बाप माणूस.......!

माझ्या ३१ व्या वाढदिवसाला मला (नव्हे, आम्हां सहा भावंडांत प्रथमच एखाद्याला) आयुष्यात पहिल्यांदा 'हॅपी बर्थ डे' म्हणणारे माझे वडील त्यांच्या कामाच्या क्षेत्रात एकदम बाप माणूस आहेत. नुकताच त्यांचा ७१ वा वाढदिवस झाला. झाला अशासाठी, की आम्ही तो जोरदार साजरा करायचे ठरवले होते, पण 'असली थेरं करणार असाल, तर मी त्या दिवशी बाहेरगावी जाईन' अशी तंबी मिळाल्याने शेवटी तो बेत रद्द केला. त्यांना घेऊन जवळच्याच श्री क्षेत्र देवगड (तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर) येथे दर्शनाला घेऊन गेलो आणि बळेच त्यांना जेवणाची ट्रीट दिली!

वडिलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या ३३ वर्षांच्या सेवेमध्ये मी (माझ्या पहिली ते दहावीपर्यंत) त्यांच्या सोबतच बदलीच्या ठिकाणी राहत असे. कठोर स्वभावाचे आणि कुशल प्रशासक अशी दोन विशेषणे लागू होत असल्याने त्यांची दर दोन वर्षांनी बदली होत असे अन् आमची बिर्‍हाड घेऊन फिरणारी वरात नेहमीच निघत असे!

पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड होऊनही, पोलीस खाते बदनाम असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना पोलीस खात्यात भरती होऊ दिले नाही. मग ते शिक्षक म्हणून 'रयत शिक्षण संस्थे'मध्ये नोकरीस लागले. दोन-तीन वर्षांतच पदोन्नती मिळून ते 'मुख्याध्यापक' झाले, अन् १९९५ला कनिष्ठ महाविद्यालयाचे 'प्राचार्य' म्हणून निवृत्त झाले. आज वयाची ७१ वर्षे पार केल्यानंतर जर त्यांना कुणी शेतात फिरताना पाहिले, तर क्षणभरही वाटणार नाही की हाच तो आगीचा गोळा, गुरू जमदग्नी अन् गुरू वसिष्ठाचा अवतार! पण त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या, की एक लक्षात येते - सिंह म्हातारा झाला म्हणून गवत खात नसतो!

नोकरी म्हणजे केवळ शाळा-महाविद्यालय चालवणे हाच त्यांचा कामाचा आवाका नव्हता, तर ज्या-ज्या गावात गेले तिथल्या सामाजिक जीवनावर पुसता न येणारा एक ठसा त्यांनी उमटवला! मान अन् शान राखून राजासारखे राज्य केले! 'सर आले' म्हणताक्षणी केवळ शाळेतील विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षकही लटलट कापताना मी पाहिले आहेत. एखाद्या शिक्षकाने चूक केली असेल, तर तो वडिलांच्या समोर येण्याऐवजी सरळ घरी निघून जात असे. पण त्याचवेळी एखाद्या शिक्षकाला कुणी विनाकारण त्रास देत असेल, तर स्वतः त्यात लक्ष घालून ते त्या शिक्षकाचे संरक्षण करत असत. गावातील वादामुळे एखाद्या शिक्षकाची बदली झाली, तर त्याचे बिर्‍हाड गावाच्या सीमेपलीकडे पोचेपर्यंत त्याला सोबत करणे, हे ते कर्तव्यभावनेने करत असत. एखाद्या तरूण शिक्षिकेला गावातील मोकाट तरुणांकडून त्रास होत असेल, तर तिच्या वडिलांची जागा घेऊन, त्या पोरांचा बंदोबस्त त्यांना समजेल अशा भाषेत करत असत. ह्या बाबतीत स्थानिक पोलीसही त्यांना मानत.

मी दुसर्‍या इयत्त्तेत असेन, तेव्हाची गोष्ट. आम्ही मु.पो. कोरडगाव (तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर) येथे राहत होतो. माझ्या प्राथमिक शाळेजवळच वडिलांची माध्यमिक शाळा होती. 'रयत'ची शाळा असल्याने त्यांची शाळा अनेक ठिकाणी भरत असे. कुठे एखाद्या दानशूराने दिलेली खोली, कुठे मंदिर, तर कुठे गोडाऊन. अशाच एका सरकारी गोडाऊनमध्ये भर दुपारी वर्ग चालू असताना एक नागराज प्रकटले. उन्हाची काहिली सहन न झाल्याने बहुधा हे महाराज जमिनीखालून निघून वर पत्र्यावर पोचले. पण पत्रा गरम लागल्याने जखमी अवस्थेत वरून जमिनीवर पडले. संपूर्ण वर्गच पोळा फुटलेल्या जनावरांप्रमाणे वर्गातून बाहेर पडला! आमची शाळा समोरच असल्याने आमचे सर्व गुरुजी अन् विद्यार्थी असे सगळेजण गोडाऊन-कम-शाळेकडे पळाले. त्यावेळी अनेक लोक भांबावल्याप्रमाणे 'साप साप' ओरडत त्याला मारायला धावत होते. या अचानक झालेल्या गोंगाटाने अन् धावपळीच्या अंदाजाने तो नागराज कसाबसा एका बिळात जाऊन लपला, पण शेपटी बाहेर सोडून! मग वडील तिथे आले. मुलांना अन् शिक्षकांना शांत केले. ज्या शिक्षकाच्या समोर नागराज अवतरले होते, त्यांना धीर दिला. मग एका साप पकडणार्‍या माणसाला बोलावणे धाडले. त्या व्यक्तीने साप पकडून दूर नेऊन सोडला. वडिलांनी एक-दोन शिक्षक, शिपायांना सोबत घेऊन सर्व इमारत पुन्हा नजरेखाली घातली अन् मग वर्ग पुन्हा सुरू करायला परवानगी दिली.

त्याच गावात एकदा आठवडी बाजार चालू असताना शाळेतील काही विद्यार्थ्यांनी गोंधळ माजवला. अन् इतका, की तिथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. पोलीस बोलावले गेले अन् त्या मुलांना पकडले. त्या जवळपास १० जणांमध्ये गावातील प्रतिष्ठित घरातील मुले तर होतीच, पण खुद्द मुख्याध्यापकांचे एक चिरंजीवदेखील (माझा मोठा भाऊ) होते. सर्वांना वाटले आता मुख्याध्यापक मुलांना दोन दोन रट्टे / पालकांना तंबी देऊन प्रकरण मिटवतील. पण ह्यांनी सगळे १० जण तडकाफडकी शाळेतून बडतर्फ केले. त्यांचे दाखले एकाच वेळी त्यांच्या हातांत दिले. इतर मुलांचे ठीक होते, किमान त्यांचे पालक त्यांच्यासाठी गयावया करू शकत होते, माझ्या भावासाठी तर तेही अशक्य होते. जवळपास १५ दिवसांनंतर गावातील प्रतिष्ठितांच्या आग्रहाला मान देऊन वडिलांनी विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेतले.

या गावात दोन प्रमुख आडनावांच्या गटांत राजकीय वाद होता. गावातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगांत, सणांच्या दिवशी हे दोन घटक एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असत. अनेकदा यातून गंभीर वाद अन् तणाव निर्माण होत असत. एक दिवस पाच वाजता शाळा सुटून मी घरी आलो. बघतो, तर आमच्या शेजारील (****) वाड्यावर (***) च्या लोकांनी जबरदस्त हल्ला केला होता. एकाच्या शेतात दुसर्‍याची जनावरे घुसल्याचे निमित्त काढून हा राडा केला गेला होता. बायका-मुले आरडत होती अन् सर्व (****) वाडा बाहेरुन दारे बंद करुन (***)चे लोक वाड्याच्या माळदावरून आत घुसून प्रमुख पुरुषांना मारहाण करीत होते. रक्ताचा सडा पडला होता. मध्ये पडणार्‍या स्त्रियांनाही मारहाण होत होती. सगळा गाव बाहेरून बघत होता, पण मध्ये पडायची हिंमत होत नव्हती. थोड्या वेळाने एक स्त्री खिडकीतून ओरडली, "करडक सरांना बोलवाऽऽऽ..". मग एक माणूस लगेच शाळेत गेला अन् माझ्या वडिलांना सायकलीवरून घेऊन आला. (तेव्हा प्रत्येक शाळेला एक सायकल असे अन् शिपाई, शिक्षक किंवा मुख्याध्यापक वेळ पडेल तेव्हा ती वापरत असत.) सर्वप्रथम वडील हल्ला करणार्‍या गटाच्या प्रमुख लोकांजवळ गेले अन् त्यांना समजेल अशा भाषेत समज दिली. वाड्यातील लहान मुले अन् स्त्रिया यांना बाहेर काढायला सांगितले. जी काही भांडणे आहेत, ती पुरुषांनी करावीत अन् पुन्हा असले प्रकार करू नयेत अशी तंबी दिली. वडिलांचा मूळचा रागीट स्वभाव अन् मजबूत शरीरयष्टी पाहून भले भले त्यांना घाबरत असत. मस्ती करणारे विद्यार्थीच नव्हे, तर अनेक चूक करणारे शिक्षकही त्यांच्या समोर लटलट कापताना मी बघितले आहेत. अशा रुद्रावतारी वडिलांच्या मध्यस्थीने त्या दोन गटांच्या नेत्यांमध्ये समेट केला गेला. पोलीस बोलावले अन् काही लोक अटक केले गेले. पुढे अनेक दिवस गाव शांतच राहिले. जेव्हा वडिलांची बदली झाली, तेव्हा दोन्ही गटांच्या लोकांनी बदली रद्द करण्याचे प्रयत्न केले अन् न जमल्याने अखेरीस मोठा निरोप समारंभ केला.

पुढे मु. पो. चिचोंडी पाटील (तालुका नगर, जिल्हा अहमदनगर) येथे बदली झाली. ह्या गावात तर अनेक राजकीय पुढारी होते. त्यांचे एक हस्तक तिथे शाळेत शिक्षक होते. ह्या शिक्षक महाशयांचे बंधू तिथल्या ग्रामपंचायतीचे सदस्य अन् सोसायटीचे अध्यक्ष होते. राजकीय नेत्यांना शाळेत बोलावून त्यांचे सत्कार करून स्वतःचा लाभ पदरात पाडून घेणार्‍या जमातीतील ते होते. वडिलांनी त्यांचे हे उद्योग बंद करण्याचे आदेश देताच, ते वडिलांची बदली कशी करता येईल यावर लक्ष देऊ लागले. त्यासाठी गावातील अनेक विघ्नसंतोषी लोकांचाही आधार घेतला गेला, पण दोन वर्षे काही आमची बदली झाली नाही. दर दोन-तीन महिन्यांनी शाळेत अन् गावात अफवा उठे, की करडक सरांची बदली झाली. अन् मग मला कोणी विचारले, की 'झाली का रे बदली?', तर ते मलाही माहिती नसे. वडील याबाबतीत निश्चिंत असत. 'बदली झाली की दारात टेंपो दिसेल. उगाच चिंता करू नकोस' असे त्यांनी घरी सांगितलेलेच असे!

त्यांच्या शर्टाला दोन खिसे असतात. ते नेहमी गमतीने म्हणायचे, की 'दोन खिशांपैकी एका खिशात राजीनामा असतो अन् दुसर्‍या खिशात बदलीच्या ऑर्डरसाठी रिकामी जागा असते.' गावच्या पाटलाचा थोरला पोरगा असल्याने भाकरीसाठी नोकरी हा प्रकार त्यांनी कधीच केला नाही! स्वतःच्या तत्त्वांनी आणि अगदी थाटाने कारभार केला! इथून त्यांची बदली झाली, ती नगर तालुक्यातल्याच 'सारोळा कासार' ह्या गावी. पण ती बदली अगदीच मनाविरुद्ध व काही विघ्नसंतोषी लोकांच्या मनाप्रमाणे झाली असल्याने वडिलांनी एक दिवस रुजू होऊन सरळ दोन महिन्यांची रजा टाकली. मी त्या शाळेत फक्त एकच दिवस गेलो. माझा दाखला पुन्हा एका दिवसात 'चिचोंडी पाटील' येथल्या शाळेत आणला गेला!

मग आमची बदली झाली, ती मु. पो. खंडाळा (तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर) येथे. त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी काही गंभीर गैरप्रकार अन् भ्रष्टाचार केल्याने गावातील लोकांनी तेथील शाळेला टाळे लावले होते. ती शाळा रुळावर आणण्यासाठी एका कुशल प्रशासकाची गरज होती. अन् ती वडिलांच्या रूपाने पूर्ण केली गेली. पहिल्या काही आठवड्यांतच त्यांनी गावातील प्रतिष्ठित, सामान्य लोक अन् पालकांच्या विश्वासाला पात्र ठरून ती शाळा नावारूपाला आणली. दहावीचा निकाल ६०-७० टक्क्यांपेक्षा जास्त लागला. एक दिवस ते माजी मुख्याध्यापक त्यांच्या काही कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी रात्री गावात आले. ते येणार, हे गुप्त ठेवलेले असूनही शाळेच्या पटांगणात बसलेल्या काही विद्यार्थ्यांनी ही बातमी गावात दिली. खूप लोक त्या मुख्याध्यापकाला धडा शिकवण्यासाठी शाळेबाहेर घोषणा देत जमा झाले. त्यावेळी वडिलांनी मध्यस्थी करून, त्या महोदयांना गावाबाहेर सुखरूप वाटेला लावले.

मु. पो. टाकळीभान (तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर) इथल्या शाळेतही असेच काही गैरप्रकार घडल्याने अन् सलग तीन वर्षे तेथील दहावीचा निकाल २० टक्क्यांपेक्षा कमी लागल्याने वडिलांची बदली तिथे केली गेली. तालुक्यातील एक मोठे गाव असल्याने तिथे माध्यमिक शाळेला जोडून 'कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय' आहे. तिथे पुढार्‍यांची कमतरताच नव्हती. प्रत्येक शाळेला 'स्थानिक स्कूल कमिटी' नावाची एक समिती असते. त्यात मुख्याध्यापक, गावातील प्रतिष्ठित लोक असतात अन् त्यांनी मिळून शाळेच्या भल्यासाठी उपक्रम राबवणे, निर्णय घेणे अपेक्षित असते. त्यात एक बिलंदर राजकारणी होते. ही कमिटी स्वतःच्या घरची असल्यासारखे ते शाळेला वापरत. शिपायांना घरची कामे सांगणे, शाळेची इमारत, साहित्य घरच्या कामाला वापरणे असे उद्योग सुरू असत. वडिलांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी एकच तंबी दिली - 'स्कूल कमिटी बरखास्त करण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला असतो. तेव्हा जपून राहा. पद कधीही धोक्यात येईल.' मग ते महाशय ठिकाणावर आले. पुढे त्या महोदयांना वयाच्या ५० व्या वर्षी दुसरे लग्न करावेसे वाटले, तेव्हा मोठा तणाव निर्माण झाला. कारण त्यांची पत्नी एका मोठ्या राजकीय कुटुंबातील होती. शेवटी वडिलांनी दोन्ही बाजूंना समजावले अन् शांततेत त्या महोदयांचे दुसरे लग्न पार पडले. त्यांच्या पहिल्या बायकोवर अन्याय झाल्याचे वडिलांना फार वाईट वाटले. पण मुलांच्या भविष्यासाठी त्या बाईंनी अन् त्यांच्या कुटुंबाने वडिलांच्या म्हणण्याला मान दिला. नाहीतरी समजूतदार लोकांवरच जास्त अन्याय होत असतो.

दहावीचा निकाल सुधारण्यासाठी अन् एकूणच शाळेचे बिघडलेले वातावरण बदलण्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. जे शिक्षक पूर्वी बिगर-शैक्षणिक कामांकडे अन् स्थानिक राजकारणाकडे लक्ष देत होते, त्यांच्या बदल्या केल्या अन् काही चांगले शिक्षक शाळेमध्ये आणले. दोन वर्षांत शाळेचा निकाल ७० टक्क्यांपर्यंत वाढवला. वडील १९९५ला याच शाळेतून निवृत्त झाले. कनिष्ठ महाविद्यालयाला जी शिस्त लावली, त्यामुळे कॉलेजला जाऊन भलते उद्योग करण्याची स्थानिक विद्यार्थ्यांची मनीषा अपूर्णच राहू लागली. कारण कनिष्ठ महाविद्यालयाला ही शाळेची करडी (करडकी) शिस्त करडक सरांनी लावली होती. त्यामुळे शिक्षणाव्यतिरिक्त उद्योग करणारे विद्यार्थी नजीकच्या श्रीरामपूरला कॉलेजात जाऊ लागले.

या शाळेत एक हिशेब तपासनीस कारकून होते. ते महोदय दहा वर्षांपासून तिथेच नोकरीला होते अन् मूळचे तिथलेच होते. त्यांना स्थानिक राजकीय पाठिंबाही भक्कम होता. त्यांनी एकदा १० हजारांचा भ्रष्टाचार केला अन् त्याचा दोष वडिलांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा प्रकरण उघडकीस आले, तेव्हा वडील तडक संस्थेच्या जिल्हा मुख्यालयात गेले अन् त्यांनी 'ह्या क्लार्कची बदली मी सांगेन त्या ठिकाणी करा अथवा माझा राजीनामा स्वीकारा' असा प्रस्ताव वरिष्ठांना दिला. बरीच फोनाफोनी अन् धावपळ करूनही तो कारकून बदली रद्द करू शकला नाही. अन् वडील त्या कारकुनाची एका दूरच्या शाखेत बदली करूनच परतले.

या शाळेला एक वसतीगृह जोडलेले आहे. समाजकल्याण विभागाकडून मिळणार्‍या निधीवर अन् स्थानिक लोकांनी दिलेल्या मदतीवर ते चालवले जाते. इथे बदली झाल्यावर वसतीगृहाचा दर्जा खूपच खालावला आहे, हे लक्षात येताच वडिलांनी तिथे नेहमीच तपासणीसाठी जाण्याचा कार्यक्रम सुरू केला. अन् केवळ पाहणीच नाही, तर तेथील मुलांबरोबर जेवण घेण्यासही सुरुवात केली. मुख्याध्यापकांच्या अशा अचानक पाहण्यांमुळे कामकाजात सुधारणा झाली. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, कर्मवीर जयंती अशा वेळी पाहुण्यांना वसतीगृह भेटीचे आमंत्रण दिले जाऊ लागले. त्यामुळे तिथले विद्यार्थीही सुखावले. शेतीच्या हंगामानंतर गावातील शेतकर्‍यांकडे जाऊन वसतीगृहातील मुलांसाठी धान्याची मदत मागत ते गावभर फिरत असत. 'रयत'ची शाळा असल्याने गावकरीही आनंदाने अगदी अनेक ट्रॅक्टर धान्य दान म्हणून देत असत!

तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील एकमेव 'देखणे मुख्याध्यापक-प्राचार्य कार्यालय' त्यांनी इथे बांधवले. प्रसंगी वरिष्ठांशी वाद करायलाही मागे पुढे पाहिले नाही. 'मी म्हणेन, तेच खरे' असे सांगणारे वरिष्ठ जेव्हा सामोरे आले, तेव्हा त्यांची त्याच पद्धतीने जिरवायला कमी केले नाही.

१९९५ ला निवृत्त झाल्यावर ते शेतीकडे लक्ष देऊ लागले. आजही दररोज सकाळी अन् संध्याकाळी त्यांचा पूर्ण शेताला एक फेरफटका नक्कीच होतो. त्यामुळे कुठल्याही औषधोपचारांशिवाय त्यांची प्रकृती निरोगी आहे. आसपासच्या गावातील काही माजी शिक्षक अन् मुख्याध्यापकांचा एक गट त्यांनी बनवला आहे. दर महिन्याला हा गट त्यातील एका सदस्याच्या घरी जाऊन जेवणाचा कार्यक्रम करतो. तो दिवस म्हणजे त्यांच्या जुन्या आठवणींचा खजिना खुला होण्याचा दिवस असतो. दुहेरी मेजवानी! तालुक्याला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कधी जुन्या शाळा-महाविद्यालयांतील किंवा त्या गावातील लोक जर भेटले, तर जुन्या आठवणींत ते रमून जातात. अनेक गावांतील लोक, 'असा मुख्याध्यापक पुन्हा झाला नाही' म्हणून आठवण काढतात. तर काही लोक 'करडक सरांची बदली झाल्यावर शाळा जी बिघडली, ती पुन्हा सुधारलीच नाही' अशी हळहळ व्यक्त करतात!

- champak