ऍपल पिकिंग

आत्तापर्यंत कधीही शॅपरोन म्हणून नाव दिल्यावर निवडले गेले नव्हते. त्यामुळे इशानच्या शाळेत बुधवारी म्हणजे ऐन आठवड्याच्या मध्यात नवीन वर्षातली पहिली फील्ड ट्रिप असणार याची सूचना घरी आली तेव्हा भरपूर उत्सुक लोक असल्यामुळे आपला नंबर लागण्याची शक्यता अगदीच नगण्य अश्या विचाराने खुशाल नाव दिले. दोन दिवसांनी जेव्हा त्याच्या बाईंची ईमेल आली की ऑक्टोबर १५ रोजी ऍपल ऑर्चर्ड इथे होणार्‍या सहली साठी शॅपरोन म्हणून तुमची निवड झाली आहे तेव्हा नाही म्हटले तरी थोडे आश्चर्यच वाटले. कळल्यावर इशानचा चेहरा अगदी खुलला आणि नीरज म्हणाला, "How come you never came to any of my field trips?"
"आता येऊ का?" असे विचारल्यावर एक क्षणभरही न थबकता उत्तर आले "नको!".

ऑफिसमध्ये गेल्यावर पहिली गोष्ट केली असेल तर ऑक्टोबर १५ ची सुट्टी नोंदवून ठेवली. आत्तापर्यंतचा मुलांच्या शाळेतला अनुभव म्हणजे वर्गात मदत करण्यापुरताच मर्यादित होता. त्यात नाटकासाठी मुलांना मेकअप करणे, वर्गात दिवाळीची माहिती सांगणे, रांगोळी घालून दाखवणे, मदतनीस म्हणून म्हणून वाचन आणि गणिताच्या वर्गात मदत करणे आणि शाळेत होणार्‍या असंख्य पार्ट्यांसाठी जेवण त्यातही कधी कधी खास भारतीय पदार्थ करून पाठवणे इ. अनेक गोष्टींचा अंतर्भाव होता. पण संपूर्ण दिवसभर शाळेबाहरच्या सहलीसाठी जायचे हा अनुभव पहिलाच होता. माझी दोनच मला आवरता येत नाहीत आणि इथे अख्खा वर्ग दिवसभर हाकायचा याची थोडी काळजी पण वाटत होती.

जेवणाच्या सगळ्या गोष्टी कागदी पिशव्यांमधेच आणल्या पाहिजेत अशी सूचना होती, ती मी आदल्या रात्री वाचली. नशिबाने घरात इथल्या प्रसिद्ध तपकिरी कागदी पिशव्या ( Brown Bags )सापडल्या. इशानसाठी नेहमीचे यशस्वी पीनट बटर सँडविच आणि सफरचंदाचा रस घेतला आणि माझ्यासाठी भाजणीचे वडे.

बरोब्बर सव्वानऊला शॅपरोन्सनी वर्गात हजर राहावे अशी मिसेस कुशलची, इशानच्या शिक्षिकेची ईमेल आली होती. नाव जरी भारतीय वाटत असले तरी ते भारतीय नव्हते. हसर्‍या चेहर्‍याची, थोडीशी स्ट्रिक्ट वाटणारी, पण कमालीच्या गोड स्वरात मुलांना व्यवस्थित शिस्त लावणारी मिसेस कुशल साधारण पंचवीस वर्षाची टिपिकल अमेरिकन मुलगी होती. आधी एक दोन वेळा पालक-शिक्षक भेटींच्या वेळी ती भेटली होतीच.

बरोब्बर सव्वानऊला मी शाळेत पोहोचले. तिथे अजून एका मुलीची आई आली होती. इशानच्या वर्गात एकोणीस मुले होती. प्रत्येक टेबलवर पाच मुले अशी चार टेबल्स होती. गेल्या गेल्या मिसेस कुशलने सांगितले की एकेका टेबलवरच्या मुलांना एकेका पालक /शिक्षकांनी सांभाळायचे आहे. मला इशानचे टेबल दिले होते. अमँडाच्या आईला तिचे ग्रीन टेबल दिले होते. मिसेस कुशलकडे रेड टेबल होते आणि वर्गातली असिस्टंट टीचर क्रिस्टीन होती तिला ब्लू टेबलवरची मुले दिली होती. पाचच मुले सांभाळायची आहेत हे कळल्यावर जरा जिवात जीव आला. मिसेस कुशलने माझ्या पाच मुलांची नावे एका कागदावर लिहून मला दिली. मी त्यांच्याकडे नीट निरखून पाहून घेतले. हरवली बिरवली तर शोधता यायला पाहिजेत. तरी चेहरे लक्षात राहतील अशी खात्री वाटेना. शेवटी हिरवं जॅकेट घातलेली शॅरन, गुलाबी पट्ट्यांची पँट घातलेली कॅरोलाइन, डोक्यावर हूड ओढून घेतलेला निळा स्वेटशर्टवाला कॉनर, आणि पिवळा ड्रॅगनचा शर्ट घातलेला बेन टी. - अशी मनाशीच उजळणी करून घेतली.

सगळ्या दुसरीच्या वर्गांची सहल होती. त्यामुळे एकंदर सहा वर्ग जाणार होते. तीन स्कूल बसेस शाळेच्या बाजूच्या दाराशी येऊन उभ्या राहिल्या. आम्ही आणि मिसेस डायमंडचा वर्ग एका बसमध्ये होतो. मुले रांगेने बसमध्ये चढली. आम्ही पण आत चढलो.

"तर अशी दिसते होय ही बस आतून" मी म्हंटलं.
"ओह, तू पहिल्यांदा आली आहेस का स्कूलबसमध्ये?" मेरी, अमँडाची आई म्हणाली.
मी होय म्हणून मान डोलावली आणि आम्ही एका सीटवर स्थानापन्न झालो. जिच्यात बसून आपली मुले रोज शाळेत जातात, जी रस्त्यावर थांबली की आपल्याला (चरफडत) तिच्या पाठीमागे थांबावं लागतं, त्या स्कूलबसमध्ये बसायला मजा वाटत होती.

मुलांच्या गप्पांचा गलका वाढला की शिक्षक आणि काही शहाणी मुले (मुख्यत: मुलीच) शांततेच्या खुणा करत. तेव्हढ्यापुरता आवाज शांत होई आणि परत हळूहळू वाढायला सुरुवात होई. माझ्या आणि मेरीच्याही गप्पा सुरू झाल्या. तिला तीन मुलं - ही अमँडा सगळ्यात मोठी. मग पाच आणि तीन वर्षाचे दोन मुलगे होते. आत्ता तिची बहीण धाकट्या दोघांना सांभाळायला आली होती त्यामुळे मेरी सहलीला येऊ शकली.

साधारण वीस मिनिटांत आम्ही ऍपल ऑर्चर्डला पोहोचलो. गेल्या गेल्या आमचे ऍपल सायडर देऊन स्वागत करण्यात आले. अतिशय सुंदर चवीचे, ताजे सायडर मस्त लागत होते. तिथे एक छोटे ऍपल ची माहिती देणारे सभागृह होते. सगळी मुले पुन्हा ओळीने तिकडे गेली आणि बाकांवर बसली. चालताना मी त्याच्याबरोबर चालावे असा इशानचा हट्ट होता. माझा हात धरून चालायला त्याला खूप गंमत वाटत होती. त्याच्याकडे पाहाताना वाटत होतं अजून किती वर्षे हा असा निरागसपणे मला येऊन चिकटेल. मित्रांसमोर आईशी जवळीक करायची लाज वाटायचं वय अजून दूर आहे ते किती बरं आहे. मघाशी बसमध्ये सुद्धा मी त्याच्याजवळ बसावे असा त्याचा आग्रह होता. पण प्रत्येकाला बस बडीज निवडून दिले होते. त्यांनी त्यांच्याशेजारीच बसायचे होते. मी आणि मेरी मुलांच्या जेवणाच्या पिशव्या आत ठेवून आलो. तेव्हढ्या वेळात मुले सभागृहात जाऊन बसली. मी आत जाऊन इशानला शोधत होते. तेव्हढ्यात क्रिस्टीनने मला तो कुठे बसला आहे ते दाखवले. मी त्याच्या शेजारी जाऊन बसल्यावर त्याच्या चेहर्‍यावर हसू फुलले. शो सादर करणारी बाई अतिशय मृदूभाषी होती. तिने प्रेक्षकांमधल्या काही मुलांना रंगमंचावर बोलावले आणि त्यांच्या मदतीने सफरचंदाची शेती कशी होते हे सादर केले. त्यात दिव्यांचा, आवाजांचा व इतर स्पेशल इफेक्टसचा वापर केला होता. मुले ते पाहताना इतकी गुंगून गेली होती की त्यांना कळत पण नव्हते की शिकणे चालू आहे. मला शिक्षणाची ही पद्धत खूप आवडली.

या कार्यक्रमानंतर मुलांना हे राईडला नेले. वाळलेले गवत भरलेल्या ट्रॅक्टरमधून संपूर्ण मळ्याची सफर घडवून आणली. जाता जाता मुलांचा खेळ सुरू झाला. सफरचंदाचे झाड दिसले की त्याची जात कुठली असेल ते ओळखायचे. रेड डेलिशियस, गोल्डन डेलिशियस, गॅला, मॅकिन्टॉश, ग्रॅनी स्मिथ अश्या असंख्य सफरचंदाच्या जाती त्यांना ठाऊक होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या रसरशीत, लालबुंद किंवा सोनेरी हिरव्या फळांनी लगडलेली ती श्रीमंत झाडे आपले ऐश्वर्य मिरवीत होती. मधमाश्या गुणगुणत होत्या पण मुले त्यांना घाबरत नव्हती. मधूनच एखादा गर्द झाडीचा टप्पा आला की त्यांना अजूनच मजा येत होती.

हे राईडनंतर मुलांना छोट्या परड्या दिल्या आणि सफरचंदं काढून आणायला पाठवले. तिथे त्यांनी खूप धमाल केली. मैलभर पसरलेली सफरचंदाची झाडे, लाल, केशरी, पिवळ्या रंगाची उधळण करणारे फॉलचे निसर्गवैभव आणि आपापल्या परड्या घेऊन इकडे तिकडे पळणारी, स्वच्छंदपणे बागडणारी ती सफरचंदाच्या रंगाशी स्पर्धा करणार्‍या गोबर्‍या गालांची मुले हे चित्र अतिशय देखणे दिसत होते.

सफरचंदे गोळा करून झाल्यावर मुलांना सायडर कसे करायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि प्रत्येकाला करायची संधी पण मिळाली.

आता सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या. हवा सुरेख होती. हलकासा गारवा होता पण उबदार वातावरण होते. स्वेटशर्टस आणि जॅकेट्स कधीच निघाली होती, आणि नुसत्या टीशर्टसवर मुले पळत होती. तिथेच हिरवळीवर प्रत्येक वर्ग आपापली वर्तुळे करून बसला. मी आणि मेरी जाऊन मुलांच्या जेवणाच्या पिशव्या घेऊन आलो. इशान माझ्या जवळ येऊन हळून म्हणाला, "आई, you are really helping a lot." मी हसून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात तो 'I am proud of you' चा भाव जो एरवी माझ्या डोळ्यात त्याच्यासाठी असतो, तो चमकला.

जेवणानंतर मुले थोडा वेळ हिरवळीवर खेळली. मग apple cider च्या बाटल्या आणि सफरचंदाच्या परड्या घेऊन आम्ही बसमध्ये बसलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. इशान आणि त्याचा बस बडी बेन टी. जिथे बसले होते त्याच्या पुढची सीट रिकामीच होती. मी तिथे जाऊन बसले. इशानचा चेहरा पुन्हा हसरा झाला. एका हाताने तो मधूनच माझी बोटे पकडत होता आणि पुन्हा बेनशी गप्पा मारण्यात गुंग होत होता.

घरी आल्यावर त्या दिवशीचा गृहपाठ होता अर्थातच Write about the trip and don't forget your favorite part.

इशानने सहलीबद्दल सगळे लिहिले आणि शेवटची ओळ होती 'My favorite part was the cider and..that my mom came.'

- अश्विनी