निरीक्षक

हे होईल अशी शंका मला काही काळापूर्वीच आली होती. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे मला लहानपणापासूनच जाणवायला लागलं होतं छोट्या छोट्या प्रसंगांमधून. मला तुमच्यातलं वेगळेपण कसं जाणवलं माहितीये ? माझ्या आठवणीतला एक प्रसंग सांगतो. तुम्ही स्टडीमध्ये काँप्युटरवर काहीतरी काम करत होतात. मी तिथेच एका पुस्तकातली चित्रं बघत बसलो होतो. अंधार पडू लागला तसं तुम्ही मला लाईट लावायला सांगितलात. मी उठून तो लावला आणि बटन दाबून जेव्हा मी वळलो, तेव्हा तुम्ही माझ्याकडेच बघत होतात... अगदी रोखून. तुम्ही मला विचारलं होतं...

"तुला लाईटचं बटन माहिती होतं ?"
"नाही."
"मग तुला कसं कळलं कुठलं बटन लाईटचं आहे ते ?"
"एकाच बटनापर्यंत माझा हात पोहोचतो. त्यामुळे ते दाबलं मी."
"पण काय रे, दुसरं कुठलं बटन लाईटचं नसेल असं का वाटलं तुला?"
"दुसरं कुठलं बटन लाईटचं असतं तर तुम्ही मला लाईट लावायला सांगितलं नसतंत."

... हा प्रसंग मला लक्षात आहे, कारण तुम्ही त्यानंतर काम सोडून खूप वेळ माझ्याशी खेळत होतात. आपण बरीच चित्रं पाहिली, त्यांच्याबद्दल मला माहिती दिलीत आणि त्या चित्रांवर तुम्ही मला बरेच प्रश्नसुद्धा विचारले होतेत. मग तुम्ही जादूचे प्रयोग करून दाखवलेत... खूप मजा आली असा माझ्या आठवणीतला तो पहिला प्रसंग. पण बाबा, हे तिथेच थांबलं नाही. यानंतर मी तुम्हाला अनेकदा पाहिलं... मला न्याहाळून बघताना. पण खरं सांगा बाबा, तो प्रसंग म्हणजे तुमच्या माझ्यावरच्या प्रयोगांची नांदी होती, हो ना ?

तसा मी एक नॉर्मल मुलगा आणि तुम्ही मला वरकरणी तरी नॉर्मल मुलासारखंच वाढवलंत. वरकरणी असं म्हणतो कारण माझं लहानपण बाय एनी स्टँडर्ड्स पूर्ण नॉर्मल नव्हतं, बरोबर ? म्हणजे मी शाळेत गेलो, मित्रमैत्रिणी जमवले, दंगामस्ती केली, अभ्यास केला, हट्टही केला... एक सर्वसाधारण पोर जे करेल तसंच... अन् तरीही ते करत असतानासुद्धा माझ्या मनात कुठेतरी एक वेगळं असल्याची भावना होती. अगदी लहानपणापासूनच मी तुमचा मुलगा आहे हे कळल्यावर लोकांची नजर बदलायची, ते लगेच कळायचं. अशा गोष्टी लहान पोरांना लगेच जाणवतात. एक खूप मोठ्या शास्त्रज्ञाचा मुलगा असणं ही खास बाब होतीच. पण तेवढंच नाही. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने मला वाढवलंत त्यात काही उणीव नव्हती... पण त्यातला वेगळेपणा फक्त आपल्या दोघांनाच माहिती असेल. उदाहरण म्हणून मी पाचवीत असताना झालेला अपघात घ्या. शाळेत दुरूस्तीसाठी एक लोखंडी कठडा भिंतीला टेकवून ठेवला होता. आम्ही काहीजण तिथे खेळत असताना तो अचानक कलंडून खाली पडला... त्यात माझ्या तिन्ही मित्रांना बर्‍यापैकी लागलं, पण मला मात्र काहीच झालं नाही, कारण तो पडतोय असं कळल्याक्षणी मी उडी मारून बाजूला झालो. संध्याकाळी तुम्हाला ही घटना मी सांगितली तेव्हा...

"तुला कसं कळलं की तो कठडा पडतोय ?"
"अं... माहिती नाही. म्हणजे मला असं वाटलं की तो पडतोय आणि मी उडी मारून बाजूला झालो आणि इतरांना सांगणार तेवढ्यात तो खाली पडलाच."
"तुला खेळताना खूप कमी वेळा लागतं ना ?"
"अं... हो, म्हणजे मी कमी वेळा पडतो..."

... तुम्ही मला निरखत राहिलात. खरं सांगू, तेव्हाच पहिल्यांदा माझ्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. तुमचं ते मला निरखणं मला थोडं विचित्र वाटायला लागलं ना, ते याच प्रसंगापासून. नंतर २-३ दिवसांनी तुम्ही मला पहिल्यांदाच तुमच्या प्रयोगशाळेत घेऊन गेलात आणि मग सुरू झाले तुमचे प्रयोग, ते आजपर्यंत. पहिल्यापहिल्यांदा तुम्ही मला समोर बसवून काही चित्रं दाखवायचात आणि प्रश्न विचारायचात... मग तुम्ही मला वेगवेगळे प्रसंग वर्णन करून सांगू लागलात आणि मग विचारायचात की मी त्या प्रसंगांत कसा वागेन. मग तुम्ही मला वेगवेगळी कोडी घालायला सुरूवात केलीत... हे सगळं करताना मला मजा यायची, पण कशाचीतरी भीती वाटत रहायची. मी अस्वस्थ असायचो हे प्रयोग सुरू असताना. पण तुम्ही इतरांपेक्षा थोडे 'हटके' आहात अशी जी माझी भावना होती, त्या भावनेमुळे मी निमूटपणे हे सगळं केलं.

शेवटी, साधारण महिन्यापूर्वी तो टीव्हीचा प्रसंग घडला. तेव्हा सई होती इथे. एका संध्याकाळी गंमत म्हणून तिला मी जादूचे प्रयोग करून दाखवत होतो. ते करताना तिला मी टीव्हीवरचे चॅनेल्स बदलण्याची जादू दाखवत होतो... आपल्या टीव्हीला २ रिमोट कंट्रोल्स आहेत हे तिला माहिती नव्हते. त्यातले एक रिमोट तिच्या हातात ठेवले होते अन् दुसरे रिमोट माझ्या पायाखाली होते... त्यातली चॅनेल एकाने कमी-जास्त करण्याची बटने पायाच्या अंगठ्याने दाबायला मला व्यवस्थित जमायचे. माझे हात रिकामे, रिमोट तर तिच्या हातात असे असूनही मी चॅनल बदलायला लागल्यावर तिला जे आश्चर्य वाटले... तिचे विस्फारलेले डोळे बघून मी हसत असतानाच तुम्ही तिथे आलात... मी काय करतोय हे तुमच्याही लगेच लक्षात आलं, पण तुम्ही तरीही माझ्याकडे निरखून बघू लागलात... सईलाही ते जाणवलं, बाबा. तो खेळ मला बंद करायला सांगून तुम्ही मला लगेच प्रयोगशाळेत घेऊन गेलात आणि ते सेन्सर्स लावून पुढचा तासभर तुम्ही कसली रीडिंग्स घेत होतात ते मला तेव्हा कळलं नाही... पण त्यावेळी ती अनामिक भीती खूप तीव्र झाली. तिचं रूप अधिक स्पष्ट झालं तेव्हा. मला जी भीती होती ती तुमचीच होती बाबा... तुमच्या वेगळेपणाची भीती. हे इन्स्टिंक्ट कसं आलं, कुठून आलं हे तुमच्यासारख्या उच्च दर्जाच्या मानसशास्त्रज्ञाइतकं दुसर्‍या कोणाला कळेल?!

त्या प्रयोगाच्या दुसर्‍याच दिवशी तुम्ही मला सीटीस्कॅन करायला घेऊन गेलात. 'असं करावं हे अचानक तुमच्या मनात का आलं ?' या डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही 'मला त्याच्यात काही सिम्प्टम्स दिसलेत' एवढंच दिलंत... तुम्ही स्वतः मूळचे एक डॉक्टर, त्यात थोर वैज्ञानिक... तुमच्याशी कोण वाद घालणार ? त्या स्कॅनचा रिपोर्ट मला माहितीये. कसा, ते मला सांगता नाही येणार, पण असं समजा की माझं तुमच्याबद्दलचं इन्स्टिंक्ट इतकं तीव्र होतं की त्याने हे माझ्याकडून करवून घेतलं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझ्या डोक्यात एक ट्यूमर आहे... एक अनैसर्गिक वाढ! बरोबर? अनैसर्गिक... हं! काय अनैसर्गिक आणि काय नैसर्गिक हे कसं ठरवायचं हो बाबा? मी तुमचा जीवशास्त्रीय मुलगा नसून तुम्ही मला तुमचा दत्तक मुलगा म्हणून वाढवलंत हे नैसर्गिक... की मला ट्यूमर आहे हे कळूनही तुम्ही माझ्यावर पुढील काही उपचार सुरू केले नाहीत हे नैसर्गिक? की तुम्ही त्या दिवशीच घरभर क्लोज्ड सर्किट कॅमेरे बसवले हे नैसर्गिक? उपचार टाळणे आणि कॅमेरे बसवणे या दोन घटनांमुळे तर 'तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात' ही माझी भावना अगदी दृढ झाली. पण मी काय करू शकत होतो? गेल्या महिन्याभरापासून तुम्ही मला या घरात अडकवून ठेवलंय... हो, मला माहितीये की मी इथे बंदी आहे.

बाबा, मला हे माहितीये की मी तुमच्या संशोधनाचा केवळ एक भाग नव्हतो, तर मीच तुमच्या संशोधनाचा विषय होतो. तुम्ही मला इथे बंद करण्याआधीच मी प्रयोगशाळेतला आतापर्यंतचा सगळा डेटा, तुमची त्यावरची टिप्पणी सगळं वाचलंय... तुम्हाला हे खरं वाटत नाहीये, बरोबर? पण असं बघा... मी आता तुमच्याशी बोलताना काही विशिष्ट प्रसंगांचीच निवड का केली? कारण तुमच्याच मते, तुमचा संशोधनाच्या इतिहासात हे प्रसंग महत्त्वाचे आहेत म्हणूनच. लाईट लावण्याचा प्रसंग महत्त्वाचा होता, कारण मला माहिती नसूनही मी तुम्हाला 'लाईटचे बटन कुठले?' हा स्वाभाविक प्रश्न विचारला नाही. 'तुम्ही ज्याअर्थी मला काम सांगत आहात, त्याअर्थी ते मला शक्य असणारच. तेव्हा जे अशक्य आहे ते वगळून उरलेली शक्य गोष्ट करणे' असा विचार मी त्या लहान वयात करणे ही खास बाब होती. त्यात तुम्हाला माझी असाधारण बौद्धिक वाढ तर दिसलीच, पण त्याहीपेक्षा मी तुमच्या बौद्धिक क्षमतेबद्दल अन् तुमच्या विचारपद्धतीबद्दल अचूक अंदाज बांधला ते तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग आणि जास्त महत्त्वाचे वाटले. त्यानंतर तुम्ही माझ्यावर प्रयोग करत गेलात आणि तुम्हाला दिसू लागले की माझी निरीक्षणशक्ती अत्यंत तीक्ष्ण आहे, तिचा वापर करून आणि तार्किक विचार करून मी काही अंदाज बांधतो... ही माझी क्षमता तुम्हाला अनन्यसाधारण वाटली.

त्याच सुमाराला तो लोखंडी कठड्याचा अपघात झाला. त्या चौघांत फक्त मलाच काही न होणे यात तुम्हाला केवळ एक योगायोग दिसला नाही, कारण तुम्हाला माझी अतितीक्ष्ण निरीक्षणशक्ती आणि ती वापरून माझी पुढची तर्कसंगती माहिती होती. त्यामुळे, त्या प्रसंगानंतर तुम्ही थोड्या वेगळ्या दिशेने विचार करू लागलात... तुम्हाला वाटले की माझी केवळ निरीक्षणशक्ती ही असामान्य नाही, तर तिच्यामागे काहीतरी आणखी मूलभूत अशी शक्ती आहे... माझे इन्स्टिंक्ट्स, माझी जाणीव, एकंदरीतच गोष्टी सेन्स करण्याची माझी क्षमताच अचाट आहे असे तुम्हाला वाटू लागले... त्या प्रसंगात काही निरीक्षण करून कुठलाही विचार करण्याचा मला वेळच नव्हता... म्हणजे तो कठडा पडतोय असे मला वाटणे हे मला सेन्स झाले आणि उडी मारण्याची क्रिया ही प्रतिक्षिप्त क्रिया होती... मला फार कमी वेळा जखम होते, त्याचेही कारण हेच असावे असं तुम्हाला वाटलं. थोडक्यात, माझी ज्ञानेंद्रियं आणि त्यांच्याकडून येणार्‍या माहितीवर प्रक्रिया करणारा मेंदू हे असाधारणपणे तीक्ष्ण आहेत असा अंदाज तुम्ही बांधला आणि सेन्सर्ससकट तुमचे प्रयोग सुरू झाले.

पण तुमच्या संशोधनाला सर्वात मोठी कलाटणी मिळाली ती माझ्या टीव्ही चॅनल बदलण्याच्या जादूच्या प्रयोगांनी. बाबा, त्या दोन्ही रिमोटमध्ये बॅटरीज होत्या, पण माझ्या पायांखालचा रिमोट आदल्याच दिवशी नादुरूस्त झाला होता हे मला माहितीच नव्हते. तुम्हाला मात्र ते माहिती होते... त्या 'जादूच्या प्रयोगां'चा खरा अर्थ तुमच्या तत्क्षणीच ध्यानात आला. मी चॅनल बदलू कसा शकतो ? माझा मेंदू खरंच इतका असामान्य होता का की मी टीव्हीवरचे चॅनल्ससुद्धा काही इतर साधन न वापरता बदलू शकतो ? अन् तसे जर असेल तर माझ्या मेंदूच्या रचनेत आणि साधारण मेंदूच्या रचनेत नक्कीच काहीतरी फरक असेल असा विचार करून तुम्ही माझा सीटीस्कॅन केलात. त्यात त्या डॉक्टरांना दिसला तो ट्यूमर... एक अनैसर्गिक वाढ ! पण आपण अनैसर्गिक कशाला म्हणतो? जे निसर्गात इतरत्र दिसत नाही, जे नैसर्गिक रचनेच्या आड येऊन ढवळाढवळ करते ते अनैसर्गिक. पण कुठली रचना नैसर्गिक म्हणायची? म्हणजे 'हे अनैसर्गिक' असे म्हणताना आपण काहीतरी एक गोष्ट 'हे नैसर्गिक' म्हणून मानत असतो... या मापदंडाबरोबर आपण तुलना करतो. मग 'अमुक काही अनैसर्गिक' असे ठरवताना आपण योग्य तोच नैसर्गिक मापदंड घेतला पाहिजे, बरोबर? हेच म्हणायचे आहे ना तुम्हाला तुमच्या टिप्पणीत? समजा, एखाद्या गोष्टीसाठीचा 'नैसर्गिक मापदंड'च आपल्याकडे नसेल तर? समजा, एखाद्या गोष्टीसाठीचा 'नैसर्गिक मापदंड' हा रूढ, प्रचलित मापदंडापेक्षा वेगळच असेल तर? हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलेत.

बाबा, तुम्ही खरंच इतरांपेक्षा फार वेगळे आहात... तुमचं वेगळेपण दिसतं ते तुम्ही या प्रश्नांची जी उत्तरं दिली आहेत त्यातून. माझा नैसर्गिक मापदंडच वेगळा आहे असं अनुमान तुम्ही काढलं आहे... एखाद्या सर्वसामान्य माणसाने, नव्हे, एखाद्या सर्वसामान्य शास्त्रज्ञानेदेखिल 'हा ट्यूमरच' असं अनुमान काढलं असतं... पण असं अनुमान काढताना आपली काही गृहितकं असतात... त्यांची एक उतरंड असते... या उतरंडीत तुम्ही अगदी खाली गेलात... या उतरंडीतलं सर्वात खालचं, सर्वात पहिलं असं जे गृहितक तेच तुम्ही हलवलंत. हे तुमचं वेगळेपण मला, आम्हाला खूपच इंटरेस्टींग वाटतं... होय, आम्ही. मी मानव नाही, या ग्रहावरचा नाही हे तुमचं अनुमान अचूक आहे. आम्ही कुठले हे महत्त्वाचं नाही. पण इथे आम्ही कैक वर्षांपासून आहोत एवढंच सांगतो. आम्हाला तुमच्यावर वर्चस्व गाजवायचं नाही, तुमचा ग्रह ताब्यात तर मुळीच घ्यायचा नाही. बाबा, आम्ही फक्त निरीक्षक आहोत... या मानवजातीचे, या ग्रहाचे अन् या सूर्यमालेचे. तुमच्या ग्रहावर अभयारण्ये आहेत ना, तसं ही सूर्यमाला म्हणजे एक अभयारण्यच आहे... आमचं मूळरूप मानवी रूपापेक्षा फार वेगळं नाही. त्यात थोडे बदल केले की बाह्यरूप मानवी दिसायला लागतं, त्याचा फायदा घेऊन आम्हाला तुमचा अगदी जवळून अभ्यास करता येतो. आता काही अंतर्गत फरक असतात, जसे की तो 'ट्यूमर'. त्या भागामुळे तर आमचा मेंदू मानवी मेंदूपेक्षा अधिक सक्षम आहे... आमच्या जाणीवा अतिशय संवेदनशील आहेत. पूर्वी मला तुमची जी भीती वाटायची, ती याच आदिम प्रवृत्तीमुळे किंवा बेसिक इन्स्टिंक्ट्समुळे होती. पण आता मात्र मला तुमची भीती वाटत नाही... तुमच्यापासून मला धोका नाही, त्यामुळे मी तुम्हाला मारणार वगैरे नाहीये. तुमचा विश्वास बसत नाहीये ? पण बाबा, माझी जाण्याची वेळ आली असली तरी तुम्हाला मारण्याची गरजच नाही, कारण तुम्ही मला अडवूच शकत नाही. शिवाय, तुम्ही हे बाहेर कुठेही सांगितलंत तरी कोणाचा विश्वास बसेल ? ही पहिलीच वेळ नाही आमच्याबद्दलचं सत्य मानवांना कळण्याची. पण तुम्हाला न मारण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण वेगळंच आहे... समजा, तुम्ही जंगलात चिंपांझींच्या एका कळपाचा अभ्यास करताय. त्यातला एक चिंपांझी इतरांपेक्षा वेगळा आहे, त्याची क्षमता इतरांपेक्षा वरच्या दर्जाची आहे. तुम्ही त्याचं काय कराल? त्याला माराल की त्याचा अधिक बारकाईने अभ्यास कराल?
अलविदा!

- slarti