निर्मिती

नव्या मातीत आपलेपणा वाटावा म्हणून
देशातली तुळशीची मंजिरी पेरली
आणि ती उगवूनही आली ,
पण या नव्या मातीत ती उगवली, वाढली-
ती नव्या ढंगांनी, नव्या रंगांनी..
इथल्या बेसिलला पाहून
तिनंही थोडं ‘बेसिलपण’ घेतलं
बीज तेच...पेरणारी मी तीच,
मग फक्त मातीने सारं रूप पालटावं-
उगवण्याआधीच ही भीती मला वाटली होती
आपल्याला हवी तशी नाही आली ही तर...
तिला तुळस म्हणतील का बघणारे..
उगवल्यावर थोडं आश्चर्य वाटलं,
आपण बीज तेच पेरलं तर
वेगळं का उगवावं?
थोडा रागही आला, हिला या मातीत
रूजवणारे आपण, आणि ही अशी स्वत:साठीच वाढतेय?
मग विचार आला की
निर्मितीच्या प्रक्रियेतली सर्जकताच मी नाकारते आहे...

- abhaya