किल्ला!

टी.व्ही. नामक सैतानानं जगणं व्यापून टाकलं नव्हतं तेव्हाचे हे दिवस.

वर्षाचा कार्यक्रम चोख ठरलेला असायचा. समांतर अशा दोन प्रक्रिया. समांतर म्हणजे मानसिक स्तरावर. एक प्रक्रिया इंग्रजी कॅलेंडरनुसार. दुसरी मराठी किंवा ज्याला साधारणपणे हिंदू म्हणतात, त्या कालगणनेनुसार.

जून महिन्यात शाळा सुरू व्हायच्या. पावसालाही त्याचवेळी सुरुवात व्हायची. साधारण दोनेक महिन्यांनी पहिली परीक्षा व्हायची. तिमाही. आणखी दोनेक महिन्यांनी दुसरी परीक्षा व्हायची. सहामाही. हा साधारण साडेचार महिन्यांचा कालावधी असायचा. इथं पहिल्या टप्प्याचं इंग्रजी कॅलेंडर संपतं.

या साडेचार महिन्यांपैकी बहुतांश काळ पावसाचा. जूनमध्ये पावसाचा आरंभ. आरंभी तो पडायचा तसाच पडायचा. सूक्ष्मपणे पाहिलं, तर आता तसा पडत नाही. पण आपल्या जाणिवा इतक्या सूक्ष्म आता राहिलेल्या नसतात. त्यासाठी परिश्रम करावे लागतात. किमान आठवणींच्या स्तरावर तरी नक्कीच. तर, जूनमध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढत जायचा. जुलैच्या महिन्यात, किंवा मराठी कालगणनेतील आषाढात, पावसाचा जोर सुसाट असायचा. मराठी कालगणना हिशेबात यायची ती याच महिन्यात एकादशीच्या निमित्तानं. आणखी एक कारण म्हणजे रताळी यायची बाजारात. हा महिना संपला, की श्रावण. मराठी कालगणना अंगात भिनण्याचा महिना. सोमवार असायचे. नागपंचमी असायची. नारळीपौर्णिमा यायची. त्यातच मध्ये केव्हातरी तिमाहीची परीक्षा निघून जायची.

मग गणपती. सलग दहा दिवसांचा प्रश्न निकालात निघायचा. पाऊस ओसरत जायचा. मग थोडं बाहेरच्या दिशेनं पाऊल टाकलं, की हिरवाई स्वागतास सज्ज असायची. शाळेत अभ्यासानेही थोडा वेग घेतलेला असायचा. विज्ञानातील प्रयोग वगैरे सुरू झालेले असायचे. इतर काही शाळाबाह्य परीक्षा समोर आलेल्या असायच्या. काही काळातच स्पर्धांचे वातावरण सुरू होणार, त्याचेही वेध या काळात लागलेले असायचे.

सहामाही परीक्षा संपली, की एक मोठी सुट्टी असायची. किमान तीन आठवडे ते एक महिना. काही शाळांमध्ये ती तीन आठवड्यांची. त्यात इंग्रजी माध्यमाच्या उच्चभ्रू शाळा नक्कीच. आम्हां मराठी माध्यमवाल्यांसाठी ती एक महिना असायची. साधारण दिवाळी त्या सुट्टीत असायची. अगदी क्वचित एकदाच दिवाळी या सुट्टीनंतर झाल्याचं आठवतं. एरवी ही सुट्टी, ऑक्टोबरची सुट्टी म्हटली जात असली, तरी ती दिवाळीचीच सुट्टी.

दिवाळीची सुट्टी संपली, की मग थोडा काळ स्पर्धा वगैरेंत जायचा. या बहुतेक वक्तृत्व, निबंध वगैरे. प्रज्ञाशोध परीक्षांचाही काळ हाच असावा. डिसेंबरच्या अखेरीचे ओल्डमॅनचे एक नवे फॅड मधल्या काही काळात घुसलेले असायचे. ते आणि त्याच्या आसपास शालेय सहली. थोड्याच अंतरानं एक हंगाम सुरू व्हायचा. रानमेव्यांचा. जांभळं, करवंदं वगैरे. मग कैर्‍या. आंबे तसे तेव्हाच्या जगण्यात फारसे होते असं आठवत नाही. होत्या त्या कैर्‍याच. घरासमोरच्या, बागेतील झाडांपासून ते किंचित गावाची वेस ओलांडायची तयारी असेल, तर मैल-दोन मैलांच्या घेर्‍यातील आमरायांतून. अनेकदा ही कैर्‍यांची लूट असायची. लूट म्हणजे लूटच. घरचं लोणचंही त्यातून काहींनी काढलेलं असायचं.

रानमेव्याच्या या दिवसांतून निघतानाच नऊमाही परीक्षा उलटलेली असायची. वेध वार्षिक परीक्षेचे आणि तिच्या थोडे अलीकडे-पलीकडे होळी आणि रंगपंचमीचे. तेवढं संपलं, की सुट्टी! मध्येच १० एप्रिलला निकालाची थोडी जमिनीवर आणून ठेवणारी एक तारीख यायची. ती इंग्रजीच. इंग्रजी कॅलेंडरनुसार चालायचं काय, तर शाळेची सुरुवात, परीक्षा, स्पर्धांचे हंगाम, सहली (या सहलींमध्ये मौज असायची, पण ती तशी माफकच), पुन्हा परीक्षा आणि मग निकाऽऽऽल!!! जून ते सप्टेंबर पावसाळा, ऑक्टोबर ते जानेवारी हिवाळा आणि फेब्रुवारी ते मे उन्हाळा अशी ही गणितं. मराठी कालगणना यायची, ती सण वगैरे घेऊनच. त्यामुळे या कालगणनेशी असलेलं नातं थोडं वेगळं. ही कालगणना गृहिताच्या पातळीवरचीच. मुद्दाम मराठी कालगणना समजून घेऊन वगैरे नाही. त्याविषयीचे संवाद माफकच "अरे, आषाढ लागला का... वा. आता श्रावण", "गणपती आले म्हणजे, दिवाळी तोंडावर. लागा तयारीला..."
आणि ही तयारी सुरू व्हायची... गणपतीला निरोप दिल्यानंतर काही दिवसांतच.

***

एखाद्या घराचं आवार. साधारणपणे दहा-बाय-पंधरा फुटांचा चौक. चौक म्हणजे घराशेजारच्या जागेतील किंवा समोरच्या जागेतील मोकळा भाग. तिथं असतो किल्ला. त्या गल्लीतल्या किंवा गल्लीच्या एका भागातल्या मुलांनी केलेला. किल्ल्याचा डोंगर, हिरवागार. नरसाळ्याच्या कौलांनी केलेले बुरूज, किल्ल्याच्या काळ्या भिंती, मध्ये चुन्यानं पांढर्‍या रेघा मारून मुद्दाम घडवलेल्या. एखाद्या बुरुजावरून डोकावणारी तोफ. शिवरायांची छोटी पुतळी अशीच सन्मानानं ठेवलेली. किल्ल्याच्या डोंगरावर मावळे. डोंगराच्या पायथ्याशी नदी किंवा किल्ल्याचा खंदक. हा किल्ला भुईकोट नसला, तरीही खंदक. हे सारं त्या रिकाम्या चौकात पाठच्या बाजूला. किल्ल्याच्या त्या डोंगरापासून दर्शनी भागापर्यंत पसरलेल्या जागेत एक छोटं गाव वसलेलं. तिथं घरं, आखलेले रस्ते, रस्त्यांवर दिव्याचे खांब असतात, रस्त्यावरून मोटारी धावतात. गावातून, बहुदा मध्यभागातूनच, एक रेल्वेमार्ग जातो. त्यावरून एखादी रेल्वे धावताना दिसते. गावाच्या किंचित बाहेर विमानतळ. तिथून विमान उडतंय. इतकंच नाही तर माणसांच्याही हालचाली. म्हणजे माणसांच्या छोट्या प्रतिकृती एखाद्या घराच्या व्हरांड्यात चढताहेत अशा हालचाली... कल्पना करवत नाहीये?

***

मी, पम्या, नितीन, किरण्या, असला तर हुळागड्ड्या, आलेच तर संत्या वगैरे, काही वेळा राजा, वगैरेंचं टोळकं. शाळेतून आल्यानंतर, तोंडावर सहामाही परीक्षा आहे हे ठाऊक असूनही क्रिकेटचे दोनेक डाव झाल्यानंतर अंधार पडायचा तेव्हा खुंटावर बसलेले असायचो. तेव्हा ही तयारी सुरू व्हायची.
"यंदा काय करायचं बे?"
"कशाचं?"
"किल्ला?"
"पैलं कुठं ते ठरवाय लागेल."
आणि मग हे बोलणं, त्या दिवशी ठिकाण ठरवूनच थांबेल असं नाही. कारण विषयाला काहीही फाटे फुटायचे.
आठवड्याभरात कुठंतरी काही निर्णयापर्यंत गाडी यायची. आधी ठरायचं ते एक कंपाऊंड.
"कलघटगींना विचारूया का? त्यांच्या इथं जागा आहे..." अशी काहीतरी सुरुवात होऊन जागेचा शोध चालायचा. कलघटगी हे नाव बदलेल. एका वर्षी त्यांच्या इथं किल्ला केला होता. त्यांच्या बंगल्याला आउटहाऊस होतं. तिकडं जाणारा बंगल्याच्याच आवारातील चार-पाच फुटी रस्ता, त्याच्या एका बाजूला बंगल्याची मुख्य इमारत आणि दुसर्‍या बाजूला थोडी मोकळी जागा. तिची रुंदी असावी दहा-एक फूट नक्कीच. गेटमधून आत शिरलं, की आधी सात-आठ फूट थोडी झाडं वगैरे. त्यानंतर पाण्याचं एक टाकं होतं. टाकं म्हणजे जमिनीपासून एक ते सव्वाफूट खोल. दगड आणि सिमेंटचा तळ. त्यात पाणी टिकायचं. त्यांच्याकडं तेव्हा दोन कासवं होती. ती त्यात असायची. हे टाकं साधारण पाच-सात फूट लांबीचं असेल. त्यानंतरचा सुमारे पंधरा-एक फुटांपर्यंतचा भाग मोकळा. तिथं एक आंब्याचं झाडं होतं. पण ते कडेला. बाकी मोकळी जागा. पाठीशी एक खोली होती. तेवढी साधारण दहा-बाय-पंधरा फुटांची जागा, हे त्या वर्षी दिवाळीत आमचं साम्राज्य होतं.

किल्ल्यासाठी ही एवढी जागा किमान लागायचीच. त्यामुळं तिचा शोध महत्त्वाचा. नुसती इतकी जागा असून भागायचे नाही. पाणी आणि विजेचा पुरवठाही महत्त्वाचा. विजेचा पुरवठा हे आताचे शब्द. तेव्हाचा शब्द साधा - "कनेक्शनचं काय?" आणि पाण्यासाठी - "नळ आणि टाकी आहे का?"

किल्ला कोणता करायचा हाही असाच एक वेळखाऊ प्रश्न. तो सुटणं म्हणजे एकदम दहा-एक पावलं पडली असंच म्हणायचं. कारण, ती ठरलेली जागा, त्या जागेत त्या किल्ल्याचं बरोबर पार्श्वभूमीवर स्थान, त्याच्याही मागं किल्ल्याच्या सगळ्या मावळ्यांसाठी आवश्यक जागा, पुढं एक गाव वसेल अशी जागा वगैरे गोष्टी यायच्या. हे गाव म्हणजे गावच. आम्ही केलेले तीन किल्ले आठवतात. एक रायगड, एक प्रतापगड आणि एकदा सिंहगड.

किल्ला करायचा म्हणजे तयारी जोरातच असायची. आधी मिळवायचा तो नकाशा. किल्ल्याचा नकाशा. या प्रत्येक गडाच्या नावाचं एक छोटेखानी सत्तर-ऐंशी पानांचं मराठी पुस्तक मिळायचं त्या काळी. त्या पुस्तकाच्या शेवटी किल्ला, त्याचा डोंगर, त्याचा आसपासचा परिसर असा नकाशा असायचा. पुस्तकाची ती पानं म्हणजेच, आजच्या भाषेतील, ब्लू प्रिंट. कागद वगैरे नाहीच. ठरलेल्या जागेत कुठं किल्ल्याचा डोंगर उभा करायचा एवढाच प्रश्न. तो डोंगर एकदा आखला की काम सुरू. मेहनतीचं. दगड गोळा करायचे, माती आणायची. त्यांचा ढिगारा करून डोंगर उभा करायचा. दगड पक्के बसतील हे पाहावं लागायचं. मातीही पक्की लागायची. बहुतांश लाल मातीच गावात. त्यामुळं तिचाच उपयोग. पाणी मारत डोंगर उभा राहत जायचा. पूर्ण डोंगर उभा राहण्यास चार ते पाच दिवस जायचेच. त्यात बरीच व्यवधानं ठेवावी लागायची. डोंगराची रचना ओबडधोबडच असली पाहिजे, मोहरी टाकून तो हिरवागार राहील हे पाहावं लागे. डोंगरातून नदी किंवा ओढा कुठून येणार आहे, ते पाहून तिथं बेमालूम प्लास्टिक टाकावं लागे. त्या काळी हे प्लास्टिक पिशव्यांच्या रूपात इतकं सहजगत्या उपलब्ध व्हायचं नाही. अशा पिशव्या केवळ कापडाच्या मोठ्या दुकानांतूनच मिळायच्या. त्यातर आमच्याकडे नसायच्या. मग त्या मिळवाव्या लागायच्या. ते प्लास्टिक बेमालूम जाण्यासाठी मातीचा तेवढा भाग नीट बसवावा लागे. प्लास्टिकला काव वगैरेही लावली जायची. पाचेक दिवसांनी डोंगर आकाराला येत गेलेला असे तोवर...

हे सगळं काम सांघिक वगैरे असतं, हे नंतर कळत गेलं. एकीकडे डोंगराची रचना सुरू होते, तेव्हा त्याच्याआधीच त्यासमोरचं गाव आखण्यास समांतरपणे सुरुवात झालेली असायची. हे गाव आधी कल्पनेत तयार व्हायचं. प्रत्यक्ष जागेवर त्याची आखणी डोंगरासोबत. ती तशी सोपी असायची. कारण गाव म्हटलं, की मुळात डोळ्यांपुढं असायचं ते आमचंच गाव. त्यामुळं मग गावातील काही ठळक गोष्टी तिथं येणारच. त्यात रेल्वे स्टेशन, रेल्वेचा गावाला विभागून जाणारा एक मार्ग, कुठंतरी त्या मार्गावरून जाणारा एक पूल, इतर रस्ते, त्यातच कुठं तरी जमिनीसलग असा ओढ्यावरील एक पूल. किल्ल्याच्या त्या डोंगराच्या पायथ्याशी नदी (आता ही वास्तवात असेलच असं नाही, पण तो डोंगर वेगळा आणि हे गावही वेगळंच. ही नदी गावाचा भाग), गावाच्या किंचित बाहेरच्या बाजूला विमानतळ, मध्यवस्तीत गावातील चित्रपटगृह किंवा चित्रपटगृहे... यादी मोठी असायची.

सारी तयारी महिनाभर आधी सुरू करावी लागायची ती त्यातल्या कौशल्यासाठी. यातला कौशल्याचा एक भाग असायचा तो या गावाला जिवंतपणा आणण्यासाठी तिथं असणार्‍या इमारती. विमानतळाची इमारत, रेल्वे स्टेशनची इमारत, बसथांब्याची इमारत, किमान एकतरी चित्रपटगृह आणि मग घरं. या सार्‍या इमारती तयार केल्या जायच्या त्या कार्डशिटाच्या. काही ठोकळी घरं वगैरे बहुतेक किल्ल्यातील मावळेच करायचे. हे मावळे म्हणजे त्या-त्या पेठेतली, गल्लीतली, रस्त्यावरील आमच्यासारखीच पोरं. काही खास इमारती मात्र बाहेरून करून घ्याव्या लागायच्या किंवा त्यासाठी पुन्हा दोघा-तिघांची मोट बांधावी लागायची. आमच्याजवळच पण दुसर्‍या पेठेत राहायचा विवेक. तो त्यात तरबेज.

त्या चार-पाच वर्षांमध्ये अरूण थिएटर हे जवळपास प्रत्येक किल्ल्यात असायचंच. कारणही तसंच. ते गावात झालेलं नवं थिएटर. बाकीच्या थिएटरांपेक्षा अतिशय वेगळी अशी त्याची इमारत होती. वास्तुकलेचा नमुना वगैरे नाही. पण एकूण भव्य आवार, ७० एमएमसाठीची क्षमता वगैरे गोष्टींनी उगाचच पोरांनाही गावात भूषण तयार झाल्यासारखं वाटायचं. हे थिएटर रेल्वेमार्गाला खेटून असलेल्या रस्त्यावर. त्यामुळे किल्ल्यातील गावांतदेखील त्याची जागा तीच. समोरचा रस्ता तसाच बर्‍यापैकी रुंद वगैरे. त्या थिएटराशेजारची वस्ती ही मराठा कॉलनीच असणार असं चित्र.

हा विवेक अशा इमारती कार्डशिटापासून तयार करायचा. कार्डशीट, फेव्हिकॉल, स्टीलची पट्टी, पेन्सील ही त्याची साधनं. त्याच्या अंगची कला अशी की तो कार्डशिटापासून मोठ्या इमारती वगैरे झाल्यानंतर उरलेल्या कपट्यांतून माणसांच्या प्रतिकृती तयार करायचा. त्यानं बनवलेल्या घरांमध्येही वास्तुकला वगैरे दिसू शकायची. घरांच्या खिडक्या, व्हरांडा, दारं, यांत तर ती असायचीच. पण घरांची छतं ही एक खासियत. सरळ काँक्रीटची गच्ची ही बहुदा त्याला मानवायचीच नाही. त्यामुळं चढ-उतार असलेली छतं हमखास प्रत्येक ठिकाणी येत असत. विवेककडं महिना-पंधरा दिवस आधी जाऊन आपल्याला काय-काय हवंय ते सांगावं लागायचं. तो या काळात खूप व्यग्र. विषय हमखास सरळ खुन्नशीपर्यंत यायचाच. त्यात किल्ल्यांची स्पर्धा असायची, त्यामुळं या खुन्नशीला धार. विवेक इतर कुणासाठी काम करतोय याकडं मावळ्यांचं लक्ष. त्यापेक्षा वेगळं काही आपल्या हाती पडलं पाहिजे, आपल्याकडं जे असेल ते इतरांकडं जाता कामा नये... किती व्यवधानं...!

रस्त्यांची, रेल्वेची आणि विमानतळाची आखणी एकदा झाली, की मग रस्ते 'बांधण्यास' सुरुवात. रेल्वेसाठी बहुतेक प्लास्टिकचे तयार रूळ मिळायचे, तेच टाकले जायचे. एखाद्यावेळी तेवढं 'बजेट' नसेल, तर मग तिथंही काही करामत केली जायची. मुख्यता हे रूळ काळ्या, राखाडी रंगानं आखून किंवा मग 'टाकाऊतून टिकाऊ' या न्यायानं काटक्या, वायर वगैरेंपासून बनवले जायचे. थोडं कष्टाचं काम. रस्त्यांसाठी कोळशाची खर हा हुकमी पर्याय. क्वचित, काळ्या वाळूचाही उपयोग, पण अगदी क्वचितच. खरही पसरलेली असेलच असं नाही. काळ्या रंगाचे पट्टे हाही पर्याय असायचाच. तोच बहुदा लाभदायक असायचा. त्याचंही एक कारण होतंच...

इमारतींचं वगैरे काम विवेककडं किंवा आपल्यातल्याच कुणाकडं दिलं गेलं, की आणखी एक टप्पा सुरू व्हायचा. सर्वांत महत्त्वाचा टप्पा. ट्रिक सीन्स. ट्रिक सीन्ससाठी रस्ते वाळूचे किंवा कोरडी खर टाकून क्वचितच केले जायचे. काळे पट्टे रंगवणे हाच मार्ग. त्यांवरून मोटारी धावायच्या, विमानतळावरून विमान उडायचं, रेल्वे मार्गावरून रेल्वे जायची. हे सारे ट्रिक सीन्स ही या किल्ल्यांची खासियत. अगदी आजही, माझ्या माहितीप्रमाणे ती तशीच आहे.

हे ट्रिक सीन्स कसे व्हायचे? दोरा, 'U' आकाराचे खिळे हे त्यांचं साहित्य. एखादी मोटार जिथून निघेल ते टोक आणि ती जिथपर्यंत जाणार असेल ते टोक या ठिकाणी हे खिळे रस्त्यात खोचलेले असायचे. त्यांतून दोरे गेलेले असायचे. दोरांना मोटारी बांधलेल्या असायच्या. ही बांधणी थोडी खास असायची. मोटार असो किंवा आणखी काही. गाडी इकडं-तिकडं जाऊ नये यासाठीही दोरेच. विमानंही उडायची ती अशीच दोर्‍यांच्या साह्यानं. माणसं चालायची ती या दोर्‍यांच्याच जोरावर. काळ्या दोर्‍यांची रिळंच त्यासाठी खरेदी केलेली असायची. दोरा काळा, कारण तो पार्श्वभूमीत लपून जायचा.

किल्ल्यासमोरच्या गावातील रस्त्यांवर, घरांमध्ये दिवे वगैरे असायचे. त्यानिमित्तानं मुलांना वीजव्यवस्थेचं वास्तविक ज्ञान आरामात मिळून जायचं. बांबूच्या काड्यांपासून पथदिवे केले जायचे. प्रत्येक खांबावर एक दिवा. त्यासाठी विजेच्या दिव्यांच्या माळा आणून त्या वेगळ्या करायच्या किंवा मग ते छोटे दिवे, त्यांचे होल्डर स्वतंत्रपणे खरेदी करायचे. इथं मात्र बजेट हे लागायचंच किंवा कोणाच्या घरी दिव्यांच्या माळा असतील, तर त्या आणून वेगळ्या करायच्या आणि किल्ला झाल्यानंतर पुन्हा होत्या तशा जोडायच्या. या दिव्यांच्या निमित्तानं सोल्डरिंग, त्यासाठीची गन या गोष्टीतर शिकायला मिळायच्याच, शिवाय विजेशी संबंधित सुरक्षिततेचे धडेही एक-दोन 'धक्के' खाल्ले, की आपोआप मिळायचे. एक गोष्ट असायची. दिव्याचे हे खांब साधारण फूटभर तरी नक्की उंच. विशिष्ट अंतरावर रस्त्यांच्या कडेनं ते असायचे. त्या काळात रस्ता दुतर्फा, मध्ये दुभाजक वगैरेंचा इतका अनुभव नसायचाच मध्यम किंवा छोट्या शहरांत. त्यामुळे दिव्याचे खांब रस्त्याच्या कडेलाच. त्या खांबांवरचे ते छोटे दिवे मिणमिणता प्रकाश देऊ शकायचे. अर्थात, त्या शहरातील रस्त्यांवर तसाच प्रकाश असायचा.

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली नदी, त्यामागचा डोंगर हे ओलांडून गेलं, की मागं एक झोपडी असायची. झोपडी म्हणजे चार काठ्या उभारून त्याभोवती चादर वगैरे लावून केलेला आडोसा. तो बाहेरून दिसायचा नाही. तिथं किल्ल्याचे दिवस मावळे बसलेले असायचे. साधारण संध्याकाळी सहा ते रात्री नऊ-साडेनऊ ही किल्ल्याच्या सादरीकरणाची वेळ. या काळात मावळे त्या झोपडीत. कारण ती झोपडी म्हणजेच त्या ट्रिक सीन्सची - आजच्या शब्दांत - कंट्रोलरूम. मोटारी, विमाने, माणसे वगैरेंच्या दोर्‍यांची दुसरी टोके तिथं त्या झोपडीत गेलेली असत. कुठला दोरा कुठल्या वाहनाचा किंवा माणसाचा वगैरे तिथल्या मावळ्यांना पक्कं लक्षात ठेवावं लागायचं, आणि बहुदा ते ठेवायचेही. फसगत क्वचितच.

एव्हाना किल्ल्याच्या डोंगरावर टाकलेली मोहरी उगवलेली असायची. त्यामुळं डोंगर हिरवागार झालेला असायचा. मग चाचणी सुरू व्हायची. चिलिमीचा पाईप, त्यात कॉईल, तिला विजेची जोडणी आणि कॉइलला लागून एक केप. किल्ल्याच्या एखाद्या बुरुजावर ठेवून ही तोफ उडवली जायची. तिच्यापाठोपाठ चाचणी व्हायची ती रस्त्यांवरच्या दिव्यांची आणि किल्ल्यातील विशिष्ट महत्त्वाच्या ठिकाणच्या दिव्यांची. उडालेलं विमान शेवटाला एखाद्या कौलारू घराच्या टोकापाशी जाऊन थांबायचं. ते दिसत नाही ना याचीही चाचणी.

किल्ला उभारून, लावून तयार व्हायचा, तेव्हा धनत्रयोदशी दुसर्‍याच दिवसावर आलेली असायची. अखेरचा हात फिरवण्याचे काम अद्यापही बाकी असायचंच. ते त्याच दिवशी व्हायचं. दिवाळीचा सकाळचा फराळ झाला, की पावलं किल्ल्याकडंच वळली पाहिजेत. सकाळी सगळी साफसफाई वगैरे चालायची. त्यानंतर दिवे वगैरे तपासणी, ट्रिक सीनचे दोरे वगैरे कायम आहेत की नाहीत, ते कुठं तुटलेले नाहीत ना, हे पाहिलं जायचं. हे सगळं अनेकदा रात्रीही उघड्यावरच असायचं. त्यामुळं कुठं रस्ता 'वाहून' तर नाही ना गेलेला हे पाहायला लागायचं. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशीची रात्र जागवलेली असायची. किल्ल्याचं अखेरचं काम तर असायचंच. शिवाय रस्ते रंगवणं हे एक महत्त्वाचं काम. पातळ चुन्यानं भरलेले डबे घेऊन टोळी बाहेर पडायची. सगळ्या भागांतील प्रमुख रस्ते, कंपाऊंडच्या भिंती या त्या रात्री रंगायच्या. आपल्या गटाचं नाव लिहून कोणता किल्ला केला आहे ते सांगत समुदायाला निमंत्रण दिलं जायचं, "या किल्ला पाहायला"!!!
किल्ल्यामागच्या कंट्रोलरूममध्ये साधारणपणे दोन किंवा तीनजणच असायचे. तितकीच संख्या दिवे वगैरेंच्या व्यवस्थेसाठी. एक-दोनजण समोरच्या गर्दीच्या नियंत्रणासाठी. एकजण किल्ल्याचं धावतं वर्णन करणारा. एकूण गट दहाजणांचा वगैरे. हे दहाजण हेच किल्ल्याच्या या उपक्रमाचे मोठे रिसोर्सेस. त्यांच्यानंतरचा रिसोर्स म्हणजे पैसा. तो अगदीच फुटकळ असायचा. काळा दोरा विकत आण, कार्डशीट घे, फेव्हिकॉल घे वगैरे. मग अनेकदा त्यात कपात केली जायची, कारण पैसा दिवे वगैरेंसाठी लागायचा. मग अशावेळी इतर आयत्या उपयुक्त साधनांचा उपयोग व्हायचा. शाळेसाठीचे रंग हे त्यांतले प्रमुख. अशांतून दिसून यायचं, की या मुलांची कल्पकता हीच मोठी समृद्धी होती त्या उपक्रमांत.

***

किल्ल्यांचे दोन वर्ग हमखास असायचे. तिसराही होता, पण एकूणच त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष. हा म्हणजे चिल्ल्यापिल्ल्यांचा गट. त्यांच्यानंतरचा गट असायचा साधारण बारा-तेरा वर्षांपर्यंतचा. या गटाचा किल्ला हा त्यांच्या क्षमतेनुसारच. एक डोंगर, त्यावर नरसाळी कौलं लावून बुरूज उभे करीत केलेला किल्ला. समोरचे शहरदेखील त्या कुवतीनुसारचेच. ट्रिक सीन्स बहुदा नाहीतच. कारण ती क्षमता नसायचीच. अर्थात, हे सारं असलं, तरी तो करणार्‍या मुलांच्या वयाचा विचार करता, तेही कौतुकास्पदच असायचं. मुख्य म्हणजे त्या वयातही सांघिक कामगिरी दिसायचीच. किल्ल्यांचा खरा स्पर्धात्मक गट यायचा तो त्यापुढचा. वयोगट बारा-तेरा ते पुढे, साधारण अठरा आणि क्वचित वीसपर्यंतचा. ट्रिक सीन्स वगैरे गोष्टी, नकाशा आणि त्यानुसारची किल्ल्याची उभारणी, रस्ते, दिवे वगैरे गोष्टी हा त्यांच्या क्षमतेतील भाग. आमच्या भागात असे मोठ्या मुलांचे किमान पाच-सहा किल्लेतरी असायचे. दिवाळीचे पाचेक दिवस संध्याकाळी हाच कार्यक्रम या भागातल्या रहिवाशांचा असे. रहिवासी म्हणजे त्यांतही मुले वगैरेच अधिक. संध्याकाळी साधारण सहानंतर केव्हातरी किल्ल्याचा शो सुरू व्हायचा. शो म्हणजे शो. ".... (इथं त्या मुलांच्या गटाचं नाव) आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सादर करीत आहोत 'अमुकगड'... " असं म्हणत त्या किल्ल्याची कॉमेंटरी (याला समालोचन किंवा धावतं वर्णन हे शब्द नाहीत, त्याला कॉमेंटरीच म्हणायचं) सुरू व्हायची. ही कॉमेंटरी करण्यासाठी कुणी त्यातल्या-त्यात ती कौशल्यं असणारा मुलगा असायचा. त्यानं किल्ल्याचा इतिहास समजून घेतलेला असायचा, त्याच्याकडं थोडी वक्तृत्वकलाही असायची. हातात एक लांबसडक काठी घेऊन किल्ल्यापासून त्याची कॉमेंटरी सुरू व्हायची. किल्ल्याच्या डोंगराचं नाव, त्याची उंची, किल्ल्याची वैशिष्ट्यं, थोडक्यात किल्ल्याचा इतिहास. मग डोंगराच्या पायथ्याची नदी, तिच्यावरचं एखादं धरण वगैरेंचं वर्णन करीत स्वारी गावात यायची आणि मग एका टोकाहून दुसरीकडे असं फिरत सारं काही प्रेक्षकांना सांगून व्हायचं. हे सारं तोंडपाठ. हातांत कागद वगैरे घेऊन स्क्रिप्टप्रमाणं हा प्रकार नाही. विमानतळावर कॉमेंटरी आली, की विमान उडालं पाहिजे. थिएटरपाशी येते, तेव्हा तिथून गाडी निघाली पाहिजे. एखाद्या विशिष्ट बंगल्यापाशी येते, तेव्हा तिथून गाडी निघाली पाहिजे किंवा गाडी येऊन थांबली पाहिजे. गाडी येऊन थांबली, तर माणसं पायर्‍यांवरून घरात चढली पाहिजेत. हे सगळं सुसूत्रपणे असायचं.

साधारण पाऊण ते एक तास चालणारा हा एक कार्यक्रम. दिवसभरात अशी चारेक सत्रे व्हायची. या चार-पाच दिवसांतच केव्हातरी एकदा स्पर्धेचे परीक्षक येऊन जायचे. गुपचूप असं म्हटलं जायचं, पण किल्लेकरांच्या वर्तुळात साधारणपणे कोण परीक्षक असेल याचा अंदाज असायचाच. त्यामुळं त्या सत्राला अधिक सावधानता आपोआप यायची.

killa.jpg पहिल्यांदा आमचा किल्ला स्पर्धेत नव्हताच. उगाच आम्ही भाग घेतला अशी स्थिती. मोजके पाच-सहा ट्रिक सीन, किल्ल्याचं रूपडंही नकाशानुरूप नाही, किल्ल्याची माहितीही नाही. तो कसला स्पर्धेत येतोय? त्यावेळचे इतरांचे ट्रिक सीन चांगले होते. गाड्या वगैरे जोरदार अगदी. एका किल्ल्यात विमानं तर दोन. उड्डाण एकच. पहिलं धावपट्टीवरून उड्डाण घ्यायचं आणि ते वर गेलं, की तिथून पुढं दुसरं जमिनीला समांतर काही अंतर उडालेलं दिसायचं. बेमालूमपणे दोरे लपवण्यात ती मंडळी यशस्वी झाली होती. त्याशिवाय गावातील तळ्यात त्यांनी बोटी फिरत्या ठेवल्या होत्या. तेही खासच. पाहत राहावं असं दृश्य.

आमची तयारी दुसर्‍या वर्षी झाली जोरदार खरी, पण तेही वर्ष धक्का खाण्याचंच होतं. किल्ल्यात प्रथमच त्या वर्षी दोन ट्रिक सीन असे आले, की बाकीच्यांनी तोंडांत बोटे घातली. आमच्यासह. काय होतं असं? या ट्रिक सीनमध्ये रस्त्यांवरून धावणार्‍या गाड्या चक्क वळायच्या. वळायच्या अगदी सफाईदारपणे. आजवर आम्ही पाहिल्या आणि पळवल्या त्या गाड्या सरळ रस्त्यानं पॉईंट टू पॉईंट जाऊ शकायच्या. पण या किल्ल्यातील गाड्या वळताना पाहून पहिल्याच दिवशी इतर स्पर्धकांनी हार मान्य केली होती. त्याच वर्षी भर पडली होती ती माणसं चालण्याची. माणसं म्हणजे चक्क कार्डशिटापासून केलेल्या माणसांच्या प्रतिकृती. अगदी स्त्री, पुरूष, मुलं वगैरे. हा तर डोक्याला शॉट होता. चालण्याची म्हणजे अगदी पावलं उचलून नव्हे. सलग एका रेषेत माणसांची हालचाल व्हायची. हे कोणाच्याही डोक्यात आलेलं नव्हतं.

विमान उडणं, मोटारी धावणं, जहाजं फिरत राहणं, गडावरून तोफ उडवली जाणं वगैरे सगळं अगदी मान्य होतं, गृहित होतं. पण माणसांची हालचाल होऊ शकते, गाड्या वळू शकतात हे मात्र एकूणच कल्पनेत नव्हतंच. त्या वर्षी मिळालेला तो मोठा धक्का होता. गाड्या वळतात कशा याचा शोध पुढे लगेचच लागला, पुढच्या वर्षीपासून इतर किल्ल्यांमध्येही गाड्या तशाच वळणं घेत धावू लागल्या हे खरं, पण पहिल्या वर्षी बसलेला धक्का मोठाच होता. त्या वर्षी त्याच किल्ल्यानं त्या भागाच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. बर्‍याच मामल्यांत. त्यांचा किल्लाही उत्तम होता, ट्रिक सीन्स होतेच, कॉमेंटरीही होती, घरं वगैरेंत त्यांनी बाजी मारली होती! एकूणच किल्ला सरस ठरला. पुढच्या वर्षी इतरांनी ती मजल गाठली. पण त्या वर्षीचा त्यांचा 'भाव' हा 'भाव' होता.

***

गाव सुटलं.

नवी गावं पाहत गेलो, दिवाळीच इतरत्र होऊ लागली. त्या-त्या दिवाळीचं नवेपण समजून घेत गेलो. किल्ले बहुतांश सगळीकडं होतात हे ध्यानी येत गेलं आणि मग हळूहळू आपल्या गावाच्या किल्ल्यांचं वेगळेपणही ध्यानी येत गेलं. किल्ला नावाचा एक डोंगर, नावापुरते बुरूज, खेळण्यातले शिपाई वगैरे यापलीकडे त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असायचं. ते एक जितं-जागतं गाव असायचं. पोरांनी हातांनी घडवलेलं. विजेचा खेळ करायचा, कल्पना वापरायची, कलाकुसर दाखवायची. श्रम करायचे, सांघिक कामगिरी करायची. रात्री रस्ते रंगवत प्रचाराचेही धडे घ्यायचे. भरगच्च कार्यक्रमांतून उभं राहिलेलं जितं-जागतं गाव. कदाचित, तेव्हापर्यंत टी.व्ही. न आल्याची ही करामत असावी.

तसं गाव मात्र पुन्हा बाहेर कुठंही पहायला मिळालं नाही... कदाचित, तोवर आलेल्या टी.व्ही.नं आपलं काम केलं असावं!!!

- Shravan Modak
रेखाटन : prakashkalel