ठरविले अनंते

"चिमण्या? तू शंभरी गाठलीस?"
मक्याच्या डोळ्यांत 'कोण होतास तू, काय झालास तू' असे भाव होते. हे आश्चर्य मी वयाची शंभरी गाठण्याबद्दल नसून वजनाची शंभरी गाठण्याबद्दल होतं. कारण माझ्या बायकोनं, म्हणजे सरितानं नुकताच तसा गौप्यस्फोट केला होता.

मी, सरिता, मकरंद (मक्या) प्रभू व त्याची बायको माया आणि दिलीप (दिल्या) अत्रे दर आठवड्याला भेटतो. सामान्य लोकांसाठी असलेल्या एका सामान्य बँकेत मी एक सामान्य मॅनेजर आहे व सरिता घर सांभाळते. मक्या आय टी कंपनीत मॅनेजर आहे आणि माया आयुर्वेदिक डॉक्टर आहे. दिल्या CA आहे आणि त्याची स्वतःची इन्व्हेस्ट्मेंट कंपनी आहे. 'ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हा मृत्यू' या उक्तीवर गाढा विश्वास असल्यामुळे, दिल्या अजून सडाफटिंगच आहे. त्याला चतुर्भुज करायचे आमचे सर्व प्रयत्न असफल झाल्यानं, आम्हीही आता नाद सोडून दिलाय.

"तुला आता क्विंटलकुमारच म्हणायला पायजे!" मक्यानं काडी लावली.. त्याला आम्ही काडीपैलवान म्हणतो.. सारख्या काड्या लावतो म्हणून.

"त्यापेक्षा 'चिमण्या गणपती' चांगलं आहे! यावर अजून एक पेग!" मक्यानं नावं ठेवायला सुरुवात केल्यावर दिल्या कसा मागं राहणार?

"चिमण्या, तू टिळक रोडवरून जाऊ नकोस हां! तिथं 'जड वाहनास प्रवेश बंद' अशी पाटी आहे!" मक्याला दारू आणि अतिशयोक्ती एकदमच चढते.

"हो ना! लग्नात कसा मस्त पाप्याचं पितर होता!" इति सरिता. मस्त पाप्याचं पितर? ही बया आमचा मधुचंद्र चालू असतांना माझ्यावर रुसली होती... का? तर, ती एका ओढ्यात पाय घसरून पडली आणि मी तिला हीरोसारखं उचलू शकलो नाही. पोरीपण काय काय खुळचट रोमँटीक कल्पना घेऊन लग्न करतात ना? तेव्हा मला काय माहीत असणार म्हणा.. माझं तर पहिलंच लग्न होतं.. मग काय? मधुचंद्राचा कडुचंद्र झाला.. अर्ध्यातूनच परत यावं लागलं.. मी विसरणारेय होय?

"हे बघा! या सगळ्याला सरिताच जबाबदार आहे. आमच्याकडे सगळ्यांची पोटभर जेवणं झाल्यावरसुध्दा चार माणसांच उरतं. आणि मग नवरा नावाचा हक्काचा कचरा डेपो असतोच ते डंप करायला." मी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला पण तो अंगाशी आला.

"एऽ! हा माझ्या स्वैपाकाला कचरा म्हणतो!!!" बायकांमधे कांगावखोरपणा उपजतच असतो की काय कोण जाणे. पण सरिताची ही आर्त फिर्याद ऐकून सगळे लगेच 'इस्लाम खतरेमें हैं' ष्टाईलमधे मदतीला धावले.

"पहिलं म्हणजे कोकणस्थाच्या घरात चार माणसांच जेवण उरतं ही सरासर अतिशयोक्ती आहे." दिल्याला इथं प्रादेशिक रंग देण्याचं काही कारण होतं का?.. पण त्याचं देशस्थी रक्त अशी कुठलीही संधी सहसा सोडत नाही.. हा माझा शाळेपासूनचा मित्र.. माझ्याबाजूनं बोलणं जमणार नसेल तर किमानपक्षी त्यानं गप्प रहावं.. पण सरितानं त्याला येताजाता खाऊपिऊ घालून फितवलाय!

"गाढवाला काय गुळाची चव?" इतका वेळ मोबाइलवर 'अय्या! खरंच?' इ.इ. चित्कार करणार्‍या मक्याच्या बायकोनं... मायानं.. सरिताची बाजू घेतली... एकाच वेळेला दोन्हीकडे लक्ष ठेवण्याची किमया फक्त बायकांनाच जमते म्हणा, नाहीतर मोबाईलवरची टुरटुर संपल्या संपल्या सरिताच्या बाजूनं बोलणं कुणा पुरूषाला जमलं असतं का?

मक्या: "अरे, सरिताच्या स्वैपाकाला कचरा म्हणणं म्हणजे चितळेंच्या बाकरवडीला कोळसा म्हणण्यासारखं आहे."

"गाढवांनो! निष्कारण चेकाळू नका! मी क्वांटिटीबद्दल बोलतोय क्वालिटीबद्दल नाही!"... मी जोरदार निषेध सुरू केला... "मी कोब्रा असलो तरी सरिता देब्रा आहे. रोज थोडं अन्न उरवायचं अशी माझ्या शत्रुपक्षाची शिकवण आहे व त्याचं ती निष्ठेनं अजून पालन करते.. त्याला कोब्रा काय करणार?". माझ्यावरच्या चढाईला मी अगतिकतेचं डायव्हर्जन दाखवलं.

"अन्न कशाला उरवायचं?" दिल्याचं कुतुहल जागं झालं.. डायव्हर्जनचा उपयोग झाला वाटतं.

"अरे, कधी आपल्या पितरांच्या आत्म्यांना भूक लागली तर खायला". मी नाटकी आवाजात आमच्या शत्रुपक्षाच्या कुळाचाराची चिलीम पेटवली.

"मग सकाळी अन्न कमी झालेलं असतं का?" दिल्याला यूएफओ, भुतं-खेतं अशा सर्व गूढ गोष्टींबद्दल विशेष आकर्षण आहे.

"हो! कधी कधी कमी होतं!" सरितानं सत्य परिस्थिती सांगितली.

"आईशप्पऽऽत! खरंच?" दिल्याच्या हातातला चमचा खाली पडला. आमच्या घरात भुतं येऊन जेऊन जातात आणि आम्ही निवांतपणे झोपलेलो असतो याचा भीतीयुक्त आदर त्याच्या डोळ्यांत चमकायला लागला.

"हो! मला कधी कधी रात्रीची जाग येते ना....." मी सुरुवात केली आणि इष्ट परिणामासाठी बिअरचा घोट घ्यायला थांबलो... सगळे कानात प्राण आणून ऐकायला लागले.

"तेव्हा माझ्या आत्म्याला भूक लागलेली असते आणि तो थोडंफार संपवतो." मी थंडपणे सगळ्यांच्या उत्सुकतेचा फुगा फोडला... विशेषतः दिल्याच्या चेहर्‍यावरचा अपेक्षाभंग पाहून मला हसू आवरेना.

"ते काही नाही, तू वजन कमी करायलाच पाहिजेस. You need to tighten your belt." मक्या त्याच्या कुठल्याशा अमेरिकन क्लायंटचा वाक्प्रचार फेकून परत माझ्या वजनावर घसरला.. आता नवीन डायव्हर्जन शोधायला पाहिजे.

"बेल्ट कसला टाईट करतोस? माझा डंबेलसारखा आकार होईल ना अशानं! आणि आता मला कुठलाच बेल्ट बसत नाही ते वेगळंच". माझा डायव्हर्जनचा एक क्षीण प्रयत्न!

"तू आता असली कोकणस्थासारखं खायला लाग. रोज सकाळ संध्याकाळ ताम्हनात बसेल एवढंच खायचं. नैवेद्याच्या वाटीत बसेल एवढंच तोंडीलावणं अन् कानकोरण्यात मावेल एवढंच तूप!" दिल्यानं प्रिस्क्रिप्शन दिलं.

"अरे एवढंच? अशानं मी दिसेनासा होईन काही दिवसांनी! "

"नेहमीसारखं खाल्लंस तरीही दिसेनासा होशील काही दिवसांनी!". खलनायकाच्या सुरात मक्यानं परिस्थितीचं गांभीर्य पटवायचा प्रयत्न केला.

"आणि हो! शिवाय रोज थोडा घाम गाळायचा". दिल्याचं संपेच ना.

"अरे मी घाम गाळतो म्हणून तर आमचा संसार चालू आहे ना! नाहीतर तो केव्हाच वार्‍यावर गेला असता!" डायव्हर्जनचा अजून एक प्रयत्न!

"काही एवढं आडून आडून बोलायला नकोय! सरळ सांग मला, 'तू पण नोकरी कर' म्हणून!". सरिता मुद्दाम असं करते की खरंच बोलणं कळत नाही म्हणून करते हे अजूनही मला कळलेलं नाही.

"चिमण्या! तुझे फालतू विनोद बंद कर आणि इकडे लक्ष दे नीट! सरिता, तो तुला काहीही म्हणत नाहीये!" दिल्या कसा माझ्या बाजूनं बोलला?.. छे! आज कोणावरच डायव्हर्जनचा परिणाम होत नाहीये!

दिल्या: "तू जिमला जायला सुरवात कर."

मी: "अरे पण ते फार खर्चिक असतं!"

"तू त्याचा ROI बघ आधी! तू काहीच केलं नाहीस तर दोन वर्षांत तुझ्यावर बायपास सर्जरी करायला लागेल. त्यासाठी डॉक्टरला किती द्यावे लागतील? आत्ता काही हजार खर्च केलेस तर पुढे तुझे काही लाख वाचतील!" दिल्यातला इन्व्हेस्टर जागा झाला की तो 'बुल' 'बेअर' असल्या रानटी भाषेत बोलायला लागतो. ROI म्हणजे Return on Investment हे मक्या हळूच बायकोच्या कानात कुजबुजला.

शेवटी 'एका मित्राला मृत्यूच्या खाईतून वाचवायचं!' असं सामाजिक कार्याचं स्वरूप त्या वादाला आल्यामुळं माझ्या प्रतिकाराला न जुमानता सर्वांनी 'मी वजन कमी केलंच पाहिजे' यावर शिक्कामोर्तब केलं.

******************************************************************

झालं, एका शनिवारी जाऊन आमच्या जवळच्या जिममधे नाव नोंदवून आलो... एकदम एका वर्षासाठी.. हो, कारण ते स्वस्त पडत होतं. मग बाजारात जाऊन ट्रॅक सूट, नवीन शूज, आयपॉड अशा इतर वस्तू खरेदी केल्या.. आपलं म्हणजे कसं व्यवस्थित असतं. सगळ्या जाम्यानिम्यानिशी पहिल्या दिवशी बरोब्बर सकाळी सहा वाजता जिममधे हजर झालो. गेल्या गेल्या एका ट्रेनरनं कब्जा घेतला आणि पुढचा तासभर हाल केले.. पहिल्यांदा त्यानं मला ट्रेड मिलवर चालायला सांगितलं.. चालायला कसलं? पळायलाच.. आयपॉडचे बोळे कानात कोंबून मी गाणी चालू केली आणि पळायला लागलो.. थोड्याच वेळात हेमंतकुमारचं 'दूरका राही' मधलं गाणं लागलं.. अशी धीरगंभीर गाणी पळत पळत ऐकतात काय?.. ती शांतपणे, नीट आस्वाद घेतच ऐकली पाहिजेत.. मग मी ट्रेड मिल थांबवून ऐकू लागलो..

'मंझिलकी उसे कुछभी ना खबर.. फिरभी चला जाय दूरका राही..'

वा! वा! काय आवाज आहे या माणसाचा! माझं पूर्ण लक्ष गाण्यात असतानाच हेमंतकुमार एकदम 'चला! गोखले! चला!' असं शुध्द मराठीत खेकसला.. इतका वेळ त्या दूरका राहीला 'चला, चला' करणारा हेमंतकुमार एकदम मला कसा काय चला म्हणाला?.. बघतो तर तो ट्रेनर 'हल्याऽऽऽ! थिर्रर्रऽऽऽ!' चा आविर्भाव करून मला पळायला सांगतोय असं लक्षात आलं.. आयला! पूर्वी शेतावर कामाला होता की काय?

सर्वसाधारणपणे सर्व व्यायाम प्रकार इकडे पळ, तिकडे उड्या मार, हे उचल किंवा ते ढकल यातच मोडणारे होते. जाता जाता त्यानं मला न्युट्रीशनिस्टला भेटायला सांगितलं. न्युट्रीशनिस्ट, कल्पना नायडू नावाची एक बाई निघाली.. साधारण ३५-३६ वर्षांची असेल.. पण एकदम आकर्षक.. गव्हाळ वर्णाची.. खांद्यापर्यंत रुळणारे केस.. अधूनमधून मानेला हलकासा झटका देऊन कपाळावरचे केस मागे नेण्याची ष्टाईल.. सगळच मोहक. मग माझं वजन करण्यात आलं.. ते पाहून तिनं काहीच आश्चर्य दाखवलं नाही.. माझ्यासारखी पुष्कळ वजनदार मंडळी रोजच तिला पहायला मिळत असणार म्हणा. मी तिचं सौंदर्यग्रहण करण्यात दंग होतो तेवढ्यात तिनं माझ्याकडं न बघताच बोलायला सुरुवात केली..

"तुमचं वजन उंचीच्या मानानं जरा जास्त आहे. तुमच्या उंचीला ६५ किलो वजन योग्य आहे. तुम्हाला जवळपास ३५ किलोतरी कमी करायला लागतील. आता मी तुम्हाला तुमचं डाएट सांगते." ती हे बोलत असताना प्रथमच मी तिच्या डोळ्यात नीट पाहिलं. काय विलक्षण डोळे होते तिचे.. मोठे.. काळेभोर.. नक्कीच काहीतरी जादू होती त्यात.. बोलणं ऐकता ऐकता तिच्या डोळ्यांच्या डोहात मी बुडायला लागलो.. आजुबाजूला काय चाललं आहे ते समजेनासं झालं.. फक्त 'खायचं नाही' 'खायचं नाही' असं काहीतरी खूप लांबून ऐकू येत होतं..

कल्पना: "अहो! काय झालं तुम्हाला? काय काय खायचं नाही सांगत होते मी.." मी एकदम शरमिंदा झालो.

"अंss! हां! गटांगळ्या खायच्या नाहीत! नाही.. नाही.. आपलं ते हे... बरंच काही खायचं नाही. तुम्ही मराठी फार छान बोलता हो!" मी नजर टाळत काहीबाही बकलो.. बायकांची काहीतरी कारण काढून स्तुती करणं हा सारवासारवीचा उत्तम प्रकार आहे असा अनुभव आहे.

कल्पना: "अहो! मी लहानपणापासून इथंच वाढलेय!"

मी: "असं होय? अरे वा!" याच्यात वा! वा! करण्यासारखं काय होतं? पण मी अजून नीट सावरलो नव्हतो त्याचं हे लक्षण!

कल्पना: "हां! तर मी तुम्हाला कॅलरींबद्दल सांगत होते. तुमचं वजन आहे तेवढं टिकवायला तुम्हाला साधारणपणे रोज २२०० कॅलरी लागतात. वजन १ किलोने कमी करायचं असेल तर अंदाजे ७७०० कॅलरी बर्न करायला लागतात. तुम्ही रोज जिममधे तासभर घालवला तर अंदाजे ५०० कॅलरी बर्न होतील." आयला! माझं शरीर म्हणजे जळाऊ कॅलरींची वखार आहे काय?.. सारखं काय बर्न बर्न!.. चुकून जास्त बर्न झालं तर आगच लागायची.

कल्पना: "तुम्ही दिवसभरात १८०० कॅलरी घेतल्या तर साधारणपणे ९ दिवसांनी तुमचं वजन १ किलोनं कमी होईल." अरेच्च्या! हे सोप्पं दिसतंय! म्हणजे अकाऊंटला डेबिट जास्त टाकायचं आणि क्रेडिट कमी - की बॅलन्स आपोआपच कमी होणार! मला ही डेबिट क्रेडिटची भाषा लवकर समजते. हं! पण ९ दिवसांनी १ किलो म्हणजे ३५ किलो घटवण्यासाठी वर्षभर लढायला लागणार? बापरे!

कल्पना: "तर असं तुम्ही दोन महिने करा मग आपण परत बघू!" तिनं हे समारोपाचं वाक्य टाकल्यावर डोळ्यांकडे न पाहता मी लगेच 'थँक्यू' म्हणून सुटलो.

रस्त्यानं जाताना मला उगीचच हलकं हलकं वाटत होतं.. नेहमीपेक्षा जास्त वेगानं हालचाली करत दिवस घालवला. दुसर्‍या दिवशी जाग आली ती अंग दुखीमुळे.. या कुशीवरून त्या कुशीला पण वळता येत नव्हतं.. शरपंजरी भीष्माच्या वेदना अनुभवल्या अगदी.. देवानं माणसाला इतके अवयव का दिले बरं?.. काही अवयव काढून खुंटीला टांगता आले असते तर किती बरं झालं असतं ना?.. त्यात खूप भूक लागलेली.. काही खाण्याची सोय नाही.. कसाबसा दिवस काढला.. रात्री स्वप्नात नुसते निरनिराळे पदार्थ दिसले.. हारीनं लावलेले.. जाग आली.. भूक लागलेलीच होती.. घरात फारसं काही खाण्याजोगं दिसत नव्हतं.. आत्म्यांवरचा विश्वास उडाल्यामुळे सरिता हल्ली काही उरवत नाही.. एक ब्रेडची स्लाईस खाऊन परत झोपलो.. जावे बुभुक्षितांच्या वंशा तेंव्हा कळे!

******************************************************************

असेच दोन महिने निघून गेले.. पहिल्या महिन्यात तब्बल ५ किलो वजन घटवूनसुध्दा दुसर्‍या महिन्यात मी परत पूर्वस्थितीला आलो होतो. गमावलेलं परत कमावल्याचं प्रचंड दु:ख उरावर घेऊन मी साप्ताहिक सभेला आलो.. दोन्ही बायका कुठलंसं भुक्कड नाटक बघायला गेल्यामुळे नव्हत्या.

"अरे चिमण्या? सुरवातीला जरा कमी झाला होतास. आता परत बाळसं धरलं आहेस वाटतं. डोंगरे बालामृत पितोस का काय?" माझ्या विशाल इस्टेटीवर हात फिरवीत मक्यानं ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली.

मी: "अरे! सगळं क्रेडिट डेबिट टॅली झालं". मी हताशपणे सांगितलं आणि ते दोघेही बुचकळ्यात पडले.

मक्या: "ए भाऊ! जरा सभ्य लोकांच्या भाषेत बोल ना! तू जिमला जातोस का बँकेत?""

मी: "अरे त्या जिममधली सीए आहे ना...".

मक्या: "जिममधे सीए? तुझं मानसिक संतुलन बिघडलंय नक्की!"

मी: "सीए म्हणजे कॅलरी अकाऊंटंट! माझा नवीन शॉर्टफॉर्म आहे तो!". मग मी वजन कमी जास्त होण्यामागचं क्रेडिट डेबिट तत्व सांगितलं.

दिल्या: "अच्छा! म्हणजे दोन महिन्यांत तुझा बॅलन्स बदललाच नाही! कशामुळे? जिमला जाणं होत नाही म्हणून की हादडणं जास्त होतंय म्हणून?"

मी: "दोन्हीही! मागच्या महिन्यात मी आठवडाभर दिल्लीला गेलो होतो ना ट्रेनिंगसाठी? मग एकदम खूप क्रेडिट झालं!"

मक्या: "पण ते तर फक्त आठवड्यासाठीच होतं ना? आल्यावर भरून काढायचं!"

मी: "अरे वा! तुला पण कळतं की! मला वाटलं फक्त मलाच अक्कल आहे!" मी उपरोधानं म्हणालो. "मी परत जायला लागल्यावर एकदा मराठीत पाटी नाही म्हणून गुंडांनी जिमची तोडफोड केली. ३ दिवस जिम बंद होती."

दिल्या: "हं! एकंदरीत बराच घोटाळा झालेला दिसतोय. पण एवढ्यानं तू परत ५ किलो कमावलेस?"

मी: "नाही. सध्या गोट्याला स्थळं बघतोय ना त्यामुळे अधनंमधनं शूटिंगला जावं लागतं!". गोट्या म्हणजे माझा मुलगा. कांदेपोहे कार्यक्रमाला आम्ही शूटिंग म्हणतो.

मक्या: "पहाटे सहा वाजता शूटिंग असतं का कधी? काहीही फेकतो!"

मी: "पुढचं ऐक ना माठ्या! आत्तापर्यंत १५-१६ शूटिंग झाली.. पण एकीचाही होकार नाही. मग काही ओळखीतून आलेली स्थळं होती त्यांच्याकडून खोदून खोदून कारण काढलं. तर, मी शूटिंगच्या वेळेस तेलकट तुपकट पदार्थांना नाही म्हणतो ना.. माझ्या डाएटसाठी... त्यामुळे मुली नकार देतात असं कळलं.. त्यांना होणार्‍या सासर्‍याचं डाएट म्हणजे 'फाजील लाड' वाटतात... लग्नानंतर प्रत्येक माणसासाठी वेगळा स्वैपाक करायला लागेल अशी आत्तापासून भीती वाटते त्यांना!"

दिल्या: "काय म्हणतोस? खरचं? मग आता काय करणार?"

मी: "आता सुरू केलंय, देतील ते सगळं खायला! माझं डाएट फाफललं ना पण!"

मक्या: "पण जिमला तरी जातोयस ना?"

मी: "अरे कुठलं? हल्ली लोड शेडिंग चालू झालय ना.. नेमकं सहा वाजता.. त्यामुळं माझं लोड शेडिंग थांबलय. मला वेळ पण बदलून मिळत नाहीये... पुढच्या बॅचेस फुल्ल आहेत. आणि त्यांच्याकडे जनरेटर नाहीये.. पूर्वी पॉवर जायची नाही म्हणून घेतला नव्हता."

मक्या: "मग तू सकाळी उठून पळायला जात जा!"

मी: "आमच्या इथं जॉगिंग पार्क वगैरे काही नाहीये बाबा! रस्त्यावरनं पळायला लागलो तर गल्लीतली कुत्री मागे लागतील. आणि नंतर चोर समजून लोक मागे लागतील."

दिल्या: "मग तू असं कर! एखाद्या मुलीच्या प्रेमात पड!"

मी: "काssय?"

दिल्या: "अरे तुझ्या प्रेमात कोण पडणार आहे? हे एकतर्फी प्रेम असणार आहे.. त्यामुळे प्रेमभंग अटळ.. तो झाला की झुरून झुरून कॅलरी बर्न होतील."

मी: "अरे, मला गेल्या २५ वर्षात सरितावरसुध्दा प्रेम करायला जमलेलं नाही.. काहीतरी मूर्खासारखे सल्ले देऊ नका.. आणि जिम दोन दिवसांनी सुरू होणारेय ना.. लोड शेडींगच्या वेळा बदलल्यावर!"

दिल्या: "भडभुंज्या! हे तू आधी का नाही सांगितलंस?".

मी: "पण तुम्ही कुठं विचारलंत?"

सभा बरखास्त झाली.

******************************************************************

दोन दिवसांनी माझ्या जिमवार्‍या परत सुरू झाल्या.. परत ती सगळी पळापळ, ओढाताण आणि भूक! ठरलं होतं त्याप्रमाणे कल्पनाला दोन महिन्यांनी भेटलो. मी मूळ अवस्थेला परत गेल्याचं पाहून तिनं माझं डाएट अजून कडक केलं. मी भूक मारण्यासाठी येताजाता चहा प्यायला लागलो होतो.. आता बिनदुधाचा व बिनसाखरेचा चहा.. साखर माझ्या सर्व खाण्यातून हद्दपार झाली हे जरा जास्तच झालं.. साखरेशिवाय कोकणस्थ म्हणजे पाण्याशिवाय मासा!.. त्यात भर म्हणजे फॅट फ्री दूध घ्यायला सांगितलं.. फॅट फ्री दुधाला दूध म्हणू शकतात तर डालड्याला साजूक तूप का नाही म्हणत?.. फॅट फ्री दुधातून एकदा सकाळचं सीरिअल खाल्लं.. मग ते साघ्या पाण्यातूनसुध्दा तेवढच वाईट लागेल हे लक्षात आलं आणि मी साधं पाणी वापरू लागलो.. ते बघून सरिताच डोकं फिरलं.. "हे काय असलं भिकार्‍यासारखं खायचं? त्यापेक्षा तू चांगलंचुंगलं खाऊन वर गेलेला चालेल मला! नाहीतर भूत होऊन 'भूक' 'भूक' करत पिंगा घालशील माझ्याभोवती!".. असल्या जीवघेण्या शब्दात तिनं ठणकावलं.. पण ध्येय गाठायचं म्हणजे असल्या विरोधांना सामोरं जावचं लागतं हे थोरामोठ्यांच्या चरित्रांत वाचलेलं असल्यामुळे मी विचलीत झालो नाही.

नंतर काही दिवसांनी कल्पनेच्या टेबलावर मी बर्‍याचशा बिल्डरची ब्रोशरं पाहिली आणि मला व्यवसाय वाढवायची संधी दिसली..

"काय, घर घ्यायचा विचार करताय काय? कुठे घेताय?" मी खडा टाकला.

कल्पना: "अजून काही नक्की नाहीये! नुसता अभ्यास सुरू केलाय!"

मी: "काही लोन बिन लागलं तर या माझ्याकडं. मी बँकेत मॅनेजर आहे." असं म्हणत मी माझं कार्ड दिलं.. अर्थातच डोळ्यांकडे न बघता.

कल्पना: "लोन तर मला लागणारच आहे! काय अफाट किंमती आहेत ना घरांच्या?" इथं मला दिल्याच्या कनेक्शनचा वापर करायची कल्पना आली.. समोरची नाही.. मराठी भाषेतली.

मी: "तुम्ही माझ्या मित्राला जरूर भेटा. तो तुम्हाला स्वस्तात घर मिळवून देऊ शकेल. शाळेपासूनचा मित्र आहे माझा.. अगदी खात्रीचा.. दिलीप अत्रे नांव त्याचं.. त्याची स्वतःची इनव्हेस्टमेंट कंपनी आहे.. आणि बरेचसे बिल्डर त्याचे गिर्‍हाईक आहेत. माझ्या दुसर्‍या एका मित्राला त्यानं बाजारभावापेक्षा २५% स्वस्तात घर मिळवून दिलं होतं." मी माझ्याच कार्डाच्या मागं त्याचा पत्ता फोन लिहून दिला.

कल्पना: "वा! हे बरं झालं बाई! नाहीतर मी अगदी कन्फ्यूज झाले होते.. इतके बिल्डर.. इतक्या स्कीम्स.. काही कळतच नव्हतं बघा! थँक्स हं!"

मी: "अहो थँक्स कसले त्यात? खरं म्हणजे मी आमचा धंदा वाढवायचं बघतोय!" मी प्रामाणिकपणे सांगितलं.

त्यानंतरचा एक-दीड महिना कल्पना दिल्याबरोबर रोज कुठल्या ना कुठल्या साईट बघत फिरत होती. मला पुढं काय झालं याचा काहीच पत्ता नव्हता.. मग मक्याच्या भाषेत touch base करण्यासाठी एकदा तिला मी छेडलं..

मी: "काय? घर मिळालं की नाही अजून?"

कल्पना: "हो! हो! कालच मी एक घर फायनल केलं" चला! शेवटी एक घर तिला पसंत पडलं म्हणायचं.. मलाच सुटल्यासारखं झालं.. नस्ती ब्याद मागं लावल्याबद्दल दिल्या मला शिव्यांची लाखोली वहात असणार अशी एक भीती मनात होती.. पण, आश्चर्य म्हणजे, दिल्यानं अजूनपर्यंत तरी काही कटकट केलेली नव्हती.

कल्पना: "तुमच्या मित्राच्या मदतीशिवाय जमलं नसतं हं पण मला! काय अफाट नॉलेज आहे त्या माणसाचं! मी त्यांनी सांगितलेले शेअर्स घेतले ते सगळे खूप वाढलेत." तरीच दिल्यानं मला शिव्या घातल्या नव्हत्या.. तिच्या डोळ्यांत गुंतून न पडता त्यानं चलाखपणे आपल्या रानटी भाषेनं तिला घोळात घेतलं होतं आणि स्वतःचाही धंदा बघितला होता. हाडाचा ब्रम्हचारी आहे बुवा!

कल्पना: "शिवाय त्यांच्यामुळे मला घरही स्वस्त मिळतंय!"

मी: "चला बरं झालं! मग लोन घ्यायला कधी येताय?" मी लगेच धंदा दामटला.

कल्पना: "लोनचं काम आपण उद्यापासून करू या का?"

मग कल्पना रोज बँकेत येऊ लागली. ते बँकेतल्या काही भवान्यांना खुपलं. त्यातली एक आमच्याच घराशेजारी रहाते.. ती आणि सरिता बर्‍याचवेळेला घराशेजारच्या भाजीवाल्याकडे भेटतात.. तिथं बहुतेक तिनं काडी लावली असणार.. काडी कसली चांगली दिवाळीची फुलबाजीच! अर्थात याची मला काहीच कल्पना नव्हती.

दरम्यान मला बढती मिळाली.. पगारही वाढला. दिल्यानं एका कार डीलरला पटवून स्वस्तात ३ होंडा सिटी बुक केल्या.. तो, मी आणि मक्या या तिघांसाठी. माझ्याकडं जुनी मारूती व्हॅन आहे तरीसुध्दा अजून एक घ्यायची ठरवलं! सरिताला हे काहीच माहीत नव्हतं.. आमच्या गाड्या येईपर्यंत डीलरला 'डेमो' गाडी घरी नेऊन दाखवायला सांगितली.. सरिताला सरप्राईझ देण्यासाठी. तो दुपारी ४ वाजता पाठवतो म्हणाला. लगेच मी सरिताला 'दुपारी ४ वाजता घरी थांब. मी एक सरप्राईझ पाठवतो आहे. ' असं सांगितलं. असं सगळं व्यवस्थित प्लॅन केलेलं होतं.. पण म्हणतात ना? 'God proposes man disposes' किंवा काहीतरी.. तसंच झालं.. कल्पनेला काही कागदपत्रं मला द्यायची होती आणि तिला बँकेत यायला जमणार नव्हतं म्हणून ती माझ्या घरी आली.. तेही बरोब्बर ४ वाजताच! बरं नुसती कागदपत्रं देऊन जावं की नाही? तर छे! सरितानं आग्रह केला म्हणून चहा प्यायला थांबली.. बरं निमूटपणे चहा पिऊन जावं की नाही? तर छे! चहा पिता पिता माझ्या मदतीची वारेमाप स्तुती केली.. बायकांना कुठे किती बोलावं याचा काही पाचपोचच नसतो. सगळ्यात कहर म्हणजे त्या डीलरनं गाडी घरी पाठवली नाही हेही मला माहीत नव्हतं. मी संध्याकाळी घरी जाईपर्यंत वणवा चांगला धुमसलेला होता. नेहमीसारखी सरिता गुणगुणत नव्हती.. वरती दिवाही न लावता अंधारात बसली होती. म्हटलं हिचं काहीतरी बिनसलं असेल.. शेजारची काहीतरी खडूसपणे बकली असेल.. म्हणून तिकडे दुर्लक्ष करून मी हर्षवायूच्या अपेक्षेने विचारलं..

मी: "काय पाहिलं का सरप्राईझ?"

सरिता: "हो!" तिच्या आवाजानं माझ्या काळजात चर्रss झालं. नक्कीच काहीतरी हुकलं आहे. हिचा आज वाढदिवस आहे काय? माझा आहे काय? हिनं मला काही करायला सांगितलं होतं काय? मी काही विसरलोय काय? असं काहीच नाहीये.. हां! मी तिला अजून माझ्या प्रमोशनचं सांगितलंच नाहीये.. एवढी महागडी गाडी घेऊन मी पैसे उधळतोय असं समजून तिला राग आला असणार.. त्यात नुकत्याच झालेल्या कुठल्याश्या लग्नात तिला मी नवीन शालू घेण्यास स्पष्ट नकार दिला होता.. तिच्याकडे डझनभर तरी आहेत म्हणून.. मग आता तिला चांगलाच स्कोप मिळालाय बदला घ्यायचा.. त्यात घरी एक गाडी आहेच शिवाय.. हेच कारण असणार, दुसरं काय?

मी: "काय मस्त देखणी आहे ना?"

सरिता: "हो हो देखणी असेल नाहीतर काय? सगळे पुरूष मेले सारखेच!" बायकांना आमचं गाड्यांवरचं आणि क्रिकेटवरचं प्रेम कधी कळणार?

मी: "आता एका आठवड्यात घरी येईल!" इतका वेळ नुसता धुमसणारा वणवा मी नकळत पेटवला.

सरिता: "काय? तू घरी आणणार? कायमची?" गोष्टी या थराला गेल्या आहेत हे तिला अजिबात अपेक्षित नव्हतं.

मी: "हो! कायमची! असल्या गोष्टी भाड्यानं परवडतात काय?"

सरिता: "ती भाड्यानं पण मिळते?" ही असं काय काहीच माहीत नसल्यासारखं करतेय? आत्तापर्यंत य वेळेला गाड्या भाड्यानं घेतल्या असतील आम्ही!

मी: "न मिळायला काय झालं? दुनियामे हर चीज बिकती है और भाडेसेभी मिलती है!" आमच्या बँकेत आम्हाला सारखं राष्ट्रभाषेचा वापर करा असं सांगतात त्याचा परिणाम!

सरिता: "पण एक घरात आहे ना इतकी वर्षं! तिचं काय?" सरितानं इथं एक हात स्वतःकडे केल्याचं मला कळलं नाही.

मी: "ती जुनी झाली आता! टाकून देऊ! एवढं काय!"

सरिता: "जुनी झाली? टाकून देऊ? अरे देवा!" जुनी गाडी टाकायची म्हटल्यावर ही एवढी का विव्हळायला लागली बरं? एवढं गाडीवर प्रेम? कमाल आहे बुवा!

मी: "बरं तर! नको टाकू या! दोन दोन ठेवून ऐश करू या!"

सरिता: "ऐश! तू या गोष्टींना ऐश म्हणतोस?"

मी: "ऐश नाही तर काय म्हणणार? फार कमी लोकं दोन-दोन ठेवतात!"

सरिता: "अरे! तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? सरळ सरळ दोन-दोन ठेवायच्या म्हणतोस!". 'ठेवायच्या' शब्दावरचा ठसकाही मला जाणवला नाही. आता काय म्हणावं?

मी: "त्यात हाडाचा कुठं प्रश्न आला? फक्त पैशाचा येतो. बाय द वे! मी अजून एक सरप्राईझ तुला दिलं नाही अजून! मला प्रमोशन मिळालंय आणि पगार पण वाढलाय चांगला! आता माझ्या खिशाला दोन सहज झेपतील! खरं तर जुनी स्टेटसला शोभणार नाही आता! पण ठीक आहे!"

सरिता: "आणि शेजारी पाजारी? ते काय म्हणतील याचा काही विचार?"

मी: "ते काय म्हणणार? वरकरणी 'वा! वा! फार छान चॉईस आहे हं!' असं म्हणतील पण मनातल्या मनात खूप जळतील"

सरिता: "हे तुझं सगळं फायनल आहे?" सरितानं एकदम शांतपणे विचारल. तिनं काहीतरी निर्णय घेतला होता वाटतं.

मी: "हो!" यावर सरिता काही न बोलता बेडरूममधे गेली. मी तोंड धुवेपर्यंत ती दारातून बाहेर पडलेली होती. जाता जाता 'मी माहेरी चाललेय' एवढच ओरडली. अशी ती अधनंमधनं जातेच त्यामुळे मला तेव्हा काही विशेष वाटलं नाही.. पण दोन दिवस झाल्यावरसुध्दा आली नाही, फोन पण नाही म्हटल्यावर माझी चलबिचल सुरू झाली. मी तिच्या घरी फोन लावला.. नेमका सासरेबुवांनी उचलला.

मी: "हॅलो! मी चिमण बोलतोय! सरिता आहे का?"

सासरा: "आहे! पण ती फोनवर येणार नाही!"

मी: "का?"

सासरा: "आता का म्हणून परत मलाच विचारताय?". सासरा जरा तिरसटच आहे. पूर्वी सरकारी नोकरीत होते.. तिथं अरेरावी करायची सवय लागलेली.. आणि आता वय पण वाढलं. त्यांच्या 'अरे'ला 'कारे' केलं तरच थोडा निभाव लागतो हे मला अनुभवानं माहीत झालं होतं.

मी: "अहो, तुम्हाला नाही तर कोणाला विचारणार? फोन तुम्हीच घेतलाय ना?".

सासरा: "माहितीये! उगाच अक्कल शिकवू नका! एकतर या वयात नस्ते धंदे करायचे आणि वर 'का?' म्हणून विचारायचं?"

मी: "धंदे? मी काय धंदे केले?"

सासरा: "उगी भोळेपणाचा आव आणू नका! सगळ्या जगाला माहिती आहेत तुमचे धंदे!" फोन दाणकन आदळला. नंतरचे दोन-तीन फोन असेच काहीसे झाले. असल्या तप्त वातावरणात तिच्या घरी जाण्यात काही पॉईंट नव्हता. आयला! असे कुठले धंदे मी करतोय जे मलाच माहीत नाहीत पण सगळ्या जगाला माहिती आहेत? सरिताला दिलेलं सरप्राईझ सरप्राईझिंगली असं माझ्या अंगाशी कसं येतंय?

दुसर्‍या दिवशीच्या साप्ताहिक सभेत मी माझी व्यथा सांगीतली. त्यावर बरीच चर्चा होऊन शेवटी मायाला सरिताच्या घरी पाठवायचं ठरलं. इतका वेळ दिल्या काहीच बोलला नव्हता. त्याची सारखी चुळबूळ चालली होती.. बहुतेक त्याला काहीतरी सांगायचं होतं.. पण माझ्या सरप्राईझमुळं त्याची पंचाईत झाली असावी.

"अरे हां! तुम्हाला एक बातमी द्यायची होती!". शेवटी दिल्याला आवाज फुटला.
"मी.. मी लग्न करतोय!"

"काय? तू? आणि लग्न?" आम्ही तिघेही एका सुरात ओरडलो.

माया: "कुणाशी? नाव काय तिचं?"

दिल्या: "कल्पना नायडू!"

एकंदरीत आमच्या या विश्वामित्राची तपश्चर्या कल्पनेनं भंग केलीच तर.

उरलेली सर्व सभा दिल्याची टिंगल करण्यात गेली. दुसर्‍या दिवशी माया सरिताकडे गेली.. तिच्या कल्पनेतल्या कल्पनेचं भूत उतरलं आणि सरिता घरी आली.. तिला फार अपराधी वाटत होतं.. ती मला सॉरी म्हणाली.. मी पण तिला 'सरिता! मी तुझ्यावाचून रिता आहे!' असली कादंबरीतली वाक्यं टाकून खूष केलं.

यथावकाश दिल्याचं लग्न झालं. कल्पना आमच्या दोघांच्या पाया पडली. आता मी तिला काय आशीर्वाद देणार? मी फक्त "'दिल्या' घरी तू सुखी रहा" एवढंच म्हणू शकलो.

या सगळ्या भानगडीत माझी जिम चालू होती. माझं वजन १० किलोनी कमी झालं होतं. मी आनंदात होतो.. पण.. त्यांच्या लग्नानंतर एकदा मी जिमला जायला निघालो.. जरा उशीरच झाला होता, खूप पाऊस झाला होता.. रस्त्यात प्रचंड पाणी साचलं होतं.. घाईघाईत जिमला जाताना ड्रेनेजच्या खड्ड्यात पाय अडकून पडलो.. पाय मोडला.. प्लॅस्टर घातलं ६ आठवड्यांसाठी.. मी परत प्रसरण पावणार हे लख्ख दिसत होतं.. तंगडी वर करून पडल्या पडल्या मला साक्षात्कार झाला.. मी बारीक होणं न होणं हे माझ्या हातात नाहीच्चै. ते सगळं वरती ठरलेलंच आहे.. तेव्हा आपण ------

ठरविले अनंते तैसेचि फुगावे
चित्ती असो द्यावे समाधान!

- chimanyagokhale