क्रिकेटमधली दादागिरी

भारतीय क्रिकेटमध्ये या दशकात जेवढे बदल झाले तेवढे प्रचंड बदल आधीच्या कित्येक दशकांत झाले नसतील. हा त्याचाच आढावा. तसेच येथून पुढे भारतीय क्रिकेट कोठे जाऊ शकते याचाही अंदाज करण्याचा एक प्रयत्न!

आधीचे दिवस
२००० सालच्या सुरूवातीला भारतीय क्रिकेटची अवस्था 'मागील पानावरून पुढे चालू' अशीच होती. भारतातील सामने म्हणजे फिकट तपकिरी रंग भरून दिसणारी मैदाने, पाटा किंवा पहिल्याच दिवशी दुष्काळी जमिनीसारख्या दिसणार्‍या व फिरकीला साथ देणार्‍या खेळपट्ट्या, चेंडू स्विंग होणार नाही व गुडघ्याच्या वर उसळणार नाही हे माहीत असल्याने कसेही खेळणारे फलंदाज, अशा मैदानावर खेळण्याची सवय नसलेल्या परदेशी संघांना हरवणे. मग अधूनमधून येणारे परदेश दौरे व तेथे चेंडू उसळतो किंवा स्विंग होतो हे दर सामन्यात नव्याने कळल्यासारखे खेळणारे खेळाडू. काही अपवाद वगळता दर वेळेस खाल्लेला मार. हे चित्र गेली कित्येक दशके चालू होते आणि २०००च्या सुरूवातीपर्यंत तसेच होते. संघनिवडही नेहमीप्रमाणे 'मुंबईचे चार, कर्नाटकचे दोन, दिल्लीचे दोन, एक निवडसमितीच्या अध्यक्षाच्या विभागातला, एक कोणत्यातरी पदाधिकार्‍यांना मत मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या विभागातला' अशा पद्धतीने चाले. त्यामुळे घरी बरेचसे विजय व बाहेर सपाटून पराभव हे ठरलेले!

एकूण व्यवस्थेतसुद्धा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन देशांतील क्रिकेट मंडळांची हुकूमत सर्वत्र चालायची. मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूला शिव्या घालायच्या व रात्री त्यांच्याचबरोबर बारमध्ये बिअर पीत त्या परतवायच्या ही परंपरा. त्या शिव्या भारतीयांना न चालल्यामुळे त्यांनी दिलेली प्रत्युत्तरे त्यांच्या चालवून घेण्याच्या व्याख्येत बसत नसत. क्रिकेटच्या आर्थिक नाड्या हातात असल्याने दोन्ही संस्कृतींमधील फरक लक्षात घेण्याची गरज आयसीसीच्या लोकांना पडत नसे. यात मग साहजिकच भारत, पाकिस्तान, श्रीलंका वगैरेच्या खेळाडूंना पक्षपाती वागणूक सहन करावी लागे. १९९७च्या एका सामन्यात राहुल द्रविडने एक षटकार मारल्यावर (त्याला स्वत:ला वाटलेले आश्चर्य ओसरण्यापूर्वीच) ऍलन डोनाल्डने त्याच्याकडे बघून केलेले हावभाव हे याचे उत्तम उदाहरण. भारतीय खेळाडूंना अशी 'ट्रीटमेंट' बर्‍याच वेळा मिळे व ती ऐकून घेतली जाई, तसेच रेफ्री वगैरे मंडळींकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाई.

तसे भारतात तोपर्यंत केबल वगैरे नुकतेच स्थिरावू लागले होते व भारतात वाढणारा प्रचंड मध्यमवर्ग, त्याच्यापुढे दाखवली जाणारी नवनवीन टीव्ही चॅनेल्स, क्रिकेट खेळाडूंची वाढती लोकप्रियता व त्यांचा वापर करून आपले उत्पादन प्रेक्षकांसमोर आणण्याची स्पर्धा हे सर्व सुरू झाले होते. १९८७च्या विश्वचषकानंतर भारतीय उपखंडातील क्रिकेट मंडळे एकत्र येऊन मतदानाच्या जोरावर स्वत:ला सोयीचे निर्णय पदरात पाडून घेऊ शकतात हे कळले होते. पण या ताकदीचा अजूनही वापर केला जात नव्हता.

एकूण जागतिक क्रिकेटमध्ये भारत मैदानावर फक्त स्वत:च्या घरी वाघ आणि मैदानाबाहेर तर पूर्णपणे लिंबूटिंबू होता. इतर संघातील खेळाडूंनी कसेही वर्तन करावे, रेफ्रींनी व पंचांनी पक्षपाती निर्णय द्यावेत व भारतीय मंडळाने व खेळाडूंनी ते ऐकून घेऊन गप्प बसावे अशी साधारण परिस्थिती होती. प्रत्यक्ष मैदानावरही आक्रमकतेची पहिल्यापासूनच सवय नव्हती.

या सुमारास संघातही नुकतेच बरेच बदल झाले होते. केवळ घरी जिंकल्यामुळे सर्वात यशस्वी समजला गेलेला अझरुद्दीन निवृत्तीच्या मार्गावर होता. सचिन तोपर्यंत जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज झाला होता पण दोन वेळा कप्तान म्हणून अपयशी ठरला होता. संजय मांजरेकर, सिद्धू वगैरे खेळाडूही बाहेर जात होते. द्रविड व गांगुली स्थिरावले होते.

दादा आणि राईट
मग २०००च्या सुरूवातीला ते मॅच फिक्सिंगचे मोठे नाट्य घडले. दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंनी पैसे घेउन मॅच हरल्याचे आरोप झाले, त्यांतील काही खरेही ठरले. बर्‍याच देशातील खेळाडू यात होते. भारतात अझर, जडेजा वगैरे खेळाडू संघातून बाहेर गेले. मागच्या काही वर्षात काही वेळा मैदानावर घेतलेले अनाकलनीय निर्णय किंवा हातात असलेले सामने घालवण्याची खरी कारणे आता लोकांना कळली. एकूणच क्रिकेटमधला लोकांचा इंटरेस्ट एकदम कमी झाला. संघही नुकताच ऑस्ट्रेलियात मार खाऊन आला होता. या दौर्‍यावर कप्तान म्हणून अपयशी ठरलेल्या सचिनने कप्तानपद सोडले. आणि त्यामानाने नवखा असलेल्या सौरव गांगुलीकडे ते देण्यात आले. काही दिवसांनी न्यूझीलंडचा जॉन राईट हा भारतात प्रशिक्षक झाला. हे दोन बदल भारतीय क्रिकेट वर सर्वात मोठा आणि चांगला परिणाम करणारे ठरले!

"माझ्याकडे कोणतीही जादूची कांडी नाही," असे सुरूवातीला स्पष्टपणे सांगणारा सौरव गांगुली ("दादा") कप्तान झाल्यापासून खरोखरच जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे बदल होऊ लागले. जॉन राईटनेही बर्‍याच गोष्टीत बदल घडवले. संघाचा सराव, दौर्‍यातील एकूण व्यवस्था, प्रसार माध्यमांची हाताळणी, फिटनेस व एकूणच शारीरिक कौशल्य वाढवण्यासाठी त्यातील तज्ञ माणसे आणणे, मालिकेपूर्वीचे व दरम्यानचे डावपेच, कॉम्प्यूटर वर केलेल्या अनॅलिसीस चा वापर करणे वगैरे बर्‍याच नवीन गोष्टी चालू झाल्या.

गांगुलीला संघ निवडीमधली कोटा सिस्टीम बंद करता आली नाही तरी त्याने बरेच बदल केले. निवडीबद्दल थोडाफार पक्षपात सगळेच करत असतील, पण गांगुलीबद्दल असे म्हटले जाते की केवळ त्याला मान देतो म्हणून एखाद्याला संघात घ्यायचे असा प्रकार त्याने केला नाही. त्याला जे खेळाडू चांगले वाटले त्यांच्या बाजूने तो कायमच निवड समिती समोर ठामपणे उभा राहायचा. युवराज सिंग, हरभजन सिंगपासून ते अगदी धोनीपर्यंत त्याने वेळोवेळी पाठिंबा दिलेले खेळाडू आज भारताच्या संघात मोठे खेळाडू झालेले आहेत. केवळ एक दोन सामन्यात वाईट खेळला म्हणून एखाद्या खेळाडूला लगेच डच्चू द्यायचे धोरण गांगुलीने कधीच केले नाही. त्याने स्वत: अशा वागणुकीचे परिणाम भोगले होते त्यामुळे तो इतरांवर तशी वेळ येऊ नये हे नेहमीच जाहीरपणे सांगत होता व त्याप्रमाणे वागत होता. विनोद कांबळी (२००० मधे), दिनेश मोंगिया (२००३मध्ये) आणि अशा इतरांना एवढ्या संधी इतर कप्तानांबरोबर क्वचितच मिळाल्या असत्या.

यातून वर्षभरात जो नवीन संघ तयार झाला त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पूर्वी नसलेला आदर मिळाला. आता भारत 'बाहेर'ही सामने जिंकू लागला. पूर्वी आपण बाहेर जिंकायचो म्हणजे जेव्हा 'फिरकी' चालायची तेव्हाच! मेलबोर्न-१९८१ वगैरे सारखा एखादा अपवाद. आता हेडिंग्ले, ऍडलेड, जोहान्सबर्ग आणि यावर्षी तर पर्थ अशा ठिकाणीसुद्धा भारत जिंकू लागला. वेगवान खेळपट्यांवर भारताशी खेळणे आपल्याच अंगावर उलटू शकते याची भीती इतर संघांना वाटू लागली. अर्थात लगेच भारताचा 'ऑस्ट्रेलिया' झाला नाही, कारण जितक्या वेळा चांगले खेळणार तितक्या वेळा वाईटही खेळतच होतो आपण (ते नेहमीच होत होते, पण आता चांगला खेळही दिसू लागला). त्यामुळे अजून फारशा मालिका जिंकलेल्या नाहीत, पण एकूण प्रगती बघता हळूहळू तेही होऊ लागेल असे वाटते. आणि मुळात या देशात कसोटी सामने जिंकणे हेच किती दुर्मिळ होते हे आपल्याला यावरून कळेल: १९३२ साली खेळायला लागल्यापासून २०००च्या मार्चपर्यंत भारताने बाहेर खेळलेल्या १५६ पैकी फक्त १३ कसोटी सामने जिंकले होते. आता फक्त गेल्या ८ वर्षांत ५२ पैकी १८ जिंकले आहेत. यातील बांगलादेश व झिम्बाब्वे विरुद्धचे वगळले तरी ५२ पैकी ११ हे प्रमाण आधीपेक्षा बरेच चांगले ठरेल. या आठ-साडेआठ वर्षांत एक न्यूझीलंड सोडल्यास इतर सर्व देशात भारताने किमान एक सामना जिंकला. ज्यांनी पूर्वी इम्रान, झहीर अब्बास, मियांदाद वगैरेंच्या काळात भारत पाक सामने बघितले असतील त्यांना चांगले लक्षात असेल की पाकमधे जाऊन आपण कसोटी मालिकाच काय पण एखादा सामनासुद्धा जिंकू असे तेव्हा कधीही वाटले नाही. ती कामगिरी भारताने २००४ मध्ये केली. पूर्वी इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील 'ऍशेस' ही मालिका कसोटी क्रिकेट मधली सर्वांत चुरशीची व लोकप्रिय मानली जायची. आता भारत व ऑस्ट्रेलियामधील 'बोर्डर गावस्कर' ट्रॉफी मानली जाते.

२००३च्या विश्वचषकातील कामगिरी, २००१ची ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकलेली मालिका, पुन्हा २००३-०४ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळलेली मालिका आणि २००४मध्ये पाकिस्तानात पहिल्यांदाच जिंकलेली मालिका हे याकाळातील संस्मरणीय विजय. हे असेच वाढत गेले तर भारत लौकरच ऑस्ट्रेलियाशी बरोबरी करेल असे त्यावेळी वाटू लागले.

घसरण
पण २००४ च्या उत्तरार्धात काहीतरी गडबड झाली. बर्‍याच खेळाडूंचा फॉर्म एकदम घसरला. तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण व गांगुली सातत्याने अपयशी ठरू लागले. गांगुलीचे कप्तानपदही धोक्यात आले व शेवटी प्रशिक्षक बदलल्यावर (ग्रेग चॅपेल) गांगुलीला बाहेर जावे लागले. राहुल द्रविड कप्तान झाला व ग्रेग चॅपेल प्रशिक्षक. पण त्यांचे बरेचसे प्रयत्न एकतर फसले किंवा ते पूर्णपणे अंमलात आणू शकले नाहीत. मध्ये २००६च्या शेवटी दादा संघात आला व पुन्हा जबरदस्त यशस्वी ठरला. पण २००४ जुलै ते २००७ एप्रिलपर्यंत एक वेस्ट इंडीजमधली मालिका सोडली तर भारताने विशेष काही जिंकले नाही. त्यामुळे असे वाटते की २००४ च्या एप्रिल पर्यंत भारत ज्या स्थितीत आला होता तेथून पुढे जाण्यासाठी ज्या वेगळ्या नेतृत्वाची गरज होती ते मिळाले नाही. अशी मधली २-३ वर्षे खराब गेल्यावर २००७च्या मध्यापासून भारताची कामगिरी आता पुन्हा सुधारली आहे.

यात आता ट्वेंटी-२० नावाचे २० षटकांचे नवीन सामने सुरू झाले आणि २००७मध्ये पहिलाच विश्वचषक भारताने जिंकला. यात नेहमीचे 'सिनीयर्स' वगळून सर्व तरूण खेळाडू होते. 'चपळ व आक्रमक' असा हा संघ आहे. कप्तानही महेंद्र सिंग धोनी हा या पिढीचे खर्‍या अर्थाने प्रतिनिधीत्व करणारा खेळाडू, तो आता एक दिवसाच्या सामन्यांच्या संघाचाही कप्तान आहे व बहुधा १-२ वर्षांत कसोटी संघाचाही होईल.

सध्याचा भारतीय संघ हा दहा वर्षांपूर्वीच्या म्हणजे १९९८च्या संघापेक्षा एकदम वेगळा आहे, ते केवळ बरेच खेळाडू नवीन आहेत म्हणून नाही. आपण कोणत्याही संघापेक्षा कमी नाही, आपण कोणालाही कोठेही हरवू शकतो, त्यांच्यापेक्षाही आपण जास्त आक्रमक होऊ शकतो, आपणही त्यांना मैदानावर डिवचू शकतो असा आत्मविश्वास असलेला हा संघ आहे. भारत असा माझ्या आठवणीत कधीच नव्हता.

बदलती समीकरणे
जागतिक क्रिकेटची आर्थिक समीकरणे तर मागच्या दशकात पार बदलून गेली आहेत. आयसीसी आज कोणताही निर्णय बीसीसीआयला विश्वासात घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही. जागतिक क्रिकेटमधल्या उत्पन्नाच्या ८०% भाग भारतातून येतो. झपाट्याने वाढणारा मध्यम वर्ग, आय टी किंवा इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांत नोकरी करणारा व खिशात खेळता पैसा असलेला आणि तो खर्च करायची तयारी असलेला तरूण वर्ग हे दोन गट भारतातील व परदेशातील पण भारतीय बाजारपेठ काबीज करू पाहणार्‍या कंपन्यांच्या दृष्टीने सोन्याची खाण आहेत. त्यांच्यापर्यंत ते प्रामुख्याने क्रिकेटर्स असलेल्या जाहिरातींमधून आपली उत्पादने पुढे आणत असतात.

क्रिकेटची लोकप्रियता भारतात वादातीत आहे. आयपीएल सारख्या कल्पनांमुळे त्यात आणखी भर पडत आहे. कसोटी व एक दिवसाचे सामने जरी प्रचंड लोकप्रिय असले तरी आणखी बरेच लोक कामामुळे ते बघू शकत नाहीत. येथे आयपीएलने मोठा फरक घडवून आणला. तीन-साडेतीन तासाचे सामने, जागतिक क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू, मसालेदार प्रक्षेपण, छोटी मैदाने व वीस षटकांत केली जाणारी प्रचंड धुलाई हे लोकांना टीव्ही समोर खिळवून ठेवू लागले. आता मॅच सोमवारी असली तरी कामावरून घरी येऊन संध्याकाळी ती पूर्णपणे बघता येते. मुळात भारतात कोणत्याही मैदानावर कोणताही साधा सामना चालू असेल तरी थोडेफार लोक तो पाहताना सहज दिसतात. येथे तर जागतिक क्रिकेट मधले अत्यंत लोकप्रिय खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळतात. त्यामुळे आणखी लोकांनी ते बघण्याची, त्यामुळे टीव्हीवर 'टी आर पी' वाढण्याची व त्यामुळे जाहिरातींना जास्तीत जास्त रेट मिळण्याची खात्री आहे.

त्यात पुन्हा गेल्या काही वर्षात भारतीय लोक परदेशात मोठ्या प्रमाणावर जाऊ लागले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या देशात भारताचे सामने असले की भरपूर गर्दीची खात्री असते. २००३च्या विश्वचषकातला भारत व पाक यांच्यादरम्यान झालेला सामना द. आफ्रिकेत झाला होता पण मैदान भारतीय व पाकिस्तानी प्रेक्षकांनी भरून गेले होते. खुद्द इंग्लंडचे क्रिकेट मंडळ पैसा उभा करण्यासाठी इंग्लंडमधे भारत व पाकमध्ये सामने भरवायच्या विचारात होते. मध्ये तसे काही झालेदेखील. अमेरिकेतूनसुद्धा सॅटेलाइट चॅनेल्समधून या सामन्यांना क्रिकेट खेळणार्‍या देशांमधून अमेरिकेत गेलेल्या सर्वांचा व प्रामुख्याने भारतीयांचा जोरदार प्रतिसाद मिळतो.

यामुळे भारतात व भारताबाहेरही मैदानात येणार्‍यांची व टीव्ही वरील प्रक्षेपण बघणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. सध्या क्रिकेट खेळणार्‍या देशांपैकी इतर कोणीही हे एवढ्या प्रमाणावर करू शकत नाही. आता इतर देशातील खेळाडूसुद्धा भारतातील जाहिरातींमधे असतात. या सर्व गोष्टींमुळे भारतीय खेळाडूंशी व बोर्डाशी सर्वांचेच हितसंबंध यापुढे गुंतलेले असणार व त्यामुळे बीसीसीआयला विरोधी भूमिका फार काळ कोणीही घेऊ शकणार नाही.

यावर्षीच्या सिडने टेस्टमधे जे झाले त्याने हे स्पष्टपणे जाणवते. हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाच्या ऍन्ड्र्यू सायमन्ड्सला 'monkey' ही कॉमेंट (त्याच्या ऍबॉरिजिनल वंशावरून) मारल्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार अत्यंत गंभीर आरोप ठेवून पुढचे सामने खेळण्यास बंदी घालण्यात आली. पूर्वी हे भारताने एखादा निषेध वगैरे करून शांतपणे ऐकून घेतले असते. पण यावेळेस कप्तान, बाकी संघ व बोर्ड हे हरभजनच्या बाजूने ठामपणे उभे राहिले व जाहीर मुलाखती व प्रसारमाध्यमांद्वारे पसरवल्या जाणार्‍या बातम्या वापरून ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळावर प्रचंड दबाव आणला. मैदानावरच्या कामगिरीनुसार ऑस्ट्रेलिया गेले कित्येक वर्षे सर्वात जबरदस्त संघ आहे व तेथे क्रिकेट लोकप्रियही आहे. पण यावरून भारताला दुखावणे ऑस्ट्रेलियालाही परवडणारे नाही. त्यामुळे यावर लवकरच सर्वमान्य तोडगा काढण्यात आला व हरभजन पुढचे सामनेही खेळू शकला. अर्थात पुढचा पर्थचा सामना दणदणीतपणे जिंकून भारताने ते मैदानावरही याची परतफेड करतात, हे दाखवून दिले.

साहजिकच इंग्लंड, ऑस्ट्रेलियातील लोकांना भारताचे हे नवे स्थान खुपते. त्यामुळे भारत पैशाच्या जोरावर अयोग्य गोष्टी आणत आहे वगैरे आरोप होत असतात. बीसीसीआय अचानक हातात आलेल्या या नवीन ताकदीचा अगदी योग्य उपयोग करत आहे असे नाही, पण हे आरोप करणार्‍या या देशांतही पूर्वी अशी प्रकरणे सोडविताना 'कमर्शियल' विचार झाला नसेलच असे नाही. त्यामुळे एका दृष्टीने पूर्वी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया जे करत होते ते आता भारत करतो असे म्हणता येईल.

पुढचे दशक
पुढच्या काही वर्षात ही ताकद अजूनच वाढेल असे दिसते. आयपीएलमध्ये खेळणार्‍या परदेशी खेळाडूंना त्यांचे स्वत:च्या संघाबरोबरचे दौरे सोडून आयपीएलमध्ये खेळावेसे वाटते. चॅंपियन्स ट्रॉफीसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून मिळणारा पैसा हा आयसीसीकडे जातो, याउलट आयपीएल पूर्णपणे बीसीसीआयची आहे. इतर अनेक देशांच्या मंडळांकडे पैशाचा तुटवडा आहे. श्रीलंकेच्या मंडळाने नुकताच बीसीसीआयबरोबर १० वर्षांचा करार करून आयपीएलमधे खेळायला त्यांचे खेळाडू नेहमी उपलब्ध असतील हे मान्य केले आहे. म्हणजे यापुढे आंतरराष्ट्रीय सामने असले तरी बीसीसीआय त्यांना आयपीएलमधे खेळण्यास भाग पाडू शकते. टेनिसमधे ज्याप्रमाणे विम्बल्डनचे महत्त्व आहे तसे क्रिकेटमधे आयपीएलचे होईल अशी चिन्हे दिसत आहेत. हे वीस वीस षटकांचे सामने वाढतच जाणार आहेत. कसोटी सामने म्हणजे उसळत्या खेळपट्टीवर जोरदार गोलंदाजी करणारे गोलंदाज, मोठी मैदाने, इतर प्रकारच्या सामन्यांच्या मानाने गोलंदाजांच्या बाजूने असणारे नियम यातून तासंतास लढत द्यायची तयारी आणि क्षमता असावी लागते. ट्वेंटी-२० ला मध्ये दिसेल तो चेंडू घुमवायचे कौशल्य जास्त महत्त्वाचे, फार फार तर तासभर फलंदाजी त्यामुळे स्टॅमिना वगैरे एवढा महत्त्वाचा नाही. या फरकामुळे दोन्हीकडे यशस्वी होणारे बरेचसे खेळाडू वेगळे असतील.

तसेच क्रिकेटमध्ये नव्याने येऊ पाहणारे १५-२० देश आत्तापर्यंत कोणत्याच महत्त्वाच्या स्पर्धांत खेळू शकत नसत, आता ट्वेंटी-२० मध्ये लवकर येऊ शकतात. भारत व इजिप्त ही मॅच कसोटीमधे सध्या अशक्य असली तरी ट्वेंटी-२० मध्ये २-३ वर्षांत होऊ शकते. म्हणजे पुढच्या दहा वर्षांत असे सामने खेळणारे आणखी बरेच देश असतील. म्हणजे तेवढे जास्त मार्केट!

प्रेक्षकांची प्रचंड संख्या व त्यांचा सतत पाठिंबा ही भारतीय क्रिकेटची मुख्य ताकद आहे. भारत पाक सारखे सामने असले की ते बघणार्‍यांची संख्या अमेरिकेतील सुपरबोलपेक्षाही जास्त भरते. आणि जसे जास्त लोकांकडे टीव्ही येतील तसे ते आणखीनच वाढेल. बेसबॉल, अमेरिकन फुटबॉलप्रमाणे संघ व खेळाडूंशी संबंधित 'ब्रॅंड'वाल्या गोष्टी अजून विकण्याची पद्धत आली नाही, ती ही येऊ शकेल. म्हणजे अमेरिकेत जसे संघाचे नाव किंवा चिन्ह असलेले बूट किंवा टी शर्ट दिसतात तसे क्रिकेटमधेही होऊ शकते आणि त्यातून प्रचंड मोठे मार्केट मिळू शकते.

बीसीसीआयला भारताच्या या दादागिरीचा आणखी पैसे मिळवण्यासाठी कसा उपयोग करायचा हे चांगले कळते हे उघड आहे. पण त्याचबरोबर ट्वेंटी-२०ची उसाची कांडी चोथा होईपर्यंत पिळून काढत बसायची की सर्व प्रकारचे क्रिकेट अजून कसे वाढेल, अजून जास्तीत जास्त देश यात कसे येतील असा प्रयत्नही करायचा हा विचार बीसीसीआयने कधीतरी करायला पाहिजे. ट्वेंटी-२० चे प्रेक्षक काहीतरी मसालेदार बघायला मिळते म्हणून बघणारे आहेत, त्यांचा इंटरेस्ट उद्या एखादी टीव्ही मालिका सुद्धा बदलू शकते. खर्‍या क्रिकेट प्रेक्षकांना खिळवून ठेवायला चीयरलीडर्स आणायची गरज नाही, आणि असे प्रेक्षकही असंख्य आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट अजूनही १०-१२ देशच खेळतात. पण त्यातही इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडीज या संघांच्या खेळण्याच्या पद्धती केवढ्या वेगळ्या आहेत! त्यात अजून संघ आले तर आणखी वेगळे क्रिकेट पाहायला मिळेल. बोलरने बॉल टाकणे आणि बॅट्समनने तो घुमवणे या दोन गोष्टीत ट्वेंटी-२०ने क्रिकेट बंदिस्त केले आहे, ते बघायला काही दिवस लोक आवडीने येतील पण तेथून त्यांना मूळ स्वरूपातले क्रिकेट बघायला आणणे हा उद्देश असायला हवा. जागतिक क्रिकेटचे नेतृत्व करायचे असेल तर पैसा व क्रिकेटचा विकास या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या पाहिजेत.

याचबरोबर मैदानावरही भारत अजून बलाढ्य संघ कसा होईल यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. पैशाचा चांगला उपयोग करून चांगल्या सुविधा असलेली मैदाने, सरावासाठी सोयी तयार करणे. दौर्‍याची तयारी व्यवस्थित करणे, सतत खेळणार्‍या खेळाडूंना मध्ये विश्रांती मिळेल अशी व्यवस्था करणे, बर्‍याच गोष्टी अजून करण्यासारख्या आहेत. मैदानावर प्रचंड गैरसोय असूनही हजारो प्रेक्षक येतात, त्यांना जर चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्या तर आणखीनच येतील.

एकूण मैदानाबाहेरची दादागिरी आत्ताच चालू झाली आहे, त्याचा फायदा मैदानावरसुद्धा सर्वात जास्त जिंकणारा संघ तयार होण्यात होतो का ते पुढच्या काही वर्षांत दिसेल.

- farend