आपण सारे नापास ....

शिक्षणा-नोकर्‍यांची क्लिष्ट गणिते
आणि पगारा-खर्चाचे किचकट ताळेबंद
सोडवत रहातो आपण...
निरर्थक नात्यांचे निबंध लिहित आणि
मानापमानाच्या वाक्यांची
संदर्भांसहित स्पष्टीकरणे देत राहतो आपण....
जुनेपाने इतिहासजमा कुलवृतांत
आणि गैरलागू सनसनावळी घोकत रहातो....
आणि बदलीच्या ठिकाणी वणवण फिरत
नावडता भुगोल शिकत रहातो....
सोडवत रहातो कसलीकसली प्रमेयं
आणि न जुळणार्‍या सिद्धता
काढत रहातो मैत्रीची वर्गमुळं
प्रेमाची घनमुळं आणि नात्यांची क्षेत्रफळं.
चुकूनमाकून एकत्र आलेल्या माणसांचे
काढून बघतो लसावि-मसावि
आणि नेहमी वाकड्यातच शिरणार्‍या
आकड्यांनी भरुन टाकतो पानेच्या पाने.
लिटमस पेपर सारखे
कसल्या कसल्या द्रावणात बुडवून घेत
आपल्याच मनाचे रंग बदलत रहातो आपण.
आधीच मारुन ठेवलेल्या बेडकासारख्या
एखाद्या 'घटने'चे डिसेक्शन करुन
ठराविक छापाची निरिक्षणे नोंदवतो
आणि हमखास मार्क मिळवुन देणारे
'अमीबा' रंगवतो.
आवडतं हिंदी सोडून
न झेपणारं संस्कृत घेणार्‍या मुलासारखं
न झेपणारं बरंच काही काही घेत रहातो आपण
आवडणारं बरंच काही सोडून....
गिरवत जातो चाकोरीतली मुळाक्षरं
स्वच्छंदी चित्रं खोडून....

परिक्षेला बसल्याच्या आविर्भावातच
सोडवत जातो जीवन.

बँकबॅलन्स्, शेअर्स, बढत्या आणि
पेन्शनफंडाच्या जिवावर
स्वत:च स्वत:ला पास ठरवत
जेव्हा आपण उभे रहातो चित्रगुप्तासमोर
त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून....
तेव्हा तो हसतो आणि
म्हणतो आपल्याला चिडवून....
"बोर्डातच आला असतास की रे गड्या!
तेव्हढा तो ढिगाने लाल रेघा पडलेला
'समाधाना'चा पेपर घ्यायचा होतास की रे
दुसर्‍या कुणाकडनं तरी सोडवून.... "

- स्वरुप कुलकर्णी