दिवाळी

पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळी हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस दीपोत्सवाचे असतात.

धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस. आश्विन वद्य त्रयोदशी. एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी तुम्हांला त्यांची दया येत नाही का?" त्यावर यमदूत म्हणाले, "एकदाच असं झालं होतं. हेमराज नावाच्या राजाला एक पुत्र झाला. षष्ठीपूजनाच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचं भविष्य सांगितलं की, 'हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल.' ते ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवलं. पण सोळाव्या वर्षी त्या मुलाचं लग्न होताच त्याचे प्राण घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो. त्या वेळी तिथे झालेला विलाप ऐकून आम्ही व्यथित झालो. लग्नाच्या चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू झाला होता. लग्नासारख्या अतिशय आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हांला खूप वाईट वाटलं. असा प्रसंग कोणावरही येऊ नये असं आपण काही कराल, तर फार बरं होईल." यावर यमदेव म्हणाले, "धनत्रयोदशीपासून पाच दिवस जो दीपदान करील, त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यू येणार नाही."

पुराणात सांगितलेली ही धनत्रयोदशीची कथा. मात्र या दिवसाला धनत्रयोदशी का म्हणतात, याचा उलगडा या कथेवरून होत नाही. आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी याचा जन्मही याच दिवशी झाल्याची कथा आहे. म्हणून वैद्य या दिवशी धन्वंतरीची जयंती साजरी करतात.

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगाला सुगंधी तेल, उटणे लावून गरम पाण्याने स्नान करावे, त्यानंतर यमराजाला नमस्कार करावा, दुपारी ब्राह्मणांना भोजन द्यावे, संध्याकाळी सर्वत्र पणत्या लावून शंकराची पूजा करावी, असं शास्त्रात सांगितलं आहे.

प्रागज्योतिषपुराचा राजा नरकासुर याला भूदेवीकडून वैष्णवास्त्र मिळाल्यामुळे तो फार बलाढ्य झाला व देवांना त्रास देऊ लागला. इंद्राचा ऐरावत आणि घोडा, अदितीची कुंडले त्याने पळवून नेली. याशिवाय अनेक राजांच्या एकूण सोळा हजार कन्या त्याने पळवून आणल्या, आणि अनेक राजांनाही तुरुंगात डांबले. त्याच्या या अत्याचारांनी लोक गांजले. मग इंद्राने कृष्णाची प्रार्थना केली. कृष्णाने सत्यभामेसह नरकासुरावर स्वारी करून त्याला मारलं व त्याच्या बंदिवासातील सोळा हजार कन्या मुक्त केल्या. ही गोष्ट आश्विन वद्य चतुर्दशीस घडली. मरताना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की, 'आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा मिळू नये.' कृष्णाने त्याला तसा वर दिला. तेव्हापासून आश्विन वद्य चतुर्दशी ही नरकचतुर्दशी मानली जाऊ लागली. आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करू लागले.

दिवाळीच्या तिसर्‍या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यात येतं. पुराणांत यासंबंधी कथा आहे, ती अशी - प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना कैदेत टाकले. मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे तीन पावले मावतील, एवढ्या जमिनीची याचना केली. बळीने त्रिपादभूमी वामनाला दिली. वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू, असं विचारताच बळीने आपले मस्तक नमवून त्यावर तिसरे पाऊल ठेव, असं वामनाला सांगितलं. वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले. सर्वांबरोबर लक्ष्मीचीही सुटका केली, व सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले. हे सर्व आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावास्या या तीन दिवसांत घडलं. लक्ष्मीची सुटका झाल्यानंतर, ती कायम प्रसन्न असावी म्हणून तिची पूजा करण्याचा प्रघात सुरू झाला.

पुराणांत असं सांगितलं आहे की, आश्विनी अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधते. जिथे स्वच्छता, रसिकता असेल, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यनिष्ठ, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशील पुरूष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया असतील, त्या घरी वास्तव्य करणं लक्ष्मीला आवडतं.

वामनाने जेव्हा तिसरं पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं, तेव्हा त्याने बळीराजाला पाताळात लोटण्यापूर्वी वर दिला की, 'तुझी आठवण कायम राहावी म्हणून कार्तिक शु. प्रतिपदेच्या दिवशी लोक तुझ्या नावाने आनंदोत्सव साजरा करतील.' कृष्णाने बळीराजास असा आशीर्वाद दिल्यानंतर दिवाळीला जोडून बलिप्रतिपदा साजरा करण्याचा प्रघात पडला.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा विक्रम संवताचा वर्षारंभदिन मानला जातो. या दिवशी द्यूत खेळावे, असा संकेत आहे. पार्वतीने शंकराला या दिवशी द्यूतात हरवले होते. त्यावरून या प्रतिपदेला द्यूतप्रतिपदा असेही नाव मिळाले आहे.

बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. वेदकाळी गोधन मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असे. गोदान हे अत्यंत श्रेष्ठ असे दान समजले जाई. गाईच्या ठिकाणी सर्व देवता अधिष्ठित आहेत, हा समज त्यातूनच निर्माण झाला. म्हणूनच गोपूजेची प्रथा आपल्याकडे सुरू झाली. कृष्णाच्या सल्ल्याने गोपांनी इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली. तेव्हापासून ही गायीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा, फुले खोचतात आणि कृष्ण, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात. अनेक गावांत गोठ्यातील गायी-बैलांना सजवून त्यांची पूजा करतात व मिरवणूक काढतात. ही पर्वतपूजा केली नाही, तर कार्तिक महिन्यातील सर्व धार्मिक कृत्ये निष्फळ होतात, अशी धारणा आहे.

जैन धर्मीयही दीपावलीचा उत्सव वैदिक धर्मियांइतकाच आस्थेने पाळतात. हरिवंश पुराणात या उत्सवाची सुरुवात कशी झाली, त्याची गोष्ट सांगितली आहे - आश्विन अमावास्येला भगवान महावीर या शेवटच्या तीर्थंकरांचे निधन झाले. त्या वेळी जे देव, राजे व भक्त तिथे उपस्थित होते, त्यांनी महावीरांची पूजा करून दीपाराधना केली. 'ज्ञानदीप निर्वाणाला गेला आहे, आता आपण साधे दिवे लावून त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश कायम ठेवू या', असा विचार जैनांनी केला. तेव्हापासून भगवान महावीरांचे भक्त दरवर्षी जिनेश्वराची पूजा करून दीपोत्सव साजरा करू लागले. जैनांनी ती तिथी महत्त्वाची मानून वीर-निर्वाण-संवत नावाचा एक नवा शक सुरू केला.

या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर धृवप्रदेशात होतं, त्या काळात झाला, असं मानण्यात येतं. सहा महिन्यांची दीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातील लोकांना नवीन आयुष्य सुरू झाल्यासारखे वाटत असणार आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव साजरा करत असावेत. आर्यांच्या सात पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रहायणी या तीन यज्ञांचे एकीकरण व रुपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा, अशी कल्पना आहे. पार्वण पाकयज्ञ हा पितरांसाठी असे, आश्वयुजी हा इंद्र व कृषिदेवता सीता यांच्यासाठी असे आणि आग्रहायणी हा संवत्सरसमाप्तीचा याग असे.

काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, चौदा वर्षांचा वनवास संपवून राम सीतेसह अयोध्येला परत आला, तो याच दिवसांत. त्या वेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव केला आणि तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी चालू झाला.

सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रीत्यर्थ दीपोत्सव सुरू झाला, असंही एक मत आहे, तर काही संशोधकांच्या मते सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या राज्याभिषेकसमारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तोच पुढे दर वर्षी साजरा करण्याची प्रथा पडली.

भारतीय वाङ्मयात दिवाळीचे उल्लेख अनेक वेगवेगळ्या नावांनी आले आहेत. वात्स्यायनाच्या कामसूत्रात (इसवी सनाच्या चौथ्या शतकापूर्वी) यक्षरात्री नामक उत्सवाचा उल्लेख आहे. कामसूत्रात यक्षरात्री, कौमुदीजागर व सुवसंतक या तीन सणांना 'सणांचे महामणि' असं म्हटलं आहे. ही यक्षरात्री म्हणजेच दिवाळी. यशोधराने कामसूत्रावरील टीकेत यक्षरात्री म्हणजेच सुखरात्री असे सांगून, तिचा यक्षपूजा व द्यूत यांच्याशी संबंध जोडला आहे. वराह पुराणातही कार्तिक शुद्ध प्रतिपदेला यक्षाची पूजा होत असल्याचा उल्लेख सापडतो. कुबेर हा यक्षांचा राजा, व धनाचा, संपत्तीचा राजा मानला जातो. गुप्तयुगात वैष्णव संप्रदायाच्या प्रभावामुळे कुबेराच्या पूजेऐवजी लक्ष्मीपूजनाचं महत्त्व वाढत गेलं असावं.

श्रीहर्षाच्या नागानंद या नाटकातील दीपप्रतिपदुत्सव म्हणजे दिवाळीचा सण. नीलमत पुराणात त्यालाच दीपमाला उत्सव असं नाव दिलं आहे. सोमदेव सूरी (इ. स. चे दहावे शतक) याच्या यशस्तिलकचंपूत दीपोत्सवाचे वर्णन आलं आहे, ते दिवाळीशी खूप जुळतं आहे. इ. स.च्या ११व्या शतकातील श्रीपती नावाच्या ज्योतिषाचार्याने आपल्या ज्योतिषरत्नमाला या ग्रंथावरील मराठी टीकेत दिवाळी हा शब्द अनेकदा वापरला आहे. अलबेरूनीने 'तहकिक-ए-हिंद' या ग्रंथात दिवाळीचं सविस्तर वर्णन केलं आहे. तेराव्या शतकात मेरुतुंगाने लिहिलेल्या 'प्रबंधचिंतामणी' या ग्रंथात कोल्हापुरात साजर्‍या होणार्‍या दिवालीचं वर्णन केलं आहे. चौदाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या 'आकाशभैरवकल्प' या ग्रंथात विजयनगर साम्राज्याच्या राजाने साजर्‍या केलेल्या दिवाळीबद्दल लिहिलं आहे. 'ऐन-ए-अकबरी'त अबु फझल याने दिवाळीतील रोषणाईची तुलना 'शब-ए-बारात्'च्या रोषणाईशी केली आहे. ज्ञानेश्वरी व लीळाचरित्र या ग्रंथांतही दिवाळी हा शब्द अनेकदा आढळतो.

दिवाळीचा सण प्रचारात कधी व कसा आला, हे सांगणं तसं अवघड आहे. मात्र त्याला आजचं स्वरूप पौराणिक काळात प्राप्त झालं, हे नक्की. शिव व विष्णू यांचे महत्त्व वाढल्यानंतर त्यांच्या उपासकांनी या दैवतांसंबंधी अनेक कथा रचून पूर्वापार चालत आलेल्या कित्येक विधींचा व सणांचा संबंध या दैवतांशी जोडला. विष्णूचा अवतार समजल्या जाणार्‍या श्रीकृष्णासाठी दिवाळी साजरी करावी, असं वैष्णवांनी ठरवलं. या सणाचा कृष्णाशी संबंध जोडल्यानंतर कृष्णचरित्रात अनेक अद्भुत गोष्टींचा समावेश होत गेला. तसंच, प्राचीन काळी गृहस्थाश्रमी पुरुषाने काही गृह्य संस्कार करणे अपेक्षित असे. अशा अनेक गृह्य संस्कारांचे रुपांतर होऊन आजचे कित्येक सण प्रचारात आले आहेत. त्या काळी प्रत्येक गृहस्थाश्रमी पुरुष वर्षातून सात पाकयज्ञ करत असे. हा यज्ञ करण्याचा विधी अतिशय सोपा असल्याने तो उरकण्यास विशेष खर्च किंवा त्रास नसे. दानधर्म करणे, आहुती देणे किंवा सत्पात्र अशा विद्वान ब्राह्मणांस अन्नवस्त्र देणे यांचा समावेश या पाकयज्ञांत होता. अष्टक, पार्वण, श्राद्ध, श्रावणी, आग्रयण, चैत्री व आश्वयुजी हे पाकयज्ञ दरवर्षी निरनिराळ्या महिन्यांत करण्यात येत असत. यांपैकी पार्वण, आश्वयुजी व आग्रयण या तीन पाकयज्ञांचे एकीकरण व रुपांतर होऊन आजचा दीपोत्सव अस्तित्वात आला असला पाहिजे.

पितरांबद्दल आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेस व अमावास्येस त्यांच्याप्रीत्यर्थ पार्वण किंवा पिंडपितृयज्ञ नावाचा पाकयज्ञ करण्यात येई. शिवाय नवीन धान्य घरात आणताना करण्याच्या यज्ञाला विशेष महत्त्व होतं. भाऊबीज, नरकचतुर्दशी या दिवशी यमाला दिले गेलेले महत्त्व पाहता दीपोत्सवाची सुरुवात पितरांच्या उद्धारासाठी झाली, असं मानण्यास भरपूर वाव आहे.

पौराणिक काळी यमासंबंधी जुनी कल्पना जाऊन त्याला निराळे व भयंकर रूप प्राप्त झाले. वेदकाळात तो नरकाचा स्वामी नसून स्वर्गातील एक मुख्य देव होता. सत्कर्मे करणार्‍यांस सद्गती देणारा व सज्जनांना मदत करणारा म्हणून त्याची स्तुतीस्तोत्रे ऋग्वेदात गायलेली आढळतात. पुराणांत यमाला सूर्यपुत्र म्हटले आहे. सूर्याच्या गतीबरोबर मनुष्यमात्राचे आयुष्य क्षीण होत जाते. अर्थात मृत्यूचे दिवस जवळ आणणारे दैवत सूर्यपुत्र असे मानले गेले, यात नवल नाही. वैवस्वत (आकाश) हा पिता व शरण्यू (अरुणोदय) ही माता, यांच्या पोटी यमाचा जन्म झाला, असं ऋग्वेदात सांगितलं आहे. यमाची बहिण यमी हिचाही उल्लेख असून या दोघांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं. या संबंधात ऋग्वेदात केलेले विवेचन वाचल्यास दिवस व रात्र यांस यम व यमी अशी अलंकारिक नावं देण्यात आली होती, असं लक्षात येतं. यमद्वितीया या सणाद्वारे आपल्या पूर्वजांनी यम व यमी यांच्या संबंधांनाच मूर्त स्वरूप दिलं.

दिवाळीत अंतर्भूत झालेला दुसरा पाकयज्ञविधी म्हणजे आश्वयुजी. अश्वयुग किंवा आश्विन महिन्याच्या पौर्णिमेस हा करण्यात येत असे. ऋग्वेदाच्या सहाव्या मंडळात जो उल्लेख सापडतो त्यावरून असं दिसतं की, अश्वयुग महिन्याच्या पौर्णिमेस इंद्रास तांदळाची खीर अर्पण करण्यात येत असे. त्या दिवशी रात्री गाई व त्यांची वासरं गोठ्यात एकत्र ठेवण्यात येत असत. हा संपूर्ण विधी शेतीशी संबंधित होता. या दिवशी कृषिदेवता सीता हिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची प्रार्थना करत असत. कालांतराने सीतेच्या जागी विष्णुपत्नी लक्ष्मीची स्थापना करण्यात आली. धनधान्याची देवता म्हणून लक्ष्मीचे महत्त्व फार वाढले. अगदी प्राचीन वाङ्मयात लक्ष्मीचे नाव आढळत नाही. ज्याप्रमाणे रुद्राच्या भयंकर स्वरूपावरून रुद्राणी ही भयानक शक्तीदेवता मानली गेली, त्याचप्रमाणे विष्णूच्या अंगी जे सात्त्विक गुण असल्याचे पुराणांत लिहिले आहे, त्यांस शोभेल अशीच वधू लक्ष्मी आहे, असं ठरवून तिच्यात उत्तमोत्तम गुणांची स्थापना पुराणकारांनी केली. सीतेची जागा लक्ष्मीने घेतल्यानंतर आश्विन महिन्यातील पौर्णिमेस लक्ष्मीपूजन करण्यात येऊ लागले. कोजागरी पौर्णिमा या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. दिवाळीतील लक्ष्मीपूजन, कित्येक ठिकाणी रूढ असलेली द्यूत खेळण्याची पद्धत, कोजागरी पौर्णिमेपासून पितरांसाठी आकाशदिवे लावण्याची प्रथा, त्या दिवशी नवीन धान्याची खीर करण्याची पद्धत, नवीन भाताचे पोहे करण्याची चाल (हल्ली आपण दिवाळीत फराळ करतो), याच वेळी गोपूजा करण्याची प्रथा वगैरे गोष्टी लक्षात घेता आश्वयुजी हा गृह्ययज्ञ म्हणजे दिवाळी असल्याचं स्पष्ट होतं.

वेदकाळात अतिशय लोकप्रिय असलेल्या सीता, इंद्र वगैरे देवता मागे पडल्या, कृष्णाचे महत्त्व वाढले आणि कृष्ण हा इंद्राहूनही श्रेष्ठ आहे, हे दाखवण्यासाठी त्याच्या हातून इंद्राचा पराजय झाला व त्याने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गाई व गोप यांचे रक्षण केले, अशी गोष्ट प्रचलित झाली. प्रत्येक अवताराचं इतिकर्तव्य म्हणजे असुरांचा संहार व गोब्राह्मणांचा प्रतिपाळ. याच्याशी जुळेल अशा रीतीने नरकासुराची व इतर दैत्यांच्या कथा रचल्या गेल्या. पुराणकारांनी यमराजाला स्वर्गातून नरकात आणलं. त्यालाच पुढे नरकासुर बनवून, पूर्वेकडे, म्हणजे त्याच्या वडिलांच्या, सूर्याच्या दिशेकडे असलेल्या प्रागज्योतिषपूरास वास्तव्यास आणलं.

आश्विन महिन्यात पाऊस संपलेला असतो. सांपत्तिक स्थिती चांगली असते. यामुळे हा कृषिविषयक सण लोकांना आवडला. घरात नवीन धान्य आल्यावर त्याची व ते धान्य देण्यास कारणीभूत झालेल्या गोकुळाची पूजा करणं, लोकांनी पटकन स्वीकारलं.

त्यानंतर दिवाळीत आग्रयण नावाच्या तिसर्‍या विधीचा समावेश करण्यात आला. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेस आग्रयण (नवान्नेष्टि) केला जात असे. मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमेची रात्र ही संवत्सराची पत्नी असं समजून तिला आहुती देत असत. अर्थात संवत्सरसमाप्तीचा हा उत्सव होता. मात्र विविध राजांच्या काळात संवत्सराचा पहिला महिना होण्याचा मान वेगवेगळ्या महिन्यांना मिळत गेला. कधी चैत्र तर कधी वैशाख, कधी मार्गशीर्ष तर कधी कार्तिक. कार्तिक हा वर्षाचा पहिला महिना असावा असे विक्रमादित्याच्या कारकिर्दीत ठरले. राजाज्ञेनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदात घालवण्याचा प्रघात पडला, आणि दिवाळीला महोत्सवाचं रूप मिळालं.

प्राचीन वाङ्मयात केलेलं दिवाळीचं विवेचन आणि सूत्रकारांनी त्यावर केलेलं भाष्य यावरून दिवाळी साजरी करण्याचा शास्त्रोक्त विधी काय होता, हे कळून येतं. 'धर्मसिंधु' या ग्रंथात आश्विन पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचा विधी सांगितला आहे. आश्विन पौर्णिमेच्या दिवशी कोजागरी व्रत करून लक्ष्मी व इंद्र यांची पूजा करावी. नारळाचे पाणी पिऊन द्यूत खेळण्यास सुरुवात करावी. त्या दिवशी रात्री लक्ष्मी प्रत्येक घरी जाते, आणि जे द्यूत खेळत असतील त्यांना सधन करते, असा विश्वास आहे. त्यानंतर नारळ, पोहे या पदार्थांचा नैवेद्य दाखवून सर्वांना हा प्रसाद द्यावा. याच दिवशी आश्वयुजीकर्म करावे. आश्विन पौर्णिमेस किंवा अमावास्येस आग्रयण करावे. आग्रयण केल्याशिवाय कोणतेही नवीन तयार झालेले धान्य वापरू नये. याच पौर्णिमेस सर्वांत मोठ्या मुलाला किंवा मुलीला निरांजनाने ओवाळावे. आश्विन कृष्ण द्वादशी गोवत्स द्वादशी या नावाने ओळखली जाते. या दिवशी सवत्स गाईचे पूजन करून तिला मिश्र धान्याचे वडे खायला घालावे. अपमृत्यू येऊ नये म्हणून त्रयोदशीच्या दिवशी यमासाठी घराबाहेर दिवा लावावा. चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करावे. नांगराने उकरून काढलेले मातीचे ढेकूळ व आघाडा, दुधी भोपळा व टाकळा यांच्या फांद्या स्नानाच्या वेळी तीन वेळा आपल्या अंगावरून फिरवाव्या. त्यानंतर यमतर्पण करावे. संध्याकाळी मठ, तट, कोट, बाग, रस्ते, गोठा, अश्वशाळा, गजशाळा या ठिकाणी शोभेचे दिवे लावावे. तूळ राशीत सूर्य गेल्यावर चतुर्दशी व अमावास्या या दोन दिवशी संध्याकाळी पुरुषांनी हातात कोलीत घेऊन पितरांस मार्ग दाखवावा. यास उल्कादर्शन असं म्हणतात. यानंतर अमावास्येच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून देवपूजा आटोपल्यावर दुपारी पार्वण श्राद्ध करावे. संध्याकाळी दिवे लावणे, उल्कादर्शन व लक्ष्मीपूजन झाल्यानंतर भोजन करावे. लहान मुले, वृद्ध व रोगी यांखेरीज इतरांनी दिवसा भोजन करू नये.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात दिवाळीच्या उत्सवाचे स्वरूप साधारणपणे सारखंच आहे. घरं स्वच्छ झाडून, सारवून, रंगवून आणि फुलांच्या माळा, पताका, तोरणे वगैरे लावून सजवणे, अभ्यंगस्नान करून नवीन कपडे, दागिने घालणे, नातलगांसह फराळ, दिव्यांची रोषणाई, लक्ष्मीपूजन, दीपदान इ. कार्यक्रम सर्वत्र होतात. याशिवाय, प्रत्येक प्रदेशाची काही पारंपारिक वैशिष्ट्ये आहेत.

गुजरातेत आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. त्या दिवसाला वाघवारान असं म्हणतात. त्या दिवशी स्त्रिया सकाळी उठून सडासंमार्जन करून रांगोळ्या काढतात. त्यात वाघाचं चित्र हमखास असतं. ते चित्र भाऊबीजेपर्यंत ठेवतात. आश्विन वद्य चतुर्दशीला रूपचतुर्दशी म्हणतात. त्या दिवशी लवकर स्नान करून नवीन कपडे घातले जातात. मात्र त्या रात्री सर्वत्र भूतांचा संचार असतो अशी समजूत असल्याने लोक सामान्यपणे रात्री बाहेर पडत नाहीत. त्या रात्रीला काळरात्र म्हणतात. अनेक लोक त्या रात्री शेंदूर व तेल लावून हनुमानाची पूजा करतात आणि नारळ फोडतात.

अमावास्या हा दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्या दिवशी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांची पूजा करतात. दौत, रुपया आणि वही ही त्यांची प्रतिके मानली जातात. नवीन जमाखर्चाच्या वहीच्या तिसर्‍या पानावर 'श्री' हे अक्षर लिहून त्यावर एक विड्याचं पान व एक रुपया ठेवतात. नंतर त्या वहीची पंचोपचार पूजा करतात. रात्रभर वही तशीच उघडी ठेवून जवळ एक दिवा तेवत ठेवतात. सर्व जण जागरण करतात. सकाळी वहीला नमस्कार करून 'लक्षलाभ' हे शब्द तीनदा उच्चारतात.

कार्तिक शुद्ध प्रतिपदेला काळभैरवाची पूजा करतात. सकाळी लहान मुलं मिठाची पुरचुंडी घेऊन गावात हिंडतात. वर्षारंभाच्या शुभशकुनानिमित्त लोक त्यांच्याकडून मीठ विकत घेतात. रात्री मुलं मशाली घेऊन हिंडतात. लोक त्यांना तेल व मिठाई देतात.

राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून आला, त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिला नैवेद्य दाखवतात. दिवाळीतील चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी संध्याकाळी मुली डोक्यावर 'घुडल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे खाली छिद्र असलेलं मडकं, व त्यात दिवा लावलेला असतो. ते घुडलेखां नावाच्या मुसलमान सरदाराचे प्रतीक आहे. त्या अत्याचारी सरदाराला मारवाडी वीरांनी ठार मारून अनेक मुलींची सुटका केली होती. व घुडलेखांचे शिर कापून आणून त्याला अनेक बाणांनी अनेक छिद्रे पाडली होती, अशी एक दंतकथा आहे. मारवाडी वीरांच्या शौर्याची आठवण म्हणून ही घुडल्यांची मिरवणूक असते, असा समज आहे. मात्र यात फारसे तथ्य नसावे. हा मुळात दीपपूजेचाच एक प्रकार आहे. नामसादृश्यामुळे घुडल्याचा संबंध घुडलेखांशी जोडला गेला असावा.

अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटात करतात. प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धनपूजा व अन्नकुट करतात. संध्याकाळी बैलांची पूजा करतात. महाराष्ट्रातल्या पोळ्याप्रमाणेच हा सण असतो. खेंखराच्या दुसर्‍या दिवशी घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते. त्याच दिवशी नवीन वर्षासाठी नवीन वह्यांत जमाखर्च मांडण्यास सुरुवात करतात.

पंजाबात लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिवाळी साजरी करतात. अमृतसरच्या सुवर्णमंदिराच्या स्थापनेचा दिवस म्हणूनही हा दिवस महत्त्वाचा आहे. उत्तरांचलमधील लोक दिवाळीच्या दिवशी गायीची पूजा करतात, तर सिंधी लोक तलावाच्या काठची माती आणून चबुतरा करतात व त्यावर काटेरी वृक्षाची फांदी रोवून तिची पूजा करतात. मग त्याच चबुतर्‍याची थोडी माती ते घरी नेतात. दुसर्‍या दिवशी त्या मातीचे सोने होते, अशी समजूत आहे. बंगालमध्ये लक्ष्मीपूजनापेक्षा कालीपूजनाला अधिक महत्त्व मिळाले आहे. आश्विनी अमावास्येच्या रात्री बंगालात कालीची स्तोत्रे गात जागरण करतात. या रात्रीला महानिशा असं म्हणतात. काली हीच लक्ष्मी, सरस्वती व शक्ती होय, अशी त्यांची धारणा असते.

दक्षिण भारतात दिवाळीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तामिळनाडूत काही लोक सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. या भागात आश्विनी अमावास्येच्या दिवशी केलेलं पितृतर्पण विशेष फलप्रद मानलं जातं. कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून बळिराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. त्या दिवशी बळीची प्रतिमा तयार करून गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी-बैलांना माळा घालून सजवतात, त्यांची मिरवणूक काढतात. केरळात ओणम् हा सण आश्विन महिन्यात बळीच्या स्मरणार्थच साजरा होतो. महाराष्ट्रात काही ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराची शेणाची आकृती करून तिच्यावर घरातील सर्व केरकचरा टाकतात व त्या ढिगावर एक पैसा ठेवतात. नरकासुराच्या स्मरणार्थ काही ठिकाणी पायाने कारीट ठेचून त्याचा रस जिभेला लावण्याचीही पद्धत आहे. अमावास्येच्या दिवशी नवी केरसुणी विकत घेतात, तिला लक्ष्मी म्हणतात, कारण ती अलक्ष्मीला झाडून टाकण्याचे काम करते.

बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्याभोवती एकवीस दिवे मांडण्याचीही पद्धत आहे. बळिराजा देवांचा शत्रू असला तरी तो दुष्ट नव्हता. अलोट दातृत्व आणि प्रजाहितदक्षता यांसाठी त्याची ख्याती होती. त्याचे राज्य हे सुराज्य होते. म्हणूनच ते पुन्हा प्रस्थापित व्हावं, अशी इच्छा या पद्धतींत प्रकट झाली आहे, असं वाटतं.

खरं म्हणजे या सार्‍या परंपरांमागे गहिरे सामाजिक संदर्भ दडले आहेत. जीवन सुखकारक व्हावं, या हेतूने निसर्गातील विविध शक्तींची पूजा सुरू झाली. जन्म, मृत्यू या घटनांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला, आणि निसर्गातील अतिभव्य अशा घडामोडींतील हा एक फार छोटा भाग असल्याचं मानवाला कळून चुकलं. पहिला मर्त्य, तो यम. या यमाला दैवत्व प्राप्त झालं, आणि यमलोकी गेलेल्या आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून विविध धार्मिक प्रथा सुरू झाल्या. या धार्मिक प्रथा पुढे व्यापक स्वरूपात पाळल्या जाऊ लागल्या. नवीन कपडे, कापणीनंतर घरात आलेले नवीन धान्य हे देवाला अर्पण केल्याशिवाय वापरू नये, असा दंडक होताच. आश्विनात शेतकर्‍याचा हाती पैसा असतो. आपल्या पूर्वजांचं स्मरण तो यथोचित करू शकतो. गोधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते. नवीन खरेदीही होते. शेतात काम करणार्‍या मजुरांनाही मालकाकडून बिदागी मिळते. अशावेळी पैसे, कपडे, धान्य, देवाला आणि पितरांना अर्पण करण्यासाठी लोप पावत चाललेल्या यज्ञविधींना नवं स्वरूप देण्यात आलं, आणि दीपोत्सव साजरा होऊ लागला. त्यात असंख्य संदर्भ, आख्यायिका नंतर येत गेल्या. पण सुखी आयुष्य जगण्यासाठी पितरांना, निसर्गाला तुष्ट ठेवणं हा हेतू मात्र कायम राहिला.

इतर गोष्टींप्रमाणे दिवाळीचं स्वरूपही बदललं. घरात आलेल्या नवीन तांदळाचे पोहे करून देवाला नैवेद्य दाखवणं, पितरांना सुखरूप परतता यावं म्हणून घरावर आकाशकंदिल लावणं, या प्रथांचे संदर्भच बदलले. पण वात्स्यायनाच्या यक्षरात्रीइतकीच आजची दिवाळी उत्साहात साजरी केली हाते. अज्ञानाला, दु:खाला, अंधकाराला पळवून लावणारी ही दिवाळी आजही प्रत्येकाचं आयुष्य उजळवून टाकते.

[संदर्भ : १. भारतीय संस्कृतीकोश - संपा. पं. महादेवशास्त्री जोशी २. आर्यांचे प्राचीन व अर्वाचीन सण - ले. श्री. वामन मंगेश दुभाषी (ऋग्वेदी)]

-chinoox