बैल कमाई

तिठ्यावर थाम्बलेल्या येष्टीकडे बगीत दादान प्रश्न टाकला, 'आज पावणे कोणाकडे?'

'पावणे, खयले पावणे?,' दाजीची नजर पण पावण्यार पडली. तोपर्यंत परीटघडीची पैरण आणि स्वच्छ पांढरं धोतर नेसलेली एक व्यक्ती येष्टीतून उतरून त्याच्या दुकानाकडे चालू लागलेली त्याने पाहिली. चहाच्या भांड्याखालचा विस्तव जरा मोठा करेपर्यंत पावणा त्याच्या दुकानाकडे येऊन पोहोचला. समोरच्या लाकडावर शिसलीने काहीतरी खुणा करणार्‍या जगल्याने एकदा मान वर करून पावण्याकडे पाहिले असले तरी तो पुन्हा त्या फळीवर रेघोट्या ओढण्यात गढून गेला. पावणा येऊन दाजीच्या हाटेलात टेकला म्हणताच दाजीने पाण्याच्या एक गलास पावण्याच्या समोर सरकवला.

नुकतीच दिवाळी होऊन गेलेली, आणि तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला. घरोघरी तुळशी वृंदावनाची सजावट चाललेली. असल्या हंगामात असा अनोळखी पावणा सकाळच्या येष्टीने उतरतो ही कल्पना दादाला पटेना आणि त्याच्यातला गुप्तहेर जागा झाला. आलेल्या पावण्याच्या चालीवरून बोलीवरून तो नक्की कुठे चाललाय आणि कश्यासाठी आलाय हे त्याला काढून घ्यावे वाटले.

'काय पावण्यानू, कसा काय? सगळ्या व्यवस्थीत?' दादाने चौकशी सुरू केली.

'होय, एक चाय द्या.' पावण्याचे 'होय' हे उत्तर आपल्याला आणि चायची आर्डर ही दाजीला होती हे दादाच्या लक्षात आलं. आता पुढे विषय वाढवल्याशिवाय पावण्याकडे माहिती काढता येणार नाही हे त्याने ताडले. मदतीसाठी त्याने जगल्याकडे पाहिलं पण जगल्या अजूनही पट्टी घेऊन कसलीतरी करामत करण्यात मग्न होता. तिकडे दाजीची पडत्या चहाची आज्ञा घेऊन चहा गाळायला गेला.

'आज हडे खंय?' मग त्यानेच सुरुवात केली.

'सहजच,' पावणा अजूनही फार बोलायच्या तयारीत नसावा. त्याने पाण्याच्या गलास उचलून शेजारच्या झाडाखाली दोन चार चुळा टाकल्या, आणि तो चहाची वाट पाहत बसला. बोलत नसला तरी तो दादाकडेच बघत होता हे दादाच्या नजरेतून सुटले नाही. पण तेवढ्यात दाजीने एक चहाचा कळकट कप पावण्यापुढे आणून ठेवला, आणि तोही तिथल्याच एका खांबाला टेकून उभा राहिला.

कपातला चहा घोटाघोटाने घश्याखाली ढकलत बसलेल्या पावण्याकडून फारश्या गप्पांची अपेक्षा करता येणार नाही असं मनाशी म्हणत दादा उठणार येवढ्यात पावण्याने,

'इकडे प्रकाश गवळी कोण?' असा प्रश्न टाकला.

'प्रकाश गवळी? तुमका कित्याक? ' पावणा बोलतोच आहे तर त्याला अजून बोलता करावा, दादाने विचार केला? 'पानी घाल म्हटल्यार...' पावण्याच्या मनात आलं पण त्याने फक्त

'नाय सहजच, थोडी चौकशी करूची होती ' एवढंच उत्तर दिलं.

'प्रकाश गवळी? नाय बाबा कोण म्हायत अश्या नावाचो माणूस. जगल्या तुका ठावक आता काय रे कोण हो गवळी?,' गावातला माणूस आपल्या माहीत नसणे म्हणजे पावणा चुकीच्या गावाला आला असणार अशी त्याची खात्री पटली. उत्तरादाखल जगल्याने फक्त मान हलवली आणि त्यातून होय अगर नाही कोणताही अर्थ काढता आला असता.

'असां काय? तुमच्या गावची बडी असामी आसा असा लोक सांगतत आणि तुमका ठावक नाय?'

'बडी असामी? काय भानगड काय?,' दादाची उत्कंठा वाढू लागली.

'भानगड कसली? स्थळाची चौकशी करूक इल्लंय,' पावण्याने कबूल केलं.

'म्हणजे सोरगत? अरे वा? मुलगी काय करता तुमची?' आता दादाला फुकट फौजदारी करायला वाट सापडली.

'चेडू माझां नाय हो, आमच्या मेवण्याचां, म्हणजे भाची माजी. शिकलेलां आसा, हुषार आसा. तेच्या लग्नाचा बगतों,' पावण्याने म्हायती पुरवली.

'कोणीतरी एक मुलगो सुचवलो, तेची चौकशी करूक इलंय.'

'पण शिकलेली म्हणजे किती शिकलेली?' दादा चौकशी सोडायला तयार नव्हता. दाजी अजूनही दादाकडे बघत बसला होता.

'नॉनमॅट्रिक पास, पण मुम्बैक शिकलेलां, म्हणजे बगा मुम्बैच्या शाळेत, तेवां एकदम फाड फाड मराठी बोलता. मराठी वाचूक लिवाक पण येता. आमच्याकडे कोणाचा पत्र लिवचां वाचूचा असलां काय येतत लोक. आमचे मेवणे मिल मध्ये होते नाय,' पावणा माहिती पुरवू लागला होता.

'कोणीतरी स्थळाची माहीती दिली. शिक्षाण मोठासा नाय, पण मालदार आसामी आसा, तेवां म्हटलां मी चौकशी करून येतंय.'

'अरे व्वा. म्हणजे एकदम मुम्बैची सोरगत आसा तर. जगल्या आयकलस काय, एकदम मुम्बैची सोरगत. तिकडे रेल्वे असता, इमाना असतत काय? आपल्या सारख्या नाय,' खरंतर ही माहिती जगल्यालाही होती, पण तो बोलत नाहीय तोपर्यंत आपल्याला बडबड करायला काहीच हरकत नाही, हे दादाने ताडले.

'आमच्या कडे कोणी इमान बगलां कधी? आमची म्हातारी, म्हणजे आजी आमका पोटाबुडी घेवान उभी रवा इमान वरसून जाताना आमच्यार पडात म्हणान.'

'इमानाचा रवांदे पण हो प्रकाश कोण तुमका ठावक आसा काय? लाखभर रुपये आसत म्हणता तेच्याकडे.'

'आमच्या गावात एक प्रकाश, ' खूप वर्षापूर्वी 'जयप्रकाश, जयप्रकाश' ही आरोळी आठवून तो मनाशीच हसला.

'तुमी असां करां ह्या पाननीतसून सरळ जावा, आणि घरटाणार एक आंबो दिसलो काय डाव्या बाजूक एक घर दिसतलां, थंय जावा,' जगल्यान मान वर करून एकदम माहीती दिली.

'अरे तू पकल्याच्या घराकडे पाठवतय काय तेंका?, पकल्याकडे नाय...,' दादा पुढे काहीतरी बोलणार होता, पण दाजीने वटारलेले डोळे त्याने पाहिले आणि, 'वेळ.. वेळ नाय तेच्याकडे, काय समाजलां,' उठणार्‍या पावण्याला तो म्हणाला. पावणा पाणंदीत चार पावलं जातो न जातो तेवढ्यात,

'अरे पण परकाश म्हणजे आपलो पकलो? तेच्याकडे खंयले लाखभर रुपये? लाख तर सोड, शा शंभर खापरे गावताना मारामार.'

'दादा, जरा वगी रवशीत. म्हणान तुका सांगतंय, माणसाचे कान उघडे आणि त्वांड बंद व्हया म्हणान, ' जगल्याने सुनावले.
'पण लाख रुपाये? अरे मुम्बैची व्हकाल असली म्हणान काय, कोणाक कायव सांगशात काय?'

'तेणां पकल्याचो पत्तो इचारल्यान, मी पकल्याचो पत्तो दिलंय. तेच्याकडे लाख रुपये आसत काय, लाख दगडधोंडे आसत माका ठावक नाय. पण एक सांगतंय, अवनू पकल्याचा आयेन घराक रंग लावलेन, शाकारणी केलेन, तेवां पकल्याच्या लग्नाची तयारी करतहा ती, ह्यां मी तुका सांगतंय,' जगल्या.

'पण लाख रुपये? पकलो मेलो ढोरां राखता माजी आणि तेच्याकडे लाख रुपये.'

'पकल्याच्या आयेचो धंदो काय तुका ठावक आसा? आदी तेचो इचार कर आणि मग माका विचार करून उत्तर दी. मुम्बैच्या आकाशात इमाना फिरली तरी गावकारांका काय अक्कल इली नाय,' .

'तरी, परकाश गवळी? तेचा आडनाव गवळी आसा?,' दादा बडबडत वाटेला लागला.

* * *

दोन चार दिवसानी चांगला इस्त्री केलेला पांढरा शर्ट आणि पांढरा शुभ्र पायजामा चढवलेला पकल्या दाजीच्या दुकानावर पोहोचला तेव्हा दाजीचं तोंड दोन मिनिटं तसंच उघडं राहिलं. यापूर्वी पकल्याला मळका गंजी आणि अर्धी विजार या शिवाय दुसर्‍या कुठल्याच वेषात त्याने पाहिलं नव्हतं. कधी पटकन न बोलणारा जगल्याही एक क्षण अवाक झाला, आणि लगेच,

'या नव्हरदेव,' म्हणाला.

'हं,' हाताने बाकड्यावरची धूळ झाडत पकल्याही बाकड्यावर टकला, "किती धूळ झाली हंयसर.'

'धूळ? हां हां धूळ, येष्टी गेली नाय रे मगाशी, तेची धूळ,' दाजी डोळे मिचकावीत म्हणाला. जगल्याची मान खाली होती पन तरी तो हसतोय हे पकल्याच्या लक्षात आले.

'हसा, हसा, दिवस इलेत तुमचे,' पकल्या म्हणाला.

'हसां नाय तर काय? कालपर्यंत थंय मेरेर मळकी चड्डी घालून बसस मारे, तेवां नाय तुका धूळ दिसली?'

'नाय दिसली, पण आज हे असले कपडे घातलंय तेवां तरी दिसा नये काय? आपल्याकडे जावची थंय धूळ नुसती. दाजी जरा फडको मार,' बाकड्यावरची धूळ आपल्या कपड्यांना लागेल म्हणून तो अजूनच अंग चोरून बसला. उत्तरादाखल दाजीने एका कळकट्ट फटक्याने होती ती धूळ इकडे तिकडे केली, आणि त्याबद्दल पकल्याकडून शिव्याही खाल्ल्या.

'पकल्या ह्या नवीन कपड्यांचा काय?' जगल्याने विषय काडला.

'तुका कित्याक? आमी काय नये कपडे घालू नये का काय?'

'घालुचे रे, चिडतय कित्याक? पण आज न्हवर्‍यासारखो नटान भायर पडलंस म्हणान आपलां इचारतंय.'

'लगीन करतंय, जवळ जवळ ठरलां. आता ठराव बिराव झाले काय मग झालां,' फारसे आढेवेढे न घेता पकल्याने सांगून टाकलं.

'तां ठावक आसा रे, परवा पावणो घराक पाटवलंय नाय मी? परकाश गवळी विचारी होतो,' जगल्याने विषयाला हात घातला.

'हां तेच. मुलीचे मामा, घर बगूक इल्ले. सकाळी दुधाचो रतीब घालतंय नाय तेवां तेंका कोणी सांगला गवळी म्हणान.'

'दुधाचो रतीब, मेल्या माझ्या म्हशीचा दुध चोरतस काय? तरीच मी म्हणतंय हल्ली म्हस दुध देणां नाय ती,' दादाने कुठूनतरी प्रवेश केला.

'मेल्या दादा, मस्करी करू नको हां, तुझी म्हस पावशेर दुध देताना मारामार, तेतूर मी चोरतलंय काय, आणि इकतलंय काय?'

'तुका कसा समाजलां, माजी म्हस काय दुध देता ती?' दादा लगेच भांडणाला सज्ज होत म्हणाला.

'मेल्यानू वगी रेवा रे, आदी पकलो लगीन करता तेचा काय ता बगा. दादा बस आदी बस खाली,' जगल्याच्या या वाक्याने भांडण मिटलं, 'भेटलास काय तडक्यार मडक्यां कित्याक, जरा निवौन खांवक शिका.'

'तसां काय नाय रे, मी वगीच मस्करी करी होतंय. बरां पकल्या तुका काय मदत होई ती सांग म्हणजे आमका तयारेक लागाक बरां,' दादा खरं तर लाख रुपयालाच हात घालणार होता पण जगल्या भडकेल म्हणून त्याने थोडा वेळ काढायचं ठरवून टाकलं.

'मदत? अरे घरचां लगीन. तेच्यात मदत मागाची कसली. उध्यापासून उद्यापासून आपण सगळ्यांनी पकल्याचा घर सजवायचां काय? टेकू लावचे हत ते मी लावीन, दाजी वाटेरचे झाळके जरा कापून घे, दादा तुझी गोरवां पकल्याच्या गोठ्यात बांदाक लाग. अरे पावणे मुम्बैचे असले तरी आमी काय कमी नाय,' जगल्याने लगेच कामांची वाटणी केली. 'पावणे ठरावाक कधी येतले?' प्रश्न पकल्याला होता.

'चार दिवसानी, गुरुवारी म्हुर्त काडून.'

'मग बरां झालां, तोपर्यंत सगळी तयारी अगदी शाप बरोबर करून टाकुया. पण पकल्या एक विचारू?' दादाला रहावत नव्हतं.

'पकल्याकडे लाख रुपये खंयचे?' जगल्याने दादाचं वाक्य पूर्ण केलं.

'आयेन सांगलेन, कोणी इचारलां तर लाखाचे दागिने आसत घरात म्हणान सांग, मिंया तरी कदी बगलंय लाख रुपाये?,' पकल्या उठत म्हणाला.

'मी ताबडतोप कपडे शिवाक टाकतंय, पकल्याचा लगीन म्हणजे आपलां लगीन... म्हणजे आपल्या घरातलां लगीन. मी हो चललंय,' दादाही लगबगीने निघाला.

* * *

घराची तात्पुरती डागडुजी आणि सफाई झाली तोपर्यंत गुरुवार उजाडला. शुभकार्याची सुरूवात म्हणून दादाने एक आंब्याच्या पानांचा टाळ आणून माटवाला बांधला. पकल्याची आये शेतातून सापसुरळी फिरावी तशी अंगणापासून मागील दारच्या पडवी पर्यंत उगाचच फिरत होती. मुलाचं लग्न आणि त्यात मुम्बैची मुलगी या बातमीने तिची मान ताठ झाली होती. त्यात दादा, दाजी, जगल्या कामाला लागून त्यानी बहुतेक सगळी तयारी केली त्यामुळे तिला पकल्याचा अभिमानही वाटला. 'खरे मित्र हां, खरे मित्र,' असं चार पाच वेळा म्हणालीही. दादा अधून मधून घरातून फिरून लाखाचे दागिने कुठे दिसतात का बघत होता. त्याने पकल्याच्या आयेला विचारून पाहिले पण म्हातारीने काही दाद लागू दिली नाही. स्वतःच्या बायकोला आणि आईलाही त्याने विचारून पाहिलं पण त्या दोघीनाही कल्पना नव्हती. शेवटी पाहुणे यायच्या जरा आधी पुन्हा थोडा धीर करून त्याने पकल्याचा आयेला विचारले.

'गे आवशी, त्या दागिनांचा कायतरी कानार इला...'

'वगी रव रे दादा, दागिने काय अशे वाटेर टाकतलंय मी? परत परत दागिने दागिने काय?'

'तसां न्हय, पण पावणे येवच्या आदी एकदा खात्री करून घेवाक होई, वगीच मी कायतरी बोलतलंय,' दादाने प्रयत्न चालू ठेवला.

'कायतरी कसो, लाखाचे दागिने घालतलंय मी पुर्‍या एक लाखाचे.'

'नक्की मा? म्हणजे नक्की एक लाख बोला मा?'

'एक लाख? तू वरती आणि धा इस हजार बोल, आमी काय पाटी येवचो नाय आता. पावणे इलेशे दिसता,' पाननीकडे बोट दाखवत पकल्याची आये पुढे झाली.

दादाही पावण्यांच्या स्वागताला पुढे झाला. मुलीच्या मामाशी सलगी करत त्याने पावण्याना खळ्यात नेलं. बरोबर मुलीची आई, मामी, वडील, आणि दोन गावकरी घेऊन आलेली मंडळी स्थानापन्न होताच, दादाने इकडेच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या. जगल्या, दाजी वगैरे मंडळी येताच त्याने सगळ्यांशी ओळख करून दिली. मुलीची आई आणि मामी आधी माजघरात आणि नंतर विहीर बगण्याचे निमित्त करून सगळं घर बघून आल्या. आता लग्नाचा विषय बोलायला हरकत नाही अशी खात्री झाल्यावर मुलीच्या मामाने सुरुवात केली. तुमची मंडळी, आमची मंडळी, पावणे-रावणे, मानपान सम्मान इत्यादी नेहमीची वळणे घेत गाडी सुरू राहिली. मधून मधून दादाची पकल्या, त्याचे मित्र, पकल्याची आई आणि गावगप्पा सांगणारी बडबड सुरूच होती. दादाची गाडी वाहवते आहे असं लक्षात आलं की जगल्याने खाकरावं असं ते ठरवून आलेले होते, त्यामुळे दादाच्या गाडीला खरडी लागण्यास मदत व्हायची. पकल्या स्वतःच न्हवरदेव असल्यामुळे आणि त्याला यातली फारशी माहीती नसल्यामुळे गप्प बसून होता. मग मुलीच्या मामानेच सुरुवात केली,

'पर्तिभा, आमची भाची, मुम्बैक शिकाक होती.' मुलगी उच्च शिक्षित नसली तरी मुम्ब_ईला शिकलेली आहे हे त्याने जाहीर करून टाकलं.

'पकलो... आपलो परकाश धावी पास,' मुलगी नॉनमॅट्रिक तेव्हा पकल्या जास्त शिकलेला आहे असे सांगितले की झाले ही दादाची शक्कल.

'हे मुलीचे वडील, मिलमधे होते,' यावर त्यानी नुसती मान हलवली.

'आमची जमीनवाडी एकदम भरपूर आसा,' हे वाक्य दादाच्या बाबतीत खरं असलं तरी पकल्याचा बाबतीत खरं नव्हतं.

'तशी आमची पण मोठ्ठी जमीन, काय? माड आसत, फोपळी आसत, रतांबे तर वेचून संपणत नाय, काय?' पावण्यांनी आपली बाजू पण तगडी आहे हे सांगून टाकले.

त्यावर दादाने गुरें, दुधदुभते, गोठा अशी स्वतःची एक यादी लावली. अजून चार दोन वाक्यात दोन्ही बाजूंची खरी आणि सांगायची यादी संपली, आणि मंडळी समोर ठेवलेला चहा संपवू लागली. कोणी काहीच बोलत नाही म्हटल्यावर दादाने माजघरात उभ्या असलेल्या म्हातारीकडे बघत,

'आणि लाख सव्वा लाखाचे दागिने तयार आसत,' असं म्हणत भुवया उंचावत म्हतारीकडे खात्रीसाठी नजर टाकली.

'सव्वा लाख, होय तर,' आये बोलून गेली. सोबतच्या बायका 'सव्वा लाख' म्हटल्यावर हातातल्या चहा तसाच धरून आयेकडे पाहत राहिल्या. मदतीला आलेल्या दाजीच्या बायकोने हातातला कप घेतल्यावर आपण गेली काही मिनिटे आ वासलाय हे त्यांच्या लक्षात आले.

'नाय, मुलाची माहेती मिळाली तेव्हां राघो म्हणालो, सत्तर हजारांचे तरी असतीत म्हणान,' मामाला वाचा फुटली.

'सत्तर कसले? एकशे वीस, बरोबर मागे आये,' दादा लगेच बोलला.

'अगदी बरोब्बर, डबोभर दागिने काय सत्तरात येतत?' आयेने खात्री दिली.

'डबोभर दागिने, म्हणजे डबो आसा तरी केदो?' प्रश्न दादाचा होता, त्याने अंदाजाने आकार ठरवला.

'तांच बोलाचां होता, म्हणजे आमचो काय इसवास नाय असां नाय, पण तुमचां घर, गोठो बगून आमच्या ह्या मनू आणि तुळश्याची खात्री पटाना,' मुलीचे वडील इतर दोघांकडे बोट दाखवत म्हणाले.'आजून पावण्यांकडे चौकशी केली पण तेंचो इश्वास बसना. म्हणजे आमी काय तुमका खोटे पाडणौं नाय, पण एकदा डोळ्यानी बगल्यार खात्री खाली असती. आता राघो न सांगल्यानी म्हणजे नक्की असतीत.'

'राघो कोण राघो ?' विषय हाताबाहेर जाऊ नये म्हणून जगल्याने तोंड घातले.

'अरे वगीच कोणाक सांगतों काय, लाखा दिड लाखाचे दागिने आसत म्हणान,' आता लाखाचे दिड लाख करत दादाही रिंगणात उतरला.

'दादा अरे....' पकल्या काही बोलणार होता, पण दादा पावण्यांकडे रोखून बघत होता.

'असतीत असतीत, आमी खंय नाय म्हणतों, पण काय आसा लग्नासारखी नाजूक बाब, तेवां हातच्या दागिन्याक आरसो कित्याक?' मामी पण बोलू लागल्या.

आता मात्र दादाला रहावेना. 'आये, तिंया आदी दागिने घेवान ये, हेंका देकवया कशे असतत दागिने ते, मगे डोळे... उघाडतीत,' वास्तविक तो 'फुटतीत' म्हणणार होता पण जगल्याचा चेहरा बघून त्याने शब्द बदलला. कनवटीला लावलेली किल्ली घेऊन आये माजघरात गेली. अंधार्‍या कोपर्‍यात ठेवलेल्या एका गंजक्या पेटीचे कुलूप उघडून तिने एक डबा हळूच बाहेर काढला आणि दुसर्‍या कुणाची नजर पडण्या_आधी पेटीचे कुलूप लाऊन टाकले. दागिन्याचा डबा घेऊन आये बाहेर अंगणात येईपर्यंत माजघरातल्या बायका परत पुतळ्यासारख्या स्थीर झाल्या. दागिन्यांच्या पेटीला चिकटून आल्यागत सगळ्या बायकाही अंगणात आल्या. डबा हातात घेण्यासाठी दादाने हात पुढे केला तरी आयेने डबा काही त्याच्या हातात दिला नाही. एका डुगडुगत्या खुर्ची वर डबा ठेवत ती तिथेच उभी राहिली. चिकटून आलेल्या बायकाही आयेला खेटूनच उभ्या राहिल्या. दादा काही बोलणार होता पण...

'दादा, तू बोलां नको आता, मिंया देकवतंय तेंका दागिने,' आयेच म्हणाली. एकाद्या जादुगाराने सगळ्यांची नजरबंदी करत एकादा पेटारा उघडावा तसा आयेने डबा उघडला. सुर्यकिरणाच्या तिरीपेमुळे अजूनच चकचकीत दिसणारे दागिने नजरेला पडताच आता सगळ्यांचे श्वासही बंद झाल्यागत शांतता पसरली. काही क्षण गेल्यावर मुलीच्या मामीने 'बगु बगु' म्हणत हात पुढे केला पण आये कुणाला हात लाऊ देणार नव्हती.

'जीवाचा रान करून जमा केलंय मी हे, तशे कोणाच्या हाताक लागुक देवचंय नाय, ' ती मध्ये आली. समोर दागिने दिसताहेत पण म्हातारी कुणाला हात लाऊ देणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलं. पुरुषांमध्ये दादा सगळ्यांच्या पुढे होता तो,

'अगे पण बगुंदे गे,' असं म्हणत आजून जवळ सरकला. दाजीची बायको इतका वेळ जवळून बघत होती, तिने आयेला बाजुला करत डबा उचलला आणि दागिन्यांवर सूर्यकिरण नीट पडेल अश्या ठकाणी धरला. आये खरं तर तिला थांबवणार होती पण ती दागिन्याला हात लावत नाही हे बघून ती तशीच थांबली. एक दोन क्षण त्या चकचकणार्‍या दागिन्यांकडे बघत दाजीची बायको तशीच थांबली आणि पटकन वळून आयेला म्हणाली.

'आये, हे दागिने खंयसून हाडलं?'

'मी कुडाळाक सोनाराकडे बसान तयार करून घेतलंय,' आये.

'कधी गेल्लं तू कुडाळाक, आणि किती दिवस गेल्लं,' दाजीची बायको.

पकल्याची आये कुडाळला जात नसे हे गावातल्या पोराटोरालाही माहीत होतं. बायको पावण्यासमोर आयेची उलटतपासणी घेतय हे न सहन होऊन दाजी,

'गो, तू म्हदी म्हदी बोलां नको ...'

'तुमी वगी रवा. आये, खरां खरां सांग. हे दागिने तू खंयसून हाडलस? कुडाळच्या खयच्यां सोनारान घडवले ते.' दाजीच्या बायकोने जवळपास दरडावत विचारलं.

आपण सांगितलेलं खोटं पचत नाही हे कळल्यावर आयेने पवित्रा बदलला आणि ती', 'नाय गो नाय, मी जावक नाय कुडाळाक, पण दागिने आसत मा?' म्हणाली.

'दागीने आसत, पण इले खयसून ते सांग, ' दाजीची बायको. दाजी बायकोला थांबवायला काहीतरी बोलणार होता पण तिच्या चेहर्‍याकडे बघून तो गप्पच बसला.

'सावकारीचे. कोणी मेल्यान माझ्याकडे पैशे मागल्यान. दहा हजार रुपाये. शेतीचे दिवस आणि बैल घेवचो म्हणान. रडकुंडेक इलो शेती अडली म्हणान. चेडवाचे दागिने गहाण ठेवल्यान. तेका चार वर्सां झाली, आता काय तो परत येतलो, तेवां ते दागिने माझे,' आयेने खुलासा केला.

'दहा हजार रुपयांका लाखाचे दागिने दिल्यान, असो होतो तरी कोण माणूस?' दाजीची बायको.

'राघो राघो कापडोसकार. कोणय असयना मेलो, माका काय? माजे पैसे तेणां नेल्यान आणि मी दागिने घेतलंय.'

'राघो कापडोस्कार? आणि तुमका स्थळ सांगान पाठवल्यान तोय कोणतरी राघोच मा?'

'होय तर, राघो कापडोसकारच,' मुलीची आई लगेच म्हणाली.

'आये, अगे तेका राघो फरारी म्हणान वळाखतत, तुका ठावक नाय,' निराशेने मान हलवत ती म्हणाली. पण म्हातारी अजून तोर्‍यातच होती.

'म्हणानत फरारी, तेचो माझ्या झिलाच्या लग्नाचो काय संबंध?' ती घुश्श्यातच म्हणाली.

'खुळी की काय आये तू? अगे हे दागिने खोटे मा गे, पितळेचे. दहा हजाराक गंडो आणि तोंडाक पाना फुसान गेलो मा गे तो,' दाजीची बायको म्हणाली.

'अरे देवा, बरां स्थळ सांगतंय म्हणान सांगान आमच्याकडसून पण दहा हजार घेऊन गेलो मायं x.x.x. ', डोक्याला हात लावत मुलीचे वडील मटकन खाली बसले.

पुढच्या पाच मिनिटात पकल्याच्या खळ्यात डोक्याला हात लावलेली आये, पकल्या आणि तो चकचकीत दागिन्याचा डबा आ वासून पडला होता. माटवाच्या दारावरचा आंब्याचा टाळ निसटून धूळीत पडला कधी, कुणालाच कळलं नाही.

- vinaydesai