माकडाचा मोबाईल

बालगायिका : कु. अनाहिता पोंक्षे
संगीतकार : विवेक काजरेकर (vivek_kajarekar)
गीतकार : मिलिंद छत्रे (milya)

गाण्याचे बोल असे आहेत:

माकडाचा मोबाईल

एक माकड घेऊन आले एकदा एक मोबाईल
डिस्प्ले होता कलरफुल आणि लेटेस्ट होती स्टाईल

स्क्रीनसेव्हर त्याचा होता बाल हनुमान
रिंगटोन म्हणून सेट केले जंगलबुकचे गान

माकड म्हणे वापरायचाय का तुम्हाला हा फोन?
एका कॉलला रुपये तीन, एस. एम. एस. ला दोन

दुसर्‍या जंगलात फोन करायला पडेल ज्यादा दर
रोमिंग तेवढे घेतले नाही, उगाच खर्चात भर

कोल्हा म्हणाला माकडदादा झालोय फार बोअर
एस.एम.एस. करुन मागवा जरा क्रिकेटचा स्कोअर

ससा मागे शर्यतीसाठी एकदाच फोन उधार
अलार्म सेट करुनच झोपेन यंदा मीच जिंकणार

अस्वल म्हणाले वाट बघत असेल माझी हनी
फोन करुन सांगतो ’आलोच मी’ काढून ठेव हनी

कुत्रा बोले शेपूट हलवत सांगू का खरंच
'आयडीआ' का घेतलेस भाऊ, वापरुन बघ ना 'हच'

इतक्यात आले वाघोबा डरकाळी फोडत
पळती सारे सैरावैरा आरडा ओरडा करत

माकड म्हणाले "घाबरु नका! पळताय काय असे?
युक्ती ऐसी करतो आता वाघोबाही फसे.."

हळुच त्याने बंदुकीचा 'ठो ठो' रिंगटोन लावला
घाबरुन तेथून वाघोबाने लागलीच पळ काढला

वाघोबाची फजिती पाहून हसु लागला जो तो
माकड म्हणाले नीट बसा काढू छानसा फोटो

काढू छानसा फोटो, काढू छानसा फोटो॥