भोवरे

मीरा

डोअरबेलचा आवाज झाला तशी मीरा दचकली. आपण कुठे आहोत हे लक्षात यायलासुद्धा दोन मिनिटं लागली तिला. आणि त्यावरही विश्वास बसू नये इतका अंधार घरात!

चाचपडत तिने दिवा लावला. दाराकडे जाता जाता सवयीने हॉलकडे एक नजर टाकली. आता दोन मोठ्या माणसांच्या घरात असा पसारा तरी काय असणार? पण तरीही बैठकीवरची चुरगळलेली चादर आणि कोपर्‍यात पडलेला अर्धवट प्यायलेल्या चहाचा कप खुपलेच तिच्या डोळ्यांना. एरवी हा असासुद्धा हॉल पाहुण्या माणसाच्या नजरेला पडला नसता. पण आज ना तिच्यात ते आवरायचे त्राण होते, ना इच्छा, ना बघणार्‍याला काय वाटेल याची फिकीर.

"तू निदान प्रयोग म्हणून एक दिवस अजिबात आवरा आवरी न करता काढ" म्हणायचा शिरीष. आत्ता त्याने हे पाहिलं असतं तर तो काय आणि किती उपरोधिक बोलला असता या कल्पनेनेच त्या ही मनःस्थितीत तिला विषण्ण हसू फुटलं. बाकी एकमेकांचा उपरोध हसू येण्याइतका अती झालाच होता गेली कित्येक वर्षं.. पण म्हणून..

पुन्हा बेल वाजली. खरंतर दार उघडायची इच्छाच होत नव्हती. शिरीष गेल्यानंतरच्या महिन्याभरात कंटाळा येण्याइतकं सांत्वन झालं होतं. तेच सराईत प्रश्न, तीच सरावाने नेमकी होत गेलेली उत्तरं, आणि तेच परस्परांचं दुःख मापण्याजोखण्याचे डाव.. नक्की काय साधतं यातून? ज्या जखमेला उपचारांची खरी गरज आहे ती तर..

काय होईल नाहीच उघडलं दार तर? कोण असेल ते आपण नाही आहोत असं समजून जाईल निघून!
पण आता दिवा नाही का लावला? ते दिसलं असेल की दाराच्या फटीतून.
मग? समजा नाहीच उघडायचं मला! काय हरकत आहे?

या खेपेला मात्र निर्वाणीची वाजल्यासारखी बेल वाजली. काय हा नादिष्टपणा म्हणून स्वतःलाच फटकारत तिने जवळपास धावत दार गाठलं. उघडते तो दारात करण.

हा क्षण आज ना उद्या येणार, कितीही टाळला तरी येणार, हे काय तिला माहीत नव्हतं का? मग तरी ती इतकी कशी गाफील राहिली? इतकी? नुसतंच डोळे विस्फारून त्याच्याकडे तब्बल अर्धं मिनिट बघत उभं राहण्याइतकी?
"मीरा.. मी.. आत आलो तर.. ?" शेवटी त्यानेच सुरुवात केली.
"अं.. हो.. हो.. सॉरी करण.. मी.."
"इट्स ओके. आय अन्डरस्टँड." त्याने तिच्या खांद्याला हलकेच थोपटलं.
त्या स्पर्शाने चटका बसल्यासारखी मीरा मागे सरली. गडबडीत त्याच्याकडे पाठ फिरवत आत हॉलमधे आली. बैठकीवर बसत त्याला खुर्चीकडे निर्देश करत "बस ना" म्हणेपर्यंत त्याच्या मुद्रेवर क्षणभरासाठी आलेलं प्रश्नचिन्ह विरून गेलं होतं.

"आय ऍम सॉरी अबाऊट.."
"हं." तिने जवळपास तोडलंच ते वाक्य.
"कशी आहेस?"
"...."
"हं. काम कधी सुरू करत्येस परत?"
"नाही माहीत"
"असं करून कसं चालेल मीरा? अवस्था बघ तुझी. जेवतेखातेस तरी की नाही? काम सुरू केलंस तर तेवढंच.. म्हणजे, मला माहीत आहे हे दुःख मोठं आहे, पण.."
"करण प्लीज!!"
ते मघाचं प्रश्नचिन्ह आता अधिकच मोठं होऊन पुन्हा उभं राहिलं त्याच्या चेहर्‍यावर.
"अम्मी कसा आहे?"
"कोण जाणे!"
"मीरा!"
"काही कळतच नाही रे त्याचं! रडला नाही एकदाही.. पण गप्प गप्प असतो.. बोलायला जावं तर लक्ष नसतं.. इतका उत्साही मुलगा.. मिटून गेल्यागत झालाय.. बाहेर पडला नव्हता इतके दिवस. आज मित्रांनी ओढून नेलाय अक्षरशः"
"ओह! पुअर चाईल्ड!"
"हं.."
"या वयातली मुलं दाखवत नाहीत अटॅचमेंट, पण बाप गेल्याचं दुःख.."
"हं"
"त्यात तूही अजून सावरत नसलीस तर त्याला कठीण नाही का?"
"हं"
"हे बघ मीरा, थोडं स्पष्ट बोलतो. तुझ्या नाजुक मनःस्थितीची कल्पना आहे मला. आणि हे सगळं टायमिंग किती विचित्र होतं याचीही. मी तेंव्हा पुढे केलेला हात कधीच मागे घेणार नाही हे जितकं खरं, तितकंच मी तुला कसलीच घाई किंवा फोर्स करणार नाही, हे ही. तू त्या काळजीने कामावर येणं टाळत असलीस तर.. "
"तसं नाहीये करण! कसं सांगू तुला!!"
"एनी प्रॉब्लेम?"
"प्रॉब्लेम तर केव्हाचा होताच ना करण? तू तुझ्या मनातली गोष्ट मला सांगितल्यावरसुद्धा किती दिवस आणि केवढं धैर्य पणाला लागलं होतं तो sms करण्यापूर्वी! चाळिशीची बाई अशी कोणासाठी मॅड होईल हे कोणाला पटेल? पण हे असं इतकं सहज प्रेम, आपुलकी गेल्या कित्येक वर्षांत वाट्याला आलीच नव्हती रे माझ्या! मला पडला मोह तिचा. वाटलं, का नाही? का या इतक्या अपार सुखाला नाही नाही म्हणत रहायचं? शिवाय एक शारीरिक जवळीक सोडली तर काय शिल्लक राहिलं होतं आपल्यात व्हायचं? इतके अंतर्बाह्य झालोच होतो की एकमेकांचे! मला सांग, आपण एकमेकांना गेल्या वर्षभरात जितके ओळखायला लागलो तितकं आपल्या लग्नाच्या जोडीदारांनी जन्म सोबत काढून जाणलं का आपल्याला?"
"आय नो... आय नो. मग मला सांग, इतकी अस्वस्थ का आहेस?"
"कारण करण, शिरीषला जेव्हा हार्ट अटॅक आला, तेव्हा आपले ते sms झालेला माझा सेलफोन त्याच्या हाताशी टेबलवर होता!"
"काय?"
"हं.. मला शब्द न शब्द तसाच्या तसा आठवतो त्यातला. 'Home alone. thinking abt u. can u cm see me? ask me all those qstions again.. u might get lucky this time..&yes, luv u..' "
"..!"
"तुझं 'येतोय, तयार रहा' म्हणून उत्तर आलं, आणि सोळा वर्षांच्या मुलीसारखी हरखून बावरून आवरायला पळाले मी. शिरीष आणखी दोन दिवस यायचा नव्हता मुंबईहून, अम्मी त्याच्या मित्राकडे रहायचा होता अभ्यासाला.. त्यामुळे निष्काळजीपणा झाला.. आंघोळ करून बेडरूममधे कपडे करत होते.. बाहेर भांडं पडल्याचा आवाज आला, म्हणून बघायला आले तर शिरीष डायनिंग टेबलपाशी बसला होता.. कधी आला होता कोण जाणे.. चेहरा वेदनेने पिळवटलेला.. उजव्या हाताने छातीला डाव्या बाजूला आवळत चोळत होता.. जमिनीवर त्याच्या हातातून पडलेलं भांडं आणि पाण्याचं थारोळं.."
"बाप रे! त्याने.. पाहिला होता मेसेज?"
"कसं कळणार?!! 'शिरीष.. शिरीष.. काय होतंय.. थांब डॉक्टरना फोन करते.. आडवा होतोस का आत तोवर..' म्हणून मी त्याच्या जवळ जाऊन डाव्या हाताला धरायला लागले तर इतक्या जोरात हात झटकलान.. दुखत होतं म्हणून.. की.. की.."
"माय गॉड!"
"डॉक्टर यायच्या आत सगळं संपलंच होतं. ते म्हणाले बहुधा हा पहिला अटॅक नसावा. आधी लक्षात आलं नसावं.."
"ओह!"
"इतकी वर्षं एकत्र काढलेलं माणूस गेलं की कसे का संबंध असेनात, दुःख होतंच ना.. पण तुला सांगू, मला एक तो त्याच्या हाताशीच पडलेला सेलफोन आणि त्याने जाण्याआधी माझा झटकलेला हात यापलिकडे काही सुचतच नाही.."
"मीरा..!"
"सगळा जन्म चिडत रडत का असे ना, पण एकनिष्ठ होते ना त्याच्याशी? नशीब बघ माझं.. मोह पडला तुझा, पण ते पाऊल घातलंही गेलं नाही, आणि तरी.. तरी.. जाताना तो हे मत करून गेला असेल माझ्याबद्दल? मी कारण झाले असेन त्याच्या मृत्यूला? बरं तसं झालं की नाही, हे तरी नक्की कळावं?? ते ही नाही? नुसतेच भोवरे? का??"

===

अम्मी

"अम्मी, यार अब बस भी कर!"
"हं"
"अरे 'हं' काय? काय म्हणतोय मी?"
"सुखी, प्लीज!"
"नो! बहुत हो गया यार! किती दिवस असा मूँह फुलवून बसणार आहेस?"
".."
"देख, मला समजतं वडील जाण्याचं दुःख आहे.. टेन्शन आहे.. पण आता महिन्याच्या वर होऊन गेला यार! कॉलेजला ये.. थोडा घुल मिल ले.. नाहीतर कसा बाहेर येणार यातून?"
"हं"
"तू तरुण मुलगा असा वागलास तर तुझ्या आईने कोणाकडे बघायचं?"
"हं"
"पिक्चरला येतोस का?"
"नको यार.. मूड नाही.."
"अरे मूड नाही म्हणून तर! मस्त एखादा बकवास पिक्चर बघू.. खाना खाऊ.."
"पिऊ..!" रोहितला अगदीच राहवलं नाही.
इथे अम्मी दचकला.
"न.. नको.. नको.. तुम्ही लोक जा.. मी जातो घरी.."
"भगवान! ये कब बडा होगा!!" इति अर्थातच रोहित.
"शट अप रोहित. कभी तो भेजा इस्तेमाल कर!" म्हणत सुखीने अम्मीच्या गळ्यात हात घालत त्याला बोलत ग्रूपपासून दोन पावलं पुढे नेलं.
"अम्मी, कुछ प्रॉब्लेम है क्या? रोहितकडे लक्ष नको देऊस. तुला नाही पटत मला माहीत आहे. कोणी तुला पिण्याबिण्याचा आग्रह नाही करणार ये मेरा जिम्मा. बस?"
"वोह बात नहीं है सुखी.."
"फिर क्या बात है? बोल तो!!"
"तुला आठवतं, डॅड गेले त्या संध्याकाळी बारमधे ओढत नेलं होतं तुम्ही मला?"
"हाँ .. पण तू कुठे बधलास?"
"माझे आजोबा.. वडिलांचे वडील.. दारूच्या व्यसनापायी.."
"ओह!"
"डॅडना त्यामुळे भयानक तिटकारा होता त्या गोष्टीचा. आणि असल्या सवयी सहसा मित्रांच्या आग्रहाने लागतात म्हणून एकूणच मित्राबित्रांच्या फार नादी लागण्याचाही! तुला माहीत आहे, त्यांना स्वतःला एकसुद्धा मित्र नव्हता कधी!"
"मॅन!"
"माणूसघाणेच होते. आई खरी सोशल स्वभावाने. पण कोणाला तोंड भरून 'या ना आमच्याकडे' म्हणावं असं वातावरणच नसायचं घरात. घरात जो काही संवाद व्हायचा तो आई आणि माझ्यातच. ते बोललेच कधी तर दोनच गोष्टी.. मी अभ्यास नीट करतो की नाही आणि दारूबिरू पीत नाही ना!"
"सॉरी यार अम्मी. ये सब पता होता तो.."
"अरे, मी बारावी झालो ना, इतके चांगले मार्क्स.. मनासारखी ऍडमिशन मिळालेली इंजिनियरिंगला.. एक 'शाबास' इतका शब्द नाही निघाला त्यांच्या तोंडून!! काय बोलले असतील? 'आता कॉलेजमधे जाणार.. उगाच नाही त्या मुलांच्या नादी लागून नाही ते प्रकार करू नकात. तू कधी कसलं व्यसन केल्याचं जर मला कळलं ना अमित, जीव जाईल माझा – लक्षात ठेव!'"
"माय गॉड!!"
"त्या दिवशी आपण बार मधून बाहेर पडलो. तुम्ही तिघे बर्‍यापैकी.."
"ड्रंक होतो! पता है. तू इतका आग्रह करूनसुद्धा प्यायला नाहीस म्हणून तुझी वरात काढायची टूम निघाली.. आम्ही उचललाच होता तुला.."
"जर मी तुला सांगितलं की त्याच वेळी तिथेच समोर रस्त्यावर सिग्नलला डॅडची कार उभी होती, तर?"
"क्या??"
"हं. डॅड खरंतर मुंबईत असायचे होते. प्रोग्राम बदलला असावा. दुसर्‍या बाजूने जाणार्‍या गाडीचा उजेड पडला त्यात मी ओझरतं पाहिलं."
"ओह! नक्की? नक्की तेच होते? त्यांनी पाहिलं तुला?"
"तेच होते हे नक्की. कार पण ओळखली की मी. त्यांनी पाहिलं का ते माहीत नाही. पण गाडी जर तिथे सिग्नलला मला वाटतंय तितका वेळ उभी असेल, तर आपण बार मधून एकत्र बाहेर पडलो आणि तुम्ही मला डोक्यावर घेतलंत.. एवढं आणि एवढंच दृष्य त्यांना दिसलं असेल."
"ओह नो!! पर तुझे पक्का पता नहीं है.. शायद नहीं देखा हो.."
"तेच तर!! नक्की कळायला तरी हवं होतं यार – पाहिलं की नाही?? हा असला गिल्ट सहन होत नाही यार!! त्यांना तसं सिग्नलला पाहतो काय आणि घरी गेल्यावर त्यांना हार्ट अटॅक येतो काय! काय समजायचं? जे मी केलंच नाही, त्याच्या धक्क्याने गेले असतील? का यार? असं का असतं लाईफ??"

===

शिरीष

"मेमसाब.. कैसी हो आप?"
"ठीक हूँ रंजीत. तू सांग, कसा आहेस? कसं चाललंय काम? बायको काय म्हणते तुझी? कधीची तारीख दिल्ये?"
"अभी तो टाईम है मेमसाब. ठीक है वो."
"हं. चहा घेतोस?"
"नहीं मेमसाब.. वो सब.."

आता यापुढे काय बोलायचं मीरालाही कळेना. रंजीत हा शिरीषचा कंपनीने दिलेला ड्रायव्हर. पोरगेलासाच होता. शिरीष गेल्यावर आज इतक्या दिवसांनी भेटायला आला होता.
"मेमसाब, वो.. आप से एक बात करनी थी.."
"बोल ना"
"वो.. कल गुप्तासाब सस्पेंड हो गया"
"अं? हो का? अरे बाप रे!"
"कुछ कंपनीके पैसेका लफडा किया था.."
आता मीराला यात इन्टरेस्ट असेल असं याला का वाटावं? उगाच काहीतरी म्हणायचं म्हणून ती म्हणाली, "ओह!"
"दो महिने पहले दीपकसाबको लफडेका पता चल गया था.. कौन किया मालूम नहीं था.."
"अस्सं.."
"वो.. वो पहले शायद अपने साब पर शक किया था मेमसाब.."
"काऽऽय??"
"हाँ मेमसाब.. बम्बईमें मीटिंगके बाद दीपकसाबने उनके होटलमें बुलाया था साब को.. मैं नीचे रुका था तब दीपकसाब का ड्रायव्हर बोला मुझे.."
"अरे पण.. कसं शक्य आहे!"
"उस दिन साब होटलसे बाहर निकला तो उनका सूरत देखके मैं समझ गया.. कुछ गडबड है.. पर पूछता कैसे मेमसाब?"
"अरे देवा! दीपकने तेव्हा.."
"क्या पता मेमसाब क्या बोला.. बोला भी के नहीं.. एन्क्वायरी शुरू भी कहाँ हुआ था तब? पर साब बोला – 'कल की मीटिंग के लिये नहीं रुकना है – अभी घर जायेंगे – तबीयत ठीक नहीं है – जल्दी चलो – खाना खाया?'.. इतनी भी बात कहाँ करते थे साब?"
"हं.."
"वो एन्क्वायरी अभीतक चल रहा था मेमसाब. मुझे मालूम था – साब ऐसा आदमी नहीं था. उनको जरूर सदमा पहुँचा होगा इस बात का"
"रंजीत!"
"मेमसाब, आपने हमेशा मेरा अच्छा खयाल रक्खा. चायपानी, कभी देर हो गई तो खाने का पूछनेका.. कौन पूछता है कंपनीके ड्रायव्हर को? इसलिये मुझसे रहा नहीं गया मेमसाब.. बतानेका जरूरी समझा."
"थँक्स.. रंजीत."
"नहीं मेमसाब. मुझे तो सोचके नींद नहीं आयी रातभर. कैसी जिंदगी है! जो काम साब कभी किया ही नहीं, जिसका एन्क्वायरी अभी शुरू भी नहीं हुआ था, जो शक दीपक साब बताया के नहीं ये भी पता नहीं.. उनकी जान.. क्या उस वजह से.. या सचमुच सिर्फ तबीयत ही खराब हो गयी थी? हमको बस ऐसा लगता है के हमको सब पता है क्या हो रहा है.. पर सोचो तो कुछ भी ठीक से मालूम नहीं रहता! कैसी जिंदगी है मेमसाब!! आप ही बताओ – कैसी जिंदगी है!!"

===

- स्वाती आंबोळे