गणपतीबाप्पा ते सॅन्टा क्लॉज

भारतीय माणूस हा तसा उत्सवप्रिय प्राणी. आपल्या घरात, समाजात साजर्‍या होणार्‍या, अनेकाविध रंगांची उधळण करणार्‍या उत्सवांचा भारतात काही तोटा नसतोच. होळी, नवरात्र, दिवाळी, दसरा.... आणखीही कितीतरी..

दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत यायला नवर्‍यासह विमानात बसले, तेव्हा या सार्‍या सोनेरी सणांच्या नि क्षणांच्या सुखद स्मृती उराशी बाळगूनच. लग्नाला दोनच वर्ष झाल्याने सारं नवं नवलाईचं. त्यात परदेशाची ही पहिलीच वारी. तेव्हा बॅगेच्या आतल्या कोपर्‍यात रुमालात नीट गुंडाळलेली माहेरची अन्नपूर्णा नि सासरचे एक-दोन देवसुद्धा बरोबर होते. पंधरा दिवसांनी दसरा दिवाळीची चाहूल असल्याने सोबत जरीच्या साड्याही होत्याच. तेव्हा अमेरिकेबद्दल फारसं काही माहित नसलं तरी इथल्या मराठी मंडळांबद्दल ऐकून होते.

पण कसचं काय!! पोचल्यापोचल्या सॅन फ्रॅन्सिस्कोपासून बर्‍याच अंतरावर असलेल्या 'डेली सिटी' नावाच्या गावी हॉटेलात मुक्काम ठोकला. मराठी मंडळ तर सोडाच, पण मराठी माणूस मला तिथे औषधालाही दिसला नाही. नाही म्हणायला हॉटेलची मालकीण म्हणजे कॅथी नावाची गुजराती (?) मुलगी होती. तिची भाषा नि तिचे उच्चार एकदम अमेरिकन असल्याने दिवाळीबद्दल तिला काही विचारायचा माझा धीरच होईना. 'डिवॅली? व्हॉट डिवॅली?' असं म्हणून ती मला फटकारून टाकेल अशी मला भीतीच वाटली.

दसरा हॉटेलच्या खोलीत, देवांची टेबलावर पूजा ठेवूनच पार पडला. एक-दोन दिवसातच नवर्‍याच्या कंपनीनं आमची उचलबांगडी 'पेटालुमा' या गावात केली. सणासुदीच्या दिवसांमुळे सासर-माहेरची आठवण रोजच कशी आभाळात ढग दाटल्यागत उफाळून यायची. अशाच एका उदासश्या दिवशी, रस्त्याच्या पलिकडे असलेल्या रेस्टॉरंटमधून व्हेजी पिझ्झा खाऊन आम्ही दोघे परतत असताना एका पंजाबी माणसानं आम्हाला बघून गाडी थांबवली. स्वतःच्या घरी येण्याचं आग्रहाचं आमंत्रण देऊन, दिवाळीच्या दिवशी गाडी घेऊन न्यायलाच आले. त्यांची पत्नी नि दोन लहान मुली यांच्याबरोबर अमेरिकेतली पहिलीवहिली दिवाळी अगदी गोडधोड, फटाके, लक्ष्मीपूजनासह थाटात साजरी झाली.

या गोष्टीला एक वर्षं उलटून गेलं. वर्षभरानं आलेली दिवाळी एकदम आनंदाची होती. आता आमचं स्थलांतर अपार्टमेंटमधे झालं होतं. गाडीची खरेदी झाली होती. भोवताली राहणार्‍या अनेक मराठी, अमराठी लोकांना या दिवाळीच्यानिमित्ताने आम्ही फराळाला बोलावलं होतं. अंगावरचा बनारसी शालू नि सगळ्या मर्‍हाटमोळ्या साजशृंगारासकट मी सार्‍यांचं स्वागत करताना बघून माझ्या अमेरिकन शेजारणीनं 'ओ, व्हॉट अ ब्युटिफुल नोज पिन...' असा चित्कार काढत माझ्या नथीचं मनापासून कवतिक केलं.

यानंतर असेच अनेक सण जिथे जिथे गेलो त्या राज्यात आम्ही धडाक्यात साजरे केले. गणपतीबाप्पा, देवीचं नवरात्र... दसरा, दिवाळी... अगदी कोजागिरी पौर्णिमासुद्धा. गणपतीला मखराची सजावट, प्रसाद, डाळीची खिरापत, सारं काही. अगदी हरतालिकेची पूजाही मनापासून केली जायची.

या सगळ्या सणांमधे ख्रिसमस केव्हातरी डोकावून जायचा. पण मॉल्समधे केलेली सगळीकडची सुरेख सजावट नि प्रेमळ आजोबासारखा दिसणारा सॅन्टा क्लॉज यापलिकडे त्या सणाशी फारसं नातं जोडलं गेलं नव्हतं. नाही म्हणायला त्यानिमित्तानं असणार्‍या जागोजागीच्या सेलमधे होणारी भरपूर खरेदी तेवढी बेहद्द आवडायची.

पण सात वर्षांपूर्वी संसारात चिमुकल्या प्रिन्स नि प्रिन्सेसचं आगमन झालं नि हे चित्र बदललं. लहानपणी तर दोन्ही मुलांना सॅन्टा क्लॉज खूप आवडत असे. त्याच्या मांडीवर बसलं की त्याच्या दाढीमिशा जणू आपल्याच मालकीच्या आहेत अशा थाटात त्या ओढल्या जायच्या. अशी काही वर्षं गेली, मुलं थोडी मोठी झाली नि एका ख्रिसमसला लेकानं अभावितपणे अगदी निरागस प्रश्न केला... 'आई, आपण आणू या का ख्रिसमस ट्री?'

'अं....बघूया हं. बाबांना विचारूया...' मी हुकमाचा एक्का वापरून तेवढ्यापुरती सुटका करून घेतली. पण पाठपुरावा करण्यात लेक कसला वस्ताद... रोज उत्तर देऊन मला कंटाळा आला तरी त्याला विचारायचा कंटाळा येत नव्हता. मी दाद देत नाही हे बघून त्यानं गुप्तपणे वरच्या पातळीवर आपलं आवेदन नेलं असावं... कारण शनिवारी सकाळी नवर्‍यानं जाहीर केलं..."आपण ख्रिसमस ट्री आणायला जातोय..."

"अहो, खरंच की काय?" मी आश्चर्य वगैरे वाटल्याची स्माईली आणली चेहर्‍यावर...

"त्यात काय.. मुलांची हौस आहे. होऊन जाऊ दे..."

"अहो, पण.. आधीच चिकन खायला लागलेयत दोघं... आता हे आणखी..." माझा विरोध तीन विरुद्ध एक या प्रमाणात असल्याने दुबळा पडत चाललेला...

"मग? चिकन खाल्लं तर काय होतं? तू म्हणजे अगदीच 'ही 'आहेस.... तरी दादा म्हणत होता मुंबईची मुलगी कर... नागपूरची काकूबाई नको..."

माझ्या वर्मी असा घाव बसल्याने मला आता माघार घेणं शक्यच नव्हती.
"बरं बरं.. घेऊन येऊ आपण... उगाच नसते टोमणे नकोत.."

नि उत्साहात ख्रिसमस ट्रीची खरेदी झाली. त्यावर लावायला छोटे छोटे ऑर्नामेंट्स, दिव्यांची माळ, टोकावर लावायचा मोठा लखलखता तारा... अगदी मुलांना नकळत झाडाखाली ठेवायच्या भेटवस्तू..... एक ना दोन. छकुल्यांचा उत्साह तर अगदी ओसंडून वाहत होता.

ख्रिसमसच्या आदल्या दिवशी बाबांना मदत करायला चार चिमुकले हात अगदी तत्पर होते. बैठकीच्या खोलीच्या कोपर्‍यात झाड स्थानापन्न होतं. उशीरापर्यंत खपून ते सुरेख सजवलं गेलं. अगदी वरचा तारा लावेपर्यंत मुलं कोचावर पेंगाळून झोपी गेली. त्यांना उचलून पलंगावर नेऊन ठेवतानाच नवर्‍याने आवाज दिला, "मागचं आवरून झालं की त्यांच्या गिफ्ट्स ठेवायला विसरू नकोस हं झाडाजवळ..."

दिवसभराच्या कामानं दमलीभागलेली मी, नवर्‍याची सूचना कानावर आली तरी मेंदूनं त्याकडे दुर्लक्ष केलं. अंथरुणावर पडल्यापडल्या मला गाढ झोप लागली. सकाळी चारच्या सुमाराला जाग आली तशी मुलांच्या गिफ्ट्स ठेवायची आठवण होऊन मी उठले. बाहेरच्या खोलीत आले नि मंत्रमुग्ध झाल्यासारखी ख्रिसमस ट्री कडे बघतच राहिले.

बाहेर रात्र असली तरी माझ्या घरी 'लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया'च जणू अवतरली होती. खिडकीतल्या मंद चांदण्यांच्या प्रकाशात चमचमणारं ते झाड जणू अंगाखांद्यावर हिर्‍यामाणकांचे अलंकार ल्यायल्यासारखं भासत होतं, हसत होतं. रात्रीची नीरव शांततादेखील त्या झाडानं अगदी बोलकी करून टाकली होती. त्याचं ते अनुपम सौंदर्य न्याहाळतानाच माझ्या मनात एक वेगळीच सुखद भावना आकार घेऊ लागली. तीन महिन्यांपूर्वी थाटामाटात गणपतीची सजवलेल्या मखरात प्रतिष्ठापना केल्यावर मनीमानसी रेंगाळणार्‍या, मोहरून टाकणार्‍या आनंदाच्या तरंगांचं या भावनेशी फार फार जवळचं नातं वाटलं मला तेव्हा..

ते झाड, त्याचं देखणेपण नि ख्रिसमसच्या मुलांच्या पुस्तकांमधे वाचलेल्या गोष्टीं या सार्‍यांची त्याक्षणी इतकी तरल सांगड घातली गेली मनात... की पळभर फायरप्लेसकडे वळून बघितलं मी... पाठीवर गाठोडं घेतलेला, लालचुटुक कपड्यातला प्रेमळ म्हाताराही उतरेल आता यातून... असा एक खुळा विचार डोकावला कल्पनाविश्वात...

आम्ही घरी ख्रिसमस ट्री सजवतो त्याला आता दोन वर्षं उलटून गेलीयत. काही लोक कौतुक करतात... काहींना आश्चर्य वाटतं. अगदी नवर्‍याचा एक मित्र तर आम्हाला 'आद्य समाजसुधारक आणि 'ख्रिंदू' धर्माचे प्रणेते ' असा खिताब देऊन मोकळा झालाय!!!!!!!

पण माझ्यापुरतं सांगायचं तर श्रावण आला की गणपतीबाप्पाचं मखर सजवण्यात मदत करणार्‍या, बाप्पासमोर इवलेसे हात जोडून 'मोरया मोरया, मी बाळ तान्हे...'असं आर्जवानं विनवणार्‍या नि ख्रिसमसला सॅन्टा क्लॉज रात्री येईल म्हणून उत्सुकतेनं वाट बघणार्‍या माझ्या चिमुरड्यांच्या दोन्ही सणांबद्दलच्या उत्साहात, आतुरतेत मला कुठलाच फरक जाणवत नाही. सप्टेंबर ते डिसेंबर हे चारही महिने अमाप आमोदानं भरलेले असतात आमच्या घरात...

गणपतीबाप्पा ते सॅन्टाक्लॉज हा आमचा परदेशातला प्रवास म्हणूनच आगळावेगळा नि तरीही 'मी मराठी' हे आवर्जून सांगणारा.....

- supermom