कैदी

Kaidi.jpg
घनगर्द पर्णसंभार, गडद अंधार, रांगती जर्द सर्प बुंध्यात
वर निर्मम संततधार, गहन गंधार कोंदतो घमघमत्या गंधात

पायांत झिरपती ओहळ वाहत काजळ पाहुन भोवळती पडछाया
वर उंचनिंच माथ्यास कंच हिरव्यास खोल नि:श्वास येत ऐकाया

पोवळे बिंब कोवळे उदे मोकळे कुठेशी दूर निळ्या आकाशी
अंदाजच येथे फक्त, पहारे सक्त, कसे पोचावे सत्य मुळाशी

कर्दमात रुतले तमात अन् संभ्रमाशीच नाते जडल्याची धास्ती
अस्वस्थ आत उध्वस्त रान बंदिस्त स्वत:च्या अस्तित्वातच कैदी

- swaatee_ambole

रेखाटन - prakashkalel