पैलतीर

pailateer_ajay_patil.JPGतुलाच ना नकोसं होतं
लहरींवर रुसून
लाटांना भिऊन
वार्‍याकडे पाठ करून
नकाराचा नांगर टाकून
बसायला वाळूत तोंड खूपसून

म्हणूनच तर ना माझ्या मना
आपण निघालो पैलतीरी
लहरींवर झुलत
लाटांवर बागडत
वार्‍याला झुलवत
खारे फवारे झेलत
कधी डुचमळत
तर कधी कोलमडत
पण कधीही
न बसता रडत

पैलतीर दिसताच मग
का आठवलं सुकाणू
तट्ट फुगलं शीड
का पाहतोयस गुंडाळू
अरे,जाऊ ना असेच मस्तीत
भिडू त्याही तीराला मजेत
अन् कुणी सांगावं
असेल तोच आपला
खराच ऐलतीर
सोडून आलो आत्ता
तोच निघेल पैलतीर !

- Bhau Namaskar

रेखाटन - Ajai