आला खुशीत समिंदर

आला खुशीत समिंदर, त्याला नाही धीर
होडीला देइ ना गे ठरु, सजणे होडीला बघतो धरु ॥ ध्रु ॥

हिरवं हिरवं पाचूवाणी जळ, सफेत फेसाची वर खळबळ
माशावाणी काळजाची तळमळ, माझी होडी समिंदर
ओढी खालीवर, पाण्यावर देइ ना गे ठरु ॥ १ ॥

ताबंडं फुटे आभाळांतरी, रक्तावाणी चमक पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं काहीतरी, झाला खुळा समिंदर
नाजुक होडीवर, लाटांचा धिंगा सुरु ॥ २ ॥

सुर्यनारायण हसतो वरी, सोनं पिकलं दाहिदिशांतरी
आणि माझ्याहि नवख्या उरी, आला हसत समिंदर
डुलत फेसावर, होडीशी गोष्टी करु ॥ ३ ॥

गोर्‍या भाळी तुझ्या लाल चिरी, हिरव्या साडिला लालभडक धारी
उरी कसली गं गोड शिरशिरी, खुशी झाला समिंदर
त्याच्या उरावर, चाले होडी भुरुभुरु ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: