आज दिनांक..

निळ्या रंगाचं, प्लॅस्टिकचं कव्हर असलेली डायरी होती दादांची.
म्हणजे ते कव्हर वर्षाननुवर्षे एकच. फक्त साल बदललं, की आतली डायरी बदलायची! दरवर्षी एक स्वस्त, साधी डायरी आणायची अन तिला हे छान निळे कव्हर घालायचे.

ही डायरी आमच्या लोखंडी कपाटाच्या सर्वात छोट्या ड्रॉवरमध्ये असायची. मला प्रचंड उत्सुकता- या डायरीत काय असेल. ही डायरी काढून, खूप गंभीरपणे विचार करून, एकांतात बसून दादा काय लिहित असतील, असा प्रश्न पडायचा नेहमी.

ही डायरी, अन ड्रॉवर आम्हाला कधीच बघायला मिळायचे नाहीत. कपाट उघडे असताना एकदा धाडस करून, स्टूल घेऊन डायरी काढली. आधी तिच्या चकचकीत निळ्या कव्हरवरून हात फिरविला. मग ती हळूच उघडली. आत सुवाच्च्य अक्षरातलं नाव, पत्ता, त्याभोवती थोडी नक्षी. मग पुढे काही महत्वाच्या सनावळ्या. म्हणजे नात्यातली लग्ने, निधने, वास्तू, जन्म इ. कधी झालेत ते...

पुढे पाने उलटली, तर सगळे हिशेब दिसू लागले.
वेगळे हे, की एकही आकडा नाही. सगळे काही शब्दांत..!!
एकशे साठ रुपये सुताराला टेबलासाठी दिले... एक्केचाळीस रुपये बाजार.. चार रूपये पेन आणि पेन्सिल... एकवीस रुपये लग्नाला आहेर... सतरा रूपये एस्टीची तिकिटे... अन बरंच काय. काही तर सांकेतिक भाषेतही..
यापलीकडे झालंच तर हिशेब जुळविणे. न जुळला तर तो फरक, अन प्रश्नचिन्हे वगैरे..

हे सर्व अगदी निरखून बघत असताना मागून धपाटा बसला, अन मी व डायरी- दोघे सोबतच स्टुलावरून खाली पडलो. त्यानंतर मला भरपूर रगडल्यावर, 'त्या डायरीला हात लावशील तर खबरदार' असा दमदार इशारा देऊन दादांनी आवरते घेतले..

ही माझी 'डायरी'शी झालेली पहिली जवळची भेट.
***

नवीन वर्षाच्या आसपास दादांसोबत दुकानात कॅलेंडर घ्यायला गेलो, की तिथे निरनिराळ्या छोट्यामोठ्या आकाराच्या, निरनिराळ्या रंगाच्या, प्लॅस्टिक किंवा पुठ्ठ्याची कव्हर्स असलेल्या डायर्‍या गठ्ठ्याने अन हारीने ठेवलेल्या असायच्या. त्या नव्या कोर्‍या डायर्‍या कितीतरी वेळ हावर्‍यासारखा मी न्याहाळत राही. दादांची नजर चुकवून एखादी उघडून तो नवाकोरा वासही घेई. अशी सुंदर दिसणारी, गुळगुळीत पानांची डायरी त्यांनी विकत घ्यावी असे मला वाटायचे. पण ते आपली साधीच घेत. त्यांच्यालेखी त्या मुखपृष्ठ आणि छानछान पानांपेक्षा डायरीतला हिशेब महत्वाचा होता.

मग घरी येऊन दादा त्या डायरीची पूजा करीत. बस. त्यानंतर मात्र ती डायरी कपाटात जाई. काही लिहिण्यासाठी ती बाहेर निघाली तरी दादा जवळ येऊ देत नसत.

मला मात्र दुकानात घेतलेला तो कोर्‍या पानांचा वास पुन्हापुन्हा आठवत राहायचा. त्या कोर्‍या गुळगुळीत पानांवर मी निळ्या-मोरपंखी शाईच्या पेनने लिहितो आहे, अशी स्वप्नेही पडायची..
***

मला या ओबडधोबड दगडात माझं शिल्प दिसतं आधीच. मी फक्त आजूबाजूचा अनावश्यक भाग तेवढा काढून टाकतो- असं एक शिल्पकार म्हणाल्याचं मला आठवलं.

असंच डायरीतल्या या कोर्‍या पानांचंही होत असेल का?

वीज चमकून शुभ्र रेघ अचानक आभाळभर पसरावी तशी दिसत असेल एखादी कल्पना कोर्‍या पानांवरच्या रेघांमध्ये. कधी कवितेच्या ओळी तर कधी मन भरून उरलेली पावसाची एखादी पागोळी. कधी आपलेच काळेकुट्ट प्रतिबिंब, तर कधी असंख्य विचार-विकार-विखार.

कित्येकदा सुचतात अचाट कल्पना, अन कधी तिथेच कल्पनांचा गर्भपात. कधी राग, द्वेष, मत्सर; तर कधी कंटाळा, वैराग्य, फ्रस्ट्रेशन.

कधी हौस म्हणुन जुळलेले यमक, तर कधी पुढे मिळालेल्या यशाचं गमक.

कधी ही डायरी- सखी-सोबती, जन्माची एकच साथीदार मिळाल्यासारखी. नवसाची. तर कधी जन्माची वैरी. अगदी हाडवैरी. अशी की पुन्हा तिच्याकडे फिरून पहावं वाटू नये. कधी दर दिवसाला उतावीळ होणारी अभिसारिका, तर कधी महिने-वर्षे वाट बघणारी समजूतदार, जोडीदार..

कधी पै-पैचा हिशेब, तर कधी भावनांची अमर्याद उधळण. कधी स्वच्छ प्रतिबिंब, तर कधी आपलंच एक गढूळ, डहुळलेलं अंग.

हे सगळं म्हणजे डायरी असेल का? की यातलं नक्की काय असेल?
***

शाळेत गेलो, अन मोठ्यांची आत्मचरित्रे वाचनात आली. त्यातल्या बर्‍याच जणांना रोजनिशी लिहायची सवय. यांच्या अक्षरांतली यांची डायरी बघायला मिळाली, तर काय मौज येईल- असे मनात येऊन जाई.

अगदी याच वयात- आपणही का लिहू नये आपली दैनंदिनी- असं वाटू लागलं. अन मग सुरूच झालं पुढचं काम. मागल्या वर्षाच्या वह्यांमधल्या शिल्लक राहिलेल्या कोर्‍या पानांची जाड दोर्‍याने शिवून दादांनी करून दिलीच एक नवीन वही. मग तीमध्ये काय वाटेल ते येऊ लागले- कॉमेंट्री केल्यासारखा दिवसभरचा वृत्तांत. गृहपाठ अन अभ्यासाचे वेळापत्रक. भाषणांची तयारी. निबंध अन पेपरातले आवडलेले उतारे. ही फक्त 'माझी वही' म्हणून मला आवडू लागली..

मग हळूहळू लक्षात आलं, की आपण म्हणतो, तितकी ही 'माझी' नाही. रोज ही वही दादा बघतात, अन त्या भितीनेच आपण आपल्याला पाहिजे ते लिहू शकत नाहीये..! तीत खरं तर आपल्याला बरंच काही लिहायचं आहे. त्रास देणार्‍या मुलांबद्दल. एखादा खेळ न खेळता आल्याबद्दल. एखादा खेळ नेहेमी खेळावासा वाटल्याबद्दल. एखादे शिक्षक अजिबात न आवडल्याबद्दल. एखाद्या शिक्षकांनी चुकीचं शिकविल्याबद्दल. नेहेमी माझ्याकडून गणिते सोडवून घेणार्‍या काळ्याभोर डोळ्यांच्या मुलीबद्दल. सचिन तेंडुलकर आणि मिरासदारांना भेटावसं वाटल्याबद्दल..

मग ही वही सुटलीच. सुटली म्हणजे मनातनं सुटली. 'अभ्यासाचे वेळापत्रक' एवढ्यापुरतीच ती मर्यादित रहिली. दादा मात्र ती वही रोज अभिमानाने बघत राहिले..!
***

श्री. ना. पेंडशांचं 'लव्हाळी' वाचतो आहे. अन बरंचसं स्वत:शी रिलेटही करतो आहे. एका बी.एस्.सी. झालेल्या मध्यमवर्गीय तरूणाची रोजनिशी.

सुट्ट्यांनतर कॉलेज सुरू व्हायला अन डायरीलाही आज दोन महिने झालेत बरोबर. आत्मपरिक्षण अन सुधारणा हा डायरीचा एक हेतू असतो असे म्हणतात. पण सुधारणा झाली का? अन किती? चुका कबूल करण्यात आपण कमी तर पडत नाही ना? डायरी लिहिताना हातचं राखून लिहिलं जातं का? कशासाठी हा खोटेपणा?

स्वतःबद्दलची अन दुसर्‍यांबद्दलची मते ही 'फक्त स्वतःचीच' असू शकतात. ती चूक की बरोबर- कोण ठरवणार?

ही डायरी म्हणजे दिवसभरात घडलेल्या भौतिक घटनांचा वृत्तांत, किंवा न घडलेल्या घटना रंगवून स्वतःचे समाधान करून घेण्याचीही जागा नव्हे. तर भौतिक जग अन माझी मानसिक स्थिती यांना जोडणारी पातळी आहे, दुवा आहे. दु:ख, आनंद, आश्चर्य, वैताग अशा अनेक भावनांना थोडीफार वाट करून देण्याचा मार्ग. कबुलीजबाब. गाळणी. रिहॅबिलिटेशन सेंटर.

पण माझी डायरी अशी आहे का?
कुणास ठाऊक. आपण काही महात्मा किंवा ब्रम्हदेव नाही बुवा. जे घडतंय ते ठीक मानून पुढे चलावं.
***

इंजिनियरिंगच्या निमित्ताने होस्टेलला भरती झालो, अन डायरीला थोडी मोकळीक मिळाली. मग बहुतेक सगळं तीत येऊ लागलं. पण तरिही घरातला पगडा कमी व्हायला बरेच दिवस लागले. थिअरी, प्रॅक्टिकल, सोपे, अवघड, मास्तर, क्लास- हेच विषय जास्त. फार झालं, तर पाहिलेले सिनेमे अन फिरणं वगैरे. यात मग मध्येमध्ये- निवडणुका, क्रिकेट. करिश्मा कपूर किंवा काजोल सेक्सी दिसल्याची नोंद. पाकिस्तानवरचा राग. बाळ ठाकरेंचं कौतुक. चांडक मास्तरला खवीस वगैरे शिव्या. 'पोरी टापल्याचा' वृतांत.

पहिली दोन वर्षे होस्टेलला काढल्यावर नंतरची दोन वर्षे बाहेर. म्हणजे एका कॉलनीतला बंगला. खाली मालक, वरती आम्ही असा थाट. आमच्या डायरीला बहर आला, तो इथे!

इथे डायरीत मोठ्ठे-मोठ्ठे उतारे लिहू लागलो. डायरी या विषयावर पार्टनर्सशी तावातावाने चर्चा करू लागलो.कसं अगदी छान वाटायचं. आपण फार विद्वान वगैरे असल्यासारखं वाटायचं. तसं लिहायचोही मग डायरीत. वादविवादातल्या संवादांसकट. पण खाऊन-पिऊन सुखी..!

मग प्रत्येकाचा होतो तसा- कहानी मे ट्विस्ट. पण हा नतद्रष्ट ट्विस्ट आपल्याला कितीही त्रास देत असला, तरी आपण स्वत: सोडून इतर कुणालाच हा 'ट्विस्ट' वगैरे वाटत नाही. जाणवला, कळलाच, तरी इतर सगळे मूर्खात काढतात. पण आपल्याला उगीचच आपण अन आपली डायरी संपन्न वगैरे असल्यागत वाटायला लागतं.

बंगल्याच्या खालून बाल्कनीचा आधार घेऊन वेलमोगरा वर आला होता. बंगल्याच्या मालकाच्या कन्यारत्नाला ही फुले डोक्यात माळताना आम्ही पाहिले..
मग आम्ही, अन आमची डायरी- दोघेही सोबतच माकड झालो..!!!
***

.... आज 'माया मेमसाब' नावाचा पिक्चर सीडी आणून, लेक्चर बंक करून पाहिला.
काहीतरी अद्भूतरम्य, स्वर्गीय हवं असणारी मनस्वी वृत्तीची माया. ती रंगवत असलेल्या फँटसीत बसणारा पुरूष शोधणारी. पण सरळ व्यवहारात हे असलं काही न बसल्यामुळे शेवटी आत्महत्या करणारी. कलात्मकतेकडे झुकणारे हे चित्र सत्तर टक्के लोकांच्या डोक्यावरून जात असेल...

.... आज वर प्यायचं पाणी आलं नाही, म्हणून पाणी घ्यायच्या निमित्ताने खाली गेलो. हातात चिठ्ठीचं मणामणाचं ओझं. काय झालं काही कळलं नाही. वर आलो तेव्हा प्रचंड थरथरत होतो, हात मोकळे होते.
पार्टनर साला पेद्रू. थोडं सावरल्यावर हलकं व्हावं म्हणून आयुष्यातलं हे पहिलं अचाट डेअरिंग सांगून टाकलं, तर माझ्यापेक्षा जास्त घाबरला. सामानच आवरायला घेतलं की. तिचा खवीस बाप आता लाथ मारून बाहेर काढणार म्हणून! मग खालून हसण्या-खिदळण्याचा आवाज आला तेव्हा जीव भांड्यात पडला.
पण आता यातून काय काय अर्थ काढायचे? चला, एंड रिझल्ट काहीही असो. काहीच न करता गप्प बसलो, अशी रुखरूख तर लागून राहणार नाही....

.... आज तिची मान पूर्णपणे खाली. जाऊ दे. २-३ दिवस दुर्लक्ष करावं. पण जमेल का?....

.... आज माझी मान पूर्णपणे खाली. बघू या किती जमतंय.....

.... आज कुणीच मान खाली घालण्याचा प्रश्न आला नाही. आमनेसामने नाहीच. एकदम कर्फ्यू....

.... च्यायचा वैताग साला. वैताग हा शब्द डायरीत पुन्हा-पुन्हा लिहायचा वैताग आला आहे आता. नेहेमी डोक्यात जत्रा असतेच. आता हे नवीन डफडं घुसवून घेतलंय वरून. अभ्यास अन टर्मवर्क- दोघांच्या नावाने बोंब आहे. काही खरं नाही.
एफ.ई. च्या पोरींमध्ये आमच्यातल्या काहींना भयानक इंटरेस्ट. रॅगिंग बॅन केलंय, तरी काहीतरी कारणाने हे टापणार. इडियट साले.
श्या! कशातच राम नाही....

.... मशिन डिझाईनच्या शीट्सना 'स्टार्ट-ऑन' साइन घेतली, पण त्यासोबत लेटमार्कचा आहेरही मिळाला. वैताग देण्याचं काम ह्या मास्तराइतकं दुसरं कुणाला जमणार नाही. संध्याकाळी भणंगासारखं एकटाच फिरलो. अन आता लाईट नाही. रात्री अडीच वाजले तरी झोप नाही....

.... नेहेमीप्रमाणे फॉलो केलं आजही. अन संध्याकाळी दसर्‍याचं सोनं द्यायला खाली गेलो, तर तिची गडबड पाहून हसूच फुटलं. पण पुढे काहीच नाही. बोललो तर खाली मान. अन नाही, तर टप्पोरे डोळे रोखून जुलूम. बाई गं, काय करू- ते तरी सांग....

.... आज बरोबर सहा महिने झालेत. हो नाही, नाहीही नाही. संधी साधून बोलायला गेलं, की गोरा चेहेरा आणखीच गोरामोरा. अन यापेक्षा जास्त काही करायला आमच्याकडनं होणे नाही. आम्ही म्हणजे शंभरांतले नव्व्याण्णव असतात तसे. आमचा 'डर' चा शाहरूख वगैरे तर मुळीच होणार नाही....

.... अमृता प्रीतमचं भाषांतरित 'एक होती अनिता' वाचलं. 'स्त्रीच्या नकारातही काही संस्कार, संयम असतो' हे अन असलं बरंच काही वाचल्यावर अलीबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे वाटलं....
***

'सहा महिने' झाल्यानंतर काही तरी केलंच पाहिजे नाही का?
डायरीची गेल्या सहा महिन्यांतली काही विशिष्ट पाने फाडली. त्याला 'कव्हरिंग लेटर' लिहिलं. ती बंगल्याच्या गेटमध्ये आल्याचं निमित्त साधून हे तब्बल १०-१२ कागदांचं घडी केलेलं गाठोडं खाली 'प्लीज, हे उचल' म्हणत फरशीवर टाकलं. तर ही न ऐकल्याचं नाटक करून 'पप्पा, दूधवाला तुम्हाला हिशेबासाठी बोलावतोय' म्हणत दरवाज्याच्या जवळ जाऊन बोंब मारतेय. तो खवीस बुढ्ढाही हे पांढर्‍यास्वच्छ कागदाचं एवढं मोठं भेंडोळं आंधळ्यागत ओलांडून पुढे गेला, नशीब.
मी चक्रावून झोकांड्या देत पुन्हा ते भेंडोळे उचलले. मेंदूचे बहूतेक तुकडे झाले असावेत, पण तंगड्यांचे तुकडे होण्यापेक्षा परवडले!
वर आल्यानंतर अंगात दीडदोनशे डिग्रीचा ताप आहेसं वाटलं. मग अर्धा तास शांत पडून 'सुटका' सेलेब्रेट केली. साजरं केलं. स्वतःचा, सगळ्या जगाचा राग-राग केला.

त्यानंतरची पंचवीसेक पाने फुल्ल.. कादंबरीच!
आता ही डायरी वाचून हसू येतंय....

आयुष्य पुढे चालूच राहिल्याची नोंद डायरीनेही घेतली. पण एक मात्र खरं की या चार वर्षांच्या कडूगोड आठवणींचा हा केंद्रबिंदू होऊन बसला. बाकीचे सर्व प्रसंग, घटना या बिंदूभोवती वेगवेगळ्या त्रिज्यांच्या वर्तुळात कमीअधिक भडकपणे किंवा सौम्यपणे जाऊन बसले.
याची जाणीवही डायरीनेच करून दिली..
***

.... वेरूळला जाऊन आलो. चक्क एकटा. कैलास लेणे अप्रतिम. काही ठिकाणी त्या दगडांचा आकार, त्यांचं त्या गुहांमधलं विशिष्ट स्थान, मधल्या मोकळ्या जागा, खास तिथलाच म्हणता येईल- असा एक गंध, त्या शिल्पांवर विशिष्ट कोनांतून पडणारा प्रकाश.. या सर्वांमुळे असा काही स्पेशल इफेक्ट साधला गेला होता की तिथनं हलावसं वाटेना....

.... वाढदिवसाला सालबादाप्रमाणे दादांचं ग्रिटींग आलं. अमुक यशस्वी वर्षे संपवून तमुकाव्या वर्षात पदार्पण. शुभेच्छा वगैरे. त्यातल्या 'यशस्वी' शब्दाकडे गृहपाठ न केलेलं पोरगं मारक्या मास्तरकडे बघतं तसं बघत राहिलो. काहीतरी संकल्प सोड म्हणे. कोणत्याही परिस्थितीत जगत राहायचा संकल्प सोडला आहे- हे काय कमी आहे?....

.... दोन-अडीच महिन्यांनी आज डायरी आठवली. हे सालं, असंच होतं.
अर्थात रोज लिहिण्यासारखं काय असणार? आठला उठलो, नऊला चहा, दहाला आंघोळ, अकराला कॉलेज, तीनला प्रॅक्टिकल.. हे?
पण कुणाला सांगितल्यावर कसं मोकळं वाटतं, तशीच डायरी. वर म्हणजे, डायरीला जे काही सांगू शकतो, ते सगळ्यांना नाही काही सांगू शकत..
'अंतर्मुखी- सदा सुखी' असं कुठे तरी आज वाचलं, ते उलटं पाहिजे असं वाटलं. हे असं फालतू 'अंतर्मुखी' वगैरे नसणार्‍यांची डायरी एकदा बघितली पाहिजे, नाही का?
गेल्या तीन दिवसांत पाच सिनेमे! काय पण ऐष चालू आहे. काय, मरणार वगैरे आहोत की काय?
आज डायरीचा वाढदिवस. मागल्या वर्षी हे आमचं अपत्य जन्माला आलं, तेव्हा ते फारसं जगेल असं वाटलं नव्हतं. त्याची फारच हेळसांड झाली, पण तरी बिचारं अजून तग धरून जगतंय. सालं, चिवट हाडाचं दिसतंय..!

.... नेमाडेंचं कोसला अन दळवींचं पुलं-एक साठवण वाचून पूर्ण केलं. आज महाशिवरात्र. दोन्ही वेळेला उपवास. जय जय शिवशंकर करीत आयुष्यात पहिल्यांदा घोटा प्यालो. एकूण एक अवयव सुटे होऊन आपल्याभोवती नाचताहेत, असे वाटू लागले. स्वतःची ही स्थिती पाहून रात्रभर हसत राहिलो....
***

कॉलेज संपलं. मला अन डायरीला जबाबदारीची सर्वांना या वेळेला होते, तशी जाणीव झाली. कॉलेजात व्यवहार पाच टक्केही शिकलो नाही हे समजून गेलं.

तीन पोरांना 'शिकवून' दादा थकले होते. आयुष्यभर दहावीचं गणित विज्ञान शिकवत राहिले, पण व्यवहारातली गणितं हाताबाहेर चालली होती. त्यामूळे मी पटकन मार्गाला लागावं, ही अपेक्षा गैर नव्हतीच. वेळोवेळी आलेल्या त्यांच्या लांबलचक पत्रांतून ती स्पष्टपणे व्यक्त होत होती.

मग चारचौघांसारखा लागलोच कामाला. डायरी आता थोडी बाजूला पडली, पण सुटली मात्र नाही. शिकणार्‍या भावांना जमेल तसे पैसे पाठवून दादांचा थोडा भार हलका करण्याचाही प्रयत्न केला. पण एव्हाना दादांचं सगळंच बदललं होतं. काय होतंय, ते सांगत नव्हते.

मग एकदा तपासणीच्या निमिताने कळलं, दादांना असाध्य व्याधी आहे. सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसणार्‍या त्यांना लिव्हर कँसरनं गाठलं होतं. लास्ट स्टेज. शंभरांतले नव्व्याण्णव मोजून झाले होते.

आयुष्यभर दुसर्‍यांची मनं सांभाळणार्‍या या माणसाने शेवटीही त्रास दिला नाही. नवीन बंगल्याचं पाडव्याला भूमीपूजन केल्यापासून अन पोटात दुखायला लागल्यापासून बरोबर पंधरा दिवसांनी दादा आयुष्याच्या गणितातल्या शेवटच्या उत्तरावर आले.

डायरी अश्रूंशिवायच भरपूर आक्रंदली. पुन्हा एकदा कादंबरी झाली. दादांची सुवाच्च अक्षरांतली पत्रे आठवू लागली..
***

दादा, तुमचं अक्षर फार सुंदर होतं. आमचीही अक्षरे तुम्हीच घडवलीत. बाहेरची हवा लागून ती नंतर बिघडलीही. मग तुम्ही पन्नाशीनंतरही अगदी छापल्यासारखं लिहित असल्याचं बघून आम्हाला लाज वाटे. प्रत्येक गोष्ट लिहून ठेवणे, हिशेब ठेवणे, नोंद ठेवणे ही खूप चांगली सवय तुम्ही लावून घेतलीत. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या सुरेख अक्षरांतल्या नोंदी, डायर्‍या बघितल्या अन आभाळाएवढं आश्चर्य आम्ही सगळे करीत राहिलो. सर्वांनी मनाशी कबूल केलं, की इतक्या व्यवस्थित, बारीक-सारीक डिटेल्स अन हिशेब लिहून ठेवणे आम्हाला आयुष्यात कधी जमणार नाही. मी शिकत असताना तुम्ही मला लिहिलेली पत्रे आजही माझ्याजवळ आहेत. अक्षर इतकेही बिघडू न देता दोन-चार पाने तुम्ही सहज लिहित होता. त्या पत्रांत काय नव्हते? काळजी, उपदेश, गप्पा, गोष्टी, उदाहरणे, व्यवहार, घटना, सुविचार अन तुमच्या मिस्किल स्वभावाची झलकही! आज ती पत्रे काढून वाचण्यासाठी मोठे धैर्य लागेल; पण प्रत्येक मुलाने, विद्यार्थ्याने वाचावीत, अशी ती आहेत. ही पत्रसंस्कृती आपल्या घरात तुम्हीच निर्माण केलीत. आम्हाला पत्रे लिहिण्याबाबत तुम्ही पुन्हापुन्हा बजावून सांगत होतात. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला लिहिलेलं हे पत्र मी कुठल्या पत्त्यावर पाठवू? दादा, तुम्ही कुठे आहात?
***

महिने, अन वर्षे गेली. मी समजूतदार झालो की नाही, हे माहिती नाही; पण डायरी जरूर झाली. डायरीशी कधी खोटं बोललो. सगळ्या घडलेल्या गोष्टी अन मनातलं एकूण एक आवर्तन सांगायचं- हा करार मोडला. क्वचित खोटी आत्मप्रौढीही केली. महिने-महिने कधी तिच्याकडे पाठ फिरविली. तर कधी मुसळधार पावसागत एकाच दिवसात वीस-पंचवीस पाने खरडली. कधी कवितांची वही, कधी टर्मवर्कचे वाया गेलेले कागद, कधी चिटोरा तर कधी सुंदर मुखपृष्ठाची एक्झिक्यूटिव्ह डायरी अशा वाटेल त्या रुपांत तिला वागविलं. पण तिनं सहन तर केलंच, वरून मला सांभाळूनही घेतलं. कसोटीच्या क्षणांत आधार दिला. कधी पाठ थोपटली, तर कधी पाठीवर सांत्वनाचा हात फिरविला. माझ्या लिहिण्याचं तिनं कौतुक केलं. अन लाखो वेळा काहीच न बोलता माझ्या समोर आरसा धरला..! ती माझी 'डायरी' झाली, दैनंदिनी किंवा रोजनिशी नाही..
***

शेवटी आपल्याला हवं असतं तरी काय?
लहान होतो, तेव्हा दहा फूट सायकल चालवायला मिळाली, तर आभाळाला हात टेकायचे बाकी असायचे. आता?
वर्तमानातच जगलं, तर बरेचसे प्रश्न सुटतील बहुतेक. पण तसं होत नाही. माणूस जगतो, तो आठवणी अन आशा, यांवरच. म्हणजे भूत आणि भविष्य यांवर.

म्हणजे असं, की काल आपल्याला पडलेले प्रश्न आज हास्यास्पद वाटताहेत. आजचे प्रश्न उद्या मोडीत निघतील. अन उद्या काय प्रश्न पडणार आहेत त्याची चर्चा आजपासून. आयला, मजा आहे!

या आठवणी अन आशा यांचे कॉकटेल- म्हणजे रोज पडणारी स्वप्ने. फुक्कटचा सिनेमा रात्रभर.
कित्येक स्वप्ने तर लिहून ठेवावी इतपत भारी. म्हणजे सस्पेन्स, ऍक्शन, कॉमेडी, थ्रिल, फिक्शन अन बर्‍याच काहींचं मिश्रण. पण त्यातली अर्धी-अधिक स्वप्ने जागे झाल्यावर अजिबात आठवत नाहीत.
या स्वप्नांची वेगळी एक डायरी करावी म्हणतो मी.
आता आजच बघा ना...

होस्टेलमधले जिने, आमच्या जुन्या एम्.डी. ची केबिन, साईटवर काम करणारे लोक, माझ्या क्लायंटचा रिसेप्शन एरिया, खालून वर आलेला वेलमोगरा, गॅदरिंगसाठीच्या गाण्यांची प्रॅक्टिस उशिरापर्यंत करून घेणारा मास्तर हे सगळे मला एका ठिकाणी दिसतात. मी भंजाळतो. हे सगळे वेगळे लोक, वेगळ्या जागा, वेगळी गावे अन वेगळे प्रसंग असे एकत्र कसे झालेत, हे कळत नाही...

सायकल चालवणारा मी हे काहीतरी वेगळं होतंय, हे जाणवून थबकतो. तर चहूकडे अंधार दिसतो. एवढ्या अंधारात आतापर्यंत सायकल कशी चालवत होतो, याचं नवल वाटतं. बंगल्यांची कॉलनी असावी, पण अंधारात नीट समजत नाहीये. तशातच एक पांढरा स्वच्छ कुर्ता पायजमा घातलेला माणूस काठी आपटत येतो. हा गडी उभा नि आडवा, अन काळाकुट्ट चेहेरा. लालभडक डोळे- त्याच्या चेहेर्‍यापेक्षा मोठे भासणारे. हातात जाड बांबूसारखी काठी. ती काठी आपटल्यावर, देवळातल्या नगार्‍यावर थाप मारल्यावर होतो तसा भलामोठा आवाज, अन पाठोपाठ प्रतिध्वनींची आवर्तने..

कोण सांगतं, किंवा कुठून कळतं कुणास ठाऊक, पण हा माणूस सगळ्यांच्या समस्या सोडवतो म्हणे!
मी विचार करतो- काल आपल्याला पडलेले प्रश्न आज हास्यास्पद वाटताहेत. आजचे प्रश्न उद्या मोडीत निघतील. अन 'तुझ्या समस्या मला सांग..' असं हा काठीवाला माणूस दरडावून विचारतो आहे. हा म्हणे आपले प्रश्न सोडवून देणारा. आपल्याव्यतिरिक्त दुसरा, तिसराच कुणीतरी. कसं शक्य आहे?

मी जोरजोरात मान हलवतो. जणू जोखड उतरवण्याचा प्रयत्न केल्यागत. स्वप्नातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केल्यागत. अन ते खरंच स्वप्नच असतं. अगदी स्वप्नात विचार केला होता, त्याप्रमाणे..!

मी लख्ख जागा होतो. गडद अंधारातच मला उद्याचा दिवस दिसतो. लख्ख अगदी.
मी व्यवस्थित उठून बसतो. उशाची डायरी हातात घेऊन, लिहिण्यापुरते लाईट लावून लिहायला घेतो...

-SAJIRA