लग्न ते सहजीवन

"अगं, बारा गावचं पाणी पिऊन आलोय ह्या धर्तीवर बारा वर्षं तुझ्याबरोबर राहतोय, असं म्हणू शकतो मी," विना मला चिडवायला म्हणाला आणि मी चमकले - 'बारा वर्षं' म्हणजे एक तप झालं की.. मग आमच्या आणि आसपासच्या अनेक लग्नांचा, सहजीवनांचा पट माझ्यासमोर उलगडत गेला. त्याचाच हा लेखाजोखा. १०-१२ वर्षांपूर्वीचा काळ तर तुम्हांआम्हां सगळ्यांच्या आठवणीत असेलच. त्यामुळे काही सुरस माहिती देणे किंवा विस्मृतीत गेलेला कालखंड, रीतीरिवाज यांच्या आठवणी जागवणे हा माझ्या लेखाचा उद्देश नाही. गेल्या १०-१२ वर्षांत जीवनशैली, राहणीमान, नोकरीचे स्वरुप, करियरची बदलती संकल्पना या सार्‍यांचा परिपाक म्हणून लग्न, सहजीवन यांच्या बाह्य स्वरुपात आणि संकल्पनेत काय बदल झालेत, याचा आढावा आपण सगळे मिळून घेऊया असं मला वाटतं. त्यामुळे विषयाची सुरुवात तर मी करते आहे पण पूर्णत्वाची जबाबदारी आपल्या सर्वांची.

१२-१५ वर्षांपूर्वी कसं होतं लग्नाचं स्वरूप? मध्यमवर्गीयांमध्ये साधारण मुलीचं वय सरासरी २१ ते २३ झालं म्हणजे 'मुलगी लग्नायोग्य' झाली असं समजलं जात होतं, तर मुलगा २४-२६ वर्षांचा असे. माझ्या ओळखीतल्या काही मुलींची लग्नं त्यांचं शिक्षण चालू असतानाच झाली. पण ती संख्या अगदी थोडी. मात्र एकदा पदवी घेतली (मग ते M. Com. असो की इंजिनीयरिंग ) मुलीच्या लग्नाचा विचार सुरु व्हायचाच. अर्थात त्यालाही अपवाद असायचे. मुलालाही शिक्षण संपल्यावर ३-४ वर्षं वेळ मिळायचा नोकरी-धंद्यात स्थिरावायला आणि लगेच लग्नाचा विचार सुरू. त्यामुळे साहजिकच मुलाचं करियर घडत असतानाच लग्नाची बघाबघी चालू व्हायची तर मुलीच्या नोकरीची ती सुरुवातच असायची. त्यामुळे मुलींच्या अपेक्षा 'किमान मॅनेजर तरी असावा', अशा फारशा नव्हत्या. नोकरी कायमस्वरुपी असावी, हा विचार मात्र असायचा. मग मुलाचा करियरसंदर्भातला संघर्ष गृहीत धरला जायचा तर मुलीच्या नोकरीमागे ती मुलाच्या करियरला पूरक असावी, त्यातून अर्थार्जनही व्हावं, असा सर्वसाधारण विचार मध्यमवर्गीय लोक करत. (यात लग्नाळू मुलं-मुलीही आली.) त्यामुळे बँकिंग, शिक्षणक्षेत्र, अकाउंट्स, ऍडमिनिस्ट्रेशन अशा क्षेत्रांमध्ये मुलींचा सर्वसाधारणतः संचार असायचा. मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग (शॉपफ्लोअरवर काम) अशा क्षेत्रात काम करणार्‍या मुलींकडे कुतुहलाने बघितलं जायचं. असं वातावरण अगदी १२ वर्षांपूर्वीही होतं. याच सुमारास आयटी हे क्षेत्र हळूहळू मुलामुलींना खुणावत होतं. बैठं काम मुलींना योग्य आहे किंवा डेटा प्रोसेसिंग म्हणजे अकाऊंटिंगशी संबंधित आहे अशा समजातून मुली त्या क्षेत्राकडे अधिकाधिक आकर्षित होत होत्या. अर्थात इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्सकडून मुलांचा ओघही हार्डवेअर, नेटवर्किंग अशा क्षेत्रांकडे वळत होताच. इथेच कुठेतरी एक नकळतसा बदल झाला तो मुलामुलींच्या करियरकडे बघण्याच्या दृष्टिकोनात. नंतरच्या २-३ वर्षांत 'वायटूके'मुळे सॉफ्टवेअर बूम आला आणि आयटी क्षेत्र बहरलं. इतर क्षेत्रांतल्या कार्यपध्दतींतही आमूलाग्र बदल झाले आणि नोकरीचं स्वरुप बदलू लागलं. ऑनसाईट जावं लागणं, प्रशिक्षण, वितरण सेवा, शाखांना भेटी देणे ह्या अनुषंगाने अपरिहार्य असलेल्या फिरतीमुळे मुलींचा एकट्याने वावर वाढला. त्यांचं परावलंबित्वही बर्‍याच अंशी कमी झालं. आत्मविश्वास वाढला. साहजिकच ह्याची परिणती मुलींची निर्णयक्षमता वाढण्यात झाली. इकडे व्यवसाय क्षेत्रातील बदलत्या वातावरणामुळे मुलांनाही लहान वयात मोठा वाव मिळू लागला. ज्येष्ठतेनुसार बढती ही संकल्पना बदलून कार्यक्षमतेला महत्व आलं आणि लहान वयात वरची पदं सांभाळण्याची संधी मुलांना तसंच मुलींना मिळू लागली.

ह्या सार्‍याचं प्रतिबिंब वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांत, जीवनशैलीत दिसू लागलं. उच्च शिक्षण घेण्याकडे कल वाढला. मुलगी नोकरी/व्यवसाय करणारी असावी/नसावी अशी अपेक्षा पूर्वी ५०:५० असायची मात्र गेल्या ७-८ वर्षांत मुलींच्या नोकरी-व्यवसायाकडे जास्त गंभीरपणे पाहिलं जातंय. लग्न ठरताना तिच्या करियरचा विचार बहुतांशी केला जातो. (याला अपवाद आहेतच.) मुलीचं नोकरीचं ठिकाण, तिला कोणत्या शहरात, राज्यात, देशात वाव मिळू शकेल याचाही आता विचार होतो. अन्यथा पूर्वी लग्न ठरलं आणि मुलगा परगावचा असेल तर सरकारी नोकरी, बँकिंग इ. क्षेत्रातील मुलींनाच बदली घेणे शक्य व्हायचे. इतर क्षेत्रातल्या मुलींना मात्र नोकरी सोडणे आणि नवर्‍याच्या गावी जाऊन पुन्हा श्रीगणेशा करणे ह्याशिवाय पर्याय नव्हता.

अर्थातच लग्न ठरवण्याच्या पध्दतीतही गेल्या १२ वर्षांत हळूहळू खूप बदल झाले. पूर्वी नात्यातून, ओळखीतून स्थळ येणे हा राजमार्ग समजला जायचा. प्रेमविवाह होतेच पण शक्यतो त्यातही जात, राहणीमान, घरातलं वातावरण ह्याचा विचार होत होता. शक्यतो दोन्ही घरी 'जमू' शकेल अशीच प्रेमप्रकरणं लग्नापर्यंत पोहोचत होती. (अर्थात अपवाद इथेही होतेच) व्यवसायक्षेत्रातील वातावरण, करियरची संकल्पना जशी बदलू लागली, तसा लग्न जुळवण्याच्या इतर पर्यायांचा वापरही वाढला - जसा वधूवरसूचक मंडळे, संकेतस्थळे इत्यादी. त्यामुळे मुलामुलींना एकप्रकारे जागतिक पातळीवर पर्याय उपलब्ध झाले. आपापल्या अग्रक्रमाप्रमाणे त्यांना उपलब्ध पर्यायांतून निवड करता येऊ लागली. 'माझी निवड' हाच मग महत्त्वाचा घटक ठरु लागला. पण म्हणजे निवडीचे निकष पूर्वीपेक्षा आमूलाग्र बदलले का? माझ्या मते नाही. वरवर खूप गोष्टी बदलल्या तरी मूलाधार तेच राहिले. मुली मुलांबरोबरीने शिकल्या, नोकरी/व्यवसायात स्थिर झाल्या तरीही मुलाचं शिक्षण मुलीपेक्षा जास्त हवं, पगार आणि हुद्दाही वरचा हवा, ही अपेक्षा 'जैसे थे' आहे. यात अपवाद आहेतच पण त्यातले बहुतेक प्रेमविवाह. अशा विवाहांमध्येही नातेवाईकांच्या लुडबुडीमुळे अन् समाजातील टीकाटिप्पणीने गुंतागुंत फार... मी आसपासच्या खूप मित्रमैत्रिणींशी या विषयावर बोलले. मुलींना एकतर आपल्यापेक्षा कमी पगाराचा, कमी शिकलेला मुलगा निवडणं कमीपणाचं वाटतं (इतर बहिणी, मैत्रिणी ह्यांच्याशी तुलना केली जाते). समाजातलं स्थान खालावेल अशीही त्यांना भीती वाटते, तर असा विचार न करणार्‍या इतर काही मुलींना होणारा नवरा 'हे कसं स्वीकारेल?' याची भीती वाटते. गंमत म्हणजे आपल्यापेक्षा जास्त शिकलेली किंवा वरच्या हुद्द्यावरची मुलगी निवडणे मुलांनाही कमीपणाचेच वाटते. नवर्‍याचं स्थान वरचं हवं हे न मानणारा मुलगा अजूनही विरळाच. (बाह्यत: जरी मुलगा-मुलगी समान, वगैरे विचार ऐकवले गेले तरीही. न मानणार्‍यांचं प्रमाण वाढतंय एवढं मात्र नक्की!)

मुलगी २४-२५ वयाची असतानाच आर्थिकदृष्ट्या बर्‍यापैकी स्थिरस्थावर असेल तर तिची अपेक्षा मुलाचं स्वतःचं घर असावं अशी असते (कारण पुन्हा तेच. आपल्या वरचढ हवाच! वेगळं राहण्याचं स्वातंत्र्य हवं हाही विचार त्यामागे असतोच!). पूर्वी मुलाच्या आईवडिलांचं स्वतःचं घर आहे की नाही हे पाहिलं जाई. आता मात्र 'मुलाचा स्वतंत्र फ्लॅट आहे का?' हा कळीचा मुद्दा ठरतो. मग त्यानंतर जोडीदार आपल्याच क्षेत्रातील हवा, आपल्या शहरातला हवा, हे मुद्दे येतात. मुलगा परगावचा चालणार असेल तर, ज्या ठिकाणी मुलीला वाव मिळेल असंच शहर निवडलं जातं. मात्र अजूनही मुलीच्या नोकरीच्या ठिकाणी मुलाने स्थलांतर करणे (तेही वाव असेल तरच!) तितकेसे प्रचलित नाही. इथे पुन्हा आपल्या पूर्वापार रीती-परंपरांची साक्ष काढणारा 'समाज' नावाचा बागुलबोवा समोर केला जातो.

'दिसणे' ह्या मुद्द्याला महत्त्व किती?, हे 'गोरी बायको हवी' ह्या धर्तीवरच्या 'वधू पाहिजे'च्या जाहिराती पाहिल्या की कळतंच. बाजारातील गोरेपणा आणणारी वा वाढवणारी सौंदर्यप्रसाधने, त्यांच्या जाहिराती ह्याची साक्षही काढता येईलच. भारतीयांना 'ब्लॅक' म्हणणं परदेशांत जरी कमी किंवा बंद झालं तरी आमचा गोरेपणाचा हव्यास कमी होत नाही हीच शोकांतिका. शारीरिक धडधाकटपणाची अजूनही उघड चौकशी केली जात नाही. एड्सने इतकं थैमान घालूनही, एचआयव्ही चाचणी आपणहून करुन पत्रिकेबरोबर दाखला जोडणारा मुलगा अथवा मुलगी जवळजवळ नाहीच. मात्र त्याचवेळी 'घरात कोणाला मधुमेह आहे का?' याची आडूनआडून चौकशी केली जाते.

पत्रिका हा आजही विवाहातला मोठा अडथळा किंवा लग्न जमवणारा घटक आहे. पत्रिका बघणार्‍यांचं प्रमाण 'उन्नीस-बीस' इतकंच बदललं आहे. अगदी प्रेमविवाहातही अजूनही 'पत्रिका जमते का ते किमान पाहूया तरी' असा घरच्यांचा आग्रह असतोच. थोडक्यात 'दैववाद' पाठ सोडत नाही. मुख्य म्हणजे पत्रिकेचा आग्रह धरणार्‍या तरुण मुलामुलींची संख्या बरीच मोठी आहे. 'घटस्फोट घेणार्‍यांनी पत्रिका पाहिली होतीच ना?' असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा मात्र वडिलधार्‍यांचा मान म्हणून, शेवटी मुलगा (किंवा मुलगी) मीच निवडणार आहे, तेव्हा पहिली चाळणी थोडी त्यांच्या मनाप्रमाणे असली तर काय बिघडतं?, पाहिली तर फरक काय पडतो? वगैरे कारणं दिली जातात. 'लग्न यशस्वी होईल की नाही' ही भीती आणि त्याची खात्री करुन घ्यायचा एक मार्ग म्हणूनही पत्रिकेकडे पाहिलं जातं. 'Don't leave any alternative untouched' असं व्यवस्थापन क्षेत्रामध्ये शिकलेलं असतं ना!

अशा सार्‍या गोष्टींचा विचार होऊन लग्न जमतं (प्रेमविवाह असेल तरीही ह्या सार्‍या गोष्टी अप्रत्यक्षरीत्या आपला प्रभाव पाडतातच). अगदी मूलभूत आवडीनिवडी, छंद, नोकरी-व्यवसायातलं पुढचं नियोजन ह्याबद्दल मुलामुलीचं बोलणं लग्न ठरताना शक्यतो होतंच, ही गेल्या काही वर्षांतील जमेची बाजू. पण प्रश्न हा आहे की हे बोलणं पुरेशा मोकळेपणाने, समान पातळीवर होतं का? की वर उधृत केलेले मुख्य निकषच ह्या चर्चेतही प्रमुख भूमिका बजावतात? अजूनही मध्यमवर्गीय संकल्पना अशीच की, थोडीफार चर्चा झाली की लग्न ठरवायचं आणि लगोलग साखरपुडा करायचा. मग मुलगामुलगी एकमेकांना भेटायला, समजून घ्यायला मोकळे. 'साखरपुडा ते लग्न' या काळातली दोघांना मनमोकळेपणे भेटायची संधी खरंतर लग्न ठरल्यापासून साखरपुड्याची तारीख ठरेपर्यंत मिळायला हवी. म्हणजे आपला मूळ निर्णय पुनःपुन्हा तपासून घेता येतो, एकमेकांच्या स्वभावाचा पूर्ण अंदाज येतो. एखाद्या परिस्थितीत जोडीदाराची प्रतिक्रिया काय असते, तेही कळतं आणि त्या आधारे निर्णय फिरवता येतो (म्हणजे खरंतर यायला हवा!). पण असं घडताना दिसत नाही, कारण भेटी सुरू होतात साखरपुडा झाल्यानंतर आणि मग त्यानंतर लग्न कसं मोडायचं? मुळात एकमेकांशी भावनिक अनुरुपता नसल्याने लग्न मोडलं, हे कारणच आपण अजून पचवू शकत नाही. त्यातून आतातर साखरपुडाही झाला, अशी सबब असतेच. अशा परिस्थितीतही एखाद्या मुलीने हिमतीने ह्या मुलाशी आपलं पटू शकत नाही, असं सांगितलं आणि आई-वडिलांनाही ते पटलं तरी समाजाचा बागुलबोवा असतोच. नातेवाईक, स्नेही यांचाही सूर 'जमवून घे जरा' असाच असतो. लग्न मोडलं तर ज्या प्रकारच्या नजरांना, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टोमण्यांना मुलीला तोंड द्यावं लागतं त्याची कल्पना न केलेलीच बरी... अर्थात एकमेकांशी न जमण्यामुळे लग्न मोडावं लागण्याची ही परिस्थिती मुलावरही येऊ शकते. फक्त मुलाच्या बाबतीत समाजाचा दृष्टिकोन तितकासा टोकदार नसतो, त्यामुळे मुलगा लग्न मोडल्यानंतर लवकर सावरू शकतो.

गेल्या काही वर्षांत परदेशांत स्थायिक होणार्‍या भारतीय तरुणतरुणींची संख्या वाढतेय. त्यामुळेच ८-१५ दिवसांसाठी भारतात येऊन मुलगी बघून, लग्न ठरवून आणि करून परतणार्‍या तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. अशा लग्नांमध्ये कोणत्याही तपशीलामध्ये जायला ना मुलीला वेळ असतो ना मुलाला. तर एकमेकांना नीट समजून घेणे फार दूर राहिले. अर्थातच इथे मुलांच्या अपेक्षांची यादी भलीमोठी असते तर परदेशात रहाणारा, डॉलर्समध्ये कमावणारा मुलगा मिळावा ह्या अपेक्षेपोटी इतर गोष्टी मुलींना नगण्य वाटतात. कधी मुलींनाही परदेशात करियर करायचे असते आणि ती संधी मिळते आहे तर का सोडा, ह्या हेतूने असे झटपट निर्णय घेतले जातात. अशी लग्नं यशस्वी होतातही पण जी अयशस्वी होतात त्यांनी सारा दोष फक्त नियतीला द्यावा का?

अशाप्रकारे एकदाचं लग्न होतं आणि मग येतो फुलपाखरी काळ एकमेकांत शारीरिक आणि मानसिक गुंतवणुकीचा, फुलण्याचा, फुलवण्याचा.. इथेच बीज रुजतं सहजीवनाचं.. दोघांतलं नातं नर-मादी, मालक-दासी, नवरा-बायको असंच रहाणार की त्यापुढे जाऊन मैत्रीमध्ये बदलणार? माझा अनुभव म्हणाल, तर नातं तेच टिकतं (आणि मनापासून रुजतं) जिथे मैत्री जुळते. हे खरंतर नवरा-बायको याच नाही तर सगळ्याच नात्यांना लागू होतं. कारण कालांतराने आई-वडील अन् मूल, बहीण-भाऊ असो अथवा इतर कोणतंही नातं. जर 'मैत्री' हाही त्याचा एक महत्वाचा घटक असेल तरच त्यात सहजता राहते नाही तर शिल्लक राहते केवळ औपचारिकता. मग नवरा-बायको (खरं तर नर-मादी) हे तर सगळ्यांत अनादि अन् अंतिम नातं - ते मैत्रीशिवाय कसं रुजेल? पण भारतीय कुटुंबव्यवस्था, नीतीमूल्यं, संस्कृती यांचा जयघोष करण्याच्या नादात आपण या मूळ गाभ्याकडे दुर्लक्ष करतोय असं नाही का वाटत तुम्हांलाही? 'भारतीय लग्नं टिकण्याचं प्रमाण' ह्या एकाच मापदंडावर आपण लग्न यशस्वी समजायचं का? आपण केवळ बाह्यांगाने विचार करतो की घटस्फोट नाही झाला म्हणजे ते लग्न यशस्वी. पण शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक भागीदारी ह्या निकषांवर आधारित आपली लग्नसंस्था भावनिक देवघेव, परस्परविश्वास, सामंजस्य आणि मुख्य म्हणजे जोडीदाराच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर ह्या मूल्यांचा विचार किंवा अंतर्भाव करते का? परदेशी जीवनशैलीशी जी स्पर्धा आज चालली आहे त्या अनुषंगाने आपण वरवर पध्दती, चालीरीती ह्यांमध्ये बदल केले पण ही नवी मूल्यं अंगिकारली का? व्यक्तिमत्त्व विकासामध्येच या मूल्यांचा अंतर्भाव करायला नको का? ही मूल्यं जर रुजली तर सहजीवन आपोआपच साध्य होईल. त्याचा वेगळा विचार करायचीही मग गरज उरणार नाही. पण अजूनही समाजात चित्र कसं दिसतं? गेल्या बारा वर्षांत जीवनशैलीमध्ये इतके बदल होऊनही 'सहजीवन' ह्या संकल्पनेत सकारात्मक, रचनात्मक असे बदल किती प्रमाणात झाले?

सहजीवन ही संकल्पना समाजाला मान्य असणे, समाजात रूढ असणे ही पुढची बाब, पण व्यक्तिगत पातळीवर लग्नाकडून आपल्या अपेक्षा काय असतात? शारीरिक संबंध हा मूलाधार. त्यांचं यशापयश, एकवाक्यता, त्यातील आनंदाची देवघेव हा महत्त्वाचा घटक असतोच त्यापलिकडे एकमेकांचे नातेसंबंध जपावे, एकमेकांना आर्थिक आधार द्यावा, संतती वाढवावी ह्या सामाजिक अपेक्षाही गृहीत असतातच. ह्या सार्‍यांचा समतोल राखताना दोघांनाही बरीच कसरत करावी लागते. वेगवेगळ्या ताणतणावांना तोंड द्यावं लागतं. त्याबाबत तक्रार न करता, तडजोड करायची तयारी ठेवत आयुष्याची वाटचाल करायची आहे, याबाबत सर्वसाधारण विचारी माणसांमध्ये दुमत नसतं; किंबहुना 'म्हणजेच लग्न यशस्वी' असं आजही प्रत्येकाला वाटतं. घटस्फोटांचं प्रमाण प्रचंड वाढलंय, कुटुंबसंस्था कोलमडली आहे वगैरे चर्चा आपण ऐकतो त्यात कितपत तथ्य आहे? आजही एकमेकांसोबतचं जीवन अगदीच असह्य असेल तरच घटस्फोटाचा विचार होतो. पूर्वीही एकमेकांबरोबर न पटणारी जोडपी होतीच, पण केवळ स्त्रियांच्या आर्थिक अवलंबित्वामुळे आणि स्त्रीविषयक सामाजिक दृष्टिकोनामुळे बहुतेकवेळा लग्न न तुटता रडतखडत टिकून रहायचं. एक तर त्यावेळी घरगुती समस्यांची चर्चाही खुलेपणाने व्हायची नाही आणि एकत्र कुटुंबात वाढल्याने सगळ्यांना बरोबर घेत, सांभाळत आयुष्य काढायचं ही मानसिक तयारी नवरा, बायको दोघांचीही असायची. पण आज खूपशा स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहेत, त्या आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकतात त्यामुळे बहुधा लग्न कसंबसं टिकवणं आजच्या पिढीला मान्य नाही. अर्थात आत्मकेंद्री, चंगळवादी प्रवृत्तीमुळे आणि पैसे फेकून कोणतेही सुख विकत घेता येते अशा माजामुळे 'तू नही और सही' असा विचार करणारे तरुण-तरुणीही आहेत. तसंच कित्येकदा जोडीदाराला माणूस म्हणूनही वागवलं जात नाही किंवा मालक-दासी, नर-मादी ह्याच चक्रात लग्न अडकतं, ही उदाहरणं आजही थोडीथोडकी नाहीत ही शोकांतिकाही आहेच. पण सध्यापुरता अशा पराकोटीच्या उदाहरणांचा विचार न करता सर्वसाधारण 'टिकलेल्या' लग्नांबद्दल बोलायचं ठरवलं तरी नवरा-बायको हे नातं अन् मैत्र ह्यांचा परस्परसंबंध असतो किंवा असावा असा विचार करणारे किती?

दोघांनी, दोघांचं असं एक घरकुल उभारावं (इथे मला लौकिक 'घर' असा अर्थ अभिप्रेत नसून 'कुटुंब' असं म्हणायचं आहे), एकमेकांची स्वप्नं पुरी करण्यासाठी धडपडावं ही तर नवरा-बायकोतल्या सहजीवनाची पहिली पायरी किंवा पाया म्हणा हवं तर. तसंच एकमेकांचं भावविश्व समजून, भावभावना सांभाळून एकमेकांना सावरणं ही पुढची पायरी. ह्यातून मग पुढे येते एकमेकाच्या ध्येयात, भावविश्वात भागीदारी, सक्रिय सहभाग. पुलं-सुनीताबाई, अनिल-सुनंदा अवचट, मालतीबाई-विश्राम बेडेकर, साधनाताई-बाबा आमटे (आणि त्यांचं सारं कुटुंबच), अभय-राणी बंग ही उदाहरणं आपल्यासाठी नवीन नाहीत. पण हे सारं क्षणात घडत नाही. सहजीवन ही एक प्रक्रिया आहे. जी हळूहळू घडत असते. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो आणि तो प्रवास खडतर, वळणावळणाचा, चढउतारांचा असतो. सहजीवनाच्या प्रवासाला शेवटचे स्टेशन नाही. ह्या वाटेवरचे अनुभवच खरं तर सहजीवन समृद्ध करतात. ही सारी अनुभूती खुल्या मनाने, हातात हात घालून घेत गेलो तर रोज नवी क्षितिजं अन् नव्या वाटा! मग एका क्षणी ही कल्पना, हे ध्येय ह्याचं (किंवा हिचं ) अन् त्यात हिचा (किंवा ह्याचा) सहभाग इतका असले हिशेब संपतात आणि उरतं देहातीत, कालातीत अद्वैत! आता 'मुक्तांगण' सुनंदा अवचटांचं की अनिल अवचटांचं हा प्रश्नच किती खुळेपणाचा वाटतो की नाही? आणि त्याला मदत पुलंनी केली की सुनीताबाईंनी ह्या प्रश्नाला काही अर्थ उरतो का?

खरंतर ह्या सहजीवनाच्या जीवनशैलीचा एकदा अंगिकार केल्यावर ते कायदेशीर लग्न आहे की 'लिव्ह-इन' प्रकारातलं आहे ह्या गोष्टींनाही तितकंसं महत्त्व उरत नाही कारण सहजीवन हा वायदा आहे, कायदा नाही. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने लग्नसंस्थेची गरज आज आहे, हे खरं पण लग्न हा केवळ उपचार. आपण तिथेच अडकायचं की त्यापलिकडे जाऊन सहजीवनाची वाट चोखाळायची हे तुम्हीआम्ही ठरवायचंय. सुरुवात असेल कालबाह्य रीतीरिवाज, तथाकथित परंपरेचा बागुलबोवा, लग्नसंस्थेचे पूर्वापार मूलाधार/निकष (मुलाचं सुस्थापित असणं, मुलीचं दिसणं वगैरे) झुगारून बुद्धीच्या दगडावर घासून, तर्कशुद्धरीत्या आपली मतं बनवणं, निर्णय घेणं आणि योग्य जीवनशैली अंगिकारणं हीच! मग ना समानतेचे वेगळे धडे द्यावे वा घ्यावे लागतील, ना स्त्रीमुक्तीचा संघर्ष छेडण्याची गरज भासेल. अर्थातच मग मुलींनी मंगळसूत्र घालावे की घालू नये, लग्नानंतर कपडे कोणाच्या मतांप्रमाणे घालावे, नाव बदलावे की बदलू नये ह्यापासून अर्थार्जन आणि घरकाम अशी कामांची विभागणी करावी का? तिने केवळ सावली बनून रहावं की तिचं वेगळं व्यक्तित्व जोपासावं ह्या प्रश्नांची उत्तरंही आपसूकच मिळतील. केवळ बाह्योपचारांना संस्कृतीचं परिमाण लावायचं की दोघांमध्ये सशक्त नातं रुजवत, फुलवत अवघा कुटुंबवृक्ष सावरायचा, फुलवायचा याचा बुद्धिनिष्ठ विचार करायची वेळ आता आली आहे, असं तुम्हांला नाही वाटत?

- sarivina