मन कूकर कूकर...

मन कूकर कूकर
खदखदत रहाते
जरा जरा वेळ जाता
शिट्टी वाजत रहाते

मन स्कूटर स्कूटर
वेड्यावाणीच वागते
सुरु होण्यासाठी याला
लाथ मारावी लागते!

मन फोन समजावा
याला डेड म्हणू नये
जावे बोलत स्वत:शी
एकट्याने कण्हू नये

मन गरगर पंखा
स्वत: भोवती फिरते
तरी कसे कोण जाणे
वारे डोक्यात शिरते

मन फ्रीजर फ्रीजर
आत आत गोठलेले
थेंब कुठल्या क्षणांचे
कुठे कुठे दाटलेले

मन भरलेला माठ
त्यात स्वप्ने काठोकाठ
मागे स्वप्नांच्या धावता
दु:खे येती पाठोपाठ

मन अडकली टेप
तेच तेच बरळते
जुन्यापान्याच सुरांना
पुन्हा पुन्हा उगाळते

मन वायर वायर
वर रबरच आहे
आत पितळ जिवाचे
त्यात सौदामिनी वाहे

मन बटण दिव्याचे
कधी चालू कधी बंद
मन उजेड दिव्याचा
कधी तीव्र कधी मंद

मन कपबशी साधी
आहे भासाने भरली
आप-पर भाव जाता
मोहमायाच सरली...

- प्रसाद शिरगांवकर