"आभास"

तुझे भास किती आमंत्रणांचे आभास किती
मनातल्या मृगजळाची आग्रही आरास किती

लहरी मोगराही करतो सराईत इशारे
गाण्यांतल्या कहाण्यांची ही मिजास किती

पहाटेचा प्राजक्त अन तुझे लाघवी सुगंध
स्वप्नांनीही पहावी स्वप्ने असे मधुमास किती

सुगंध वेचण्याचे हिशेब केवढे जीवघेणे
पहाटेच्या प्राक्तनात रात्रीचे वनवास किती

लळा लावतो चंद्र पण हेळसांड तारकांची
नभाच्याही नशिबी ग्रहणे खग्रास किती

मिठीतल्या मंथनांची श्वासांनी केलीच चर्चा
विघ्ने सगुणा-निर्गुणाची या आत्म्यास किती

उत्सव तुझे न माझे ते खेळ अद्भुतांचे
बिचार्‍या आयुष्यास अप्रुपाचे अदमास किती

- Girish Kulkarni