करोगे याद तो..

(१७ ऑक्टोबर १९५५ हा स्मिताचा जन्मदिवस. ती आज असती तर ५४ वर्षांची असती. ती आज असती तर...?
स्मिताच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तिला आठवताना.. )

smita_film_strip_1.JPG

स्मिताचं 'स्मितापण' मला जाणवलं तो क्षण मला अचूक आठवतो. रविवारच्या एका दुपारी मी टीव्हीवर 'शक्ती' बघत होते. स्मिता स्क्रीनवर 'हम ने सनम को खत लिखा..' गाणं तिच्या कमर्शियल फिल्म्समध्ये हमखास जाणवणार्‍या, आत्तापर्यंत तिची ट्रेडमार्क शैली झालेल्या ऑकवर्ड पद्धतीत गात होती. तिचे हातवारे, तिचा मेकप.. मी वैतागत चॅनल बदलला. तोपर्यंत मी स्मिताचे 'नमकहलाल', 'आखिर क्यों' आणि असेच कोणते तरी राज बब्बर बरोबरचे एक-दोन सिनेमे पाहिले होते. 'अर्थ'सुद्धा पाहिला होता पण माझ्या मनावर ठसा उमटलेला होता तो त्यातल्या शबानाचाच.

आणि आजूबाजूचे सगळे स्मिता पाटील असं नाव जरी उच्चारलं, तरी एकदम मेस्मराईझ झाल्यासारखे बोलायला लागायचे. स्मिता म्हणजे ग्रेटच असा एकंदर त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ निघायचा. स्मिताच्या दिसण्याबद्दल मलाही कधीच प्रश्न नव्हता. तिचा कोणताही - विशेषत: ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट - फोटोग्राफ नजर खिळवून ठेवायचा. तिचे अ‍ॅरेस्टिंग फिचर्स वादातीत होते. पण म्हणूनच अमिताभ आणि राजेश खन्नाच्या तिच्या तोपर्यंत मी पाहिलेल्या त्या सगळ्या दुर्दैवी सिनेमांमधल्या तिच्या दिसण्यातून माझा अपेक्षाभंग होत होता. बाकी सगळ्यांना दिसलेली स्मिता मला तोपर्यंत कधी दिसलेलीच नव्हती.

चॅनल्स सर्फ करत असताना डीडी नॅशनलवर सुरू असलेला एका साध्या काळ्या पांढर्‍या सिनेमातल्या दृष्यावर नजर स्थिरावली. तिथेही परत स्मिताच होती. गरीब मुस्लिम मुलीच्या वेषात, चेहर्‍यावर कणभरही मेकप नाही. ती उठते आणि एक जुनाट लाकडी दरवाजा उघडून बाहेरच्या मिट्ट अंधारात डोळे रुतवून कुणाचीतरी काही क्षण वाट पहाते आणि मग परत दरवाजा बंद करून रिकाम्या डोळ्यांनी आपली कामं करत राहते... पार्श्वभूमीवर छाया गांगुलीचा घनगर्द व्याकुळ आवाज "आपकी.. याद.. आती रही रातभर.. चश्मेनम मुस्कुराती रही रातभर.."

स्मिता अगदी साध्या, सहज घरात सगळेच करतात तशा हालचाली करत वावरत होती. पण त्या वावरण्यात एक हताश सुन्नपणा. कोणीतरी खूप जवळचं कुठेतरी दूर निघून गेलंय. चुलीत लाकडं सारून ती सगळं आवरून ठेवते, सासूचे पाय चेपून देते, घराचे कडी-कोयंडे लावते. सगळी नेहमीचीच कामं हातांच्या सवयीने उरकली जाताहेतच. पण मन अस्वस्थ आहे... "रातभर दर्द की शम्मा जलती रही.. गम की लौ थरथराती रही रातभर.." थकवा चेहर्‍यावर स्पष्ट उमटलेला. बिछान्यावर ती पाठ टेकते, पण झोपायचा धीर तिला होत नाही. डोळे मिटले तर त्या आपल्याला इथे एकटं सोडून दूर निघून गेलेल्याची याद जास्त तीव्र होत राहणार चढत्या रात्रीसोबत, हे तिला माहीत आहे. मग ती हात वर करून फळीवरचं त्याचं पत्र काढते. त्याच्या हातांनी तिच्यासाठी लिहिलेल्या शब्दांवरून तिचे डोळे फिरत राहतात. ते काही वाचत नसतात. पण.." बांसुरी की सुरीली सुहानी सदा.. याद बन बन के आती रही रातभर.." न राहवून ती त्या तशा मध्यरात्रीही परत एकदा तो जुनाट, लाकडी दरवाजा उघडून बाहेरच्या अंधाराचा वेध घेते.

तो काय करत असेल? आत्ताही तो जागाच असणार, मागे ठेवून आलेल्यांना जरा तरी चार सुखाचे दिवस दाखवावेत म्हणून दिवस रात्र कष्ट करत तो वणवणतच असणार, हे तिला माहितेय. आणि तसं भटकताना त्याच्या मनातही.. " याद के चाँद दिल में उतरते रहें.. चाँदनी जगमगाती रही रातभर.." हेच असणार याची तिला खात्री आहे." शहरातल्या कृत्रिम दिव्यांच्या उजेडात टॅक्सी फिरवत असणारा तो तिला नजरेसमोर स्पष्ट दिसतो.. ती परत परत उदास स्वरांत म्हणत रहाते.. आपकी याद आती रही रातभर..

पहाटे उजाडायच्याही आधी परत उठून ती तिची आन्हिकं सराईत, यांत्रिक पणे आवरत रहाते.. हालचालींमध्ये तोच सुन्न हताशपणा. एक त्याची याद सोडली तर उरलेली नजर नुसतीच रिकामी.

मुझफ्फर अलींचा 'गमन' त्यादिवशी संपला तेव्हा मी पडद्यावरच्या स्मिताला पाहून मेस्मराईझ झाले होते. तिच्या एक्स्प्रेशन्सनी, तिच्या व्यक्तिरेखेसम दिसण्यानी केवळ चकित झाले होते. स्मितामय झाले होते. त्यानंतर मग मी मिळेल तिथे, वाट्टेल त्या वेळी लागोपाठ स्मिताचे सिनेमे पहात सुटले. व्हिडिओ लायब्रर्‍या पालथ्या घातल्या. भवनीभवई, बाझार, मंडी पासून चक्र, भूमिका, उंबरठा, मग परत एकदा स्मितासाठी 'अर्थ', मध्येच टीव्हीवर 'जैत रे जैत'. आकाशवाणीमध्ये 'मिर्च मसाला' दाखवणार समजलं तेव्हां संध्याकाळी उशिरा धो धो पावसात, ट्रेन्स बंद होण्याची शक्यता डोळ्यांपुढे दिसत असूनही उलटा प्रवास करून जात केवळ मोठ्या स्क्रीनवर स्मिताला बघायचंच या वेडातून धडपडत गेले. 'अर्धसत्य' बघितला तेव्हा दारूच्या नशेतल्या वेलणकरला 'नोकरी सोडून दे तू ही..' असं कळवळून सांगत असलेल्या हळव्या स्मिताला पहाताना मी ओम पुरीची ती थक्क करून टाकणारी एक्स्प्रेशन्सही काही क्षण नजरेआड केली.

आत्तापर्यंत असा एकाच्या मागे ध्यास घेऊन लागत, त्याला अंगात ताप चढेपर्यंत पूर्ण भिनवून घेण्याचा अनुभव याआधी फक्त लागोपाठ जीएंची पुस्तकं वाचताना आला होता. चित्रपट बघताना सोबत कुणीही असलं, कितीहीजण असले.. तरी माझ्यासाठी स्मिताचे हे चित्रपट बघणे, चित्रपटातल्या स्मिताला बघणे हा एक संपूर्णपणे वैयक्तिक, खाजगी अनुभव झाला.

स्मिताची अफाट अभिनय क्षमता, तिचा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स, तिचे कमालीचे बोलके डोळे.. स्मितावर काढलेल्या एका डॉक्युमेन्टरीमध्ये शबानाला नंतर कधीतरी त्या डोळ्यांसंदर्भात बोलताना ऐकलं.. " आँख उठाकर देखती थी किसी शॉट में तो पर्दे को आग लगा देती थी वो!" हे सगळं त्या वर्ष-दोन वर्षांच्या काळात माझ्याकडून करून झालं आणि नंतर जीएंना जसं जीव खाऊन वाचून झाल्यावर एका विचित्र डिप्रेशनमध्ये मी पुस्तकांच्या रॅकच्या अगदी वरच्या फळीवर बरीच वर्ष ठेवून दिलं होतं, तसंच स्मिताच्याही बाबतीत केलं.

टीव्हीवर कधी तिच्या फिल्म्स लागत, मी पहात असे. बेनेगलच्या पूर्ण डिव्हिडीजचा सेट घेतला तेव्हा साहजिकच त्यात अनेक स्मिताच्या एक्स्क्लूजिव फिल्म्स होत्याच. बेनेगलच कशाला निहलानी, मृणाल सेन या कोणत्याही सत्तरच्या पूर्वार्धातल्या आणि ऐंशीच्या उत्तरार्धापर्यंतच्या 'बेटर सिनेमा' चळवळीच्या शिलेदारांनी काढलेल्या कोणत्याही उत्कृष्ट सिनेमात स्मिताची भूमिका असणारच होती. तेव्हा नंतरच्या काळात कधी मुद्दाम उठून पाहिले नाहीत तरी स्मिता नजरेआड होणार नव्हतीच.

पण स्मिता आता होऊन गेलीय, कितीही आवडली तरी परत नव्याने पडद्यावर तर काही वेगळं घेऊन येणारच नाहीये.. असं एक डीटॅच्ड फिलिंग स्मिताच्या संदर्भात त्या सर्व कालावधीत मनात होतं.

आणि एक दिवस अचानक प्रतिकची मुलाखत वाचली, त्याचे फोटो पाहिले, मग त्याचा सिनेमा पाहिला. स्मिताला मी अगदी दूरान्वयेही कोणत्याच वैयक्तिक संदर्भात ओळखत नव्हते. पण तरी प्रतिकला पडद्यावर पाहिलं आणि मला स्मिताची, एखाद्या जवळच्या व्यक्तिची यावी तशी चरचरून आठवण आली. त्याचे डोळे, त्याच्या त्या एरवीच्या काहीशा ऑकवर्ड हालचाली, आणि अभिनय करतानाचा तो कमालीचा सहजपणा.
स्मिता मला पुन्हा भेटत होती.

त्यानंतरच्या वीकेन्डला मी न राहवून फक्त स्मितासाठी पुन्हा एकदा 'भूमिका' पाहिला. त्यातली ती सच्ची, साधी, निष्कपट, नात्यांचे-पुरुषी स्वभावांचे चमत्कारिक गुंते न उलगडू शकलेली, पण तरीही स्वतःवरचा विश्वास कसोटीच्या क्षणी न ढळू देता, आयुष्याचा तोल सांभाळू पाहणारी त्यातली उषा साकारताना स्मिताने उत्कट संयमितपणे अभिनयाचा जो दीर्घ पट साकारला, तो पाहून परत एकदा चकित झाले आणि त्यापेक्षाही जास्त आनंदित झाले, कारण मला स्मिता नव्याने, नव्या ओळखीत भेटत होती. माझी उमज मधल्या काळात थोडीफार जी वाढली होती, माझ्यात उलटलेल्या वर्षांमधून जी काही मॅच्युरिटी आली होती, त्या सर्वांतून मला स्मिता नव्याने समजत होती.

हल्लीच मी स्मितावरचं एक पुस्तक वाचलं. 'स्मिता, स्मितं आणि मी' स्मिताला वैयक्तिक आयुष्यात अगदी जवळून ओळखत असणार्‍या तिच्या एका पत्रकार मैत्रिणीने - ललिता ताम्हाणेने - लिहिलेले ते पुस्तक होते. त्यात स्मिताच्या खाजगी आयुष्यातले अनेक क्षण, तिचे तिच्या माँबरोबरचे संबंध, स्मिताचं पडद्यामागचं आयुष्य, तिच्यावरच्या कविता, स्मिताला आवडणार्‍या गोष्टी, तिचा मनस्वी, हट्टी, अभिमानी आणि उत्कट, झोकून देण्याचा स्वभाव, तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, तिच्या स्वभावातला खरेपणा, तिची कलंदर कलावंत वृत्ती.. हे सगळं सगळं त्या पुस्तकाच्या पानापानात होतं. स्मिताची माझी कधी खाजगी आयुष्यात ओळख असण्याची शक्यताच नव्हती, ती या जगात नसल्यालाच वीस वर्षांहून जास्त काळ लोटलेला होता. आणि तरीही स्मितावरचं ललिताने लिहिलेलं ते पुस्तक वाचताना मला प्रत्येक क्षणी जाणवत होतं की ह्या पडद्यामागच्या स्मिताला सुद्धा मी तितकीच ओळखते आहे जितकी पडद्यावरच्या स्मिताला ओळखते. पडद्यावरची आणि पडद्यामागची स्मिता या दोन भिन्न व्यक्ती नव्हत्याच मुळी. स्मिता जशी होती तशीच तिच्या प्रत्येक व्यक्तिरेखेमधून उमटली. प्रत्येक भूमिकेमधून डोकावली.

स्मिताचे 'उंबरठा'मधल्या सुलभा महाजन आणि 'भूमिका'मधल्या उषामधून दिसणारे सुबुद्ध, स्वाभिमानी स्त्रीत्व, 'मिर्चमसाला'तल्या तिच्यावर झडप घालू पहाणार्‍या सुभेदाराच्या थोबाडीत मारताना दिसलेली सोनाबाईमधली जळजळीत निर्भयता, 'मंथन'मधल्या दूध गोळा करून विकणार्‍या, सहकाराच्या चळवळीची ठिणगी पेटवणारा अशिक्षित हरिजन स्त्रीमधला मानवी समंजसपणा, 'बाझार'मधल्या आतल्या आत धुमसत राहणारा स्त्रीत्वाचा असहाय्य हुंदका, 'अर्थ'मधल्या कविताच्या अंतर्मनातले उन्मळून बाहेर पडणारे अपराधीपण.. स्मिता प्रत्यक्षात जे आणि जसं जगली होती तेच पडद्यावरच्या प्रत्येक व्यक्तिरेखेतून आरशासारख्या लख्ख पारदर्शकतेने उमटवत राहिली. तिच्यातल्या अफाट अभिनयक्षमतेचा हा विजय म्हणायचा की दिग्दर्शकाने कट म्हणूनही स्वतःच्या आयुष्यात तीच भूमिका बजावत रहाण्याची वेळ येण्याच्या आयरनीचे दु:ख करायचे?

स्मिता विमेन्स सेन्टरसाठी काम करायची. स्त्रियांची अस्मिता, त्यांची डिग्निटी याबद्दल ती जागरूक होती.. आणि तरीही, जेव्हा तिने प्रेम केले तेव्हा दुसर्‍या एका स्त्रीला तिच्या हक्कांपासून वंचित करण्यास ती कारणीभूत ठरली, ही किती मोठी आयरनी.. तिच्या अनेक व्यक्तिरेखांद्वारे तिने भारतातल्या खेडूत, अभाव आणि अन्यायग्रस्त जीवन जगणार्‍या महिलेचं प्रतिनिधित्व केलं, आणि प्रत्यक्ष जीवनातही अगदी तरूण वयात, या आधुनिक भारतात तिने बाळंतपणात जावं, ही सुद्धा एक आयरनीच. स्मिता आणि तिच्यातला हा पराकोटीचा विरोधाभास.. या सगळ्या संदर्भात का आणि कसं अशा तर्‍हेचे जे प्रश्न मनात उभे राहतात, त्यांची उत्तर स्मिताने नक्की दिली असती असं वाटतं.. तिला अजून जरासं जास्त आयुष्य लाभलं असतं तर! तीस वर्ष.. स्मितासारख्या गुणी कलावतीला आणि त्याहीपेक्षा जास्त गुणी व्यक्तीला असं इतकंच आयुष्य का लाभावं? खूप प्रश्न अनुत्तरितच राहतात.

हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात आणि वर्तमानात अभिनयाचा कस लावणार्‍या, प्रेक्षकांच्या चिरकाल स्मरणात राहू शकतील अशा सशक्त आणि बलदंड व्यक्तिरेखा साकारण्याची मक्तेदारी कायमच पुरुष अभिनेत्यांची राहिलेली आहे. अभिनयातल्या राजे-वजिरांच्या अशा असंख्य झगमगत्या सोंगट्यांनी या रुपेरी पटावर कालानुरूप प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. प्रेक्षकांनी त्यांच्यावर अमर्याद लोभ केला. डोक्यावर बसवले, देवत्वही बहाल केले. मात्र हा असा मान आणि कौतुक किंवा कर्तृत्व गाजवण्याची संधी, तोडीस तोड अभिनय क्षमता असूनही स्त्री अभिनेत्रींच्या वाट्याला मात्र क्वचितच आला.

काही मोजक्या दिग्दर्शकांनी शतकांमधल्या काही दशकांत का होईना, पण मनस्वी स्त्री व्यक्तिरेखांच्या लखलखीत, शुद्ध सोन्याच्या मोहरा या रुपेरी पटावर उधळल्या देखील, पण हिंदी सिनेमातल्या नारीमहात्म्याच्या मध्ययुगीन कल्पनांच्या बंदिवासात असणार्‍या प्रेक्षकाला केवळ चांगलं दिसणं, आणि भूमिकेला साजेसा बेतासबात अभिनय करणं, यापेक्षा काही अधिक देऊ करणार्‍या स्वतंत्र बुद्धीच्या नायिकांना स्वीकारणं फारसं रुचणारं नव्हतंच. त्यामुळे अशा स्त्री व्यक्तिरेखा पडद्यावर साकार होण्याच्या वेळा ह्या दुर्मिळच राहिल्या.

नूतन, सुचित्रा सेन, मीना कुमारी, वहिदा, वैजयंती, नर्गिस काय किंवा त्यांच्या पुढची पिढी रेखा, शबाना या अभिनेत्रींची कामं ही त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांच्या पुरुष सहकार्‍यांच्या तुलनेत नेहमीच अधिक समंजस आणि प्रगल्भ झाली असूनही त्यांचं म्हणावं तसं कौतुक कधीच नाही झालं.

सुजाता, बंदिनी, 'आँधी'मधील आरती, 'पाकीजा'तली साहेबजान, 'गाईड'मधली रोझी, 'खामोषी'तली गीता, आम्रपाली, मदर इंडिया, उमराव जान, 'अर्थ'मधली कविता आणि अशा अनेक रुपेरी पडद्यावरील नव्या जमान्याच्या मिथकांनी सिनेमात एरवी मृदू आणि सौंदर्याच्या नक्षीदार नाजूक चौकटीत अडकून राहिलेल्या स्त्री व्यक्तिरेखेला मोकळं करण्यासाठी बरेच योगदान दिलेलं आहे. पण आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अशा जेमतेम एक किंवा फार तर दोन भूमिका निभावण्याची संधी या गुणी अभिनेत्रींना मिळू शकली. मात्र आपल्या फक्त दशकभराच्या कारकिर्दीत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेद्वारे समर्थ स्त्री व्यक्तिरेखांचा एक प्रदीर्घ पट अभिनयाद्वारे उलगडून दाखवू शकण्याचे भाग्य लाभलेली एक आणि एकमेव अभिनेत्री झाली आणि ती म्हणजे स्मिता पाटील.

७०-८० च्या दशकात मेनस्ट्रीम पॉप्युलर सिनेमांमधल्या अतर्क्यतेला आव्हान देण्यासाठी जी समांतर सिनेमाची चळवळ सुरू झाली, त्यात त्यावेळच्या समाजातले अनेक प्रश्न हाताळले गेले. स्मिताने अत्यंत प्रभावीपणे या सर्व समांतर सिनेमांमधून भारतीय स्त्रीचा चेहरा, तिचं दिसणं, वागणं, तिच्यावरचा अन्याय, तिचं पुन्हा पुन्हा उठून उभं राहणं, तिचं करारी, बौद्धिक व्यक्तिमत्त्व, तिची स्ट्रेन्ग्थ या सार्‍यासकट आपल्या व्यक्तिमत्त्वामधून उमटवला. प्रत्यक्ष जीवनातले तिचे चेहर्‍यावर काहीही मेकप न लावता, सुती साड्यांमध्ये, कॉटनच्या जीन्स-कुर्त्यामध्ये वावरणे, तिच्यातली सहजता हे सारे तोपर्यंतच्या ग्लॅमरस इंडियन फिल्म स्टार च्या प्रतिमेस छेद देणारे होते. तिच्या भूमिका आणि तिचा चेहरा वेगळा नव्हता आणि त्यामुळेच तिच्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातली सीमारेषा लोकांच्या दृष्टीने फार धूसर राहिली. त्याचा त्रास तिला झाला. यापलिकडेही खरी स्मिता नक्की कशी होती, याचे एक कुतुहल अजूनही मनातून जात नाही..

जेमतेम तीस वर्षांचं आयुष्य, त्यात पंच्याऐंशीहून अधिक चित्रपटांत, त्यात हिंदी-मराठीबरोबरच कन्नड, मल्याळम, पंजाबी, बंगाली, गुजराथी चित्रपट, टीव्ही सिरियल्समधून तिने काम करणं, दोन वेळा उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं (७८ मध्ये 'भूमिका' आणि ८२ मध्ये 'चक्र' चित्रपटांसाठी), कॉस्टा गॅव्हराससारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्दर्शकाने फ्रान्समध्ये दोनदा तिच्या चित्रपटांचे महोत्सव साजरे करणं (तसे होणारी स्मिता ही आशियातली पहिली अभिनेत्री), आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून काम करणं, पद्मश्री मिळवणं आणि हे सगळं कर्तृत्व अवघ्या दहा वर्षांत.

स्मिताचं असणं हे एखाद्या दंतकथेसारखंच वाटायला लागतं काही वेळा.

smita3_0.jpgस्मिता वेगळी होती. तिचं काम, तिचं दिसणं, तिचा आवाज, तिचं खाजगी आयुष्य, तिची जगण्यातली उत्कटता आणि तिचं या जगातून निघून जाणंही. स्मिता सगळ्याच बाबतीत खूप वेगळी ठरली. तिच्यामध्ये एक आंतरिक कणखरपणा होता आणि एक स्त्री म्हणून तिचे सावळे सौंदर्य कमालीचे सेन्शुअस होते, त्यात एक प्रकारच्या निर्व्याजतेचे अजब मिश्रणही होते. व्यावसायिक सिनेमांमध्ये त्या काळच्या सर्व टॉप स्टार्सबरोबर इतक्या भूमिका करूनही आणि त्या गाजूनही ती खर्‍या अर्थाने व्यवसायिक कधीच वाटू शकली नाही, हा एक अभिनेत्री म्हणून तिचा पराभव असूही शकेल. पण तिच्यातली इन्टेन्सिटी त्या भूमिकांमधूनही तिने कधीच हरवू दिली नाही, हे तिचे क्रेडिट. तिचे डोळे आपल्याशी थेट संवाद साधायचे, तिचं हसणं आपल्या मनात उतरायचं. स्मिताचा चेहरा शंभर टक्के मराठी होता. हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटांत तिने भूमिका केल्या. हिंदी भूमिका जास्त होत्या तरी स्मिताचं असणं हे निव्वळ मराठीच वाटत राहिलं. चित्रपटांत व्यस्त असतानाही तिच्या मराठी नाटकांमधल्या भूमिका अनेक वर्ष सुरूच होत्या ( बीज, वासनाकांड, छिन्न ).
हे सगळं ती नक्की कसं सांभाळू शकली ते तिलाच माहीत. पण म्हणूनच ती वेगळी ठरली.

आज एखादी चित्रांगदा सिंग, स्मृती मिश्रा नाहीतर सीमा बिश्वास कधीतरी काहीतरी वेगळं असं एखाद्या सिनेमात करून जातात आणि मिडिया-प्रेक्षक सगळ्यांना स्मिता पाटील आठवते. मल्टिप्लेक्समध्ये एखादी ऑफबीट फिल्म यशस्वी होते आणि सगळ्यांना स्मिताचे आभार मानावेसे वाटतात कारण कलात्मक चित्रपटांच्या चळवळीला तिच्या काम करण्यामुळे (तिच्यासोबतच्या नासिर, शबाना आणि ओम पुरी या सहकलावंतासमवेत अर्थात) फार मोठा हातभार लागलेला असतो. आज एखादी अभिनेत्री जेव्हा सशक्त स्त्री व्यक्तिरेखा साकारते तेव्हा नकळत स्मिताने जिवंत केलेल्या तशा अनेक व्यक्तिरेखा नजरेसमोर तरळून जातात. तुलना मग अपरिहार्य ठरते.

आज तेवीस वर्षांनंतरही, काळाच्या पडद्याआड कायमचं निघून गेल्यानंतरही स्मिताचं अशा प्रत्येक संदर्भातून सर्वांच्या मनात जिवंत राहणं मनाला चकित करून जातं. स्मिता खरंच गेलीय कां?

'बाझार'मध्ये नासिर जुन्या स्मिताला आठवताना दाखवलाय. धुक्याने धूसर झालेल्या संध्याकाळी त्याला एका न दिसणार्‍या झुल्यावरून झोके घेणारी स्मिता कधी दिसते.. कधी दिसेनाशी होते. तिच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर तो एका वळणाआड उभं राहून तिची वाट पहात राहतो. ती एकदा त्या रस्त्यावरून त्याच्यासमोरून गेलेली असते. ती परत येईल म्हणून तो वाट बघतो..
गली के मोड पे सूना सा कोई दरवाजा
तरसती आँखोंसे रस्ता किसी का देखेगा
निगाह दूरतलक जाके लौट आयेगी..

स्मिता परत त्या रस्त्यावरून जात नाही. तिचं दिसणं आणि तिचं असणं तरीही तो आठवतो. तिला एकदा पाहिलेला प्रत्येकजणच तिला आठवतो.
करोगे याद तो हर बात याद आयेगी.. गुजरते वक्त की हर मौज ठहर जायेगी.. असं म्हणत.

- tulip

( लेखातील काही संदर्भांसाठी आणि स्मिताच्या छायाचित्रासांठी आभार- ललिता ताम्हाणे (स्मिता-स्मितं आणि मी). )