सलाम!!

२६ जुलै,२००५. मंगळवार. अवघ्या महाराष्ट्राला मुसळधारपावसानं झोडपून काढलं तो अविस्मरणीय काळा दिवस! हा दिवस अविस्मरणीय ठरला तो काही वेगळ्याच कारणांमुळे. पूरग्रस्त भागातील हतबल लोकांची अचाट जिद्द, अनोखी सहनशक्ती आणि ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा केली गेली अशा सामाजिक घटकांची निष्क्रीयतासुद्धा हा दिवस अविस्मरणीय करून गेली.

'पाणी म्हणजे जीवन' हे अर्धसत्य होतं, पाणी म्हणजे मृत्यूही - हे अर्धसत्य कळेपर्यंत! 'पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा' हे बडबडगीत म्हणताना यापुढे येणार्‍या पिढ्यांना भय वाटावं इतका निर्मम पडला तो! सलग आठ दिवस आभाळाने महाराष्ट्रावर संततधार अभिषेक केला. सुरुवातीला उन्हाची काहिली शमविणारा आल्हाददायक पाऊस हळूहळू रौद्र रूप धारण करू लागला. रात्रंदिवस घोंघावणारा वारा, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि अंधारलेले दिवस यामुळे लहान मुलंच काय पण मोठी माणसंही मनातल्या मनात चरकली. पुढे होणार्‍या महाथैमानाची ती जणू छोटी झलकच होती.

हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला. रस्ते पाण्याखाली बुडून गेले. छोट्या छोट्या रोपट्यांनी माना टाकल्या. नेहमी नावाला पाणी असणार्‍या नद्या दुथडी भरून वाहू लगल्या. क्षणाक्षणाला पाण्याची पातळी वाढत होती. आता तर रस्ता कुठला अन् नदी कुठली हे ओळखणेच कठीण झाले. या सार्‍या बातम्या दर तासाला रेडिओ आणि टीव्हीवरून सांगण्यात येऊ लागल्या. जी गत रस्ते व नद्यांची तीच मुंबईत रेल्वे रुळांची झाली. आता रुळावरून रेल्वे जाणे अवघड होऊन बसले. मुंबईच्या वेगाला हळूहळू खीळ बसू लागली. रेल्वेवाहतूक तर ठप्प झालीच पण बस, टॅक्सी, कार, रिक्षा, दुचाकी पुढे जाण्यास कचरू लागल्या. या वाहनांमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

कोण नव्हतं त्या प्रवाशांमध्ये? शाळेमधे जाणारी लहान मुलं, कॉलेजमधली तरूण मुलंमुली, ऑफिसला निघालेले कर्मचारी, सहज पर्यटनासाठी बाहेर पडलेली कुटुंबं, औषधोपचारासाठी दूर गावी निघालेले वृध्द आजी-आजोबा, कुणाचं लग्नामुंजीचं वर्‍हाड तर कुणी कित्येक दिवसांनी घरी परतायला निघालेले फिरतीवरचे कर्मचारी. त्यात कुणाची बहीण होती, कुणाचा भाऊ होता, कुणाची आई होती, कुणाचे बाबा, पत्नी, नवरा तर कुणाचा छोटूसुध्दा त्यातच होता. बाहेर पडावं तर वर आभाळ फाटलेलं अन खाली उतरावं तर पाणी डोक्यावरुन गेलेलं. तरीही पाऊस थांबण्याचं नाव घेईना. धरणांची दहा दहा दारं उघडली. नद्यांच्या पुलांवरून पाणी रोरावत पुढे जाऊ लागलं. पाणी जीवन न वाटता मृत्यूच्या महासर्पाचा विळखा बनून गावंच्या गावं पादाक्रांत करू लागलं. तासाभरात नदीकाठच्या घरांमधे पाणी घुसलं आणि चार भिंतीत मोकळा श्वास घेत असलेल्यांचं जीवन क्षणार्धात उध्वस्त करुन गेलं.

यातच भर म्हणून की काय अतिशय तकलादू असलेली आपली विद्युत यंत्रणा आणि दूरध्वनी यंत्रणा खंडित झाली. जवळपास आठशे गावांचाच नाही तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा संपूर्ण भारताशी असलेला संपर्क तुटला. आता त्यांना मदतीसाठी हाकसुध्दा मारता येणार नव्हती. अनेक इमारतींचे पहिले दुसरे मजले पाण्याखाली गेले. रस्त्यावरुन वाहणार्‍या पाण्यामध्ये फक्त मातीच नव्हती तर घरगुती वस्तू, भांडी, कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, मेलेले प्राणी, माणसांचे मृतदेह त्यात तरंगत होते. हे सारं दृश्य अतिशय विदारक आणि जिव्हारी घाव घालणारं होतं.

तिकडे गाड्यांमध्ये अडकलेले प्रवासी गप्पा मारुन, गाणी भजने म्हणून वेळ भरून काढत होते. पण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच सारेजण हबकले. आपल्या घरचे सुरक्षित असतील ना अशी चिंता करत ते बसले आणि यांच्या वाटेकडे आशेने डोळे लावून बसण्याशिवाय घरच्यांना तरणोपाय नव्हता. आता स्टेशनवरही पाणी साठू लागलं. आहे तिथंच थांबून पूर ओसरण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण जीवनधर्म थोडीच थांबतो ? गाडीमध्ये अडकलेली लहान मुलं, माणसं तहानेने, भुकेने कासावीस झाली. तेव्हा जातपात, धर्मपंथ न बघता प्रत्येकजण आपल्याजवळील खाद्यपदार्थ इतरांना वाटू लागला. कुणी तरुण मुलगा म्हातार्‍या आजोबांचे अवघडलेले पाय चेपून देऊ लागला तर कुण्या महिलेने लहान मुलांना आईची मांडी देऊ केली. कुणी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्यांना सुरक्षित ठिकाणी पोचवत होता.

याचवेळी विविध वृत्तवाहिन्यांनी आपण सुरक्षित असल्याचे संदेश आपल्या घरच्यांना देण्याची सोय उपलब्ध करून दिली. या भीषण पावसाने दुसर्‍या दिवशी सार्‍यांनाच घरात बसवलं. पण याही पावसात ही चॅनल्स मात्र अहोरात्र अपडेट देण्यात गुंतलेली होती. तीन दिवस अहोरात्र अपडेट देऊन दुसर्‍या दिवशी सकाळी पाहायला मिळणारे हे चेहरे काय नि कशाप्रकारे काम करत होते? तेही आपल्यासारखेच कुठेतरी अडकले होते का? की हे सारं सहन करणार्‍या सामान्य माणसांप्रमाणे तेही म्हणत होते 'जिंदगीभर नही भूलेंगे वो बरसात की रात.'

ही झाली नाण्याची एक बाजू. पण याच वेळेला आपली शासनव्यवस्था काय करत होती? आपत्कालीन व्यवस्थापनाचं काम कधी सुरू होणार होतं? की असा काही प्रकार अस्तित्वातच नव्हता? या मायानगरीच्या आधारावर प्रतिष्ठा मिळालेली, सत्ता, ऐश्वर्य, प्रसिध्दी प्राप्त केलेली, सतत पुढे पुढे करणारी, प्रतिष्ठित राजकीय नेते मंडळी, सिनेसृष्टीतील चमकते तारे, भारतीयांच्या गळ्यातले ताईत असलेली क्रिकेटर मंडळी यावेळी कुठे गायब झाली होती? जेव्हा त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शासकीय ताकदीची सर्वांत जास्त गरज भासत होती तेव्हा आपला वाटा उचलण्यात का कुचराई झाली? पैसे मिळतात म्हणून हे लोक वर्ल्ड कपसाठी,जाहिरातींसाठी रस्त्यावरसुध्दा उतरायला कमी करत नाहीत.. मग खरी हिरोगिरी करायची वेळ आली तेव्हा यांची पाचांवर धारण का बसली ? का सामाजिक जाणीव, ऋण, बांधिलकी हे शब्द त्यांना पुस्तकातूनही कधी पाहायला मिळाले नव्हते? मग कशासाठी समाजाने आपलं प्रतिनिधित्व त्यांना द्यावं? हे आणि असे कितीतरी अनुत्तरित प्रश्न आहेत की जे कायम अनुत्तरितच राहणार आहेत, याची आपल्या सगळ्यांना खात्री आहे. अशा वायफळ चर्चा करून तोंडची वाफ दवडण्यात काही अर्थ नाही हे जाणून आपण उद्याच्या दिवसाची तयारी करायला लागतो.

गेल्या बारा वर्षात मुंबईनेच नव्हे तर महाराष्ट्राने, आपल्या भारताने, नव्हे सबंध जगानेच असे अनेक धक्के पचवले आहेत. कधी ते त्सुनामी, भूकंप, दुष्काळासारखे निसर्गाचे तांडव होते तर कधी WTC, रेल्वे, मंदिर, बाजारपेठांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात काळजाचा थरकाप उडवणारे मानवाचे रानटी थैमान होते. गर्दीला चेहरा नसतो असे म्हणतात..पण अशा प्रसंगामध्ये या गर्दीच्याच चेहर्‍यावर दिसलेला खंबीरपणा, कणखरपणा, दिलासा त्या गर्दीला जिवंत ठेवण्यात यशस्वी ठरला. गर्दीला कधी स्वतःची लॉबी बनवावी लागत नाही. कधी स्वत:चा पक्ष स्थापन करावा लागत नाही की त्याचे उद्देश आणि नियम लिहीत बसावे लागत नाही. मदतीच्या हाकेला ओ देण्याची पद्धत त्या पांढरपेशा रक्तात जन्मजात वाहत असते. सुरळीतपणे आयुष्य चालू असताना कुणीही समाजसेवेचा आव आणू शकतो. पण जेव्हा तुमच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं तेव्हा धर्म, पंथ, जातपात, स्त्री-पुरूष असा काही भेद उरत नाही. आपण असतो ते फक्त एक माणूस! अशा प्रत्येक वेळेला कुणाकडूनही मदतीची अपेक्षा न करता हाहा:काराच्या तांडवाला सामोरा गेला तो सामान्य माणूस! पण तो एकटा पुढे गेला नाही. त्याने आपल्या सोबत्यांनाही पुढे नेलं. स्वतःच्या डोळ्यांतील पाणी जिरवून त्याने इतरांचे अश्रू पुसले. कारण त्याला माहीत होतं की, दुसर्‍याला मदत करणं म्हणजे स्वतःचं बळ आजमावणं. शारीरिक, मानसिक, सामाजिक व ऐपतीनुसार आर्थिक परोपकार म्हणजे आत्मबळ वाढवण्याचा राजमार्ग. या त्याच्या जिद्दीवर 'दैनिक सकाळ'मध्ये ब्रिटिश नंदी या टोपण नावाने लिहिणार्‍या लेखकाची एक कविता इथे लिहावीशी वाटते. सर्व श्रेय अर्थातच मूळ लेखकाला!

सॅल्यूट!!

आय सॅल्यूट यू ऑल मुंबैवालो,
आय सॅल्यूट यू ऑल !
तुंबलेल्या गर्दीला, थकलेल्या वर्दीला,
मेलेल्या म्हशींना, सडलेल्या घुशींना,
कुत्र्यांना, मांजरांना, शेळ्यांना, कावळ्यांना
आचके देत थंडावलेल्या हजारो वाहनांना
आय सॅल्यूट यू ऑल !
बेसहारा बेचार्‍यांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या
हजारो हातांना, डिझास्टर मॅनेजमेंटच्या
भंपक उलफत्तू सरकारी बातांना
भयभीत चेहर्‍यांना अवजड पावलांना
ओल्याचिंब मानवी साखळ्यांना
मॅनहोलवर स्टूल टाकून
इशारे देणार्‍या दक्ष नागरिकांना
'पी लो अंकल,' 'यहां से आंटी' म्हणत
धीर देणार्‍या बेहरामपाड्यातील
रहमदिल तरूणांना
होड्या चालवत निघालेल्या
उत्स्फूर्त मराठी मावळ्यांना
आय सॅल्यूट यू ऑल !
शाळेत दप्तरावर पेंगुळलेल्या मुलाबाळांना
जिवाच्या आकांताने त्यांच्याकडे धावणार्‍या
चाकरमानी आयांना
डाळभात ब्रेड स्लाईस चहा कटिंग पाव बिस्कीट
देऊ करणार्‍या निम्म्या अधिक उध्वस्तांना
हूं की चूं न करता दरडीखाली गडप झालेल्या
दुर्दैवी जिवांना
अन हातगाडीवर लादलेल्या मृतदेहांना
आय सॅल्यूट यू ऑल !
आय सॅल्यूट यू फॉर
युवर करेज युवर रेझिलियन्स
अँड युवर हेल्पलेसनेस!

संपूर्ण जगातल्या माणूस म्हणून जगणार्‍या आणि जगवणार्‍या, तरीही रोज नवीन मरण झेलायला तयार असलेल्या निधड्या छातीच्या, संकटाच्या प्रसंगी एकमेकांचे हात घट्ट धरून सामोरे जाण्याचे जिगर दाखवणार्‍या, बिनचेहर्‍याच्या तरीही स्वतःच्या सामर्थ्याचा विधायक वापर करणार्‍या सामान्य माणसाला माझा त्रिवार सलाम!!

- aashu_D