छायाचित्रण अवघड नाही!

सध्या छायाचित्रण झाडून सगळे लोक करतात. अगदी वय, शिक्षण, आर्थिक स्थिती, कशाचेही बंधन नाही. पूर्वी जेव्हा फिल्मवाले कॅमेरे असायचे, तेव्हा तरी याला काही बंधनं होती, पण डिजिटल क्रांतीनंतर प्रत्येकाकडे डिजिटल कॅमेरा आला. त्याचे फायदे नाकारता येण्यासारखे नाहीत. जसं:

  • फुकटात फोटो (फिल्म कॅमेर्‍यात फोटोमागे ५ रु. जायचे).
  • फोटो काढल्या काढल्या पाहायची सोय (फिल्म संपल्यावर डेव्हलप करायची भानगड नाही).

सामान्यांच्या दृष्टीने हे 'लाख'मोलाचे फायदे आहेत. पण यामुळे काही वाईट सवयी लागतात:

  • वाट्टेल तितके फोटो काढणे.
  • फोटो काढताना विचार करायचा नाही, तो काढल्यावर बघायचं कसा आलाय ते.

पण एकदा गेलेला क्षण परत येत असतो. या सगळ्यामुळे तो फोटो चांगला होता होता राहून जातो. जाऊ दे, फिल्म विरुद्ध डिजिटल हा इथे विषय नाही. तर डिजिटल कॅमेर्‍याने फक्त बरेच फोटो न काढता, ते थोडे बरे कसे काढता येतील याबद्दल बोलू. मी काही यामधला तज्ञ नाही, पण माझा (थोडासा) अनुभव तुमच्या उपयोगी आला तर मला आनंदच वाटेल.

कुठलीही गोष्ट 'करायची' म्हणजे त्यात थोडं तंत्र, थोडी कला येतेच, अगदी गाडी चालवण्यापासून ते गिटार वाजवण्यापर्यंत. यात छायाचित्रणही आलंच. त्यातली कला जरी आतूनच आली पाहिजे, तरी तंत्र शिकणं प्रत्येकाच्या हातात आहे.

तुमच्या फोटोतून 'काहीतरी चुकलंय' ही भावना काढून टाकण्यासाठी ह्या काही साध्या सोप्प्या सूचना:

- तुमचे फोटो 'हलत' नसतील तर उत्तमच, पण जर व्यवस्थित प्रकाश असतानाही फोटो हलत असेल तर मात्र अगदी सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. जसं:

  • कॅमेरा शक्यतो दोन्ही हातात पकडा.
  • बोट फोटो काढायच्या बटणावर ठेवा, फोटो काढताना घाई न करता 'हळूच' बटण दाबा आणि 'हळूच' सोडा. हे लक्षात घ्या, की व्यवस्थित प्रकाश असेल तर कॅमेरा १/१२५ (म्हणजे ०.००८) सेकंदात फोटो काढतो. एवढ्याशा वेळासाठी हात स्थिर ठेवायचाय फक्त!

- आता फोटो कशाचा काढायचाय ते ठरवा. फोटोत काय हवे याचबरोबर काय काय नकोय हेही महत्त्वाचे असते, जसे विजेचे खांब आणि तारा. कधी माणसं नसावीत असं वाटतं तर काही फोटोंमध्ये गती, वस्तूंच्या आकाराचे प्रमाण कळण्यासाठी कोणीतरी असलेलं चांगलं असतं.

- फोटोची चौकट आधीच ठरवा, नंतर संगणकावर हवी तशी कापू असा विचार करू नका. प्रकाश जास्त असेल तर डिजिटल कॅमेर्‍याच्या डिस्प्लेवर नीट दिसत नाही तेव्हा व्ह्यु-फाइंडरमधून बघायला लाजू नका.

- मुद्दाम तिरका फोटो काढायचा नसेल, तर शक्यतो चौकट क्षितिजाला समांतर ठेवा. यासाठी चौकटीत (असल्यास) आडवे क्षितिज अथवा उभी इमारत यांचा संदर्भ घेऊ शकता.

- तीन भागांचा नियम: प्रकाशचित्रकलेत हा नियम सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. या नियमाप्रमाणे फोटोच्या चौकटीचे उभे-आडवे तीन समान भाग केले, तर जे चार बिंदू मिळतात त्यातल्या एका बिंदूपाशी जर तुमच्या फोटोचा विषय असेल, तर फोटो जास्त सुंदर दिसू शकतो. शिवाय तुमच्या चौकटीला विभागणार्‍या त्या चार रेघाही महत्त्वाच्या ठरतात. हा साधा नियम पाळला तर फोटोत बरीच सुधारणा होते. आंतरजालावर याविषयी बरीच माहिती उपलब्ध आहे. (शोधा, rule of thirds)

horizon-rule-of-thirds.jpg

- फ्लॅश हा नेहमी शेवटचा पर्याय ठेवा. जर पुरेसा प्रकाश असेल तर फ्लॅशचा उपयोग करू नये. बहुतेक सर्व डिजिटल कॅमेरे प्रकाश कमी असेल आणि फ्लॅश वापरला नाही, तर फोटो हलणार असेल तर तसे सांगतात. तेव्हा एकतर फ्लॅश वापरावा लागतो नाहीतर तिपायी (tripod)! फ्लॅशमुळे फोटोतील रंग फार नीरस आणि कृत्रिम दिसतात. तुमच्या कॅमेर्‍याच्या फ्लॅशचा पल्लाही कॅमेर्‍याच्या मॅन्युअलमधून माहिती करून घ्या. साधारणतः फ्लॅश काही मीटरांपुढे निरुपयोगी ठरतो. हे सर्वांनाच कळते असे नाही, त्यामुळे चंद्राचा फोटो घ्यायला रात्र आहे म्हणून फ्लॅश मारणारेदेखील मी बघितले आहेत.

flash.jpg

हेही सांगायला पाहिजे की, ही सगळी जुळवाजुळव करताना इतरांच्या टोमण्यांकडे लक्ष द्यायचे नाही.
"किती वेळ कॅमेर्‍यातून बघतोयस?"
"हसायचं असेल तेव्हा सांग!"
अशी वाक्यं ऐकायची तयारी ठेवा! या टोमण्यांना उत्तर तुमच्या चांगल्या फोटोंनी द्या!!

चांगले फोटो काढण्यासाठी पहिल्यांदा, कॅमेरा कसा विचार करतो याची थोडी कल्पना घ्यायला हवी. त्यासाठी आपल्या कॅमेर्‍याचे मॅन्युअल जमेल तेवढं वाचायला हवं. कॅमेर्‍यात हाय फंडा काही नसतं. कुठल्याही कॅमेर्‍यात प्रकाश लेन्समधून फिल्म अथवा फोटो सेन्सरवर पडतो, जो तिथे नोंदवला जातो. लेन्स आणि फिल्म/फोटो सेन्सर यामध्ये प्रकाश किती यावा हे नियंत्रित करायला अ‍ॅपरचर असतं आणि प्रकाश फिल्म/फोटो सेन्सरवर किती वेळ पडेल हे ठरवण्यासाठी शटर असते. बास!

पूर्वी साध्या फिल्म कॅमेर्‍यात अ‍ॅपरचर आणि शटरचा वेग ठेरवून दिलेला असे, जो वापरून सर्वसाधारण परिस्थितींमध्ये चांगले फोटो निघत. सध्याचे साधे डिजिटल कॅमेरे या गोष्टी त्यांच्या मर्यादेत बदलू शकतात.

- प्रकाश किती हवा (Exposure): साधारण डिजिटल कॅमेरा सगळी फ्रेम 'बघून' काय अ‍ॅपरचर वापरायचं (म्हणजे किती प्रकाश लेन्समधे येऊ द्यायचा) ते ठरवतो. याला Average Weighted Metering म्हणतात. बहुतेक सर्वसाधारण परिस्थितीत ह्याचे परिणाम समाधानकारक असतात. पण समजा, तुमच्या फोटोत बराच भाग काळा असेल तर कॅमेरा शक्य तेवढं अ‍ॅपरचर उघडतो, पण त्यामुळे अंधारातल्या नको असलेल्या गोष्टी दिसतात आणि जी हवी ती गोष्ट सगळी पांढरी (over expose) होऊन जाते. अशा काही फसव्या परिस्थितीत Spot Metering वापरावे. म्हणजे सगळी चौकट न बघता, कॅमेरा फक्त चौकटीच्या मध्यबिंदूवर किती प्रकाश आहे यावर अ‍ॅपरचर ठरवतो.

पण यात एक गोम आहे. तुम्हाला हवी असलेली वस्तू बरोब्बर मध्ये असेलच असं नाही. या परिस्थितीत गुंता जरासा वाढतो, तरी फार अवघड असं काही नाही. तुमचं निरीक्षण चांगलं असेल, तर लक्षात येईल की कॅमेर्‍याचे बटण दोन टप्प्यात दाबलं जातं. पहिल्यांदा नाजूकपणे दाबलं की कॅमेरा प्रकाश वगैरे बघून अ‍ॅपरचर, फोकस, शटरचा वेग या सगळ्या गोष्टी ठरवतो आणि पूर्ण दाबल्यावर या ठरवलेल्या गोष्टी वापरून फोटो काढतो. याचा वापर आपण वरील परिस्थितीत करू शकतो. Spot Metering वापरायला चौकटीचा मध्यबिंदू आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी घेऊन बटण हलकेच अर्धे दाबायचे. कॅमेरा त्याची मोजमापे करतो. मग हे बटण अर्धे दाबलेलेच ठेवून तुम्हाला हवी ती चौकट करायची आणि बटण पूर्ण दाबायचं. झालं!

metering.jpg

- प्रकाश किती वेळ हवा (Shutter Speed): वर म्हटल्याप्रमाणे, व्यवस्थित प्रकाश असेल तर कॅमेरा साधारणतः ०.००८ सेकंदात फोटो काढतो. अंधार असेल तर पहिल्यांदा अ‍ॅपरचर वाढवलं जातं आणि जेव्हा तेही शक्य नसतं तेव्हा शटर जास्त वेळ उघडं ठेवलं जातं, म्हणजे फोटो सेन्सरवर जास्त वेळ प्रकाश पडतो. त्यामुळे बर्‍याचदा रात्री काढलेले फोटो हललेले दिसतात. (रात्री कसे फोटो काढायचे ते पुढे बघू.) याउलट जेव्हा एखादी वेगवान गोष्ट फोटोत पकडायची असते, जशी धावती गाडी, तेव्हा प्रकाश कमीत कमी वेळ सेन्सरवर पडायला हवा, पण यासाठी मुळात प्रकाश भरपूर असायला हवा.

- फोकस: फोटोत ज्यावर फोकस असतो, त्या गोष्टी सुस्पष्ट दिसतात. पूर्वीच्या साध्या फिल्म कॅमेर्‍यामध्ये फोकस ठरवून ठेवलेला असे. काही फुटांपासून पुढचे सगळे स्पष्ट दिसे. त्यामुळेच साधारणतः फुलांचा फार जवळून फोटो घेण्याच्या लोभापायी बर्‍याच वेळा फोटो धूसर (out of focus) होई. सध्याचा डिजिटल कॅमेरा स्वतः फोकस बदलू शकतो. तरीही त्याला अंतराचे बंधन असतेच. काही विशिष्ट अंतराच्या आतमध्ये तो फोकस करू शकत नाही. पण यावर उपाय म्हणजे macro मोड. या मोडमध्ये आपण अजून थोडे जवळचे फोकस करू शकतो. पण तरीही अंतराची मर्यादा पूर्णपणे जात नाही, हे लक्षात ठेवायला हवे.

Spot Metering Exposure प्रमाणेच जर एखाद्या वस्तूवर तुम्हाला फोकस हवा असेल (आणि ती वस्तू मध्यभागी नसेल किंवा फार छोटी असेल) तर Center Focus मोड उपलब्ध असतो. जर ती वस्तू मध्यभागी नसेल, तर पुन्हा वरती सांगितल्याप्रमाणे बटण अर्धे दाबून मग चौकट बदलू शकता.

छान फोटो काढण्यासाठी महागातले SLR (Single Lens Reflex) कॅमेरेच असायला हवेत, असं काही नाही. पूर्वीच्या साध्या फिल्म कॅमेर्‍यापेक्षा आत्ताच्या 'साध्या' डिजिटल कॅमेर्‍यात बर्‍याच सोयी आहेत. जसे की वेगवेगळे मोड. साधारणपणे सगळेजण Automatic मोडमध्येच फोटो काढतात. पण कॅमेर्‍याचे मॅन्युअल थोडे वाचून बाकीच्या मोडबद्दल माहिती करून घेतली तर बराच (चांगला) फरक पडू शकतो. साधारण सगळ्या कॅमेर्‍यात असलेले हे काही महत्त्वाचे मोड आणि त्यांचे उपयोग:

- Portrait या मोडमध्ये ज्या गोष्टीवर फोकस आहे ती सोडून बाकीच्या (पुढच्या आणि मागच्या) गोष्टी धूसर होतात. याला Depth of Field कमी करणे म्हणतात (अ‍ॅपरचर वाढवून हे साध्य केलं जातं, पण ते जाऊ दे). असे केल्याने तुम्ही निवडलेल्या विषयाला उठाव मिळतो.

portrait.jpg

- High Speed / Sports ह्या मोडमध्ये कॅमेरा उपलब्ध प्रकाशात शक्य असेल तितका कमी वेळ शटर उघडे ठेवतो, जेणेकरून हलणारी वस्तू फोटोत स्थिर पकडणे शक्य होईल. हा मोड सगळ्या कॅमेर्‍यांत असेलच असं नाही.

वेगात असलेल्या गोष्टी टिपण्याच्यासुध्दा दोन पद्धती आहेत. दोन्हींचे परिणाम वेगवेगळे दिसतात. एक म्हणजे वरचा High Speed/Sports मोड वापरून त्या हलणार्‍या गोष्टीला स्थिर पकडणे. एखादी अ‍ॅक्शन आपण अशी कैद करू शकतो... जसे सचिनने मारलेला फटका! दुसरी पद्धत म्हणजे कॅमेरा साध्या मोडवर ठेवायचा, पण जी वेगातली गोष्ट टिपायची आहे त्या गोष्टीबरोबर हलवायचा. समजा, तुम्हाला रस्त्यावरून जाणार्‍या गाडीचा फोटो काढायचा आहे तर थोडे आधीपासून त्या गाडीला कॅमेर्‍यामधून पहात रहा, म्हणजे तुम्हाला गाडीच्या वेगाचा अंदाज येईल. कॅमेरा हलवायचा वेग कायम ठेवून कॅमेर्‍याचे बटण दाबा. फोटो निघताना आणि नंतरही कॅमेरा तसाच पुढे नेत रहा. याप्रकारचा फोटो वेगळाच दिसतो, तो एका क्षणात काढलेला फोटो असूनही त्यात एक वेग, एक हालचाल पकडता येते.

shutter-speed.jpg

- Night Scene या मोडमध्ये रात्रीच्या लायटिंगचे, बिल्डिंगचे फोटो काढता येतात. Auto मोडमध्ये जर रात्री फोटो काढले, तर कॅमेर्‍याला वाटतं फार अंधार आहे. मग तो अ‍ॅपरचर पूर्ण उघडतोच पण शटरदेखील बर्‍याच वेळ ठेवतो जेणेकरून पुरेसा प्रकाश टिपता येईल. पण त्यामुळे दिवे फार जास्त पांढरे दिसतात (थोडक्यात फोटो over expose होतो). हे होऊ नये म्हणून कॅमेरा Night Scene मोडवर ठेवायचा. मग कॅमेर्‍याला कळतं की रात्र आहे. त्यानुसार तो अ‍ॅपरचर आणि शटरची वेळ ठरवतो. तरीही शटर एवढा वेळ उघडे असते की कॅमेरा हातात धरला तर फोटो हललेला दिसतो. यासाठी व्यावसायिक फोटोग्राफर कॅमेरा तिपायी (tripod) वर ठेवून बोटांनी बटण दाबतानाही तो हलू नये म्हणून remote release वापरतात. मग आपण काय करायचे... तर एखादी अशी जागा शोधायची, जिथे कॅमेरा ठेवून हवी तशी चौकट मिळवता येईल. बटण दाबताना तो हलू नये म्हणून टायमर लावायचा. बास्स!

hand-held.jpg

एकदम मस्त फोटो येतो ही माझी हमी. जसा हा:

colosium-night.jpg

- ISO या मोडमध्ये कॅमेरा कमी प्रकाशातही shutter जास्त वेळ उघडं न ठेवता फोटो हलणार नाही याची काळजी घेतो. पण... कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है... त्यामुळे या मोडमध्ये फोटोचा दर्जा थोडा कमी होतो. फोटोतले पिक्सेल्स् दिसायला लागतात.

ISO.jpg

आशा करतो, ही माहिती सर्वांसाठी उपयोगी ठरेल. आपल्या पुढल्या छायाचित्रांसाठी शुभेच्छा!

- i_am_sam