फुरुसातो

'आकेमाशिते ओमेदेतो गोझाईमास' या शुभेच्छांची देवाण घेवाण करत जपानमध्ये नवीन वर्षाचं जोरदार स्वागत होतं.
हा सगळ्यांत मोठा मानला जाणारा सण. १ ते ३ जानेवारी या काळात ऑफिसं, शाळांना सुट्टी असते. नवीन वर्षाची चाहूल लागायला खरी सुरुवात होते ती नोव्हेंबर, डिसेंबरपासूनच. सुपरमार्केटमध्ये सर्वत्र 'ओ सेची र्‍योरी'च्या जाहिराती टांगलेल्या दिसायला लागतात. सुंदर रंगसंगतीचा मे़ळ घालून उत्तम रीतीने सजवलेले हे खाद्यपदार्थ दोन, तीन थर असलेल्या लॅकर बॉक्समधून विकायला ठेवलेले असतात. हे पदार्थ सर्वसाधारणपणे आरोग्य, वंशसंवर्धन, दीर्घायुष्य, सुबत्ता यांचं प्रतीक आहेत. "

जानेवारीत साजरा होणारा आणखीन एक सण म्हणजे 'सेईजीन नो ही' किंवा 'कमिंग ऑफ द एज डे'. हा सण वयाची वीस वर्षं पूर्ण करणार्‍या तरुण मुलीच साजरा करतात. या दिवशी आकर्षक रंगसंगती असलेले महागडे किमोनो घालून, नटूनथटून या मुली देवळात जाऊन आरोग्य आणि यशासाठी प्रार्थना करतात.

भारताप्रमाणे जपानमध्येही वर्षाचं कॅलेंडर अनेक लहानमोठ्या सणांनी भरलेलं आहे.
फेब्रुवारी उजाडतो आणि जपानी मंडळी तयार होतात ती 'सेत्सुबुन'करता. आपल्याकडे दृष्ट काढताना जसं 'इडा टळो पिडा टळो' म्हणायची पद्धत आहे त्यातलाच हा जपानी प्रकार. फक्त साजरा करायची पद्धत वेगळी. घरातील जो कर्ता पुरुष असतो तो भूतंखेतं किंवा वाईट प्रवृत्तींवर बीन्स / धान्य फेकून मारतो आणि मग घरातील बाकीची मंडळी आपल्या वयाएवढेच बीन्स खातात. असं केल्याने घरात शांतता, सुबत्ता येते असं मानलं जातं.

जपानच्या सणांचं, पद्धतींचं मूळ सापडतं ते चीनमध्ये. दरवर्षी ३ मार्चला साजरा होणारा 'हिना मात्सुरी'- 'डॉल फेस्टिवल' हाही त्यातलाच एक सण.

पूर्वी चीनमध्ये बाहुली बनवून आपल्यातल्या वाईट वृत्ती त्यात भरुन ती बाहुली पाण्यात सोडून द्यायची प्रथा होती. त्याच अनुषंगाने 'हिना मात्सुरी' जपानमध्ये साजरा होऊ लागला. ज्या घरांमध्ये मुली आहेत अशाच कुटुंबात पाच किंवा सात पायर्‍यांचं हिनादान बसवून त्यावर राजकुमार, राजकन्या, त्यांच्या दरबारातील सेवकवर्ग मांडून ठेवले जातात. तसंच काही खाद्यपदार्थही मांडून ठेवले जातात. ही पद्धत साधारणपणे एदो काळापासून (१६०३-१८६७) सुरु झाली. या बाहुल्या एका पिढीपासून दुसर्‍या पिढीकडे देण्याची पद्धत आहे.

मार्चअखेर तोSक्योतली थंडी हळूहळू कमी व्हायला लागते आणि चाहूल लागते ती वसंत ऋतूची. सगळेजण आतुरतेने वाट बघायला लागतात 'साकुरा'ची. साकुरा म्हणजेच चेरी ब्लॉसम. जपानी लोकांना खाणं आणि सोबत साके पिणं अतिप्रिय. एकदा का साकुरा फुलला की सगळ्या बागांमधून ही गर्दी उसळते. जपानी कार्यालयांच्या बियर / साके पार्ट्या या साकुराने लगडलेल्या झाडाखाली होतात. बरोबरीला ओ बेंतो , हास्यविनोदही असतातच. याचंच दुसरं गोंडस नाव 'हानामी' असंही आहे. टोक्योतले 'उएनो' पार्क, शिंजुकुचं 'ग्योएन' पार्क आणि कुदानशितामधील भारतीय दूतावासाच्या शेजारचं 'चिदोरिगाफुची' या हानामीकरता प्रसिद्ध जागा. याच काळात भारतीय दूतावासात 'साकुरा बझार' ही आयोजित केलेला असतो. विविध भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद भारतीय मंडळींबरोबरच जपानी मंडळीही घेताना दिसतात.

एप्रिलअखेर जपानमध्ये 'गोल्डन वीक'ची चार दिवस सुट्टी सर्वांना मिळते. याच चार दिवसातल्या सुट्टीचा एक दिवस असतो तो 'कोदोमो नो ही'- मुलांचा दिवस. हा दिवस ज्या घरात मुलं आहेत त्या घरातून साजरा केला जातो. ज्या घरात जितकी मुलं असतील त्यांच्या घराबाहेर तितके माशाच्या आकाराचे पतंग वार्‍यावर फडफडताना दिसतात. घरातल्या मोठ्या मुलाचा पतंग आकाराने सर्वात मोठा.

भारतात जसा पितृपक्ष साजरा केला जातो तसंच जपानमध्येही ऑगस्ट महिन्याच्या मध्यात जपानी कार्यालयांना 'ओ बोन'ची सुट्टी मिळते.जपानी माणसं आपापल्या गावी जाऊन 'ओ बोन' साजरा करतात. आपल्या वंशजांच्या नावाने दिवे लावून ते पाण्यात सोडण्याचीही पद्धत आहे. या प्रथेचं मूळ आहे चीनच्या बौद्ध परंपरेत. जपानमध्ये ही प्रथा साधारण सातव्या शतकात आली. या काळात आपल्या वंशजांचे आत्मे आपल्या घरी वास करतात असा समज आहे. 'बोन ओदोरी' नावाचे लोकनृत्य करुनही हा सण साजरा होतो.

ऑक्टोबरमध्ये हलकी थंडी पडायला सुरुवात होते . फॉल कलर्स बघायला लोकं निक्कोच्या 'आकेचीदायरा'ला हजेरी लावतात. जपानमधल्या इंटरनॅशनल स्कूल्समुळे 'हॅलोवीन'देखील घरोघरी चांगलाच माहिती झाला आहे. मुलं कॉश्चूम्स घालून 'ट्रिक ऑर ट्रीट' करायला जायला विसरत नाहीत.

नोव्हेंबर महिन्यात 'शिची-गो-सान / ७-५-३' साजरा करण्यात येतो. ७-५-३ या वयांची मुलं किमोनो घालून श्राईन्सना भेट देऊन आरोग्य व भराभराटीसाठी प्रार्थना करतात. जपानमध्ये ३ आणि ७ हे आकडे शुभ मानले जातात. त्यामुळे या वयाच्या मुलांची त्यावर्षी चांगलीच चंगळ असते. या मुलांना 'चितोसे आमे' नावाची कँडी वाटण्यात येते.

हॅलोवीनएवढी प्रसिद्धी 'थॅंक्स गिव्हिंग'ला मिळालेली नाही. थँक्स गिव्हिंगची सुट्टी फक्त इंटरनॅशनल स्कूलमधेच मिळते.
डिसेंबर महिन्यात २३ तारखेला जपानच्या राजाचा वाढदिवस असतो आणि त्याची सुट्टी सर्व कार्यालयांतून दिली जाते. या दिवशी राजा अकिहितो आणि राणी मिचिको इंपेरिअल पॅलेसच्या खिडकीतून जमलेल्या जमावाला दर्शन देतात. जसा राजा बदलेल तशी ह्या दिवशी मिळणारी सुट्टीही बदलते. जपानमध्ये ख्रिसमसही मोठ्या प्रमाणावर साजरा होतो पण २५ डिसेंबरला 'नॅशनल हॉलिडे' मात्र नसतो. शाळा मात्र १५ तारखेच्या आसपास बंद होऊन जानेवारीच्या ४ किंवा ५ तारखेला उघडतात. सलग मोठी सुट्टी मिळाल्याने बाहेर फिरायला जाणार्‍या प्रवाशांची झुंबड उडालेली असते.

या लहानमोठ्या सणांमुळे थंडीचे कंटाळवाणे दिवस थोडे सुसह्य होत असतात. नवीन वर्ष अगदी दाराशी येऊन ठेपतं आणि पुन्हा एकदा वेध लागतात ते नवीन वर्षातील संकल्पाचे, इच्छा आकांक्षांचे....

- sayonara