पान्हा!

मी जेव्हा खूप लहान होतो तेव्हा
अगदी काही महिन्यांचाच.. तेव्हा
झाडाला बांधलेल्या पाळण्यातून रडायचो मी सकाळी सकाळी भुकेने
कळवळून.. खूप वेळ..
आणि यायची धावत माझी आई
शेतातून, काम करता करता कुडकुडत थंडीने
इतर बायांची सहानुभूती झेलीत
मला घट्ट धरीत छातीशी घेऊन आडोशाला
अजूनच भडभडून,
माझ्या आकार घेत असलेल्या चेहर्‍यात शोधत, आठवत कोणालातरी
आणि मी बघायचो तिच्याकडे टक लावून
निजता निजता.. निर्व्याज..
रोजच तिच्यातच माझा बाप शोधीत..
हे रोजच.. कितीतरी दिवस.......
.
..
...
आज
माझ्या सुखाच्या महालात
रात्री माझ्या घरातील देवघरातून
हलकासाही येताच आवाज
माझ्या आईचा
जातो मी धावत.. अगदी तस्साच, ती धावत यायची तसा
आणि हळूच बघत तिला झोपलेली.. निरागस..
अगदी तस्सेच, माझ्यासारखे!
ती श्रांत, थकलेली, समाधानी, करपलेली, वृद्ध, पण भरल्या पोटाने
एक विलक्षण तेज लेवून चेहर्‍यावर मायेचे.. बाळासारखे..
आणि तिला निजलेले बघून लहान मुलासारखे
मी मनात होऊ लागतो.. अपार मायेने
तिची आई
फुटतो मला अश्रूंचा पान्हा
स्फुंदून स्फुंदून आठवत
तिचा तेव्हाचा.. तो उपाशी पान्हा
आणि तरीही फुटलेले ते.. दुधाचे चार थेंब!

- umesh kothikar