चिठ्ठी

म्हन्जे काय झालं होतं की किल्लीचं आणि माझं भांडण झालेलं. आता माझी बेस्टंबेस्ट फ्रेंड कोण हे आमच्या शाळेतल्या टिचर्स रूममधे जाऊन विचारलंत तरी कळेल... किंवा आमच्या गल्लीतल्या किंवा किल्लीच्या आळीतल्या कुठल्यापण बाईला विचारा. 'सारख्या काय गं कुचूकुचू बोलत असता?' हे वाक्य आमच्यासाठी खास आहे. शाळेतल्या सगळ्या बाई ते जस्संच्या तस्सं म्हणतात... त्यांच्या त्यांच्या तासाला. असं म्हणल्यावर आम्ही निदान दीड मिनिट गप्प बसतो, म्हणून का काय, काय माहीत ?! पण त्यामुळं आमचं बोलणं शाळा संपली तरी संपतच नाही. मग शाळा सुटली की आम्ही सायकलवर गप्पा मारत जातो माझ्या घरापर्यंत. मग सायकली पुढच्या अंगणात लाऊन मग तिथं गप्पा मारतो थोडा वेळ. मग आई आतून ओरडती, "असं करायचं ना, शाळेतच थांबायचं सायकलीला टेकून गप्पा मारत! मी आणि किल्लेदार वैनी दुधाचे पेले आणि पोह्याच्या बशा घेऊन तिथंच आलो असतो." मग आम्ही सायकली लाऊन आत जातो. हातपाय धुवून दूध आणि पोहे खातो. तेंव्हाही आई साडेतेरा वेळा सांगती की आधी खा आणि मग बोला. मग किल्ली घरी जाती. आता ती मला सोडायला घरी आली म्हणल्यावर मला पण जायला पायजे की नाही ? मग आम्ही थोड्या वेळ तिथं पण गप्पा मारतो. मग किल्लीची आई ओरडती, "अगं बसून अभ्यास करा. नुसतं हिकडून तिकडं, तिकडून हिकडं ! आणि काय गं? साऽऽऽरखं कुचुकुचू काय बोलता गं?"

अभ्यासाचं नाव काढल्याबरोबर मी आपली सायकलीवर जाऊन बसतेपण. मग किल्ली मला आळीच्या तोंडापर्यंत सोडायला येती. मग गप्पा संपल्या असतील तर बरं, नाहीतर आम्ही तिथंपण थोडा वेळ बोलतो. आमच्यासारख्याच अजूनपण आमच्या आणि बाकी शाळांच्या पोरीपण असतात अशा सायकलींवरून चकरा मारत. पण आमच्या आईसाहेबांना वाटतं, आम्हीच तेवढ्या सारख्या बोलत असतो कुचूकुचू.

हां, तर त्या दिवशी माझं आणि किल्लीचं भांडण झालेलं... मी तिच्याऐवजी नवीन आलेल्या साळुंकेच्या शेजारी बसले म्हणून. किल्ली उशिरा आलेली त्या दिवशी. आता मी कशाला स्वतःहून बसतीय! बाईंनीच बसवलं होतं. म्हणे, सारखं कुचूकुचू करत असता, आज बस हिच्याशेजारी. नवीन पोरगी आहे म्हणून कमी बोलेल असं बाईंना वाटलं का काय काय माहीत?!

साळुंके पण भारीच निघाली एकदम. तिच्या वहीच्या मागच्या पानांवर गणपतीची वेगवेगळ्या नावांनी काढलेली चित्रं होती. तिच्या मामानं काढलेली. ती नावंपण म्हणे गणपतीचीच असतात आणि ती मोडनिंबवरून आलेली आमच्या शाळेत. तिथं म्हणे एवढी गर्दी नाहीये. मस्त शांत वाटतं. पण हे खूप मोठं गाव आहे. रात्री नऊ वाजतापण रस्त्यावर लोक असतात कितीतरी. म्हणून तिला मस्त वाटतंय. बल्यासारखाच तिला पण एक मोठा भाऊ आहे. तिचे आज्जीआजोबा आणि मामापण इथंच राहतात... भवानी पेठेत.

"अय्या ! म्हणजे आमच्या घराच्या जवळच की. मग तू येत जा नेहमी घरी," असं मी म्हणलं. इतक्यात बाईंचा आवाज आला, "कुठंही बसवा, कुचूकुचू चालूच. उठ गं बाई, त्या किल्लेदारच्याच शेजारी बस. हिला बिघडवू नकोस आणि!"
मी उठून किल्लीच्या शेजारी बसले तर बोलेचना माझ्याशी. अरेच्या! आमचं भांडण व्हायचं कधीकधी पण बोलणं बंद? आता ही पनिशमेंटच झाली की नाही? मी कित्ती म्हणलं, अगं बाईंनी बसवलेलं. पण नाहीच. मग मला एक आयडिया सुचली. मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर आमचा ग्रूप साखळीपाणी खेळतो ग्राऊंडवर. मी टोल व्हायच्या थोडी आधीच वर्गात आले. माझ्या वहीतलं मागचं पान फाडून त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं "सॉरी" आणि तिच्या कंपासमधे ठेऊन टाकलं. टोल झाल्यावर सगळे वर्गात आले. किल्ली कंपास कधी उघडतेय त्याची मी वाट बघत होते. ती आपली पलीकडच्या बाकावरच्या स्वाती जोशीशी बोलत होती. तेवढ्यात बाई आल्या. मग तिनं पेन काढायला कंपास उघडला. पेन उचललं आणि कंपास बंद केला. आतली चिठ्ठी बघितली का नाही काय माहीत?! माझ्याकडं बघितलंच नाही. मग फार बोअर झालं. तिला पण होत असणार. मला काय कळलंच नाही.

आता शाळा सुटल्यावर मी 'घरी बरोबर जायचं का कसं' याचा विचार करत नखं खात उभारले होते वर्गाबाहेर. ती सायकल स्टॅंडकडं गेल्यावर मी गेले, तर ती सायकल हातात धरून वाट बघत होती. मी सायकल काढली आणि आम्ही निघालो. तिच्या घराचा रस्ता आल्यावर ती वळली. फक्त म्हणाली, "दप्तराच्या वरच्या कप्प्यात बघ." मला जाम हसू आलं. आता उतरून तिथंच दप्तरात बघावं असं वाटत होतं, पण नको. घरी गेले. हातपाय धुवून सैपाकघरात गेले, तर आई म्हणाली, "काय गं, मधुरा आली नाही का आज?"
मी म्हणलं, "घरी गेली ती."
"का गं, भांडण केलंत का काय?"

आईला कसं कळलं? ती काय अगदी रोजच येत नाही घरी. मी एका वाक्यात उत्तर दिलं, म्हणून का काय काय माहीत?! मी काय विचारलं नाही. नायतर मग सगळा यडबंबूपणा सांगावा लागला असता. मी पटकन खाल्लंपिल्लं आणि माझ्या खोलीत पळाले. जाऊन दप्तर उघडलं. आत चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, "आता काय, तुला नव्वीन मैत्रीण मिळाली. मग आम्ही कशाला आठवतोय? कित्ती छान गप्पा चाललेल्या."

आईशप्पत! मी तर काय गप्पाच मारल्या नव्हत्या. फक्त वहीवरची गणपतीची चित्रं, तिचे घरचे, तिचा यडबंबू भाऊ एवढंच काय काय... आणि मारल्या गप्पा तर काय? आमच्या कित्तीतरी अजून मैत्रिणी आहेत. मधल्या सुट्टीचा ग्रूप आहे. मग याच मुलीशी बोललं, तर काय झालं काय माहीत?! मग मी पण एक चिठ्ठी लिहून ठेवली, "मग काय झालं? मी तुझ्याशेजारी बसले होते, तर तू पण स्वाती जोशीशी कित्ती मस्त गप्पा मारत होतीस." आणि दप्तरात ठेवली गुपचुप.
शाळेत गेल्यागेल्या मला साळुंके दिसली. शाळा भरायला वेळ होता अजून. म्हणून आम्ही ग्राऊंडवर गेलो. आम्ही शाळेत कुणीपण पोरगी नवीन आली की तिला 'बुचाच्या फुलांची बिनदोर्‍याची वेणी आणि पाकळ्यांचे फुगे येतात का?' विचारतो. ग्राऊंडच्या कडेनं बुचाची झाडं आहेत खूप. शाळा भरायच्या आधी आणि मधल्या सुट्टीत कोण ना कोण तिथं वेण्या करत बसलेलं असतंच. तिला माहितच नव्हतं. मला वाटलेलंच! मग आम्ही फुलं वेचली आणि कट्ट्यावर बसलो... वेणी करत. त्या वेण्या कुण्णी घालत नाही बर्का डोक्यात. त्या आपल्या चॉकलेटच्या कागदाच्या बाहुल्यांसारख्या पूर्ण झाल्या की कुठंपण पडून जातात.

शाळा भरल्यावर मी चुपचाप किल्लीच्या शेजारी बसले. ती पाणी प्यायला गेल्यावर चिठ्ठीपण ठेवली कंपासात. मग तासाच्यामध्ये साळुंके माझ्याशी बोलायला आली. 'मी तुमच्याबरोबर जेवायला येऊ का' विचारायला. मला काय, मस्तच! आमचा चॅंप्स ग्रूप अजून वाढेल. मधल्या सुट्टीत आम्ही डबे खाल्ले, साखळीपाणी खेळ्ळो आणि परत आलो. तर माझ्या कंपासात चिठ्ठी. बरंच मोठं काय काय लिहिलेलं. मी गपचुप चिठ्ठी दप्तरात टाकली... घरी जाऊन वाचायला.
घरी जाऊन खोलीत जाऊन पटकन दप्तर उघडलं. तेवढ्यात पंक्याचा आवाज आला. म्हणून मी चिठ्ठी दप्तरात ठेवली. पण सारखं दप्तर उघडून बघू वाटायला लागलं. म्हणून आज्जीच्या खोलीत गेले. तिथं फक्त देवासमोर समई असते लावलेली. मस्त उबदार वाटतं. आज्जी डोळे मिटून स्वामी समर्थांचा जप करत होती. मी जाऊन बसले तिच्या बेडवर. आता उघडावं दप्तर तर तेवढ्यात तिनं डोळे उघडले. मग पाठीवरून हात फिरवत हातावर खडीसाखर ठेवली. आता काय बरं करावं? मी पुन्हा माझ्या खोलीत आले. तर माझ्या मागून पंक्यापण आला.

लाडू तोंडात ढकलत त्यानं विचारलं, "काय खास आहे गं तुझ्या दप्तरात?"
मी दचकलेच. याला कसं कळलं? आता असं त्याला डायरेक्ट विचारायला मी काय यडचाप नाहीये. मी नेहमीच्याच कॉन्फिडन्सनं म्हटलं, "हॅ! काय खास असणार? पुस्तकं आहेत शास्त्र आणि गणिताची. घे वाच."
"गपे! अशी दप्तर घेऊन काय फिरतीय घरात? एका खोलीतून दुसर्‍या खोलीत... आणि अभ्यास करतच नाहीस तर दप्तर कशाला पायजे बरोबर सारखं?"

मी धोका ओळखून पळत सुटले अंगणात. पण मोठ्या चुलतभावाशी तुम्ही कधी रेस जिंकलायत का? मी पण नाही. म्हणजे त्या दिवशी तर नाहीच. पंक्यानं दप्तर ओढलं. तिथंही मी थोडी फाईट दिलीच. पण मी कुठली फाईटपण जिंकले नाहीये कधी... म्हणजे पंक्याशी. शाळेत जिंकते कधीकधी. दप्तर हातात आल्यावर त्यानं मला ढकललं. मी ते काय दप्तरात होतं ते पळवून नेईन म्हणून का काय काय माहीत?!
पण तोच म्हणाला, "लांब रहा हां तू! नाहीतर चावशील बिवशील."

मी एकदा त्याच्या हाताला चावले होते फाईटमधे, पण ते खूप लहानपणी... माझं मोराचं चित्र बघून तो "पोत्यातून नाग बाहेर आल्यासारखा दिसतोय" म्हणला होता आणि बल्या म्हणला होता, "पोतंपण गळकं गव्हाचं," आणि तो आणि बल्या गडाबडा लोळले होते हसून हसून... आणि चित्र पण सोडेना हातातून... तेव्हा. आता कुठल्याही बहिणीनं हेच केलं असतं ना? असे वण उमटले. रक्ताचा पण ठिपका आला एक. सॉलिड घाबरले होते मी. आता आई आणि काकू मिळून माझी एकदम म्यागी नूडल करून टाकणार म्हणून. पण पंक्यानं त्यांना सांगितलंच नाही. बल्या निघाला होता आईकडं, तर त्यालापण नाही जाऊ दिलं. "जाऊ दे रे, या भैणी असल्याच रडूबाई असतात," म्हणला.

तर मला ढकलून पंक्या दप्तर अंगणात मोकळं करणार होता, तेवढ्यात मी म्हणलं, "आण, मी दाखवते काय आहे ते."
मग मी आतल्या कप्प्यातून हळूच एक घडी घातलेलं वहीचं पान बाहेर काढलं आणि पंक्याला दिलं आणि तोंड डाळिंबाच्या झाडाकडं करून उभी राह्यले. आता मला म्हाईती होतं की तो तो बल्याला हाक मारून दोघं कट्ट्यावर बसून जोरजोरात हसणार, लोळणार... नेहमी असं करतात मला... आणि चिडले की आहेच मग, या पोरी ना...
माझं तोंड अजून डाळिंबाच्या झाडाकडंच. खूप वेळ गेला. जवळजवळ सव्वाआठराशे सेकंद तरी. तरी पंक्याचा आवाज येईना. म्हणलं, आता झाली जाहीर महासभा माझ्या चिठ्ठीची. म्हणून मी मागं वळले. तर पंक्या तिथंच उभा होता आणि... चक्क डोळ्यात पाणी! मी यडबंबूसारखी बघत राहिले. मग एकदम डोळे पुसून म्हणला,

"त्या किल्लीनी लिहिलीय ही चिठ्ठी? ती रोज येती तुमच्या घरी ती ना? गोरी? लांब दोन वेण्या वाली?" त्यानी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली. पंक्याचं घर शेजारीच आहे, त्यामुळं त्याला सगळं माहीत असतंच.
"हो रे. असू दे. दे इकडं," मी चिठ्ठी हिसकवायचा प्रयत्न केला आणि चक्क पंक्यानी लगेच दिली!
मी वाचायला लागले. छोटं पत्रच होतं ते...

प्रिय मैत्रिण पल्लूस,
('शि सा न वि वि राहिलं,' मी पत्रलेखन आठवून मनात म्हणाले.)
इतके दिवसांची आपली मैत्री. आपण सगळ्या मज्जा शेयर करतो. डबापण शेयर करतो. ती नवीन मुलगी आली की सगळं गेलं ना! तुला नवीन मैत्रीण मिळाली आता. आता काय, डबा खायलापण ती बरोबर. आता तर तुला जुन्या मैत्रिणीची गरजच नाही आणि तू मला विसरून जाणार असंच मला वाटतंय.

तुला बसायचं असेल तर बस तिच्याशेजारी आणि मी आता तुझ्याशी बोलीनपण. त्यात काय? बाकीच्या मुलींशी बोलते तसं तुझ्याशीपण बोलीन. 'रुसायचं ते आपल्या माणसांवर. जर फरकच पडणार नसेल, तर कशाला रागावायचं?' असं आमची आई म्हणते.

त्यामुळे उद्यापासून तुझ्याशी बोलायचं मी ठरवलंय. फक्त आता गमती शेयर करण्याआधी विचार करीन.

तुझीच (जुनी) मैत्रीण मधुरा

किल्लीचा मराठीत नेहमी हाय्यस्ट असतो, हे डोळे पुसताना मला आठवलं.

पंक्या यडपट अजून तिथं उभारला होता. मी बघितलं की म्हणला, "कित्ती इमोशनल आहे तुझी मैत्रीण!"
"असू दे," मी तुसडेपणानी म्हणलं.
"मी तुला मज्जा सांगतो ती ऐक. म्हणजे नो प्रॉब्लेम."
मग मी दुसर्‍या दिवशी शाळेत जाताना किल्लीच्या घरी गेले. तिला घाई करून आम्ही लौकर शाळेत पोचलो.
ती जास्त बोलत नव्हतीच काय. सायकल लावली. साळुंके दिसलीच कट्ट्यावर. मी किल्लीला हाताला धरून तिच्याकडं नेलं.

"ए साळुंके, ही ना माझी बेस्टंबेस्ट फ्रेंड किल्ली. हिलापण तुझ्या वहीतली गणपतीची चित्रं दाखव ना."
आधी किल्ली जरा मागं उभी राहिली, पण मग चित्रं बघून पुढं आली. मग साळुंकेनं तिलापण तिच्या मामाची चित्रं, तिचं घर असल्या गमती सांगायला सुरुवात केली. त्या बोलत असताना मी पाणी पिऊन आले, तरी त्यांचं चाललेलंच. मग मी आल्यावर किल्ली म्हणली, "हिनीपण एक सायकल घ्यायला पायजे ना? मग आपण तिघी मस्त साखळी करून येत जाऊ शाळेत." मी खूष! पंक्या हुषारच आहे.

असं मी त्याला संध्याकाळी म्हणलं, तर डोक्यावर जोरात खारीक देऊन म्हणला, "गमतींसारख्या आणि डब्यासारख्याच मैत्रिणीपण शेयर करायच्या असतात बेस्ट फ्रेंडशी, यडपट!" आणि हसला गेटकडं बघून. मी बघितलं तर किल्ली सायकल लाऊन गेटमधून आत येत होती.

- sanghamitra