भीमरूपी महारुद्रा - डिगूकाका

डिगूकाका अनादि असल्यासारखा होता आणि अनंतसुद्धा. म्हणजे आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून तो होताच आणि कधीही कुठेही आपण असणारच आहोत हा विश्वास त्याने नक्की दिला होता. फक्तं कुठे, कसा आणि का प्रकट होईल ते सांगता यायचं नाही.

घरात आईने घातलेल्या सत्यनारायणाच्या पूजेपासून आणीबाणीच्या काळात भूमीगत कार्यकर्त्यांना त्यांच्याहूनही गुप्त राहून मदत करण्यापर्यंत आणि गणपती विसर्जनाला सार्वजनिक विहिरीत शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत कितीहीवेळा उडी घेण्यापासून आमच्यासारख्या यडचाप पोरांच्या टोळीच्या कसल्या कसल्या सहलींमध्ये सामील होण्यापर्यंत.... सगळ्यांत डिगूकाका असायचाच. तिरडी बांधण्यापासून नऊवारी नेसण्यापर्यंत काहीही त्याला येऊ शकण्याची नुसती शक्यताच नव्हती, तर त्याला किंचितही ओळखणार्‍या प्रत्येकाची तशी खात्रीच होती. "हल् ए, डिगूकाकाला येतं हे," असं आम्ही कशाच्याहीबाबतीत कुणालाही छातीठोकपणे सांगायचो.

डिगूकाका म्हणजे 'भीमरूपी महारुद्रा'! अस्तन्या सरसावलेला स्वच्छ सदरा, लेंगा, वहाणा, सहा फूट उंची आणि त्याला साजेलशी रुंदीही. डिगूकाका आठवतोय तेव्हापासून 'तोच चंद्रमा नभात' घेऊन फिरतोय. खाकी रंगाची आणि मिल्ट्री हिरवट रंगाची अशा दोन कॅनव्हासच्या टोप्या तो आलटून-पालटून घालायचा. शिवाय ती सायकल कायम बरोबर. त्याची बरीचशी वाक्यं सायकलवर हॉपिंग करीत चढताना त्या सायकलच्या खडखडाटात ऐकूच यायची नाहीत. कुणीही त्यावरताण ओरडून, "काऽऽऽऽय?" असं विचारलं तर त्याचं वार्‍यावर विरत जाणारं, "येताना सांगतोऽऽऽऽ," ऐकू यायचं. त्याची येतानाची वाट कायम भलतीच असायची.

पार्टीचं राजकारण घरात असल्याने डिगूकाका पार्टीचा कार्यकर्ता आहे एवढं माहीत होतं आणि आम्हाला तेवढंच पुरलं.

"तुझं नाव आधी काय ठेवलं होतं माहितीये? नर्मदा! मग मीच म्हटलं, इतक्या गोडुलीचं नाव ते नदी-बिदीचं कशाला....," असं म्हणून मी त्याच्या या कृपेच्या ओझ्याने पाताळात जायच्या अगदी थोडसंच आधी म्हणायचा, "मीच म्हटलं छानपैकी 'अंबाबाई' ठेऊया. पण आई तुझी! तिनं जाम ऐकलं नाही, अस्सा गोंधळ घातला...," असं म्हटल्यावर मला मातृप्रेमाचं भरतं येऊन वाहून जायच्या आधी तो पुढे..., "म्हणाली, माझ्या एकुलत्या एका मुलीचं नाव अंबाबाई? त्यापेक्षा ’रखमा’ ठेऊया...," माझा चेहरा वाकडा होतोय तोच..., "बाबा तुझा टरक्या. त्याला ठेवायचं होतं 'जाई-जुई' सारखं. पण तुझ्या आईपुढे त्याची काय टाप? उगीच आपलं कायतरी अगदीच वेगळं नको म्हणून म्हणाला, 'जगदंबा' ठेऊया...". यापुढे मी हातपाय आपटून "आईऽऽऽऽऽ हा बघ डिगूकाका मला चिडवतोय कसा.... तू त्याला सांग नाऽऽऽऽ...," करून तोंड वेंगाडून भोकाड पसरलेलं असायचं. आई स्वयंपाकघरातून बाहेर यायच्या आधीच, त्यानं खिशातून एक लिमलेटची गोळी नाहीतर गाभुळलेल्या चिंचेचा तुकडा असलं काहीतरी काढून माझ्या हातावर ठेऊन समेट केलेला असायचा. कितीतरी वेळा त्यानं उचलून घेतल्यावर खांद्याजवळ त्याच्याच शर्टाला, माझं सुरसुरणारं नाक पुसल्याचं अजून आठवतंय.

डिगूकाकाच्या हजरजबाबीपणाच्या इतक्या कथा ऐकल्या होत्या आणि इतके प्रकार बघितले होते की, बिरबलानंतर लागलाच तर डिगूकाकाचाच नंबर लागायचा.

मित्राच्या मुलीच्या लग्नाच्या मांडवात त्यानं नवरा-नवरीचं कौतुक करताना, मित्राच्या पाठीवर थाप मारीत म्हटलं होतं, "तुझा सीमा-प्रश्न सुटला...". मुलीचं नाव अर्थात सीमा होतं. शाळेच्या तडकू मुख्याध्यापकांसह बोर्डाच्या मीटिंगमध्ये गरमागरम चर्चा चालू असताना त्यांना मुलगी झाल्याची आणि सर्व ठीक असल्याची बातमी आली. डिगूकाका आकाशाकडे बघून म्हणाला, "प्रभूची कृपा." मुख्याध्यापकांचं आडनाव, प्रभू!

डिगूकाकाला हे असलं कसं सुचायचं माहीत नाही. पण जिथे असेल तिथला व्हायला त्याला अजिबात वेळ लागायचा नाही. डिगूकाका लेकीकडे अमेरिकेला गेला. तेव्हा नातीच्या कॉलेजात फिरून आला, एकटाच. तिथे त्याला एक मिशनरी भेटला. त्याने सकाळी कुणाचं तोंड बघितलं होतं कुणास ठाऊक. एकमेकांच्या धर्मावर दोन-चार सणसणीत वाक्यांची देवाणघेवाण झाल्यावर शेवटी त्याने ह्याला अगदी निकराचं विचारलं, "तुमचा देवावर विश्वास आहे? देव बघितलाय का तुम्ही?" डिगूकाका ताडकन म्हणाला, "येस, यंग मॅन. यू आर लुकिंग ऍट हिम! नुस्ती आईवडिलांची सेवा करण्याचं कर्म भक्तीभावाने आयुष्यभर केलेल्या पुंडलिकाने जोडलेल्या एका विटेवर, ज्याचा आदि-अंत नाही असं परब्रह्म तिष्ठत, निव्वळ दर्शनाप्रीत्यर्थ उभं आहे. आमच्यात देवळात गेलं नाही तरी चालतं. इतका सोईचा आहे का, ज्याला तू 'तुमचा' म्हणतोयस तो धर्म?" एवढं बोलून डिगूकाका थांबला नाही तर... "तू तुझ्या देवाला केलेला नमस्कारही माझ्याच केशवाला पोचतो, ही माझी श्रद्धा आहे.... एक चांगला माणूस म्हणून जगणारा प्रत्येक जीव हा आधी मनुष्यधर्माचा आहे आणि म्हणूनच हिंदू धर्माचा आहे.... सगळ्यांचा अकाऊंट एकच आहे... मग करू मी तुझ्या देवाला नमस्कार? करतो बापडा!" हेही सुनावलं. असला!

तिथेच एक दिवस कृष्णा कॉन्शसनेसच्या काही उत्साही भक्तांनी ह्याला रस्त्यात गाठला. "तुम्ही इंडियन, हा तुमचाच देव. मग तुम्ही ही पुस्तकं घ्यायलाच हवीत, पुस्तकं नकोत तर किमान इतके पैसे तरी द्याच, डोनेशन...". ह्याचा जावई कसंतरी झटकून जायला बघत होता. डिगूकाकाने त्या भक्ताला सांगितलं, "मला हे समजून घ्यायला लागेल. किती वेळ लागेल?" तो दीडशहाणा म्हणून गेला की त्यांचा तंबू आहे जवळच आणि त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. डिगूकाकाने मग त्याला आडवा घातला, "तुला रामा कॉन्शसनेसबद्दल काय माहितीये? तो अवतार आधी, मग कृष्णाचा. माझ्याकडेही भरपूर वेळ आहे. मी मुलीकडेच आलोय आणि वेळ कसा घालवायचा कळत नाहीये. आत्ता तू आधी ते रामाचं समजून घे, मग तुझं ऐकतो.... पाहिजे तर तंबूवर जाऊ, मी मोकाटच आहे." त्याला पळता भुई थोडी झाली असणार.

लहानपणचं एक आठवतंय. डिगूकाका एकदा आम्हांला घेऊन गडसहलीला गेला होता. उठून गेलो होतो वसईच्याच किल्ल्यावर, पण तयारी मात्र अगदी रायगड किंवा सिंहगड तरी काबीज करण्याची होती. मग त्यावर आम्ही कुणीही जात नसलेल्या एका भलत्याच शाळेच्या पटांगणावर जवळजवळ पाच तरी गुप्त ’खलबतं’ झाली. त्यातली तीन खलबतं सगळे मावळे आणि हिरकण्या हजर नाहीत म्हणून तहकूब झाली. हो! आम्ही हिरकण्या! सगळ्या हिरकण्यांची नाकं टोचलेली असतात असा फतवा काढला त्याने जायच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता. सगळ्या मिळून दोनच हिरकण्या पथकात. मीच एक भुंड्या नाकाची होते. मग सिगारेटच्या चांदीची चमकी करून फेविकॉलने चिकटवली डिगूकाकाने माझ्या चुकीच्या नाकपुडीवर. शिवाय फेविकॉल बरोबरही घेतलं... मधे कुठे तो हिरा पडल्यास दुसरा डकवायला. अगदी ताजा डकवलेला हिरा पडू नये म्हणून मी स्टेशनवर जाईपर्यंत आकाशातले एकाच बाजूचे काही तारे बघत गेल्याचं मला छान आठवतय. शिवाय मी धडपडू नये म्हणून मला धरून दोन खंदे मावळे दोन बाजूला.... हे असलं सगळं तो करत असताना स्वत: तर गंभीर असायचाच, पण बाकीच्या मोठ्यांनीही हसलेलं चालायचं नाही त्याला.
त्यानं सांगितलं की, "शिवाजीराजांचे मावळे घोरपडीचं मांस खायचे." यावर दुसर्‍या हिरकणीने म्हणजे त्याच्याच लेकीने बावळटासारखं घाबरून विचारलं होतं, "आणि हिरकण्या?"
"ताकभात", असं तो सहज म्हणाला होता.

त्याच्या अनेक क्लृप्त्या होत्या. सदर्‍याच्या बाहीला कोपर्‍याच्या वर आणि लेंग्याला गुडघ्यांच्या वर एकेक बटण शिवलेलं असायचं. निवडणुकींच्या धामधुमीत रात्री पोस्टर्स चिकटवायला, कापडी फलक लावायला जेव्हा अस्तन्या सावरायची आणि पँट्स दुमडायची इतरांवर वेळ यायची, तेव्हा हा मस्तपैकी अस्तन्या वर करून आतून बाहेर आलेल्या पट्टीने बटण लावून टाकायचा. तीच कथा लेंग्याची. पुन्हा पुन्हा दुमडत बसायला नको. पुष्पाकाकू असल्या शिवणकामात तरबेज. पार्टीच्या एका मान्यवर नेत्याने एकदा लिहिण्यासाठी ह्याच्याकडून पेन घेतलं आणि विसरून आपल्या खिशाला लावून चालू पडले. टुण्णकन् उडी मारून पेन अलगद ह्याच्या हातात जाऊन पडलं. ह्याने अगदी पातळ लोकरीचा धागा पेनाला बांधून आपल्या सदर्‍याच्या बटनाला बांधला होता.

डिगूकाकाचा स्वत:चा संसार तसा सरळच होता... डिगूकाका त्यात काड्या घालत नव्हता तोपर्यंत. पुष्पाकाकू सरळ ठेवेल तितका सरळ! संध्या एकुलती एक मुलगी. तिला कुणा परजातीयाबरोबर लग्नं करायचं होतं. घरातून सगळ्यांचाच कडाडून विरोध. डिगूकाकाचा आतून पाठिंबा. त्यानं तिला पळून जायला मदत केली. आपल्या एका मित्राला सांगून कन्यादान करायला लावून लग्न करून दिलं. तिला एक मुलगी झाल्यावर पुष्पाकाकू विरघळली, तेव्हा काही न बोलता आपणही गेला लेकीकडे तिच्याबरोबर. त्याचवेळी पुष्पाकाकूला खरं काय तेही सांगितलं. जावयाच्या घरात होतो म्हणूनच वाचलो, असं नंतर आम्हांला सांगत होता.

पुष्पाकाकू कधीतरी साठवणीचं शिवणकाम घेऊन आमच्याकडे यायची. चादरींना टिपा, पातळ दुलया, पडदे असलं काय काय असायचं. तिच्याकडे शिवणयंत्र नव्हतं. डिगूकाका तिला मदत करायला. तिने कितीही नको म्हटलं, विनवण्या केल्या तरी हा यायचाच. मदत काय? तर शिवणयंत्राच्या दुसर्‍या बाजूला काका एका स्टुलावर बसायचा आणि त्या दुसर्‍या बाजूने हलक्या हाताने शेवया वगैरे काढून घ्याव्यात तसं शिवणयंत्रातून पुढे सरकणारे पडदे, चादरी धरायचा. आमची पर्वणी असायची, कारण पुष्पाकाकू काय काय मस्त खायला करून घेऊन यायची. काळा-गोडा मसाला लावलेले, आमचूर टाकलेले पातळ पोहे, कटका कैरी, ढोकळा. त्या कडाडणार्‍या यंत्राच्यावर आवाज काढीत डिगूकाका काय काय गंमती सांगायचा... तेव्हाच तो कमर्शियल शिपिंगलाईनवर काम करायचा ते कळलं. सिंदबादच्या सफरी झक मारतील असलं काय काय असायचं त्याच्या गोष्टींमध्ये. मधेच गप्प व्हायचा. आमची "पुढे? मग काय झाल? सांग ना," असली भुणभुण झाली की.... आवाज खाली आणून म्हणायचा, "थांबा, माझं आवडतं पातळ येतंय, गोधडी बनून. दोन मिनिटं तरी शांतता पाळा." एकदा असंच काहीतरी मोठ्ठं शिवताना दुसर्‍या बाजूला बसलेला डिगूकाका हात झाडीत थयथय नाचत सुटला. पुष्पाकाकू घाबरली, "अहो काय? काय झालं?"
"सुई आण, कातर आण...", डिगूकाका ओरडत म्हणाला.
कशाला? तर म्हणे, माझा हात शिवलास आणि आता तो उसवायला हवा. हातात सापडेल ते घेऊन पुष्पाकाकू त्याच्या मागे लागली होती. संध्या आणि आम्ही मुलं हसून हसून लोळलो होतो.

एका वर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी तुळशीजवळ फोडायचं कारेटं आणायला आई विसरली बहुतेक. रात्री कधीतरी आठवलं तिला. मग ह्या ’भीमरूपी’चा ’फोनरूपी’ धावा केला. घरात आणलेल्यातलीच दोन घेऊन आला, "काय भाजी करायची नाहीये. करायची काय साताठ घरी?" दुसर्‍या दिवशी सकाळी आंघोळी करून आम्ही दोन मुलं आमच्या तुळशीजवळ गेलो. अंगठ्याने ते कारेटं फोडून कडूजार रसाचं बोट जीभेवर ठेवल्यासारखं करतोय तोच, कुठुनतरी प्रकट झाल्यासारखा डिगूकाका एकदम तुळशीजवळ उभाच असलेला दिसला.
"ऍ...ऍ... अस्सं नाही. काल मुद्दाम आणून दिलं ते कशासाठी आँ? तोंड उघडा... नीट... डोळे मिटा पायजेतर... हा अस्सं...."
आम्ही रडकुंडीला येऊन तोंड उघडलं, घट्ट डोळे मिटून घेतले. जीभेवर मात्र चिंचेची आंबट-गोड जीरागोळी पडली. आम्ही ओरडणार इतक्यात त्यानेच नाकावर बोट ठेऊन "शू ऽऽऽऽ" केलंन.
"हे घे वैनी, आमच्याकडला फराळ... आणि पोरांनी कारेटं चाखलनी की नाही, ते बघायला आलो," आपल्याघरचा फराळाचा डबा आईकडे देत म्हणाला. आमच्या हसर्‍या चेहर्‍यांकडे बघून आई काय समजायचं ते समजली असणार.

खाण्याच्या बाबतीत गोड खाणारा त्याचा हात धरणारं माझ्या बघण्यातच काय पण ऐकण्यातही नाही. घट्ट साजूक तुपात फक्त पिठीसाखर आणि वेलदोड्याची पूड घालून केलेला गोळा मटकावून, "अजून थोडी साखर चालली असती" म्हणणारा डिगूकाका. वेलदोडे भयंकर आवडायचे. येता-जाता, "तोंडाला आता नुस्ताच सालीचा वास येतोय, जरा चार दाणे दे, वैनी" म्हणून वेलदोड्याचे दाणे मागून घेऊन खायचा. कुणीही परदेशातून, आखातातून येणारं असलं की काकूच काय पण आमची आईही त्याच्यासाठी वेलदोडे आणायला सांगायची. "नुस्त्या वेलदोड्याच्या दाण्यांवर पोसलीत तर कोंबडीही खाईन", हे त्याचं म्हणणं आम्हाला स्वप्नातही खोटं वाटलं नाही.

अतिशय चिडला की एरवी गडगडणारा डिगूकाका शांत व्हायचा आणि अगदी समजुतीच्या स्वरात, एकेक शब्द सावकाश, लहान आवाजात बोलायला लागायचा.

त्याच्याकडे कामाला येणार्‍या बाईच्या मुलीला शाळेतल्या शिक्षकांनी पट्टीने मारलं. का? तर तिच्या गणवेषाला त्या दिवशी पट्टा नव्हता. कारण न विचारता बेदम मारलं लहान मुलीला आणि घरी पाठवून दिलं. डिगूकाका तिचा ओला पट्टा घेऊन तिच्यासह शाळेत हजर, शिवाय बरोबर कपडे वाळत घालायची काठी. त्या शिक्षकांच्या समोर जाऊन उभा राहिला, त्यांच्या समोर टेबलावर काठी ठेवली, हात पुढे केला आणि म्हणाला, "आता मारा." त्याचा चेहरा इतका शांत आणि आवाज इतका लहान होता की, खोलीतले सगळे शिक्षक घाबरलेच. त्या शिक्षकांनी तरीही धीर करून विचारलं, "का? तुम्ही कोण?"
"काय फरक पडतो? प्रश्न न विचारता शिक्षा करण्याची पद्धत आहे ह्या शाळेची असं दिसतय. तेव्हा तुम्ही फक्त हात चालवा. हं सुरू."
त्याच्यामागे उभ्या संगीताला बघून त्या शिक्षकांना काय ते कळलं.
"ही संगीता, माझ्या मुलीचे वापरलेले कपडे वापरते. तिचा पट्टा हिच्या मापाचा नाही, शिवाय एक हुक तुटलेला, जो लावायला सात घरी धुणी-भांडी करणार्‍या तिच्या विधवा आईला वेळ नाही. पट्टा गळून रस्त्यातल्या चिखलात पडल्यावर तिला पट्टा धुवायला टाकावा लागला आणि बिनपट्ट्याचं शाळेत यावं लागलं. तिचा दोष नाही. नक्की नाही. असलाच तर तिच्या अकाली मेलेल्या बापाचा आहे, तिच्या मरमर काम करणार्‍या विधवा आईचा आहे, तिला मापाचा पट्टा असलेला गणवेष पुरवू न शकणार्‍या माझ्यासारख्या नालायकाचा आहे.... पण तुम्हाला कुठे फरक पडतो ?!... तुम्ही मारा. तुम्हाला आवश्यकताही नाही कारणं जाणून घेण्याची.... तुम्ही मारा. मला लागेल अशी काठीही आणलीये... हं सुरू करा. वाट कसली बघताय?"
डिगूकाकाला बराच बाबापुता करावा लागला तिथून हलवायला.

गावच्या अंबाबाईच्या देवळासमोर बसणार्‍या एका गरीब फुलंविक्या म्हातार्‍याच्या हातून फुलांवर पाणी शिंपडताना चार शिंतोडे अंगावर उडाले, म्हणून त्याच्या अंगावर धावून गेलेल्या एका धनाढ्य वकिलाला डिगूकाकाने लोळवला होता. त्याला पुरता घोसळून शिवाय वर आणखी "कर काय कोर्ट-कचेरी करायची ती", हेही सुनावलं. त्यासंदर्भात दोन दिवस पोलीसचौकीची हवा खाऊन आलेला डिगूकाका त्याच वकिलाच्या तरूण मुलाच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रक्त मिळवण्यासाठी उंबरठे झिजवीत हिंडला.

आपल्याच भावाने बाहेर काहीतरी बाईची भानगड केल्याचं कळल्यावर डिगूकाकाने त्याला घराबाहेर काढलं आणि भावजयीला घटस्फोट मिळवून दिला. शिवाय दोनेक वर्षांत सगळं निस्तरल्यावर तिला स्पष्टपणे विचारलंही, तिला परत लग्नं करायचंय का? तर बहिणीसारखं लग्नं लावून देतो. तिच्या माहेरच्यांनी तिचं नाव टाकलं होतं. बाप्पा म्हणजे त्याचे वडील, त्याचेच 'बाप'. त्यांनी त्या मुलाचं नाव आपल्या मृत्यूपत्रातून वगळलं, त्याचा वाटा सुनेच्या हाती दिला.

डिगूकाकाला खूप लवकर आणि संपूर्ण, व्यवस्थित टक्कल पडलं. केस कापून घ्यायला रडणार्‍या आपल्या लहान नातीला त्याने सांगितलं की, "केस कापून घेतले नाहीस तर आज्जी एक एक करून सगळे उपटेल... माझ्यासारखे... येणार नाहीत उगवून परत आणि मग असला कंगवा वापरावा लागेल." खिशातून त्यानं काढलेल्या कंगव्याला मधे दातच नव्हते. तो तसाच कंगवा खिशात घेऊन फिरायचा. आजोबाच्या टकलापेक्षा नात त्या कंगव्याला जास्त घाबरली म्हणे.

कोणत्याही वेळी गावातल्या कुणाच्याही मयताला जाण्याची तयारी आणि बरोबर आठ-दहा आपल्यासारखीच भल्या मनाची माणसं नेणे, कोपर्‍यावरचा कचरा वेळेवर उचलला नाहीत तर नगरपालिकेच्या कचेरीच्या दारात कचरा आणून टाकण्याची धमकी खरी करून दाखवणे, लाटणी मोर्चा, थाळी मोर्चा असल्या मोर्चांमध्ये बायकोला पाठवल्यावर आणि त्यादिवशी तिला पोलिसांनी धरल्यावर, घरातलं स्वयंपाक वगैरे सगळं आवरणे, शेजारच्या तातूंकडे बाहेरचं बघायला कुणी तरूण माणूस नाही घरात हे जाणून प्रत्येकवेळी बाहेर पडताना त्यांना काही आणून हवंय का याची आवर्जून चौकशी करणे, जावयाच्या आज्जीला आपली लेक नीट बघत नाही म्हटल्यावर जावयाच्या देखत तिचा उद्धार करणे आणि 'बघितली नाहीस तर मी घरी घेऊन जाईन म्हातारीला'... 'आणि तुला माहेर बंद होईल' हेही धमकावणे... डिगूकाका असल्या बाबतीत अर्क.

डिगूकाकाचा पाय आयुष्यात एकदाच घसरला. पुष्पाकाकूला तो 'फुलनदेवी' म्हणायचा. कारण एकच, तिला फुलांचा अतोनात शौक. काहीच नाही मिळालं तर एकदा त्यांच्या दारातल्या आंब्याच्या मोहराचा छोटा घमघमता डिकसा आपल्या काळ्याकुळकुळीत भल्यामोठ्ठ्या अंबाड्यात घालून आली होती आमच्याकडे. लग्नाच्या वाढदिवसाला एकतरी फूल तिला द्यायचंच हे त्याच्या अनेक अत्रंग व्रतांतलं एक व्रत. त्यापायी एका सकाळी उडी मारून कुणाच्यातरी बागेतून बाहेर डोकावणारं फुल काढायला गेला, पाय घसरून मोडून घेतला. तसंच दुखर्‍या पायाने लंगडत जाऊन ते फूल दिलंन आपल्या देवीला. पाय मोडण्याचं कारण विचारता, "फुलनदेवीसाठी गुलबकावली शोधायला गेलो होतो, सात डोंगर, सात समुद्रापार..," असलं काहीतरी विचारणार्‍या प्रत्येकाला सांगून प्रत्येकवेळी तिला लाज आणीत होता.

बाप्पा नव्व्द वर्षं जगले. शेवटपर्यंत दात मजबूत. पणतीला काडकन् बुंदीचा लाडू फोडून द्यायचे. शेवटची दोन वर्षं अंथरूणावर. अंगाला खतं पडली. त्यांना जगण्याची इच्छाच नव्हती. पण त्यांच्याच भाषेत 'जुनं लाकूड, नुस्त्या काळाच्या वाळवीनं संपायचं नाही', असं. बाकीची दोन मुलं वैद्यकीय उपचार चालू ठेवून जगवायला बघत होती. त्यात नाकातून नळी घालून अन्न, सलाईन वगैरे चालू होतं. वडलांचे हाल बघवत नसल्यानं डिगूकाकाने भावांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. कधीच देवाकडे काहीही न मागितलेला डिगूकाका म्हणे एक दिवस देवळात जाऊन ढसाढसा रडला. तिरमिरून घरी आला आणि वडलांना सगळं सांगितलं अन् म्हणाला, "बाप्पा, उद्यापासून रोज तुमच्यासाठी इथे गीतेचा सोळावा अध्याय वाचणार आहे... कशासाठी ते कळतंय का? वाचू का?" अत्यानंदाने हलणारी वडिलांची मान बघून तेही केलंन. पहिल्याच दिवशी बाप्पांनी वाचन संपायच्या आधीच मान टाकली.
तीनच महिन्यात आईनं अंथरूण धरलं आणि त्याच सोहळ्याचा हट्ट धरला. डिगूकाका असा बहाद्दर की तेही केलंन. आश्चर्य म्हणजे आज्जीसुद्धा पहिल्याच दिवशी प्रस्थान ठेवत्या झाल्या.

आता पंच्याहत्तराव्या वर्षीही डिगूकाका थकलाबिकला नाहीये. त्यानेच पूर्वी कधीतरी सुरू करून दिलेल्या 'जेष्ठ नागरिक संघा'साठी बराच वेळ जातो त्याचा. त्यांच्या सहली काढ, षष्ठ्या-सत्तर्‍या साजर्‍या कर, त्यातल्या विकलांग वृद्धांना एकटं, दुर्लक्षित वाटू नये म्हणून एक दिवसाआड 'गप्पाष्टक' चालव हे सगळं चालू आहे.
मध्यंतरी ऐकलं की कुठेतरी आपटला, त्याची डोक्याला झालेली जखम बरीच चिघळली आणि त्याची शस्त्रक्रिया वगैरे करावी लागली. अतिदक्षता विभागातून बाहेर आल्याच्या दिवशी दुपारी डॉक्टर बघायला आले तर हा शेजारच्या म्हातार्‍या पेशंटची औषधं आणायला खाली केमिस्टकडे गेला होता.

दोन्ही हातांच्या एकाच बोटाने टाईप करत का होईना, पण नातीबरोबर चॅट करतो. तिला तिच्या आईच्या लग्नाची गंमत सांगितलीये आणि तुला मदत हवी असल्यास खुश्शाल मला कळव म्हणून सांगितलंय. पुतण्याला, पुष्पाकाकूला आणि संध्याला सोळाव्या अध्यायाबद्दल सांगून ठेवलंय. ह्यांपैकी सगळ्यांनी त्याच्या भाषेत 'पायात शेपडी' घातली तर, म्हणून जावयाला एक प्रत दिलीये आणि उच्चारांसकट म्हणून घेतलंय..... बॅकप म्हणून!

इथे परदेशात आता दिवाळीला कारेटं नाही आणि ते फोडायला तुळशीकट्टाही नाही. आमचा 'भीमरूपी महारूद्रा' प्रकट होणार असेल ना, तर मी अख्खं कारेटं खायला तयार आहे. प्रत्येक घराला असा एक डिगूकाका मिळावाच.... त्याच्याच चिंचेच्या जीरागोळीसारखा! विरघळतानाही झिणझिणणारा आणि नुस्त्या आठवणीने.... स्सऽऽऽऽ च्च!

- daad