सम

वैदेहीने गाडी इमारती समोर आणून लावली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. रात्री अपरात्री ती निशिकांतला विमानतळावर सोडायला-आणायला अनेक वेळा गेली होती. दिल्ली तिला आता नवीन राहिली नव्हती.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा निशिकांतला एका सॉफ्टवेअर फर्मने चांगली लठ्ठ पगाराची नोकरी आणि इतर सुखसोयींबरोबर घरही देण्याची ऑफर दिली, तेव्हा दोघांनी मिळून मंबई सोडून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला होता. ट्रॅव्हल एजन्सी मधली आपली नोकरी सोडून वैदेही दिल्लीला जाण्यासाठी स्वत:हून तयार झाली होती.

दार उघडून आत येऊन तिनं स्वत:ला सोफ्यावर झोकून दिलं. डोक्यावर गरगरणार्‍या पंख्याकडे बघत ती कितीतरी वेळ बसून होती. विचार करून करून ती शिणली होती. जे घडलं ते का घडलं आणि यात चूक कुणाची? मुळात चूक तरी म्हणायची का? प्रश्न आणि नुसतेच प्रश्न. उत्तर नसलेले. स्वतःच स्वत:ला विचारलेले. पण उत्तरं तिची तिलाच शोधायला हवीत, नाही का? तिनंच स्वतःला या गुंत्यात अडकवून घेतलं होतं. रेशमाची लड गुंडाळावी, तशा सगळ्या घटना, सगळ्या भेटी, सगळी बोलणी सगळं हसणं, ... सगळंच तिच्या भोवती गुंडाळत गेलं. इतकं की त्याचं टोक सापडेना. हा गुंता उकलावा, तर सुरुवात कुठून करावी? अगदी सुरुवातीपासून.

दिल्लीला आल्यावर वैदेहीला सगळं नवीन होतं. मुंबईतही निशिकांतचे, तिचे मित्रमंडळी, नोकरीतले सहकारी, अधिकारी यांच्या बरोबर पार्ट्या होत होत्या. पण ते सारं वातावरण वेगळं होतं. सगळे आपले वाटत होते. दिल्लीला आल्यावर निशिकांतच्या office च्या सहकार्‍यांच्या पहिल्याच पार्टीत वैदेही बुजून गेली. कॉर्पोरेट विश्वातल्या मोठमोठ्या हुद्द्यांवरच्या लोकांशी तिचा ट्रॅव्हल एजन्सीत संबंध आला होता,पण तो तेवढ्यापुरता. या पार्टीत मात्र त्यांच्याशी, कुणी निशिकांतचा सहकारी म्हणून तर कुणी बॉस म्हणून बोलताना, हसताना, हात मिळवताना तिला दडपण आलं होतं. कडक सुटाबुटातली माणसं आणि डिझायनर साड्या, वेस्टर्न आऊटफिट आणि दागिने घातलेल्या बायका किती सहजणे वावरत होत्या! हातात वाईनचे ग्लास घेऊन किती सहजपणे गप्पा मारत होत्या! मेहता, सुब्रमण्यम, कपूर ,सिंग, अग्रवाल यांच्या बायकांसारखी ती या विश्वात मुरलेली नव्हती. ते राजकारणी बोलणं, एकमेकांना शालजोडीतले टोमणे मारणं, डिझायनर दागिने, कपडे यांच्या विषयी गप्पा मारणं ... वैदेही पार्टीत गप्प गप्पच असायची. निशिकांत मात्र अगदी सहजपणे वावरत होता. वैदेहीला या वातावरणात रुळायला वेळ लागेल याची त्याला पूर्ण जाणीव होती.

डोकं सुन्न झालं तेव्हा वैदेही उठली आणि बेसिनवर जाऊन तिने गार पाण्याचे हबकारे तोंडावर मारले. बेसिनमध्ये वाहून चाललेल्या पाण्यासारखे सगळे प्रश्न गोलगोल एकत्र गोळा होऊन वाहून गेले तर किती बरं होईल ना! तिने स्वयंपाकघरात जाऊन चहाचं आधण ठेवलं.

जसजसा वेळ जात गेला, तशी वैदेहीला कॉर्पोरेट विश्वाची ओळख आणि सवय होत गेली. ती तेवढ्यापुरतं साजरं करून घ्यायची. एकदा मेहता निशिकांतला म्हणालाही होता," Your wife is too shy, Deshpande. वो तो drinks भी नहीं लेतीं. कुछ सिखाओ यार उनको!" निशिकांतने मात्र तिला कधी आग्रह केला नाही. महिन्यातून त्याच्या अनेक फेर्‍या दिल्ली बाहेर होत होत्या. कधी दोन-तीन दिवस, तर कधी आठ-दहा दिवस. वैदेहीने एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोकरी करायला सुरवात केली. ती दिल्लीत रुळली होती.

वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन वैदेही गच्चीत येउन उभी राहिली. सगळीकडे सामसूम होती. खाली गुरखा खुर्चीवर बसून पेंगत होता. इमारतीच्या ८व्या मजल्यावरून सगळं विश्व ती न्याहाळत होती. या गाढ झोपी गेलेल्या विश्वात कुणी तिचं नव्हतं, आणि तसं म्हटलं तर होतंही. कुणी तिचे शेजारी होते, कुणी मैत्रिणी होत्या, कुणी नुसतेच ओळखीचे होते. पण खरंच तिचा कुणी असेल, तर तो फक्त निशिकांत होता. त्याच्यावर तिचं निस्सीम प्रेम होतं. तिच्या कुठल्याही वागण्याने, निर्णयाने जर त्याला त्रास होणार असेल, तर ते तिला नको होतं. तिने मुद्दाम त्याला दुखावण्यासाठी काही केलं नव्हतं.

त्या दिवशीही ती काही मुद्दाम कारण काढून अनुरागच्या शेजारी जाऊन बसली नव्हती. पार्टीत तिला कंटाळा आला होता. सॉफ्ट ड्रिन्कचा ग्लास घेऊन ती स्पीकरच्या शेजारी जाऊन बसली. तिथे तिला शांतपणे बसून पंडित शिवकुमार शर्मांचं संतूर वादन एकता येत होतं. ती अगदी तल्लीन झाली होती. तिला कुणीतरी हसल्या सारखं वाटलं म्हणून तिने वळून बघितलं, तर तो टेबलाच्या दुसर्‍या टोकाला बसून हसत होता. तिचं लक्ष गेल्याचं पाहताच तो वरमला. " Sorry, आप इतनी डूब गयी थीं उस संगीत में, की आप बैठे बैठे खुद बजा रही थीं, मुझे हँसी आ गयी. Please don't mind." तिलाही हसू आलं. त्याला कधी बघितलं नव्हतं आधी, म्हणून मग परिचयाचे सोपस्कार झाले. तसा दिल्लीचाच असूनही शिकायला मुंबईत आल्यामुळे त्याला बरंचसं मराठी येत होतं. नुकताच शिकून बाहेर पडलेल्या त्याला, campus placement मधून या कंपनीत नोकरी मिळाली होती. त्या दिवशी वैदेहीला अनुराग शर्मा नावाचा नवा मित्र मिळाला. सुरवातीच्या 'Madam' पासून, एकेरी संबोधनापर्यंत त्यांची मैत्री येऊन पोचली.

'मित्र मित्र' म्हणजे तरी काय आणि कोण? ज्याच्याशी बोलायला, ज्याच्याबरोबर वेळ घालवायला आपल्याला आवडतं. ज्याला आपली काळजी आहे, आपल्या आवडीनिवडी, त्याच्याशी असलेल्या मतभेदांसकट जो स्वीकारतो, जो आपल्याला खरंच आपला वाटतो.. मग अनुराग या सगळ्या व्याख्येत बसतो नं! त्या नंतरच्या पार्ट्यांमधे वैदेही कंटाळली नाही. त्याच्याशी मस्त गप्पा मारता यायच्या. इतरही कधी तो भेटला तर त्याच्या बरोबर एखाद्या कॅफे मधे जाऊन मस्तपैकी कॉफी आणि सँडविच खात अनेक विषयांवर गप्पा मारताना कधी दडपण आलं नाही. आपलं कुठे चुकतंय असं वाटलं नाही.

मी असं काय केलं म्हणून हे सगळं घडलं? या प्रश्नापाशी येऊन वैदही गोल गोल फिरत होती. कधी मधे त्याचा ओझरता स्पर्श झाला असेलच ना! तेव्हा आपल्याला काहीच जाणवलं नाही?

निशिकांत असताना तो अनेकदा घरी येतो. कितीदा तरी त्याला घरी जेवायला बोलावलं आहे. त्याला आवडतात म्हणून खास मराठी पदार्थ बनवले. तो नेहमीच दोघांशी आदराने बोलतो. निशिकांतला 'सर'च म्हणतो. निशिकांत कधी कधी त्याला म्हणतो देखील, "तू हिला वैदेही म्हणतोस आणि मला सर.. असं का रे?" त्याचं नेहमी प्रमाणे उत्तर तयार, " वो क्या है न सर, इनके साथ जरा दोस्ती गहरी है. आप तो मेरे बॉस ही रहेंगे." तो डिपार्टमेंट मधेच ज्युनियर आहे नं. कधी निशिकांत टूरवर असला तरी अधून मधून येऊन जातो घरी. त्याच्या बहिणीच्या लग्नालाही बोलावलं होतं, खास आग्रहाचं आमंत्रण देऊन.

तो निशिकांतचा ज्युनियर आहे... मग त्याच्याशी इतक्या मोकळेपणाने मैत्री करु नये, त्याच्या बरोबर कधी बाहेर जाऊ नये... अशी शंका त्या तिघांच्या मनात कधी आली नाही. का यावी? दोन व्यक्तींमधे मैत्री असू शकत नाही? आपल्या नवर्‍याच्या ऑफिसमधील कनिष्ठ अधिकार्‍याबरोबर आपली मैत्री असू नये .. असं कुठल्या नियमात लिहिलेलं आहे? वैदही आणि तो अनेक बाबतीत सारखेच होते. दोघांना गाण्यांची आवड होती, साधं सरळ रहाणं पसंत होतं, घरगुती वातावरणात वाढलेले दोघेही छानछोकीला, झगमगाटाला बघून दडपून जायचे.

निशिकांतला कधी आक्षेप नव्हता या मैत्रीवर. तो इतक्या संकुचित विचारांचा नक्कीच नव्हता. वैदेहीने आपलं आयुष्य आपल्या आवडीने जगावं असं त्याचं ठाम मत होतं. तो नसतानाही, तिच्या अनुराग बरोबर संगीताच्या मैफिलींना जाण्याने त्याच्या मनात कुठलाच किंतु आला नाही. त्याचा वैदेहीवरही पूर्ण विश्वास होता. तिच्यावरच्या प्रेमाआड असल्या क्षुल्लक बाबी कधी आल्या नाहीत.

त्या दिवशीही दोघे असेच मस्त गझलच्या कार्यक्रमाहून परतत होते. निशिकांत कामात अडकून पडला आणि येऊ न शकल्यामुळे हळहळला होता. कार्यक्रम सुंदरच झाला. वैदेही अगदी खुशीत होती. अनुरागने गाडी काढली तेव्हा निशिकांतचा फोन वाजला. 'निघालोच आहोत, आल्यावर सांगेन सगळा वृत्तांत' म्हणून तिने फोन ठेवला. अनुरागने एकवार तिच्याकडे बघितलं आणि गाडी गियर मधे टाकली. वैदही आपल्याच तंद्रीत गुणगुणत होती. अनुरागने गाडी बाजूला घेतली आणि ब्रेक मारला. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं. तो काहीच बोलेना. तेव्हा तिने विचारलं, " क्या हुआ? गाडी क्यूँ रोक दी?"
" वैदेही, कुछ कहना चाहता हूँ."
"बोल, काय?"
"कसं बोलू तुझ्याशी, कळत नाही. पण आज हिंमत करतोच. "
"....."
"वैदेही, तुम बहोत सुंदर हो. तुझ्यासारखी मुलगी मी आज पर्यंत बघितली नाही. तुझ्या बरोबर असतो तेव्हा मी पवित्र होऊन जातो."
अनुराग काय बोलतोय ,त्याला काय प्रतिक्रिया द्यावी ... तिला कळेना.
" अनुराग, मी विवाहित आहे आणि तुझ्या पेक्षा दहा वर्षांनी मोठी आहे. माहित आहे ना?" शेवटी इतकंच ती म्हणाली.
" मला माहीत आहे, कळतंय मला, पण काय करु? तुम मुझे बहोत अच्छी लगती हो."
वैदेहीने स्वतःला सावरलं. अनुराग कुणी असा तसा मुलगा नव्हताच मुळी. इतके दिवस ती ओळखत होती त्याला. तो तिला सांगत होता त्या त्याच्या भावना होत्या. वास्तविक तिने चिडून त्याच्या एक सणसणीत वाजवली असती, तरी ते चूक नव्हतं. कदाचित तिने तेच केलंही असतं. याची हिंमत कशी होते माझ्याशी असं काही बोलायची? पण का कोण जाणे, तिने असं काही केलं नाही.
ती शांतपणे म्हणाली, "देखो, तुम गलती कर रहे हो. "
"वैदेही, मी चुकतोय का बरोबर आहे याचा मी विचार करत नाही. माझ्या मनात जे होतं ते सांगतोय. तू माझ्या बॉसची बायको आहेस हे ही मला माहीत आहे. "
दोन शिकल्या सवरलेल्या, स्वत:वर पूर्ण विश्वास आणि ताबा असलेल्या व्यक्ती एकमेकांशी बोलत होत्या.
"वैदेही, अगदी स्पष्टच सांगायचं तर,.... मुझे तुमसे प्यार हो गया है. मला जात-पात, वय कशाची पर्वा नाही."
" हे तुझं वय बोलतंय. तू लहान आहेस अजून. मला मान्य आहे, तुला कदाचित माझ्याबद्दल आकर्षण वाटत असेल. पण ते खरं नाही. तू शांतपणे विचार कर. तुलाही पटेल हे. आता उशीर फार होतोय. आपण निघालं पहिजे. तू करशील drive, की मी करु?"
"पण..."
"या विषयावर आपण नंतर कधीतरी बोलू, तू नीट विचार कर, मग."
वैदही आता काही बोलणार नाही हे लक्षात आल्यावर अनुरागने एक खोल निश्वास सोडला आणि गाडी चालू केली. संपूर्ण रस्ताभर कुणी कुणाशी बोललं नाही.

निशिकांतने दार उघडलं तेच उत्सुकतेने. त्याला मैफिलीचा वृत्तांत हवा होता. वैदेही काही न बोलता हसली फक्त आणि त्याच्या मिठीत शिरली.

दोन दिवस वैदेहीच्या डोक्यात सारखे अनुरागचे शब्द घुमत होते. आपण किती शांतपणे वागलो याचं तिला स्वत:ला आश्चर्य वाटलं. आपण बरोबर केलं, का एक घाव दोन तुकडे करून त्याला त्याच्या वर्तनाची चांगली शिक्षा द्यायला हवी होती? कुणास ठाऊक? एखाद्या व्यक्तीने आपल्या भावना प्रकट केल्या तर त्याची त्याला शिक्षा करावी? ते तर ती अजूनही करू शकते. त्याच्या विरूद्ध तक्रार करून. पण खरंच त्याची गरज आहे का? त्याचं सगळ करिअर पणाला लावायचं? त्याने चूक केली असेल! खरंच केली का? असली तरी त्याची काय शिक्षा मिळावी त्याला? वैदेहीला काही सुचेनासं झाल. अनुराग एक चांगला, समजूतदार आणि हुशार मुलगा होता. एखाद्या व्यक्तीला दुसर्‍या एखाद्या व्यक्तीबद्दल काय वाटावे, याचे कुठे नियम असतात का? त्याच्यावर कुणाचं बंधन असत नाही, की जबरदस्तीही असत नाही. मी असं काय केलं म्हणून अनुरागला माझ्याविषयी अशा भावना उत्पन्न झाल्या? म्हणजे, यात माझीही चूक आहेच? या सगळ्या प्रश्नांनी वैदहीचा चांगलाच पिच्छा पुरवला होता.

अनुरागचा त्या दिवशी नंतर फोनही आला नाही. आपण फोन करावा का? असाही विचार एकदोनदा वैदहीच्या मनात डोकावून गेला. निशिकांतला सगळं सांगून टाकावं असं तिला सारखं वाटत होतं. पण नाही सांगितलं. तिचा निशिकांतच्या समजूतदारपणावर पूर्ण भरवसा होता. पण, हे सारं त्याला कळण्याची खरंच गरज आहे का? याचा निर्णय तिला करता येईना.

दोन दिवसांनी दुपारी ऑफिस मधे तिचा फोन वाजला. अनुरागचा नंबर तिने ओळखला. घ्यावा का नाही या विचारातच तिने फोन उचलला.
"तू माझा फोन घेशील याची खात्री नव्हती मला. माझ्याशी बोलण्याची तरी तुझी तयारी आहे त्याबद्दल थॅन्क्स.
"मी इथे ऑफिसमध्ये तुझ्याशी काही बोलू शकत नाही. संध्याकाळी भेट, मग बोलू शांतपणे." आपण त्याला पुन्हा भेटायचं का कबूल केलं? पण या सगळ्याचा काहीतरी शेवट करायलाच हवा.

संध्याकाळी ती कॅफेमध्ये शिरली तेव्हा अनुराग आधीच एका कोपर्‍यातल्या टेबलावर बसला होता. दोघांमधील तणाव सहज कळत होता. तिला पाहताच तो उठून उभा राहिला. दोघेही बसले आणि कॉफीची ऑर्डर दिली.
"आता बोल. अजून काय म्हणणं बाकी आहे."
"मी तुला फार दुखावलं आहे ना? त्याच्या बद्दल मी माफी मागतो. माफ करायचं की नाही ते तू ठरव. खरं सांगू, मी त्यादिवशी घरी गेल्यावर खरंच नीट विचार केला. तू म्हणतेस ते कदाचित खरं आहे. आणि तेव्हा मला हेही जाणवलं की तिथे तुझ्याऐवजी दुसरी कोणी असती तर तिने इतक्या शांतपणे माझं ऐकूनही घेतलं नसतं आणि मला समजावलंही नसतं. मी त्या दिवशी माझ्या गालावर चार बोट मिरवतच घरी पोहचलो असतो आणि आज बेरोजगार असतो."

त्या ताणलेल्या परिस्थितीतही वैदेहीला हसू आलं. दोघांतला ताण एकदम सैल झाल्या सारखा वाटला.
"अनुराग, वाईट तर मला वाटलंच. आपल्या मैत्रीचा तू असा अर्थ काढावास ते माझ्या फार मनाला लागलं. पण तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. कुठलही वेडवाकडं पाऊल उचलणार नाहीस याची मला खात्री आहे."
"इतकं होऊनही तू माझ्यावर विश्वास ठेवतेस, यातच सारं आलं. मी तुला प्रॉमिस करतो, या पुढे असं माझ्या हातून काही घडणार नाही ज्यामुळे तुलाच काय , कुणालाही त्रास होईल. पण एक वाक्य त्या दिवशी मी बोलून गेलो, आज ते फारच फिल्मी वाटतंय, तरी खरंय. वैदेही, तुझ्याबरोबर मी खरंच पवित्र होऊन जातो."
"चल, आता डायलॉगबाजी बंद कर आणि शिक्षा भोगायला तयार रहा."
"तू म्हणशील ते मी भोगायला तयार आहे."
"तर मग आता बिल तू भर, मला निघायला हवं आता. निशिकांतची आज १२.३० ची फ्लाईट आहे. घरी जाऊन त्याची तयारी करायची आहे अजून."
इतक मोठं डोक्यात भिरभिरणारं वादळ, दोन मिनिटात शांत झालं!?
संध्याकाळी सामान आवरून, जेवणं आटपून ती आणि निशिकांत कॉफीचे मग घेऊन बसले तेव्हा ती म्हणाली,
"निशिकांत, तुला काही सांगायचंय." तिनी सगळं पहिल्यापासून त्याला सांगितलं तेव्हा तिला हलकं हलकं वाटलं. त्याला सांगावं का नाही या प्रश्नाचा तिने शेवटी निर्णय घेतला होता. तिचं सगळं त्याने शांतपणे ऐकून घेतलं. तो काहीच बोलला नाही. तिला फक्त जवळ घेतलं आणि दोघं कितीतरी वेळ तसेच बसून होते. निशिकांतला काही बोलण्याची गरज नव्हती.

पाचाचे कुठेतरी टोले पडले तेव्हा वैदेही जागी झाली. तिला गच्चीतच खुर्चीवर झोप लागली होती. नवीन दिवस उजाडला होता. काल निशिकांतच्या आश्वासक मिठीत ती सुखी झाली होती. कुठूनतरी भैरवीचे स्वर तरंगत येत होते. आरोहातल्या स्वरांपेक्षा तिला अवरोहातले उलट जाणारे सगळे स्वर जास्तच स्पष्ट ऐकू येत होत. सगळेच्या सगळे अगदी पक्के लागले होते. प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा, जे घडलं त्यामुळे नवीन प्रश्न तयार होऊ नयेत म्हणून अगदी अचूकपणे समेवर येणं तिला जमलं होत. डोक्यात भिरभिरणार्‍या प्रश्नांना तिने त्या अवरोहातल्या स्वरांबरोबर समेवर नेऊन सोडल तेव्हा फोनची रिंग वाजली. भैरवीतले सगळे स्वर गोळा करून ती निशिकांतचा फोन घ्यायला घरात शिरली.

- pama