वृद्धाश्रम

नुकताच एका वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला आणि पायाखालची जमीन सरकल्याचा प्रत्यक्ष अनुभव आला.

माझी आई नुकतीच निवर्तली. तिच्या स्मृतीप्रीत्यर्थ आम्ही अनाथ आणि वृद्धांना कपडे भेट देण्याचं ठरवलं. त्यानुसार एका वृद्धाश्रमाशी बोलणी करून आम्ही काही साड्या-ब्लाऊजपीस आणि काही शर्टपीस-रुमाल खरेदी केले. तिथेच असलेल्या काही लहान मुलांसाठी खाऊ आणि खेळणी घेतली. आईचा मेडिकल बेड तिच्याच नावानं त्या आश्रमाला आधीच दिला होता. तुमच्या जवळपास असे काही देण्यासारखे असेल, सुस्थितीतील, तर ते अशा एखाद्या आश्रमाला देऊ शकता. आमच्या आईनं आयुष्यभर खूप सोसलं. जातानाही ती आम्हाला खूप काही देऊन गेली... तिची संपत्ती आणि तिचे संस्कार... सोबत तिच्या सुंदर आठवणींची तेजस्वी माळ. हे सगळं तिच्याच पैशातून घडू शकलं. आम्ही निमित्त केवळ.

ठरल्याप्रमाणे आम्ही गेलो, ते सर्व वृद्ध आमची वाट पाहत बसले होते. आम्ही येणार असल्याची त्यांना पूर्वकल्पना देण्यात आली होती. तो दिवस नागपंचमीचा होता, तिथल्या स्त्रियांनी सुंदर कार्यक्रम तयार केला होता. तिथल्या लहान मुलांनी मातीचे सुंदर नाग केलेले होते. जुन्या मराठी लोकगीतांची सुरेल मैफल जमली होती. वय विसरून ही वयस्कर मंडळी नाचत होती, गात होती. बारीकसा भुरभुर पाऊस पडत होता. हवेत मस्त गारवा होता. मी वयस्कर लोकांसोबत आहे की मस्तीखोर तरुणांसोबत हे विसरायला लावणारे हे क्षण होते. त्या सार्‍यांचा उत्साह जब्बरदस्त होता. मित्रांनो, एवढा उत्साह, ऊर्जा आपल्यातही नसेल! त्या मंडळींनी आम्हाला तीर्थप्रसाद दिला आणि मग आमचं कपडे वाटप सुरू झालं. घरून निघताना आम्ही ठरवलं होतं की पटापट कपडे वाटू आणि मग घरी येऊन निवांत बसून आईच्या आठवांना उजाळा देऊ.

आमच्या हातून घ्यायला संकोच वाटेल असं समजून आमच्या मुलींच्या हस्ते कपडे द्यायचं आम्ही ठरवलं. माझी ४ वर्षांची आणि बहिणीची १० वर्षांची मुलगी पुढे झाली. सगळे जण कौतुकाने घेत होते. आमच्या मुली आजीआजोबांच्या पाया पडत होत्या अन आम्हीही. आशीर्वादांचा वर्षाव होत होता. काही स्त्रिया हळुवार विनवणी करीत होत्या, 'आमचे हे गेल्यापासून मी हिरवी साडी नेसत नाही हो. मला दुसरा रंग द्याल?' तर काही उसळून म्हणाल्या, 'लाल फार अशुभ रंग आहे, मला दुसरा कोणताही रंग द्या, चालेल. पण लाल नको.' पुरूष मंडळी मात्र जे समोर येईल ते निमूट घेत होते. इथंही स्त्रियांचं साडी प्रेम आणि पुरुषांचा निमूटपणा दिसून आला!

अचानक एक आजोबा हातानेच नाही म्हणाले. मुली गोंधळल्या. ते पाहून मी पुढे झाले, "काय झालं काका?"
काका काहीशा घुश्यातच म्हणाले, "हे पहा, मी सधन आहे, मी कुणाकडून घेत नसतो. राग मानू नका, पण मी हे असलं घालत नाही..."
"असलं म्हणजे?"
"असलं म्हणजे कुणी दिलेलं."
माझा चेहरा पडला, पण तसं न दाखवता मी म्हटलं, "आशीर्वाद तरी द्याल ना?"
"देतो," एक जाम कोरडं उत्तर आलं. पुढे सरकत मी या गोष्टीला अधिक महत्त्व दिलं नाही.

हा सगळा समारंभ आटोपला. मग हळूहळू आजी आमच्याशी बोलायला गर्दी करू लागल्या. आम्ही दाखवलेली आपुलकी, आदर, शाब्दिक सौम्यता, धीर यांनी आम्ही त्यांची मनं जिंकली असावीत बहुधा. काही आजोबाही जुजबी बोलायला आले. जुन्या काळचे पुरूष स्त्रियांशी बोलताना संकोचानं अंतर राखून बोलतात हे अनुभवलं, त्याउलट बायका किती बोलघेवड्या असतात... मनातलं सगळं बोलून टाकतात.

इतक्यात एक आजी जवळ आल्या, खालच्या स्वरांत म्हणाल्या, "अगं, मघा जरा रागानं बोलले ना ते माझे अहो. तू वाईट वाटून घेऊ नको हं. ते असेच आहेत. अलिकडे जरा जास्त चिडचिड करतात."
"नाही हो आजी, मी समजू शकते. त्यांच्या तत्त्वात बसत नसेल म्हणून..."
"तत्त्व तर आहेच, पण त्यासोबत दु:खही आहे गं."
त्यापुढे मी जे ऐकलं, ते ऐकून दगडालाही पाझर फुटावा. त्यांच्या एकुलत्या एक मुलाला त्यांनी अमेरिकेला शिक्षणाला पाठवलं. मुलगा अधूनमधून येत जात असे भारतात. पण ६ वर्षांनी तो जेव्हा आला, त्यानं चाचरतच आपण तिकडे लग्न केलं असल्याची आणि आपल्याला १ वर्षाचा मुलगा असल्याची कबुली दिली. प्रथम संतापाने, मग विचारांती आजीआजोबांनी संमती दर्शवली. खरंतर त्यांच्या संमतीचा प्रश्नच नव्हता म्हणा. प्रकरण जरा निवळल्यावर मुलानेच विषय काढला, "इकडे एकटे रहाण्यापेक्षा तुम्ही का येत नाही माझ्यासोबत अमेरिकेला?"
"आम्ही तिकडे येऊन काय करणार?"
"बाबा, माझी बायकोही नोकरी करते, बाळाला सांभाळाल ना तुम्ही. म्हणजे मग मलाही टेन्शन राहणार नाही, तुम्ही इकडे एकटे आहात म्हणून... हल्ली दिवस किती वाईट आहेत बाबा..."
अखेरीस ठरलं, सगळ्यांनी जायचं. मग हा बंगला ठेवून तरी काय करायचंय? नुसता पडून राहणार. त्यापेक्षा विकून बँकेत ठेवू, व्याज मस्त मिळेल. पटलं, हेही पटलं. विमानतळावर सामानसुमान घेऊन आईबाबा बसले. उगीच गर्दी नको म्हणून नातेवाईकांनी घरीच निरोप घेतलेला. मुलगा म्हणाला, "बाबा, तुम्ही सामान सांभाळा आईसोबत. मी तुमचे पैसे डॉलरमध्ये कन्व्हर्ट करुन आणतो."
दोन तास झाले, तरी मुलगा आला नाही म्हणून आईबाबा चिंतेत पडले. चौकशी करता समजले की विमान जाऊन तर तास झाला आणि यांचा मुलगा विमानात आहे. विमानतळावरील अधिकार्‍याला प्रकार लक्षात आला. त्यानं पाचशे रुपये यांना देऊन परत पाठवलं. कुठल्या तोंडानं कुठल्या नातेवाईकांकडे जाणार, म्हणून अखेरीस या दोघांनी स्वतः प्रवेश घेतला आणि ते आता इथे आहेत.

एका आजींनी मला त्यांनी काढलेली चित्रं दाखवली. मी कलाकार आहे हे जाणून त्यांचा आनंद अक्षरशः गगनात मावत नव्हता. मी परदेशात असते एवढंच त्यांना कळलं आणि त्या रडू लागल्या... "माझी मुलगी परदेशातच कुठेतरी असते. तिचं नाव दीपा. ती ना अशी दिसते... तुला कुठे भेटली, तर तिला सांग आई वाट बघतेय म्हणून. फोन कर म्हणावं तिला. नाहीतर तिचा नंबर मला पाठव. मी करीन तिला फोन." त्यांनी भेट दिलेलं गणपतीचं चित्रं घेऊन मी त्यांच्या खोलीतून जड अंतःकरणानं बाहेर पडले. मला कुणीतरी सांगितलं, "मुलगा विचारीत नव्हता, नंतर मुलगीपण सोडून गेली. तेव्हापासून आजींच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. मुलगी आश्रमाचे पैसे पाठवते, पण यांच्यापासून लपवून."

मी बहारीनला असते. तिथे एकेकाळी असणार्‍या एक आजी भेटल्या. एकदम पॉश. "अजून तसंच आहे का गं तिकडे? खूप बदललेलं असेल नाही?" त्या रम्य आठवणींनी त्या एकदम प्रफुल्लित झाल्या. एकेकाळी इतक्या उच्चभ्रू असणार्‍या त्या इथे कशा आल्या ते काही कळलं नाही. "जाऊ दे गं," म्हणाल्या.

माझं बालपण इंदुरचं. तिथे माझ्या आजीआजोबांना ओळखणार्‍या एक आजी भेटल्या. आम्हाला कित्ती वेळा त्यांनी कवेत घेतलं असेल. केवढी अपार माया, प्रेमळ स्पर्श... "माझ्या पोरी गं! मला भेटल्या गं माझ्या पोरी. आज तुमच्या रूपात माझ्या पोरी भेटल्या मला..." खरंतर काय केलं होतं आम्ही ह्या आजींसाठी? फक्त मनापासून त्यांचं ऐकून घेत होतो, इतकंच.

एक शेतकरीण आजी, अंगावर बर्‍यापैकी दागिने घातलेल्या. ठसक्यात होत्या. जमीनदारीण असाव्यात. "साड्या चांगल्या आणल्या गो पोरींनो, नायतर इतं द्यायच्या म्हनून कायबाय साड्या आणत्यात लोकं."
"अहो पण आजी, देणार्‍यानं काय दिलंय यापेक्षा त्याची दानत बघावी."
"हा, त्ये बी खरं हाय. नायतर कोन हिकडं येतंय? मी माज्या इच्छेनं आले बर्का. पोरांचा, सुनांचा लई जाच. म्हनलं जावा तिकडं, मीच जाते कशी. कुनाला एक पै बी दिली नाय नं हितं आले रहायाला. रानीवानी है मी हितं. कोन इचारनारं न्हाई का जीवाला घोर न्हाई."

अजून एक आजी आग्रहानं मला त्यांच्या खोलीवर घेऊन गेल्या. गोर्‍यापान, नाजूक, घारे डोळे, शुभ्र पांढरे केस असलेल्या आजी. त्या आम्ही दिलेली साडी लगबगीनं नेसून आल्या होत्या.
"चांगली दिसतेय का गं मी?"
"अहो आजी, तुम्ही छान आहातच. तुमच्यामुळे साडी खुलून आलीय उलट."
आजी काय गोड हसल्या. माझ्या मुलीला प्रेमानं जवळ घेत म्हणाल्या, "काय नाव तुझं गं?"
"श्रावणी."
"कुठल्या शाळेत जातेस? जातेस ना?"
"आम्ही इथे नसतो ना. तिकडे बालवाडीत जाते."
"हो का? मी होते बालवाडी शिक्षिका. हुशार आहे हं तुझी मुलगी. ये श्रावणी, इकडे ये. मला आजी म्हणायचं, काय? बरं का गं, तूही मला अहो काकू म्हणण्यापेक्षा 'अगं मावशी' म्हण. ये श्रावणी, खाऊ देते तुला."
कागदात बांधलेल्या पुडीतून त्यांनी काजू, साखरफुटाणे काढून श्रावणीला दिले. तिनं ते खिशात ठेवून दिले.
"असं पौष्टिक द्यावं मुलांना. बुद्धी तल्लख होते मग. येत जा गं, गप्पा मारायला आजीशी. तुला छान छान गोष्टी सांगीन मग. श्लोक येतात का तुला?"
श्रावणीनं दोन श्लोक म्हणून दाखवले. कितीतरी वेळ प्रेमानं त्या तिला कुरवाळत होत्या, चेहर्‍यावरून, पाठीवरून, केसावरून... खूप दिवसांची प्रेमाची भूक भागत नव्हती त्यांची...

एका आजींनी आम्हाला फुगड्यांचे प्रकार शिकवले. गावाकडची लोकगीतं म्हणून दाखवली. भुलाबाईची गाणी, शिराळशेठाची गाणी, पिकं कापणीची, दळणाची, पाणी भरण्याची, तुळशीच्या लग्नाची, कृष्ण जन्माची... किती तरी गाणी. झिम्म्याचे अभिनव प्रकार! ते करताना आमची दमछाक होत होती, पण त्यांचा उत्साह संपत नव्हता. माझ्या बहिणीने सॉलिड धूम केली त्यांच्यासोबत... अखेर आजी दमून बसल्या, त्यांना धाप लागली होती.
"आजी, पाणी हवंय का?"
"नाय गो पोरी. मले काय हून राह्यचं नाही बग. खेळू खेळू दमत न्हाई मी. येवढं तर आमी दाताला खेळून र्‍हातोय, पोट न्हाय भरलं अजून." आजी रडत होत्या की हसत होत्या ते आजीच जाणे! पण त्यांना खूप बरं वाटत होतं हे निश्चित.

इथं प्रत्येक खोलीला एक क्रमांक दिलेला असतो. प्रत्येक आजी मला भेटायला बोलवीत होती. मगाच्या नाजूक आजी म्हणाल्या, "आमची नावं नाही लक्षात राह्यची तुझ्या, तू आपलं खोली नंबर लक्षात ठेव." ते खोलीक्रमांक उच्चारताना माझी जीभ सुकत चालली होती. यांची ओळख हा खोलीक्रमांक? कदाचित एक दिवस आपली ओळखही असाच एखादा खोलीक्रमांक असू शकेल?!

एका आजीनं दिलेल्या साखरफुटाण्यांमुळे हात चिकट झाले होते. ते धुवायला बेसिनपाशी गेले. बेसिन खोल्यांच्या बाहेर होतं. तिथं उंच गवत वाढलं होतं. कुणी दानी पुढं आला तर छाटता येईल. मी बरोबरच्या आजींना म्हणाले, "आजी, केवढं हे गवत!"
त्या म्हणाल्या, "अगं, या गवतात सापही निघतात."
"भीती नाही वाटत तुम्हाला?"
"भ्यायचं कशापायी? मानसापरीस ही जनावरं बरी. डसनार हे आधीच ठावं असतंय. इथं पालीपण पुष्कळ असतात. आता नाही भीती वाटत त्यांची."

या खोल्यांच्या रंग उडालेल्या भिंतींना आपण थोडी मदत देऊ केली, तर या दिवाळीला या वृद्धांच्या आयुष्यात रंग भरेल. आश्रम बिचारा कितीसा पुरणार?
आश्रमवाल्यांनी आम्हाला सुंदर चहा पाजला. आम्हाला आश्रमाविषयी माहिती दिली. या सार्‍यांना आश्रमानं एक छान दिनक्रम घालून दिलाय. शिस्तबद्ध. जेवण, भजन, वैद्यकीय तपासणी, टीव्ही बघणं, झोप, व्यायाम, गप्पा... सगळं. पण एखाद्याला एखाद दिवशी काहीच इच्छा नसली तर?!

तिथून बाहेर पडून आम्ही लहान मुलांना खाऊ वाटला, खेळणी दिली. मुलांनी आम्हाला शुभंकरोती म्हणून दाखवले. त्यांनी बनवलेल्या राख्या आम्ही विकत घेतल्या. सुट्टे नव्हते, तर मी म्हटलं, "राहू दे तुला." पोरगं पळत कुठेतरी गेलं. दहा मिनिटांत परत आलं, "मावशी हे तुमचे सुट्टे पैसे. माझ्यासाठी एक कराल?" त्यानं परत केलेल्या पैशांकडे कौतुकानं आणि आता हा काय मागतो या भीतीनं मी म्हटलं, "हं बोल ना. काय हवंय?"
"मी एरवी आकाशकंदील, किल्ल्यासाठी घरं, भेटकार्ड बनवतो. तुमच्या ओळखीतल्यांना सांगाल आमच्याकडून घ्यायला?"
मला स्वतःची शरम वाटली. ही अनाथ मुलं, त्यांना आश्रमानं आधार दिलाय, आजी आजोबा दिलेत. आजीआजोबांना ही नातवंडं दिलीत. मग अनाथ कोण राहिलं? अनाथ कुणी असेलच तर हा समाज आहे, जिथं अशा आश्रमांना पर्याय नाही, जिथं आपल्या आईवडिलांना असं वार्‍यावर सोडून दिलं जातं, त्यांची अडचण होते. फिरतीच्या नोकरीमुळे यांना घेऊन फिरणं जमत नाही. मग त्यांची इकडे रवानगी होते. कधी जबरदस्तीनं, कधी अनिच्छेनं, कधी स्वेच्छेनं इथं ह्या वृद्धांना यावं लागतं. नंतर साधी विचारपूसही कुणी करू नये? आश्रमात तब्येत ठीक असेपर्यंत ठेवतात, अंथरुणाला खिळल्यावर यांना शासकीय रुग्णालयात नेतात. पुढे काही तरूण समाजसेवक आणि आश्रमातील सह-रहिवासी भेटायला येतील ते. विचार करा, आपण सारे धडधाकट असूनही कसे कसे अनुभव येतात रुग्णालयांमधून! मग या बिचार्‍या परावलंबी, सारं काही गमावून बसलेल्यांचे हाल कोण पाहणार?

आज उमेदीच्या काळात आपण किती 'मी - माझं' करतो? माझं घर, माझी मुलं, माझी बायको, माझा नवरा, माझ्या वस्तू, माझी पुस्तकं, आवडीनिवडी, मित्रमैत्रिणी, नवे कपडे, नव्या चपला, बूट, हॉटेलिंग, सणवार... साधं 'टीव्हीवरची आवडती वाहिनी' यावरून आपण मीपणा सोडत नाही. माझी जागा, माझं टेबल, माझा संगणक... माझं हे, माझं ते... या वृद्धांचंही एकेकाळी हे सारं असेल. आज काळाच्या ओघात हे सारं निसटलंय त्यांच्या हातून. कदाचित उद्या आपल्याही हातून हे सारं सुटणार असेल! "माझी मुलं नाही असं करणार" किंवा "माझ्या भविष्याची तरतूद मी केलीये" या आणि अशा नसत्या भ्रमात राहू नका. कुणावर काय वेळ येईल सांगता येत नाही.

मी असं म्हणत नाही की फक्त आपलीच चूक आहे. त्यांचंही चुकतं ना, पण निदान विचारपूस तरी? दैव-देव माना किंवा मानू नका, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माणुसकी तर मानाल? एवढंच करा, एखादा दिवस हॉटेलला किंवा पिकनिकला थोडावेळ कमी जा, त्यातलाच एखादा तास या वृद्धांसाठी मोकळा ठेवा किंवा यांना बागेत, पिकनिकला घेऊन जा. आश्रमातले सामाजिक कार्यकर्ते या कामी आपल्या सोबत असतातच. जरा या वृद्धांशी संवाद साधा. कोण जाणे, उद्या आपणही आपल्याशी येऊन कुणी चार शब्द बोलावे म्हणून तळमळू, अशीच कुणाची तरी वाट पाहू... अन् कुणी गप्पा मारायला आले तर हरखून जाऊ. तेव्हा, जशी जमेल तशी यांना मदत करा.

मघाशी श्रावणीला एका आजीनं कागदात बांधलेल्या पुडीतून काजू, साखरफुटाणे दिले होते, ते उघडून ती खाऊ लागली. अचानक माझं लक्ष गेलं. पाहते तर काय, त्याला बारीक कीड लागली होती. ती पुडी मी बाहेर फेकून दिली. बिचार्‍या आजींनाही जाऊन सांगावं का नका खाऊ म्हणून?! त्यांच्या अधू डोळ्यांना ही कीड दिसली नसावी बहुधा. जाऊ दे नाहीतर... त्यांना वाईट वाटेल... हेही किडकं निघालं म्हणून.

विचारांच्या तंद्रीत आम्ही बाहेर निघालो. पुन्हा पुन्हा आज्या आम्हाला येऊन काही काही सांगत होत्या... कुणी मिठी मारीत होत्या... कुणी रडत होत्या... कुणी हसत होत्या... कुणी हस्तांदोलन करीत होत्या... निरोपाचा हा अवघड प्रसंग झेपत नव्हता. पाय जड झाले होते. अंगावर वीज कोसळावी तसं या आजीआजोबांचं दु:ख आम्ही झेलण्याचा प्रयत्न करत होतो. डोकं सुन्न झालं होतं. इतक्यात एक आजोबा काहीतरी शोधताना दिसले. मी चप्पल घालत होते.
"आजोबा, काय शोधताय? चप्पल का? मी देऊ का शोधून?"
कुणीतरी म्हणालं, "काही नाही हो, सारखेच काहीतरी शोधत असतात. नीटसं ऐकू येत नाही त्यांना. चप्पल घालून कुठं जायचंय त्यांना?!"

माझी हजाराची चप्पल घालून मी ए.सी. गाडीत येऊन बसले. पायाला घाम आला होता, चप्पल नकोशी वाटत होती. मन पेटलं होतं. त्याची धग माझ्या कपाळावरून, डोळ्यांतून वाहत होती. डोकं भयानक दुखायला लागलं होतं. आमच्यापैकी कुणीच काहीच बोलत नव्हतं. बाहेर आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. आश्रमासभोवार जंगली गवत उंचच उंच वाढलेलं होतं. चौकात माणसांची प्रचंड रहदारी होती. वळून पाहिलं, तर एक आजी छत्री घेऊन उभ्या होत्या आणि आम्हाला हात हलवून 'अच्छा' करत होत्या... 'परत ये गं,' असेच भाव होते ते!

विश्वास ठेवा, यातला प्रत्येक शब्द खरा आहे. प्रशंसेच्या भुकेपोटी, लिखाणाच्या हौसेतून, मसाला घालून काहीही लिहिलेलं नाही. कुणाला उपदेशाचा डोस द्यायची इच्छा आणि लायकीही नाही. हे आयुष्याचं वास्तव आहे! स्वीकारा अथवा नाकारा, ते तसंच रहाणार. फक्त ते जळजळीत न राहता तेजस्वी, सुखावह करणं आपल्या हाती आहे. एवढं पुण्य कराच.

- palli