पंढरीची ती पताका

पंढरीची ती पताका घेऊनी भगवी करी
विठ्ठलाचा गजर होतो चंद्रभागेच्या तिरी॥धृ॥
टाळ चिपळ्या वाजती त्या एकतारी वाजते
भाव भक्तिचे सुगंधी चित्त येथे नाचते
संत सगळे जमुनी येथे गर्जती ते श्रीहरी॥१॥
ज्ञानवंतांनो जरा या या पहा कळसाकडे
वैष्णवाच्या भक्तिचा ध्वज उंच गगनी फडफडे
अमृताचा बोल ऐसा सांगते ज्ञानेश्वरी ॥२॥
वारिला येणे इथे हा पूर्वपिढीचा वारसा
ज्ञान वैराग्यात आमुच्या जीवनाचा आरसा
वाळवंटी वाजते या श्री हरीची बासरी॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: