चंद्र-तारे खूप झाले...!

चंद्र-तारे खूप झाले,
आता कोसळलेल्या उल्कांवर लिही
पाने-फुले नेहमीचीच,
आता उन्मळलेल्या मुळांवर लिही

प्रेमभंग नित्याचा,
आता रोजच्या विनयभंगावर लिही
'तुलसी-महात्म्य' पुरे,
आता बाटवलेल्या गंगांवर लिही

हिरवा मळा छानच,
आता काटेरी कुंपणावर लिही
भाटगिरी सोड आता,
राजाच्या माजोरेपणावर लिही

'माझे', 'मी', खूप आता,
आतल्या 'कमी'पणावर लिही
आणि सिरीयल्सचा आत्मा असलेल्या,
छद्मीपणावर लिही

जीवघेणे कटाक्ष बस,
रोजच्या 'जीव देण्यावर' लिही
अन हुंडा घे‌उनही 'सावित्रीचा'
जीव घेण्यावर लिही

'कर्माचे ओझे' जाणतो,
अता पुस्तकांच्या ओझ्यावर लिही
आणि सौभाग्य लेणे विस्कटणार्‍या,
कर्जाच्या बोज्यावर लिही

हिरवा‌ईचे वर्णन वाचले,
'न वाचणार्‍या' वनरा‌ईवर लिही
आपण स्वत:लाच लोटतोय ना वेड्या;
त्या भयाण खा‌ईवर लिही

-मानस६