नखचित्रे

कला : नखचित्रे

सादरीकरण : manaku1930
छायाचित्रण : himscool

नख चित्रकला
ह्याला चित्रकला म्हणायचं का हस्तकला हे जरा कोडंच आहे, कारण चित्रकला म्हणजे चित्र काढण्याची कला आणि हस्तकला म्हणजे हातांचा वापर करुन वस्तू बनविण्याची कला. नखचित्रकला ही ह्या दोन्ही कलांचा एक सुरेख संगम आहे.
गणपतीच्या ६४ कला आपणा सर्वांना ठाऊक आहेतच. अनेक कलांवर श्रेष्ठत्व संपादन करणे ही काही सोपी गोष्ट नाही त्याचप्रमाणे ह्या ६४ कलांत शिल्प, नृत्य, नाट्य, वादन ह्या कला जपणे जसे महत्त्वाचे आहे तसेच ह्या कलांचा सुरेख संगम साधत त्या जोपासणे, वाढवणे हे तर त्याहूनही अवघड असे काम. तर आज आपण ह्या ६४ कलांव्यतिरिक्त अजुन एक नाविन्यपूर्ण व तितकीच आकर्षक अशी नख चित्रकला बघूयात. 'नखचित्रकला' वाचल्यावर काय वाटतंय, नखावर एखादे चित्र रंगांच्या माध्यमातून काढणे! तर छे असे मुळीच नाही. हल्ली आपण अंगठ्याच्या सहाय्याने विविध व्यक्तिरेखा बघत असतो परंतु नखचित्र म्हणजे एखाद्या ड्रॉइंग पेपरवर नखाच्या सहाय्याने चित्र रेखाटणे. यातही नखांचा वापर अतिशय कौशल्याने समान दाबाने केला तरच ते चित्र सुरेख व समतोल दिसते. त्याच्यासाठी नखांचा काही विशेष आकार असतो का, किंवा अजूनही काही गोष्टी असतात का, ह्या सर्व गोष्टी आता आपण प्रत्यक्षच बघू या.
[video:http://www.youtube.com/watch?v=ZbxF9xbWhUY]

आमचे आजोबा श्री. म. ना. कुलकर्णी नखचित्रं काढण्यात वाकबगार आहेत. त्यातील वैशिष्ट्ये आपण त्यांच्याकडूनच समजून घेऊ या. ते म्हणतात "ही कला अवगत करणे फारसे कठीण नाही. मूलत: तो हाडाचा कलाकार असणं आवश्यक आहे. पेन्सिलनं अथवा एखाद्या रंगातून चित्र काढणं हे नखचित्रकलेपेक्षा जास्त सुलभ असतं कारण त्यात काही ढोबळ चुका आपल्या लक्षात आल्यातर आपण ते खोडरबराच्या अथवा इतर मार्गानं दुरुस्त करू शकतो आणि चित्र आपल्या मनाप्रमाणं काढू शकतो. नखचित्रकलेत तसं करता येत नाही म्हणून सुरुवातच मोठ्या विचारपूर्वक करणे प्राप्त असते. हे चित्र कसे काढले जाते हे आपण पाहू या. ह्यात दोन बोटांच्या नखांचा वापर करावा लागतो. त्यात अंगठ्याच्या नखाचा वापर अनिवार्य आणि बाकीच्या चारही बोटांपैकी मधल्या बोटाचा उपयोग करणं जात सोयिस्कर व श्रेयस्कर. दुसरी गोष्ट म्हणजे जी नखं वापरली जातात ती थोड्याफार प्रमाणात वाढवलेली असावीत. नखांचा मूळचाच आकार थोडासा कंसासारखा गोलाकार असतो त्याचा उपयोग आपल्याला चित्रातली गोलाई सुबकरित्या काढण्यासाठी होतो. आणखी एक विशेष म्हणजे माझ्या दृष्टीनं ह्या कलेला काही मर्यादा आहेत. फार मोठा कागद (थोडा जाड) घेऊन चित्र काढणं जरा अवघड जातं. अंगठा आणि मधलं बोट ह्यांतील अंतराच्या जास्तीत जास्त दुप्पट अथवा अडीच पट ड्रॉईंग पेपर घेतल्यास चित्र साकारण्यात अडथळा येत नाही. आपल्याला हवं त्याप्रमाणे चित्र काढता येते. पानं, फुलं, पक्षी, झाडी, चंद्र, सूर्य इ. प्रकारची चित्रं रेखीवपणे काढता येतात. दुसरी गोष्ट म्हणजे मधल्या बोटाच्या आणि अंगठ्याच्या नखात कागद धरावा लागतो. चित्र एम्बॉस करता येणं ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. सुलट आणि उलट ह्या बाजूंचा विचार करून चित्र तयार करावे लागते. अनेक वेळा त्याप्रमाणे चिमटीत धरलेला पेपर उलट सुलट फिरवावा लागतो आणि चित्रांना आकार द्यावा लागतो. हा चित्रकलेचा प्रकार फार थोड्या लोकांना माहिती आहे.
ह्या चित्रकलेचं प्रात्यक्षिक ज्यावेळी मी अमेरिकेतील (कॅलिफोर्निया) महाराष्ट्र मंडळात करून दाखविलं त्या वेळी त्या लोकांना आश्चर्य वाटलं. अशी कला आम्ही पहिल्यांदा अनुभवली असे उद्गार अनेक जणांनी काढले. माझ्याकडून ती आत्मसात करण्याचाही बर्‍याच जणांनी प्रयत्न केला.
कागद दोन्ही बोटांच्या मध्ये असताना नखांवर किती प्रमाणात दाब द्यायचा आणि कागद उलट किंवा सुलट केव्हा करायचा हे सरावानं जमू लागतं पण हे सर्व करत असताना कलाकार उपजतच चित्रकार असावा लागतो हे लक्षात ठेवणं जरूरीचं आहे."