संवाद - डॉ. अशोक पांडे

मुलाखतकार : पराग सहस्रबुद्धे

सखोल ज्ञान, सामाजिक बांधिलकी आणि अथक परिश्रम यांचा सुरेख संगम म्हणजेच 'बायफ'चे उपाध्यक्ष डॉ. अशोक पांडे.

Dr.Pande_.jpgमध्यंतरी माझ्या बहिणीच्या लग्नानंतरच्या स्वागतसमारंभाला उरुळीकांचन इथे जाणं झालं. नक्की कुठे जायचं आहे, ह्या बाबतीत आधी काहीच अंदाज नव्हता. बहिणीचे सासरे, डॉ. अशोक पांडे एका 'एनजीओ'मध्ये उपाध्यक्ष आहेत, एवढंच माहीत होतं आणि हा समारंभ त्यांच्या ऑफिसात आयोजित केलेला होता. आम्ही पंचवीस-तीस जण त्यासाठी सकाळी तिथे पोचलो. आमच्या स्वागतासाठी तिथे जवळजवळ दोनशे लोक हजर होते. अतिशय नेटकं आयोजन, शिस्तबद्ध वातावरण आणि सुग्रास भोजनासह हा कार्यक्रम पार पडला. आम्हांला आसपासचा मोठा परिसर, सुसज्ज प्रयोगशाळा, शेती, गोठे हे सगळं बघण्याची, तसंच तिथे नक्की कसलं संशोधन चालतं, हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. तो सगळा परिसर होता 'भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन' (बायफ) ह्या संस्थेचा. 'बायफ' ही संस्था शेतीविषयक संशोधनात आज अग्रगण्य समजली जाते. संस्थेचा परिसर पाहत असताना संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अशोक पांडे ह्यांच्याशी 'बायफ'च्या प्रवासाबद्दल तसेच त्यांच्या 'बायफ'मधल्या सहभागाबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. ही माहिती दिवाळीच्या प्रसंगी वाचकांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न.

प्रश्न : 'बायफ'ची स्थापना कधी झाली? 'बायफ'मागची मूळ संकल्पना काय?

2.jpg'बायफ'ची सुरुवात जरी १९६७ साली झाली असली, तरी ही संस्था चालू होण्यापूर्वी सुमारे वीस वर्षं त्यासाठी अभ्यासपूर्ण प्रयत्न चालू होते. १९४६ साली गांधीजींना इंग्रजांनी पुण्यातल्या आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केले होते. गांधीजी जेव्हा आफ्रिकेत होते, तेव्हा त्यांना पोटदुखीचा खूप त्रास झाला होता आणि त्यावर निसर्गोपचारांनी खूप आराम पडला होता. निसर्गोपचारांचा भारतातल्या गोरगरिबांनाही फायदा व्हावा, यासाठी पुण्याजवळ निसर्गोपचार केंद्राची सुरुवात करावी, असा विचार त्यांच्या मनात चालू होता. त्यांच्या अनुयायांनी उरुळीजवळची जागा त्यांना देऊ केली. शहरापासून जवळ, पण तरीही निसर्गाच्या सान्निध्यात असलेली ही जागा गांधीजींना खूपच आवडली आणि मार्च १९४६ मध्ये निसर्गोपचार केंद्र सुरू झाले. ह्या केंद्राची जबाबदारी विनोबाजींचे भाऊ श्री. बाळकोबा भावे यांनी घेतली. पण दैनंदिन कामकाजासाठी एखाद्या २५-२६ वर्षांच्या तरूण व्यवस्थापकाची गरज होती. त्याचवेळी श्री. मणिभाई देसाई हे आपले गणित आणि भौतिकशास्त्रातले पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन गांधीवादी चळवळीत सामील होण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी निसर्गोपचार केंद्राची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली. मात्र गांधीजींनी मणिभाईंना दोन अटी घातल्या. एक म्हणजे सगळं आयुष्य ग्रामीण लोकांच्या कल्याणासाठी वेचायचं आणि दुसरं म्हणजे देहाची राख उरुळीला पडली पाहिजे. मणिभाईंनी अटी मान्य केल्यानंतर गांधीजी दिल्लीला गेले ते स्वातंत्र्याच्या चर्चेसाठी.

मणिभाई थोडे विचारात पडले, की सगळं आयुष्य ग्रामीण लोकांच्या कल्याणासाठी घालवायचं म्हणजे नक्की काय? केवळ निसर्गोपचार केंद्र चालवून भागण्यासारखं नव्हतं. पुढे खूप विचारांती असं ठरलं, की ग्रामीण भागातील नैसर्गिक स्रोतांचा अभ्यास करायचा. देशातील जनता पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेती, दुग्धव्यवसाय यांच्या विकासासाठी प्रयत्न करायचे. उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीतूनच अधिकाधिक उत्पादन कसे मिळवता येईल, ह्यावर विचार करायचा. ग्रामीण जनतेची कार्यशक्ती वाढवून त्यांना स्वयंपूर्ण करण्यावर भर द्यायचा. ह्या सगळ्यांतूनच 'बायफ'च्या कल्पनेचा उदय झाला.

प्रश्न : गांधीजींनंतरही हे प्रयत्न कसे चालू राहिले? आणि पुढची प्रगती कशी झाली?

4.JPGगांधीजींबरोबरच्या चर्चेनंतर मणिभाईंना एक दिशा मिळाली होती. त्यामुळे त्यांनी गांधीहत्येनंतरही त्याच दिशेने प्रयत्न चालू ठेवले. साधारणपणे शेतकर्‍यांकडे गायी असतातच. मात्र या देशी गायी फारच कमी दूध देत. त्यामुळे दुग्धव्यवसायाच्या जोडधंद्यात म्हणावा असा फायदा होत नसे. उरुळीला आश्रमात 'गीर' जातीच्या गायींचा कळप होता. त्या गायी जास्त दूध देत असत. त्यांच्या दुधाचा निसर्गोपचार केंद्रातील रुग्णांना उपयोग होत असे. मात्र अशा गायी सर्वसामान्य शेतकर्‍यांकडे नव्हत्या. होत्या त्या गावठी गायी. ज्यांची दूधउत्पादन क्षमता फारच कमी असते. गायींवर संशोधन करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे गायींची दूधउत्पादन क्षमता. दुधासाठी उत्तम असणार्‍या विदेशी जातींशी संकर करून जन्मलेल्या कालवडींची संख्या योग्य खानपान व व्यवस्थापनाच्या आधारे तीन-चार वर्षांतच दहा-बारा पट वाढवता येऊ शकते. एवढ्या कमी वेळात एवढा जास्त लाभ देणारी अन्य कोणतीही गोष्ट नाही. तसेच यामुळे गरीब शेतकर्‍यांना अर्थार्जन करता येईल. घरात दूधदुभतं वापरलं जाऊन स्वास्थ्य सुधारण्यास मदत होईल. पर्यायानं ग्रामीण जनतेच्या राहणीमानाचा दर्जा उंचावेल. मग पुढे यावर अधिक खोलात संशोधन सुरू झालं.

चांगल्या दर्जाच्या वळूंचं वीर्य मिळवण्यासाठी विविध युरोपीय देशांमध्ये चौकशी सुरू केली. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात वीर्य आयात करणे, हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. आणि एकूणच सर्व बाबतीत आपण स्वयंपूर्ण असावे, असा महात्मा गांधींप्रमाणेच डॉ. मणिभाईंचा आग्रह असायचा. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याच वातावरणात जन्मलेले व वाढलेले वळू आणि त्यांचे वीर्य हे बाहेरून आयात केलेल्या वळू आणि त्यांच्या वीर्यापेक्षा नक्कीच चांगले असते (वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती या संदर्भांत). त्यामुळे गाभण गायी आयात करण्याचा विचार चालू झाला. ह्या सगळ्या पशुसंवर्धनाच्या व शेतीच्या संदर्भांतील संशोधनात सुमारे वीस वर्षे गेली. पुढे यशवंतराव चव्हाण भारताचे गृहमंत्री असताना व वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या दोघांच्या सहकार्याने सुमारे शंभर एकर जमीन मणिभाईंच्या संशोधनकार्याला उरुळीकांचन येथे मिळाली. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे त्यावेळचे अध्यक्ष डॉ. वर्गिस कुरियन ह्यांच्या पुढाकाराने सुमारे पस्तीस लाख रुपयांची देणगी 'बायफ'ला मिळाली आणि त्यातून इमारत आणि प्रयोगशाळा उभ्या राहिल्या. २४ ऑगस्ट १९६७ साली 'बायफ'ची स्थापना झाली. १९७० साली डेन्मार्क सरकारने होल्स्टाइन फ्रीजियन व जर्सी जातींच्या दोनशे गाभण कालवडी आपल्याला दिल्या. त्या विमानाने मुंबईला आणि तिथून पुढे उरुळीला आणल्या गेल्या. त्याचबरोबर उत्कृष्ट प्रतीचे वीर्यही आणण्यात आले. ह्या कालवडींपासून वळू मिळाले. पुढे त्यांचे वीर्य साठवले जाऊ लागले आणि त्यावर अधिकाधिक संशोधन चालू झाले.

प्रश्न : ह्या संशोधनाचा प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या गायींवर प्रयोग कधी झाला? आणि त्यावर शेतकर्‍यांचे सहकार्य आणि प्रतिसाद कसा होता?

पुरेशी तयारी झाल्यानंतर 'बायफ'ने बारामती, माळेगाव, प्रवरानगर ह्या भागातील साखर कारखान्यांशी संपर्क साधला. ह्या साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा करणारे शेतकरी ह्या प्रयोगासाठी तयार झाले. हे शेतकरी प्रगत होते, पुढारलेले होते. ते कृत्रिमरित्या गाभण असलेल्या गायींची व निर्माण झालेल्या संकरित गायींची चांगली काळजी घेऊ शकणारे होते. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा प्रयोग अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाला आणि ह्या गायींची दुग्धउत्पादन क्षमता सुमारे वीस लिटरांइतकी वाढली. हळूहळू या सगळ्याची प्रसिद्धी झाली आणि अनेक साखर कारखाने, तसेच शेतकरी स्वतःहून पुढे आले. गुजरातमधूनही सरकारने व अनेक शेतकरीसंस्थांनी संपर्क साधला आणि पुढे गुजरातमध्येही केंद्रं सुरू झाली.

भिन्न जातींच्या संकरणामुळे (क्रॉस-ब्रीडिंग) गायींची दुग्धउत्पादन क्षमता वाढली असली, तरी पुढे या गायींची काळजी कशी घ्यायची, चार्‍याचे प्रकार, चार्‍याची प्रत, त्यातील प्रथिने, कर्बोदके, वसा, क्षारांचे आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण किती असावे ह्यांवरही मार्गदर्शन करा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून सुरू झाली. मग ह्या बाबतीतील संशोधनाचे कार्यक्रम सुरू झाले. मग नवीन शास्त्रज्ञ आले. व्यवस्थापनासाठी एम्. बी. ए. पदवी घेतलेले लोक आले. आर्थिक बाबी सांभाळणारे लोक आले. आणि हळूहळू 'बायफ'ची एक 'मल्टी डिसीप्लिनरी टीम' तयार झाली.

प्रश्न : या सगळ्या कार्यांत तुम्हाला अडचणी आल्या का किंवा अडवणूक झाल्याचे प्रसंग आले का?

हो, भरपूर! प्रत्येक राज्यात अनेक अडचणी आल्या. पण 'बायफ'चं एक तत्त्व होतं. कोणत्याही राज्यात बोलावल्याशिवाय जायचं नाही. राज्य सरकारला गरज वाटली आणि त्यांनी मदत मागितली, तरच जायचं. कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारास बळी पडायचं नाही. पैशाची देवघेव करायची नाही. सगळं काम पैशासाठी नसून समाजासाठी आहे ही भावना प्रत्येक कर्मचार्‍याच्या मनात रुजवायची. हे कार्य ग्रामीण विकासाचे असले, तरी त्यात नवनवीन विज्ञानाधारित तंत्रांचा उपयोग करायचा. तिथल्या लोकांच्या गरजा जाणून घेऊन, त्यांचा अग्रक्रम ठरवून कार्य करायचे. प्रत्येक कार्यात तिथल्या लोकांचा पूर्ण सहभाग ठेवायचा. व्यवहारांत पूर्ण पारदर्शकता ठेवायची. तसेच तंत्र, मंत्र, दीक्षा व गती या चतु:सूत्रीचा पुरेपूर उपयोग करायचा. त्यामुळे जिथे जिथे गेलो, तिथे यश मिळालं आणि मागे वळून पाहावंच लागलं नाही.


प्रश्न : हे सगळं कार्य ज्यापासून सुरू झालं, ते निसर्गोपचार केंद्र अजूनही 'बायफ'शी संलग्न आहे का?

निसर्गोपचार केंद्र ही 'बायफ'ची मदर ऑर्गनायझेशन म्हणता येईल. इथले ट्रस्टी 'बायफ'चेच आहेत. निसर्गोपचार केंद्राचा कारभारही आता बराच वाढला असून सुमारे दोनशे रुग्ण एकावेळी तिथे राहू शकतात. निसर्गोपचार केंद्रासाठी भरपूर देणग्या मिळत असतात आणि त्याचा फायदा आम्ही गरीब रुग्णांना सूट देऊन देऊ शकतो. तसेच आवश्यकतेनुसार नवीन सोयी करण्यात त्याचा उपयोग होतो.

प्रश्न : 'बायफ' मध्ये गायींच्या बरोबर तुम्ही म्हशींवरही संशोधन केलं का?

हो. भारतातल्या एकूण दुग्धव्यवसायापैकी म्हशींच्या दुधाचा वाटा हा सुमारे ५५%च्या आसपास आहे. तसेच जगातल्या सर्वांत उत्तम प्रतीच्या म्हशींची जात 'मुर्‍हा' ही भारतातच उपलब्ध आहे. त्यामुळे बाकीच्या जातींच्या म्हशींची दुग्धउत्पादन क्षमता वाढवण्यावर संशोधन, तसेच प्रयोगसुध्दा 'बायफ'मध्ये केले जातात. म्हशींच्या रेड्यांचे वीर्य गोठवण्याच्या 'बायफ'च्या संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर पारितोषिकही मिळाले आहे आणि त्याचा उपयोग आता देशभर होत आहे. तसेच 'बायफ'ने 'शेळी विकास उपक्रम' पण सुरू करून यशस्वीपणे राबविला. त्यामुळे अत्यंत गरीब ग्रामीण जनतेला खूपच फायदा झालाय.

प्रश्न : हे कार्य किती राज्यांत चालते? त्यावर तुम्ही देखरेख कशी ठेवता? शेतकरी तुमच्याकडे गायी-म्हशी घेऊन येतो की तुमचा प्रतिनिधी त्यांच्या घरी जातो?

गायी-म्हशींच्या संकरीकरणाचा कार्यक्रम बारा राज्यांत चालतो. त्याची एकूण २२०० केंद्रं आहेत. बारा ते पंधरा गावं एका केंद्रात येतात. त्यात साधारण एक हजार शेतकरी असतात. गायींची आणि म्हशींची संख्या दोन हजारांपर्यंत असावी. इथे एक माणूस ठेवलेला असतो. तो मोटारसायकलीवरून हा कार्यक्रम राबवतो. शेतकर्‍याच्या दाराशी जाऊन तो कृत्रिम गर्भाधान करतो. कारण शेतीचं काम सोडून शेतकरी आपल्याकडे येण्याची अजिबातच शक्यता नसते. कृत्रिम गर्भाधान आणि इतर सेवा त्याच्या दारातच उपलब्ध केल्या, तर अपेक्षित परिणाम मिळेल अशी मणिभाईंची चाळीस वर्षांपूर्वी ठाम कल्पना होती. तीच आज संपूर्ण देशात राबवली जात आहे. तसेच शेतकर्‍यांचं प्रशिक्षण व सफल कार्यक्रमासाठी लागणारे इनपुटस् पण पुरवतो. कार्यक्रम सुरळीत चालू आहे हे पाहण्यासाठी पंधरा-वीस केंद्रांचा एक गट असतो व त्यावर एक अनुभवी अधिकारी देखरेखीसाठी असतो. असे तीन-चार गट मिळून एक झोन निर्माण होतो व तेथेही एक वरिष्ठ अधिकारी असतो. दोन-तीन झोन्स मिळून एक रीजन आणि तीन-चार रीजन्स मिळून एक राज्यस्तरीय कार्यालय असते. राज्यस्तरीय मुख्य हा त्या राज्यात चालणार्‍या सर्व कार्यक्रमांचा प्रमुख असतो. तसेच त्याला मदतीसाठी वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ, प्रशासक गट, आर्थिक बाबी पाहणारे कर्मचारी असतात.

हे सगळं झाल्यावर शेतकर्‍याच्या अपेक्षा आणखी वाढतात. वाया गेलेल्या जमिनीत काही सुधारणा करता येईल का? मग भूजल संरक्षण, वॉटरशेड मॅनेजमेंट, जमिनीची धूप थांबवण्यासाठी कोणते वृक्ष लावायचे, कोणती फळझाडं जास्त उत्पन्न देतात, कोणती पिकं वर्षातून दोनदा काढता येतात, जंगलं वाचवायची कशी, हे विचार पुढे आले आणि त्यांवरही संशोधन सुरू झालं, मार्गदर्शन देता येऊ लागलं. कार्यक्रमाचा विस्तार व व्याप वाढायला लागला.

प्रश्न : नेहमीच्या पिकांपेक्षा, झाडांपेक्षा वेगळी काही झाडं, वनस्पती तुम्ही वाढवता का?

नेहमीच्या झाडांबरोबरच आम्ही इथे औषधी वनस्पती वाढवतो. हिरडा, बेहडा, अडुळसा, आवळा, शतावरी, पिंपळी, बेल, तुळस ह्यांचा निसर्गोपचार केंद्रासाठी उपयोग होतो. तसेच गायींना, वळूंना, म्हशींना लागणारा सकस चारा व त्यासाठी लागणारे उत्कृष्ट बी-बियाणेही आम्ही इथेच वाढवतो. ते बियाणे शेतकर्‍यांना ना-नफा, ना-तोटा दराने पुरवतो.

प्रश्न : गायी तसेच म्हशींच्या दुग्धउत्पादन प्रयोगांव्यतिरिक्त अजून कोणते प्रयोग किंवा प्रकल्प 'बायफ'मध्ये चालू आहेत?

दुग्ध व्यवसायाशी संबंधित सुरुवातीचे प्रयोग यशस्वी, तसेच स्थिर झाल्यानंतर 'बायफ'मध्ये शेतकर्‍यांच्या फायद्याचे इतर अनेक प्रकल्प चालू आहेत. गुजरातमध्ये चालू झालेला 'वाडी उपक्रम' हा आदिवासी विकासाचा एक मोठा उपक्रम आहे. आदिवासी लोकांना त्यांच्या आवडीचं काम द्यायचं. वृक्षलागवड आणि वनसंपत्तीची त्यांना जास्त आवड असते, हे बघून जमीन नसलेल्याला एक एकर जमीन सरकारने 'फक्त वापरा आणि उत्पादन घ्या' ह्या तत्त्वावर दिली. त्यात मध्यभागी आंबा (चाळीस झाडं), बांबू, सुबाभूळ अशी झाडे लावायला सांगितली व त्यासाठी तांत्रिक मदत केली. पहिली पाच वर्षे उत्पन्न मिळणार नाही, हे लक्षात ठेवून त्या काळात त्यांच्या उपजीविकेसाठी अनेकविध कमी कालावधीचे व निश्चित उत्पन्न देणारे आणि त्याच जमिनीत करता येतील असे लहान-लहान उपक्रम प्रकल्पांतर्गत सोय करून राबविले. एकदा आंबे यायला लागल्यावर त्यांपासून व इतर उत्पादक कार्यक्रमांतून एकेका कुटुंबाला वार्षिक उत्पन्न पन्नास ते साठ हजारांपर्यंत मिळू लागलं. शेतकर्‍यांसाठी भाजीपाला, रोपवाटिका असे कमी कालावधीचे कार्यक्रम दिलेत, जेणेकरून जास्तीतजास्त उत्पादन निघून त्या शेतकर्‍यांचा, त्यांच्या कुटुंबांचा खर्च नीट भागवला जाईल. त्यांचं स्वास्थ्य सुधारेल. गुजरातमध्ये वासदा तालुक्यात ह्या प्रकल्पाची सुरुवात श्री. अरविंद मफतलाल यांच्या सहाय्याने झाली. त्याला 'वाडी प्रकल्प' असे नाव दिले गेले. आदिवासी लोकांना आर्थिक मदत देऊन नुसते पोसण्यापेक्षा त्यांना नियमित अर्थार्जनाचे साधन द्यावे. ते जंगलसंपत्तीतील लाख, डिंक, फळं, लाकूड, मोह इत्यादी विकून त्यावर कशीबशी गुजराण करतात. उरलेला वेळ दारू पिऊन आळसात घालवतात. त्यापेक्षा त्यांना कामाला लावावे. वाडीची संकल्पना पुढे आल्यावर, फक्त बेचाळीस कुटुंबंच पुढे आली. त्यात 'दारू प्यायची नाही' ही मुख्य अट असे व आम्ही सांगू तसं त्या एकरात उत्पन्न घ्यायचं असे. एवढं करूनही १९७५-७६ साली बेचाळीसच्या वर एकही कुटुंब पुढे आलं नाही. तेव्हा सगळे निराश होऊन मणिभाईंना सांगू लागले. "अपेक्षित निकाल मिळत नाहीत. कुटुंबं वाढत नाहीत. आता काय करायचे?" ते म्हणाले, "त्यातलं एकही कुटुंब गळलं नाही ना, हे महत्त्वाचं. ग्लास अर्धा रिकामा आहे, त्यापेक्षा ग्लास अर्धा भरलेला आहे, हा विचार करा. आपोआप सगळं साध्य होईल." त्याचा अपेक्षित परिणाम झाला व सरकार-दरबारीदेखील ह्या कार्यक्रमाला मान्यता मिळाली. आज ह्या 'बायफ'च्या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांत जवळजवळ तीन लाख कुटुंबं सहभागी आहेत. ह्याच धर्तीवर देशातील सर्वच आदिवासी भागांत, तसेच प्रचुर भागांत हा कार्यक्रम सरकारद्वारे राबवायला सुरुवात झाली. त्यात 'बायफ'ला 'रिसोर्स मॅनेजमेंट' म्हणून नेमले गेले आहे.

प्रश्न : ह्यासाठी संस्थेने वेगवेगळ्या तज्ज्ञांची नेमणूक केली का?

एकदा अनेक प्रकल्प सुरू झाल्यावर त्या-त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक घेतले. त्यावर संशोधन सुरू झालं. अजूनही 'बायफ'मध्ये काम करणं मानाचं मानलं जातं. त्यावेळी इतर कंपन्यांच्या मानाने इथे पगार कमी होते, पण ज्यांना खरोखरच ह्या कामाची आवड होती तेच टिकले, बाकीचे सोडून गेले. आता 'बायफ'चा पसारा खूप वाढला, आर्थिक स्थैर्य आलं. आता पगार व्यवस्थित व पुरेसे मिळू लागले. लोकही टिकायला लागले.

प्रश्न : अशोकजी, आपण 'बायफ'मध्ये कधी आलात आणि कसे?

मी मूळचा पुसद तालुक्यातल्या 'ढाणकी' ह्या गावचा. १९८० साली शिक्षण संपवून मी नोकरीसाठी बाहेर पडलो. समाजसेवा काय असते, ते फक्त ऐकून माहीत होतं. 'उदरनिर्वाहाचं उत्तम साधन मिळवायचं' हे मुख्य होतं. माझा थेसिसही जेनेटिक्सवर आधारलेला होता. मणिभाईंना त्यावेळी संशोधनासाठी अशा मुलाची जरूर होतीच. माझी शहरात, खेड्यात कुठेही काम करण्याची तयारी होती. त्यामुळे मी 'बायफ'मध्ये लागलो. १९८० ते १९९६ पर्यंत मी उरुळीला जेनेटिक्स विभाग, प्रशिक्षण विभाग यांचं काम पाहिलं. वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळल्या. संस्थेतर्फे प्रशिक्षणासाठी व इतर कामांसाठी पाच-सहा वेळा परदेशी जाऊन आलो. मी डॉ. मणिभाईंचा एक आवडता कर्मचारी होतो. ते उरुळीला आले, की मला बोलावून घेत. त्या काळात त्यांच्यासारख्या द्रष्ट्याकडून खूप शिकायला मिळालं. मला वाटते तसा त्यांचा प्रयत्नच होता तो आमच्या सर्वांच्या बाबतीत. १९९३ साली दिवाळीच्या पाडव्याला पहाटे डॉ. मणिभाईंचा देहांत झाला. आभाळाची कुर्‍हाड कोसळली. पर्वताएवढं दु:ख झेलून 'बायफ' पुन्हा सावरलं. दुसरा पर्यायच नव्हता. डॉ. हेगड्यांनी धुरा सांभाळली. सर्वांच्या सहमतीने पुन्हा प्रवास सुरू झाला ग्रामीण भारताच्या गरीब जनतेच्या विकासाचा. एक मात्र झालं. डॉ. मणिभाईंनंतर 'सर्वसमावेशक सामूहिक नेतृत्व' ही संकल्पना 'बायफ'मध्ये उदयाला आली, रुजली आणि जोमात वाढलीदेखील. आज ह्याच तत्त्वाच्या जोरावर 'बायफ'ची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. पंधरा वर्षे यशस्वी कारकीर्द पार पाडल्यावर डॉ. हेगड्यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी श्री. सोहोनींकडे नुकतीच सोपवली. डॉ. मणिभाईंच्या आकस्मिक निधनाच्या वेळी आणीबाणी म्हणून व संस्था फारश्या चांगल्या स्थितीत नसताना डॉ. हेगड्यांनी संस्थेची सूत्रं सांभाळली होती. तीच सत्ता यशाच्या शिखरावर असताना तरूण रक्ताच्या हाती सोपवली. सत्ता-हस्तांतरणाचे आजच्या भौतिक सुखाच्या मागे पळणार्‍या जगात असे नि:स्वार्थ उदाहरण सापडणे कठीण.

१९९६ साली मध्य प्रदेशातील कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. तिथे मी २००४ पर्यंत होतो. तिथल्या कामाची घडी नीट बसल्यानंतर पुन्हा उरुळीला व्हाईस प्रेसिडेंट म्हणून हजर झालो. एक तत्त्व सगळ्यांनी पाळलं, आत्मसात केलं की 'बायफ' हे एक कुटुंब आहे. त्यातला प्रत्येक सदस्य हा एकमेकांशी कामाने, प्रेमाने बांधला गेलेला आहे. एकमेकांना सहकार्य करायचं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं.

प्रश्न : हे सगळे प्रकल्प चालू आहेतच. पण याशिवाय आणखी नवीन प्रकल्प कुठले आहेत?

2_0.jpgआमच्या संस्थेचे कार्य हे 'बॉटम अप' पद्धतीने चालते. त्यामुळे त्या-त्या भागातील अडचणी पाहूनच आम्ही कार्यक्रम सुरू करतो. ह्यामुळेच शेतकरीसुद्धा त्यांत झोकून देतात. आज बारा राज्यांत पंचेचाळीस हजार गावांत आम्ही काम करतो, तीस लाख कुटुंबं 'बायफ'बरोबर काम करतात. त्यात गायी, म्हशींची संख्या पन्नास ते साठ लाखांच्या आसपास आहे. आज गरीबातलं गरीब कुटुंबही दारिद्र्यरेषेच्या वर आले आहे. ह्या प्रकल्पांकडे आम्ही साधन म्हणून बघतो, संस्थेच्या फायद्याच्या दृष्टीने पाहत नाही. त्यामुळे कुठलेही प्रोजेक्ट कोलमडत नाही. हात हालवत परत येण्याची वेळ येत नाही. आज जवळजवळ तीन हजार लोकांची आमची फौज आहे आणि तेच 'बायफ'चा कणा आहेत. इथे संशोधक, अभियंते, व्यवस्थापक, पशुतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ, डॉक्टर, अर्थतज्ज्ञ असे विशेष प्राविण्य असलेले चारशे लोक आहेत. प्रशिक्षणासाठी वेगळे, त्यात प्राविण्य असलेले लोक आहेत. प्रत्येक युनिट हे स्वयंसिद्ध हवे, आपली पोळी आपण मिळवायची हे तत्त्व आहे. नवनवीन प्रकल्पांबद्दल सांगायच झालं, तर आधी सांगितल्याप्रमाणे लोकांच्या आणि मुख्यत्वे गरिबांत गरीब लोकांच्या गरजा जाणून शेती व शेती-आधारित कार्यक्रमांची आखणी हे 'बायफ'चं तत्त्व आहे. त्यात काळानुसार, शासनाच्या धोरणांनुसार आवश्यक ते बदल करून योग्य ते प्रकल्प 'बायफ' भविष्यातदेखील राबवेल.

'बायफ' ही संस्था बारा राज्यांत काम करते आणि त्यांतल्या काही राज्यस्तरीय संस्थांची नावे अशी आहेत :
१. महाराष्ट्र : MITRA : Maharashtra Institute of Technology Transfer in Rural Areas
२. मध्य प्रदेश : SPESD : Society of Promotion of Eco-friendly Sustainable Development
३. उत्तर प्रदेश : BIRD-UP : BAIF Institute For Rural Development - UP
४. कर्नाटक : BIRD-K BAIF Institute For Rural Development, Karnataka
५, गुजरात : GRISERV – Gujrat Rural Institute for Social Economic Reconstruction, Vadodara
६. राजस्थान : RRIDMA Rajasthan Rural Institute For Development Management
७. आंध्र प्रदेश : BIRD – AP: BAIF Institute For Rural Development - AP
८. बिहार : BIRD – BAIF Institute For Rural Development - Bihar
९. झारखंड : BIRVA : BAIF Institute for Rural Vocations and Development

प्रत्येक राज्यातल्या संस्था ह्या तिथल्या सोसायटी रजिस्ट्रेशन कायद्याखाली काम करतात. प्रत्येक राज्याच्या संस्थेत व्यवस्थापनासाठी 'बायफ'चे निवडक लोक असतात, तसेच त्या सोसायटीचे व्यवस्थापक मंडळ असतेच. तिथे काम करणारे कर्मचारी हे 'बायफ'चे कर्मचारी नसून त्या-त्या संस्थेच्या वेतनश्रेणीवर असतात. मध्यंतरी म्हणजे १९८८ साली 'बायफ'चे नवीन नामकरण केले ते म्हणजे "बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन".

प्रश्न : 'बायफ'ची कुठेच जाहिरात, प्रसिद्धी का केली जात नाही?

'बायफ'ला जाहिरात करण्याची, प्रसिद्धी मिळवण्याची गरजच नाही. आमचं कामच स्वतः बोलतं. इतरांसारखे काम थोडं आणि जाहिराती, प्रसिद्धिपत्रके जास्त असे करण्याकडे आमचा कल अजिबातच नसतो. मणिभाईंची शिकवणही तशीच होती. परंतु इतकं चांगलं काम करूनही ते अनेकांपर्यंत पोचत नाही आणि ते पोचवण्याची गरज आणि महत्त्व जाणून गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक व सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. संस्थेला चाळीस वर्षं पूर्ण झाली, त्यावेळी गेल्या चाळीस वर्षांचा मागोवा आम्ही एका पत्रिकेद्वारे घेतला होता. साधारण १९९४-९५ पासून काही डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवल्या. इतरही अनेक प्रकाशनं, प्रशिक्षण साहित्य तयार केले आहे.

प्रश्न : हे सगळ काम करत असताना, प्रकल्प राबवत असताना 'बायफ' कुठली तत्त्वे, उद्दिष्टे समोर ठेवते?

'बायफ'च्या सर्व कामांना तत्त्वांची मजबूत बैठक आहे आणि ही सगळी तत्त्वे प्रकल्प पार पाडत असताना पाळलीच जातात. सगळ्यांत महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे आमचे सगळे प्रयोग, संशोधन, प्रकल्प हे समाजाची गरज लक्षात घेऊन राबवले जातात. कोणाचेही कुठलेही हितसंबंध ह्या गोष्टींशी जोडलेले नसतात. तसंच एखादा विकास कार्यक्रम ठरवणे, राबवणे, त्याचे मूल्याकंन करणे, या सर्वांत समाजाचा पूर्ण तसेच सक्रिय सहभाग असतो. दुसरं म्हणजे भ्रष्टाचारापासून दूर राहणे. कोणत्याही प्रकारच्या 'देवघेवीचे' व्यवहार 'बायफ'कडून केले जात नाहीत. 'बायफ'तर्फे राबवल्या जाणार्‍या प्रत्येक प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाईल ह्याकडे कटाक्षाने लक्ष पुरवले जाते. ह्यामुळे कमीत कमी वेळात. तसेच श्रमांत जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो.

'बायफ'चं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे महिलांचा उपक्रमांमधला सक्रिय सहभाग. महिला ही एक अत्यंत जागृत शक्ती आहे. तिला जोपर्यंत तुम्ही कार्यक्रमात सहभागी करून घेत नाही, तोपर्यंत तो कार्यक्रम घराघरांत, संपूर्ण कुटुंबापर्यंत पोचूच शकत नाही. प्रत्येक कार्यात स्रीचा सहभाग हा साठ ते सत्तर टक्के असतो. तिची कुटुंबाशी जास्त घनिष्टता असते. ती जास्त प्रामाणिक, जिद्दीने काम करणारी आणि सहनशील असते. कुटुंबाचा समग्र विचार करणारी असते. त्यामुळे आमचा प्रकल्प हा कुटुंबातल्या स्त्रियांपर्यंत पोचला पाहिजे, त्यांना तो पटला पाहिजे आणि त्यांचा ह्यात सक्रिय सहभाग असला पाहिजे ह्याकडे आमचं लक्ष असतं.

प्रत्येक कार्यक्रमासाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा हा नेहमी चांगल्या दर्जाचा असायला हवा, तसेच त्याबरोबर त्या प्रकल्पातून मिळणार्‍या उत्पादनाच्या विक्रीची व्यवस्थाही योग्य पद्धतीने व्हायला हवी ह्याकडे आम्ही लक्ष देतो.

'बायफ'तर्फे चालवले जाणारे सगळे कार्यक्रम हे निरंतर चालणारे (सस्टेनेबल) असतात, त्याचबरोबर ते पर्यावरणाला पूरक असतात. कुठल्याही कार्यक्रमामधून पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही ह्याची काळजी घेतली जाते. तसेच एखाद्या ठिकाणी विकास कार्यक्रम राबवताना त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातो, ज्यामुळे त्या कार्यक्रमातून मिळणार्‍या लाभाचे प्रमाण वाढते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच लोकांच्या संस्था बनवून त्या सक्षम केल्या जातात, जेणेकरून प्रकल्पाची यशस्वी सुरुवात झाल्यावर तो कार्यक्रम त्या-त्या संस्थांद्वारे यशस्वीपणे पुढे चालू ठेवला जातो. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विकास कार्यक्रमांद्वारे येणार्‍या आर्थिक सुबत्तेचा व्यवस्थित वापर संबंधित कुटुंबांचे राहणीमान सुधारण्यासाठी झाला पाहिजे, तसेच प्रकल्प राबवत असताना आपली संस्कृती व जीवनमूल्ये जोपासली गेली पाहिजेत ह्याकडेही 'बायफ' नेहमी लक्ष देते.

मणिभाईंच्या काळापासून ही दशसूत्री 'बायफ'च्या कार्यक्रमांत नेहमी वापरली जाते. त्यामुळेच आमचे प्रकल्प कधीही अपयशी ठरलेले नाहीत. 'बायफ'च्या भरीव कामगिरीबद्दल डॉ. मणिभाईंना आणि संस्थेला अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यात प्रामुख्याने पद्मश्री व रेमन मॅगसेसे पारितोषिकाचा उल्लेख करावासा वाटतो.

प्रश्न : 'बायफ'तर्फे जे विकासाचे कार्यक्रम चालवले जातात, त्याबदल्यात शेतकर्‍यांकडून किंवा सहभागी लोकांकडून काही मोबदला घेतला जातो का?

शेतकर्‍यांकडून मोबदला घ्यायचा म्हणून पैसे घ्यायचे हा उद्देश नसतो. पण सगळं फुकट मिळालं, की त्याची किंमत राहत नाही, म्हणून प्रकल्पात सहभागी होण्याचे थोडे शुल्क आम्ही घेतो. त्यामुळे कार्यक्रम आपल्या 'मालकीचा' आहे, ही जाणीव त्यांच्यात निर्माण होते. अगदी गरीब शेतकर्‍यांसाठी किंवा कुटुंबांसाठीच्या शुल्काची व्यवस्था प्रकल्पाअंतर्गत केलेली असते.

प्रश्न : आपल्या इतक्या वर्षांच्या सेवेतले आठवणीत राहिलेले प्रसंग सांगू शकाल?

खरं म्हणजे, तसे सगळेच प्रसंग कायम लक्षात असतात. कारण त्यात आपण आपले श्रम आणि वेळ दिलेला असतो, मनापासून काम केलेलं असतं. पण वानगीदाखल सांगायचं तर... एकदा वाडी प्रकल्पाला आम्ही भेट द्यायला गेलो होतो. एक मध्यमवर्गीय स्त्री आणि तिचा मुलगा आम्हांला भेटले. ती स्त्री आम्हांला कळायच्या आत आमच्या पाया पडली. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. ती म्हणाली, "दादा, आमच्यासाठी तुम्ही देवच आहात. दारिद्र्याने पिचून मी माझ्या मुलाला आणि मुलीला घेऊन आत्महत्या करायला निघाले होते. पण हिंमत झाली नाही. तेवढ्यात वाडी प्रकल्पासंबंधी कळलं. मला एक एकराचा तुकडा मिळाला, मार्गदर्शन मिळालं आणि आज मला त्यातून भरपूर उत्पन्न मिळतंय. आम्ही कष्ट करतो. खाऊन पिऊन सुखी आहोत. हे सगळं फक्त तुमच्यामुळे घडलं." तिचा चेहरा मला आजही आठवतो. आमची 'बायफ'ची टीम जे कार्य करते, त्याचं हे बोलकं उदाहरण आहे आणि केलेल्या मेहनतीचं चीज झाल्याचं समाधानपण.

दुसरा प्रसंग सांगायचा झाला, तर त्यावेळी भोपाळला असताना मध्य प्रदेशातील धार, राजगड, विदिशा, गुना, छाबुआ असे पाच जिल्हे त्या वेळी कार्यक्रमात होते. एकदा विदिशाच्या कलेक्टरांनी भेटायला बोलावले, पण त्यात काहीतरी गडबड आहे, हे मला सारखं जाणवत होतं. त्या मीटिंगच्या आदल्या रात्रीही मी त्याबद्दलच विचार करत होतो. दुसर्‍या दिवशी कामाचं बोलणं झाल्यावर कलेक्टरसाहेब म्हणाले की आम्ही तुम्हाला दरवर्षी दीड कोटी रुपये देतो, त्याबदल्यात मला काय मिळेल? मी स्पष्ट सांगितले, "आमच्या संस्थेत पैशाची देवघेव अजिबात होत नाही. प्रकल्पाचं काम करण्याबद्दल काही सूचना असतील, तर त्या जरूर करा. आम्ही त्याची अंमलबजावणी करू." वास्तविक त्यावेळी आम्हाला विदिशा जिल्ह्याकडून सुमारे सत्तर लाख रुपये येणं होतं. पण मी चुकीचं वागलो, असं मला अजिबात वाटलं नाही. मी भोपाळच्या कमिशनरांकडे जाऊन हा प्रसंग सांगितला. दुसर्‍या दिवशी आमचा चेक तयार असल्याचा फोन आला. त्यांनी स्वत: ह्यात लक्ष घातलं होतं. मला त्यावेळी भ्रष्टाचाराला हातभार न लावल्याचा अगदी मनापासून आनंद झाला.

प्रश्न : अशोकजी, आपण जीव झोकून काम करता, त्यात आपल्या पत्नीचा सौ. सविताताईंचा, तसेच मुलांचा सहभाग किती?

खरं सांगायचं, तर घराची आजपर्यंतची सर्व जबाबदारी सविताने आनंदाने पार पाडली, पाडते आहे. मुलांचं शिक्षण, शाळा-कॉलेज, आजारपणं हे सगळं तीच बघत असे. त्यामुळे मी एकमार्गी काम करू शकलो. मध्य प्रदेशात भोपाळला असताना महिन्यातले वीस-बावीस दिवस मी बाहेरगावी असे, पण तिने कधी तक्रार केली नाही, कधी अवास्तव हट्ट केले नाहीत. तिला नोकरी, करियर काहीच करता आलं नाही ह्याची आम्हाला दोघांनाही खंत वाटते. पण आज माझी दोन्ही मुलं सुविद्य, सुसंस्कारित आहेत हे तिच्याच मेहनतीचं फळ आहे.

---------------------------------

अशोकजींना नुकतेच M.I.T. College of Management च्या Post Graduate program in agro and food business management च्या मंडळावर मानद सभासद म्हणून घेतलं आहे. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि अशोकजींसारखे निरलस कार्य करणारे, झोकून देणारे, उत्तम व्यवस्थापक 'बायफ'ला नेहमीच मिळोत, समाजसुधारणेला त्याचा खरा खरा फायदा होवो, यासाठी 'बायफ'च्या सर्व कुटुंबियांना शुभेच्छा.