चांदोबाची खडीसाखर...

खूप खूप वर्षांपूर्वी आकाशात सूर्यबाप्पा आणि चांदोबा असे दोघंच जण असायचे. सूर्यबाप्पा हे चांदोबाचे बाबा. सूर्यबाप्पा दिवसभर आकाशात असायचे आणि चांदोबा रात्रभर. सूर्यबाप्पा दिवसभर काम करून दमायचे आणि रात्री झोपून जायचे. त्यामुळे चांदोबाची आणि त्यांची कधी भेटच व्हायची नाही. मग चांदोबाला रात्री खूप कंटाळा यायचा. रात्री अंधार असल्यामुळे त्याला खूप भीती वाटायची आणि खूप एकटं एकटंही वाटायचं.

मग एकदा चांदोबा सूर्यबाप्पांकडे गेला आणि खूप रडायला लागला.

सूर्यबाप्पांनी विचारलं "काय रे चांदोबा, तुला काय झालं... का रडतोस तू?"

चांदोबा म्हणाला "बाबा, मला रात्री खूप भीती वाटते... खूप एकटं वाटतं... तुम्ही पण चला ना माझ्या बरोबर रात्री."

सूर्यबाप्पा म्हणाले.."अरे सोन्या, मला दिवसा आकाशात जावं लागतं ना.. आणि दिवसभर आकाशात जाऊन मी खूप दमतो... मग रात्री मला झोपावं लागतं... मी कसा येणार तुझ्या बरोबर रात्री..."

चांदोबा अजून रडायला लागला आणि म्हणाला, "पण मग मी काय करू... मला एकट्याला नाही आवडत आकाशात... तुमची खूप आठवण येते."

सूर्यबाप्पांनी जरा विचार केला आणि म्हणला, "आपण एक आयडिया करुया का? मी तुला थोडी खडीसाखर देतो. ती तू खिशात ठेव. आणि तुला भीती वाटली किंवा माझी आठवण आली की तू थोडी खडीसाखर खा.... ठीके?"

चांदोबाला खडीसाखर खूप आवडायची, त्यामुळे तो एकदम खुश झाला आणि म्हणाला... "हो.... द्या खडीसाखर..."

मग सूर्यबाप्पांनी चांदोबाला मूठभरून खडीसाखर दिली. चांदोबानी ती खडीसाखर आपल्या खिशात ठेवली.

तेवढ्यात दिवस संपला. दिवस संपल्यामुळे सूर्यबाप्पा झोपायला गेले आणि चांदोबा आकाशात जायला निघाला. आज खिशात खडीसाखर असल्यामुळे चांदोबा खुशीत होता आणि तो जोरजोरात पळत आकाशात जायला निघाला. पळतापळता त्याचा पाय कशालातरी अडकला आणि तो धप्पकन पडला... तो पडल्यामुळे त्याच्या खिशातली खडीसाखर सांडली आणि आकाशात सगळीकडे उधळली...

चांदोबाने उठून बघितलं तर काय गंमत... सगळ्या खडीसाखरेच्या आकाशात चांदण्या झाल्या होत्या!

तेंव्हापासून चांदोबाने रात्रीचं रडणं बंद केलं... कारण तो आता आकाशात एकटा नसतो... सूर्यबाप्पांनी दिलेल्या खडीसाखरेच्या चांदण्याही त्याच्या बरोबर असतात! त्याला खूप कंटाळा आला की एक एक खडीसाखरेची चांदणी तो खात बसतो... सकाळ होईपर्यंत सगळी खडीसाखर तो संपवून टाकतो!

(म्हणून रात्री चांदण्या असतात आणि दिवसा नसतात!)

[माझ्या तीन वर्षांच्या मुलाने मला एकदा प्रश्न विचारला की आकाशात रात्री चांदण्या का असतात आणि दिवसा का नसतात.... त्याचं उत्तर देताना जन्मलेली ही गोष्ट!]

- प्रसाद शिरगांवकर