उभं जाळतं उन...

माझ्या दर भारतभेटीत भीक मागणारी कमीत कमी पन्नास माणसं मला नक्कीच भेटत असावीत. भीक मागण्याच्या त्यांच्या तर्‍हाही मला चांगल्या ओळखीच्या झाल्या आहेत. कोण बनवतो आणि कोण खरंच नाइलाजाने भीक मागतो हेही ओळखू येतं. मुंबई विमानतळातून बाहेर निघाल्यावर सिगारेट फॅक्टरीजवळ पाचेक मिनिटं टॅक्सी वाहतुकीमध्ये अडकते आणि मग एखादा भिकारी सर्वात आधी तिथे मला भेटतो. किती ठिकाणांची नावं घेऊ? बसथांब्यावर, आगगाडीच्या स्टेशनात, कुठल्यातरी पुलावर, दुकानात, आपण घाईने चालत असलेल्या रस्त्यावर, बाजारात अनेक ठिकाणी भीक मागणारी माणसं भेटतात आणि माझ्या ह्रदयाला डोळे फुटतात.

अमरावतीहून मला अकोल्याला जायचं होतं. जरी सकाळची अकराची वेळ असली, तरी बाहेर ऑक्टोबरातलं कडाक्याचं ऊन सांडलं होतं. वाटत नव्हतं की, नुकताच पावसाळा संपून आता अगदी काही दिवसांतच गोड-गुलाबी हिवाळा सुरू होणार आहे. विदर्भात इतकं दणकट, जळजळीत ऊन मे महिन्यातदेखील मी कधी अनुभवलं नव्हतं. फक्त दहा मिनिटांत 'महाराष्ट्र परिवहन मंडळाची' गाडी अकोल्याला निघणार होती. खिडकीच्या गजावर हात ठेवून बाहेर दिसणारं दृश्य मोठ्या कुतुहलाने मी बघत बसलो होतो. ठिकठि़काणी केळी, चिकू, संत्र्यांची सालपटं, मेणकापडाच्या फेकून दिलेल्या पिशव्या, इथे-तिथे उधळलेले कागदाचे चिटोरे, टोपल्यांतून खाद्यपदार्थ विकणारी बाया-माणसं, घोंगावणार्‍या माश्या, डेपोच्या भिंतींवर पुरुषांनी मारलेले फवारे, त्यावरच चिकटवलेली सिनेमांची पोष्टरं, केरकचरा, गर्दी ... पेट्रोलाचा, उलट्यांचा, विडीचा वास ... भारतातलं हे दृश्य जरी मला नवखं नसलं तरीही इतक्या वर्षांनंतर आपण हे दृश्य पाहत आहोत हे मात्र मनाला उमजत होतं. खूप खूप वर्षांनंतर एखादा विसरलेला प्रसंग आठवून जावा आणि त्याचा एक आगळावेगळा आनंद व्हावा, तसं काहीसं मला वाटलं. तिथल्या वातावरणाचा मला मुळीच त्रास झाला नाही की किळस आली नाही.

गाडीतल्या भीक मागणार्‍यांकडेही माझं तितकंच लक्ष होतं. कुणी लहानशी काळीसावळी पोरगी झाडू घेऊन आली आणि आता केर काढून झाल्यानंतर ती पैसे मागायला येणार म्हणून मी हातात आधीच नाणं काढून ठेवलं होतं. त्यानंतर आलेली आजीबाई दीन स्वरात एका सिनेमाचं गाणं गाऊन गेली. तिलाही मी पैसे दिले. नंतर एक काळा चष्मा घालून आलेला मनुष्य - त्यालाही दिले. गाडी सुरू व्हायला झालेला उशीर आणि वातावरणातील उकाडा या दोन्हींमुळे गाडीतले प्रवासी पार बेजार झाले होते. त्यामुळे भीक मागायला आलेल्यांवरदेखील काही जण खेकसत होते, चिडत होते. इतक्यात गाडीचा चालक आला आणि गाडी थरथरू लागली. आता काही सेकंदांतच गाडी सुरु होणार म्हणून सर्वांना हायसे वाटू लागले. बस निघणार इतक्यात मोठ्या लगबगीने एक भीक मागणारी मध्यमवयीन स्त्री वर चढली. तिच्या चेहर्‍यावरची धांदल, पायातील ठेका, अंगविक्षेप या सार्‍यांतून हे कळत होतं की आता गाडी निघणार आहे हे तिलाही माहिती आहे. पण तरीही भीक मागायला ती वर चढली आणि वाहनचालक किंवा गाडीतले उतारू आपल्याला वर चढू देणार नाहीत हे समजून पहिल्याच पायरीवर पाय ठेवल्याबरोबर मोठ्या ठसक्यात ती म्हणाली -- "उभं जाळतं ऊन बाई, तसं जाळतं हे आयुष्य. तुमच्या हृदयातली उलीशीच माया द्या.. उलीशीच मदत करा. माणूस म्हणून जगा. या दुंड्या जिवाला मदत करा. या जीवनासमोर पाय लटपटतात. तुमचे आणि माझेपण. पण मी दुंडी आहे." कंटाळवाण्या नाटकात वा सिनेमात एखाद्या नटाने आपल्या पात्राशी एकरूप होऊन संवादातील एकूणएक शब्द जिवंत करावेत आणि तसे करताना आपला चेहर्‍यावरील अभिनय कुठेच कमी पडू न द्यावा तशा प्रकारे या स्त्रीचे आगमन झाले होते. तिच्या स्वरातून आर्तता उमटत होती, तिच्या शब्दांतून कारुण्य ओघळत होतं, सच्च्या माणसात असावा तसा धीटपणा तिच्यात होता आणि त्याहूनही अधिक प्रामाणिकपणाचा अंश. गाडीत बसलेल्या अनेकांचे हात खिशांपर्यंत पोचले आणि तिच्या ओंजळीत टपाटप नाणी गोळा झाली.

माझ्या बाजूला बसलेला मुलगा म्हणाला "ही फार नशीबवान आहे. बाकीच्यांना सर्वांनी हाकलून लावलं, पण हिला मात्र पैसे मिळालेत." त्या मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंसं मला वाटलं; पण त्याला ते त्याला कळेल की नाही या संकोचात मी माझ्याशीच बोललो. बाहेर ऑक्टोबराचं ऊन ती बाई म्हणाली तसं खरोखर "उभं जाळतं ऊन..'" आहे असं मलाही वाटत होतं. जीवनासमोर पाय लटपटतात असं मलाही खूपदा वाटून जातं. तिला हवं असणारं उलंसंच प्रेम, उलीशीच दया, माया मलाही नेहमीच हवी असते. इतर भिकारी तोच तो अभिनय करून भीक मागतात. पण या बाईकडे तिचे शब्द होते. तेच तिचं वैभव! सर्व प्रवासी तिच्याकडे बघून दयेने विरघळले याचे कारण म्हणजे तिचे संवाद, तिची शब्दकळा, तिनं पेललेलं शब्दांचं वजन!

खरंच, शब्दांना किती मोल असतं!

- bee