महाराष्ट्र - ग्रामीण पत्रकारिता : सद्यस्थिती.

भारत हा कृषिप्रधान देश आहे; भारताची बहुसंख्य जनता खेड्यांतून राहते - हे आपण इतक्या वेळा वाचलं, बोललं आणि लिहिलं आहे, की त्यातले महत्त्वच आता गायब झाल्यासारखं वाटत आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या एकूण समाजजीवनातील अर्थव्यवस्थेमध्ये भरपूर बदल झाले. बर्‍याच गोष्टींचे पाश्चात्यीकरण झाले. राजेशाही, मग ब्रिटिश वसाहती आणि मग आता लोकशाही हे बदल भारतातल्या जनतेला पटवणे थोडे अवघडच गेलेले आहे. अजूनही भारतात लोकशाहीतल्या नेत्यांची आणि पुढार्‍यांची राजेशाही चालते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

मुळात भारतातली जनता ही 'एक देश' या संकल्पनेमध्ये अजूनही मानसिकरित्या पोचलेली नाही. आजही आपण राज्य, प्रांत, भाषा, जात आणि इतर वर्ग यांमध्ये विभागलेलेच आहोत. एकाच भारतात जगातील सर्वांत श्रीमंत माणूस आणि अन्न-वस्त्र-निवारा यांसारख्या मूलभूत गरजादेखील न भागलेला माणूस एकाच वेळेला, एकमेकांच्या अस्तित्वाची कल्पना नसताना आहेत, यापेक्षा दुसरा विरोधाभास कुठला?

महाराष्ट्र या विरोधाभासाचे उत्तम उदाहरण आहे. इथल्या लोकसंख्येच्या सुमारे ३०% लोक मराठी भाषा बोलत नाहीत. तसेच विविध प्रादेशिक विभागांमध्ये - कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश असा महाराष्ट्र पसरलेला आहे. यांमध्ये सांस्कृतिक, भाषिक आणि भौगोलिक विविधता प्रचंड प्रमाणात आहेत.
तसेच आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्याही महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. जगातील सर्वांत जास्त श्रीमंत याच राज्यात राहतो अणि कर्ज न चुकवता आल्याने कित्येक शेतकरी याच राज्यात आत्महत्या करतात.

महाराष्ट्राची जी खास वैशिष्ट्ये आहेत, त्यांमध्ये मराठी साहित्याचा उल्लेख करणं गरजेचे आहे. विविध विषयांवरचे आणि आशयांचे साहित्य मराठी भाषेमध्ये विपुल आहे. मराठी भाषेचं तसंही वृत्तपत्रांवर फार प्रेम. भारतामध्ये इंग्रजी भाषेत ४३७ दैनिकं, १०८६ साप्ताहिकं आणि २११ वार्षिकं आहेत; तर मराठीमध्ये ४३३ दैनिकं, १४७३ साप्ताहिकं आणि १२७ वार्षिकं आहेत. अर्थात, इंग्रजी वाचणार्‍या लोकांची संख्या आणि मराठी वाचकांच्या संख्यांची तुलना करता ही आकडेवारी आश्चर्यकारक आहे यात वाद नाही. पण याहून जास्त गमतीची बाब आहे, की भारतीय भाषांमध्ये सर्वांत जास्त खपणारे वृत्तपत्र आहे (इंग्रजी व हिंदी सोडून) 'मलयाळम मनोरमा' (१६,२८,०००), आणि मराठीमधले सर्वांत जास्त वाचले जाणारे वृत्तपत्र 'लोकमत' (१२,०८,०००) आहे. याचा अर्थ मराठी भाषेत दैनिकं भरपूर आहेत, त्यामानाने वाचक नाहीत. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी शहरी भागात सुमारे ४२% आणि उरलेली जनता निमशहरी भागात आणि ग्रामीण भागात राहते.

'महाराष्ट्रातील पत्रकारिता' या विषयाचा आढावा घेताना याचे दोन प्रकार सहज दिसतात. एक म्हणजे शहरी भागातील पत्रकारिता आणि दुसरा ग्रामीण भागातील पत्रकारिता. अर्थात शहरी व ग्रामीण भागांचे विकासाचे, राजकारणाचे आणि समाजकारणाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांतील पत्रकारितांचे चेहरे-मोहरे पूर्ण भिन्न आहे.

महाराष्ट्रातील पत्रकारिता ही कायम प्रभावी राहिली आहे, मात्र फक्त एका मर्यादेपर्यंतच. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक चळवळ म्हणून सुरू झालेली ही पत्रकारिता सध्या एक 'धंदा' याच दृष्टीने बघितली जातेय.

महाराष्ट्रात पहिले वृत्तपत्र 'दर्पण' सुरू करण्याचा मान जातो तो श्री. बाळशास्त्री जांभेकर यांना. मात्र पत्रकारितेची तत्त्वे रुजवायचे आणि जोपासायचे काम मात्र केले लोकमान्य टिळकांनी.

'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून ब्रिटिश सरकारनं ज्यांचा धसका घेतला होता ते लोकमान्य टिळक. त्यांनी मराठी, तसेच इंग्रजी वृत्तपत्रांना दिशा दाखवण्याचे काम केले. केसरीच्या पहिल्याच संपादकीय लेखामध्ये त्यांनी वृत्तपत्राला 'रात्रकालीन पहारेकरी' म्हटले आणि केसरीची तत्त्वेदेखील लिहिली. 'जनमताचे दडपण अधिकारी वर्गावर निर्माण करून त्यांच्याकडून जनहिताचे कार्य करवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, हे वृत्तपत्राचे प्रमुख कार्य' असेदेखील त्यांनी नमूद केले आहे.
'मराठा' हे उच्चशिक्षित समाजाकरता प्रसिद्ध होणारे इंग्रजी वृत्तपत्र होते. अभिजनांचे जनमत भारतीय स्वातंत्र्याकरता तयार व्हावे, म्हणून या वृत्तपत्राचे प्रकाशन केले जाई. १८९६-९७ च्या भीषण दुष्काळाचे केसरीने व मराठ्याने तपशीलवार वर्णन करून सामान्यांचे प्रश्न प्रसिद्ध केले. परकीयांच्या हातांत सत्ता असल्याने आपणच आपल्या माणसांना मदत करू शकत नाही, हेदेखील टिळकांनी लोकांच्या गळी उतरवले.

ही झुंजार पत्राकारितेची परंपरा चिपळूणकर बंधू, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, लोकहितवादी, बापूजी अणे, माडखोलकर, शिवराम परांजपे, न. चिं. केळकर, कोल्हटकर, मामा वरेरकर, भोपटकर, अनंत गद्रे, खाडिलकर, परुळेकर इत्यादींनी पुढे नेली. ही सर्व मंडळी आपापल्यापरीने स्वदेश, समाजजागृती, सामाजिक सुधारणा यांकरता वृत्तपत्राच्या माध्यमातून कार्यरत होती.

पुरोगामी विचारांचा संदेश घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात एक लोकविलक्षण क्रांती घडवली. आंबेडकरांच्या लेखणीने उपेक्षित, पददलित, विस्थापित सामान्यजनांचे दु:ख 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत', आणि 'समता' यांसारख्या नियतकालिकांतून मांडले. आंबेडकरांच्या पत्रकारितेमध्ये लक्षणीय मुद्दा असा होता, की बाबासाहेबांनी ज्या बहुजन समाजाच्या वतीने लढा उभारला, ती उपेक्षित जनता शिक्षणापासून वंचित होती. त्यामुळे वृत्तपत्र या माध्यमाचा त्यांना काहीच उपयोग नव्हता. तरीदेखील बाबासाहेबांनी पत्रकारिता हे प्रमुख अस्त्र वापरले ते शिक्षित असलेल्या, प्रस्थापित सवर्ण समाजाचे मतपरिवर्तन करण्यासाठी. त्यात बाबासाहेब यशस्वी झाले, यात शंकाच नाही.

दुर्दैवाने स्वातंत्र्योत्तर काळात आणि मुख्यत्वेकरून आणीबाणीच्या काळात या सर्व पत्रकारितेच्या प्रमुख तत्त्वांनाच हरताळ फासण्यात आला. इंडियन एक्स्प्रेससारख्या वृत्तपत्रसमूहाचा वीजपुरवठा तोडणे इत्यादी घटना याच काळातल्या. मात्र तरीही वृत्तपत्रे आपले कार्य जोमाने करतच राहिली. जनमत निर्माण करणे, नि:स्पृहपणे बातमी पोचवणे हेच त्यांनी स्वतःचे प्राथमिक लक्ष्य ठेवले होते.

वृत्तपत्रांची जनमतावर असलेली पकड लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी पत्रकारिता स्वत:च्या फायद्यासाठी वापरायला सुरुवात केली. आज राष्ट्रीय स्तरावरील सर्वच पक्षांनी कुठल्या ना कुठल्यातरी वृत्तपत्राला स्वार्थासाठी वापरायला सुरुवात केलेली आहे. स्वतःच्या पक्षाच्या मुखपत्रासोबतच एखाद्या लोकप्रिय वृत्तपत्राला जाहिराती आणि 'ADVERTORIAL'च्या जोरावर स्वत:चे दूत म्हणून वापरले जाते. कुठलेही राष्ट्रीय स्तरावरील अथवा राज्यस्तरावरील वृत्तपत्र सध्या नि:स्पृह अणि निष्पक्ष बातम्या देत नाही, हे सत्य आहे. जनतादेखील वृत्तपत्रे सध्या फक्त मनोरंजनाचे एक साधन असल्याप्रमाणे बघत आहे. हे चित्र खरोखरच फार विदारक आहे.

शहरी भागातील वृत्तपत्रलेखकांना ग्रामीण प्रश्नांची जाणीव नसते, त्यामुळे स्थानिक पातळीवरील मोठ्यात मोठा प्रश्नदेखील राष्ट्रीय स्तरावर पोचू शकत नाही.

गेल्याच महिन्यामध्ये मिरजमध्ये घडलेल्या दंगलीचे यासंदर्भात उदाहरण देता येईल. मिरज-सांगली, कोल्हापूर इथल्या दंगलीचे चित्रण तेथील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये, राज्यस्तरावरील वृत्तपत्रांमध्ये आणि राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रांमध्ये कसे केले गेले, यांचा तुलनात्मकतेने अभ्यास केल्यास या बातम्यांमधील भिन्नता लक्षात येईल. घटना घडून गेल्यावरदेखील राष्ट्रीय स्तरावर वृत्तपत्रांनी त्याला हवे तितके महत्त्व दिले नाही. काही वृत्तपत्रांनी जसं घडलय, तसं न देता त्याला कुठे ना कुठेतरी वृत्तपत्रसमूहाची किंवा संपादकाची मते किंवा विचार याचा रंग घेऊनच बातमी दिलेली आहे, हे अगदी समोरचे ताजे उदाहरण!

अजून एक उदाहरण म्हणजे दोन-तीन महिन्यांपूर्वी धुळे जिल्ह्यात निघालेल्या कोळी समाजाच्या मोर्च्यावर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. ही राज्यस्तरावरची बातमी कोकणातल्या, तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या एकाही वृत्तपत्रातून छापून आली नाही! प्रियांका चोप्राला आशुतोष गोवारीकर बँकॉकमध्ये काय म्हणाला, हे मात्र या वृत्तपत्रांनी पहिल्याच पानावर छापले होते.

महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारिता या विषयाकडे बघितल्यास सर्वत्र निराशेचाच दृष्टिकोन दिसून येईल. सध्या छपाईमध्ये आलेल्या नवनवीन तंत्रज्ञान आणि सुविधांमुळे वृत्तपत्र चालू करणे फारसे कठीण राहिलेले नाही. त्यामुळे अगदी तालुकास्तरावरही वृत्तपत्र निघते आणि अशा वृत्तपत्रांचे साधारण स्वरूप ठरलेले असते.

पहिल्या पानावरची पहिली बातमी ही गावातील राजकीय गोंधळाची असून दुसरी बातमी ही एखाद्या गुन्ह्याची चटकदार बातमी, उदा. बलात्कार, खून, आत्महत्या इत्यादी, असते. दुसर्‍या पानावर संपादकीय, ज्यामधे जिथून ते वृत्तपत्र निघते, ते सोडून इतरच भलत्या विषयांवरचे असते. जिल्हा माहिती कार्यालयातून मिळणार्‍या प्रेस रिलीजेस, भविष्य, कोडी, सुगरणीची करामत असे विषय असतात. तिसर्‍या पानावर गावातील सत्कार समारंभ, त्यांतले फोटो, भाषणे इत्यादी मजकूर, चौथ्या पानावर 'पान एक वरून पुढे चालू' आणि क्रीडा, कधीतरी अध्येमध्ये गावातील प्रतिष्ठितांचे लेख आणि त्यांचे विचार(!) अशा धाटणीची वृत्तपत्रे चांद्यापासून बांद्यापर्यंत बघायला मिळतात.

अर्थात, यामध्ये कुठेही विकासात्मक बातमी किंवा त्या गावातील लोकांना मार्गदर्शक ठरू शकेल, असे काही मुद्दे अर्थातच नसतात. चावडीवर बसून गप्पा मारायच्या लायकीचा हा मजकूर असतो. मोठी वृत्तपत्रे, जी जिल्हाविशेष पुरवणी काढतात, त्या पुरवण्यांचे चित्रदेखील असेच असते. या सर्वांमध्ये कुठेही महिला सक्षमीकरण, साक्षरता प्रसार, शेतीमधील सुधार यांवर काहीही लिहिलेले नसते. किंबहुना असे सर्व यांत असावे हीदेखील इथल्या वाचकांची अपेक्षा नसतेच.

ग्रामीण भागातील 'पत्रकार' हा बर्‍याचदा स्वतः अनेक लफड्यांचा महाशय असतो. त्याची पत्रकारिता हे स्वस्तात भरपूर पैसे मिळवायचे एक साधन असते. लोकांच्या भानगडी शोधून 'त्या पेपरामध्ये प्रसिद्ध करेन' अशी धमकी देत पैसे मिळवणे, जाहिराती मिळवणे, एवढेच या तथाकथित पत्रकाराचे काम.

ग्रामीण पत्रकाराला स्थानिक पातळीवरील सर्व प्रश्नांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरांवर घडणार्‍या सर्व महत्त्वाच्या घटनांचा स्थानिक पातळीवर काय परिणाम होईल याचाही अभ्यास असणे आवश्यक असते. शहरी पत्रकारांमध्ये शक्यतो बीट असतात. बीट म्हणजे एखाद्या पत्रकाराच्या कामाच्या विषयाचे स्वरूप अणि व्याप्ती. यांमध्ये राजकारण, अर्थशास्त्र, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, कायदा, चित्रपट, नाटक, क्रीडा असे अनेक विषय असतात. त्यामुळे हे पत्रकार त्या-त्या विषयातले पारंगत असतात. बातमीच्या पलीकडे जाऊन माहिती आणणे, इतर वृत्तपत्रांपेक्षा वेगळा विषय मांडणे हे शहरी पत्रकारांमध्ये अपेक्षित असते. मात्र ग्रामीण पत्रकारांमध्ये बीट नसतात. ते शक्यतो गावातील सर्वच बातम्या कव्हर करतात. रोजच्या बातम्यांचा रतीब घालणे, इतकेच त्यांचे काम असल्याने त्यांना त्या बातमीबद्दल जास्त विचार करणे, विश्लेषण करणे अर्थातच जमत नाही. त्यामुळे सणसणीत, भडक बातम्या शोधणे हेच त्यांचे काम बनून जाते, कारण त्यांच्या वाचकांचीसुद्धा तीच आवड असते.

ग्रामीण भागामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे; मात्र त्याबरोबरच जातीय हेवेदावे, मतदारांचे ध्रुवीकरण तसेच तरूणांचा शेतीमध्ये कमी होत जाणारा रस, ही सर्व कारणेदेखील वाढत आहेत. गावांतील लोकांच्या शहरांकडे वाढत जाणार्‍या लोंढ्यांमुळे ग्रामीण जनता थोडीफार दुय्यम जिणे जगत आहे. तशातच वाढते व्यसनांचे प्रमाण आणि राजकारणी लोकांचे नेतृत्व. ग्रामीण भागात सध्या उत्तम नेतृत्व असणार्‍या नेत्यांची कमतरता आहे आणि असलेल्या बहुतांश नेत्यांना इथल्या जनतेच्या प्रश्नांची काहीही समज नाही.

'आपल्या जनतेला ब्रेड मिळत नसेल, तर त्यांनी केक खावा' असे सांगणारी एक फ्रेंच राणी होती, अशी एक दंतकथा आहे; सध्याचे आपले महाराष्ट्रातले नेते तसेच आहेत, असे म्हणायला हरकत नाही. विदर्भातला शेतकरी का आत्महत्या करतो? ते थांबवायला काय करावे? हे हिरीरीने सांगणारा एकही नेता आज दिसत नाही.

धुळे, नंदुरबारमधल्या आदिवासी जनतेचे प्रश्न काय आहेत, हे कोल्हापूरमधल्या माणसाला माहीत नाहीत आणि माडिया लोक कुठे, कसे राहतात, याचं कोकणातल्या कोळी माणसाला काही देणं-घेणं नाही. किंबहुना, ग्रामीण भागामध्ये एका प्रकारची संकुचित वृत्ती तयार करायचे काम स्थानिक वृत्तपत्रे करत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरत नाही.

अर्थात राज्यस्तरावरील वृत्तपत्रेदेखील काही भरीव कामे करत आहेत असे नाही. कित्येकदा राज्यस्तरावरच्या वृत्तपत्रांना मुंबई-पुण्यापलीकडेदेखील महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राचे विविध प्रश्न आहेत, मुद्दे आहेत, अडचणी आहेत, याची जाणीवच नसते. हे फक्त मराठी वृत्तपत्रांबद्दल. इंग्रजी वृत्तपत्रांबद्दल तर न बोललेलेच बरे!

ग्रामीण पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय काम करणारे पत्रकार अगदी थोडे आहेत. किंबहुना, ग्रामीण पत्रकार ही संकल्पना अजून राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावर पोचलेलीच नाही. नंदकिशोर काथवटे, भानुप्रकाश शर्मा, सुनील कुहेकर अशा विदर्भातल्या काही पत्रकारांनी आदिवासी पत्रकारितेमध्ये भरपूर काम केलेले आहे. मात्र ग्रामीण महाराष्ट्रात स्थानिक प्रश्न समजून घेणार्‍या पत्रकारांची वानवा आहे.

ग्रामीण भागाचे चित्र जरी निराशाजनक वाटत असले, तरी अजून वेळ हातांतून गेलेली नाही, हे लक्षात घेऊन पावले उचलणे गरजेचे आहे. शहरी व ग्रामीण भागांतील ही वाढती दरी आणि विसंवाद आपल्यालाच घातक ठरू शकतो, हे वृत्तपत्रांच्या जितक्या लवकर लक्षात येईल तितके चांगले. ग्रामीण वाचकांना उत्तम दर्जाची वृत्तपत्रे मिळाल्यास विकासामध्ये त्यांचा सहभागदेखील वाढेल.

पुढारी, संचार किंवा रत्नागिरी टाइम्स यांसारखी वृत्तपत्रे ग्रामीण भागात तसेच निमशहरी भागात लोकप्रिय आहेत. या वृत्तपत्रांची स्थानिक पुरवणी ही बर्‍याचदा गावातल्या बातम्यांची असते. ग्रामीण भागात लोकांना बाकीच्या वृत्तपत्रामध्ये कमी आणि ही स्थानिक पुरवणी वाचण्यात जास्त रुची असते.

वाढते उद्योगधंदे, त्यामुळे होणारे जमिनीचे अधिग्रहण, शेतीसारख्या पारंपरिक उद्योगांमध्ये होणारा तोटा, या सर्वांबद्दल ग्रामीण जनतेला माहिती देणं, वाढत्या समस्यांची उत्तरे शोधण्यामध्ये सहाय्य करणे हे ग्रामीण पत्रकारितेचे प्रमुख स्वरूप ठरायला हवे. दुर्दैवाने हे आज होताना दिसत नाही .

'मनोहर कहानियां'चे दृक-श्राव्य रूप वाटावे अशा वृत्तवाहिन्या सध्या ग्रामीण जनतेला बातम्या देत आहेत. वृत्तपत्रांचीही तीच अवस्था आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेने, पत्रकारांनी आणि राजकारण्यांनी एकत्र येऊन 'ग्रामीण महाराष्ट्र' जास्तीत जास्त स्वयंपूर्ण कसा बनेल आणि प्रगतिशील कसा होईल याचा विचार करणे गरजेचे आहे.
पत्रकार फक्त बातम्याच पुरवतो असे नव्हे, तर तो जनमत तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, हे लक्षात घेऊन पीत-पत्रकारितेचे वाढते प्रकार रोखायलाच हवेत; आणि या सर्वांची सुरुवात गावपातळीवरूनच व्हायला हवी. असा विचार ज्या दिवशी महाराष्ट्रातील सर्वच पत्रकारांच्या मनांत येईल आणि पत्रकार म्हणजे ग्रामीण जनतेच्या दृष्टीने 'विकासाचा एक दूत' असे चित्र ज्या दिवशी निर्माण होईल, तो महाराष्ट्राचा सुदिन!!!

- nandini2911

आभारः
(जनसंवाद - 'सिद्धांत आणि व्यवहार' या पुस्तकाच्या लेखिका सौ. रमा गोळवलकर-पोटदुखे.)
(श्री राजेश चतुर्वेदी, चेअरमन- अ‍ॅड्फॅक्टर्स पी. आर. आणि विविध गावांतील पत्रकार)