हळवी कातरवेळ

HalaviKatarvel.gif
यमुनेकाठी रोज उतरतो कृष्ण वाजवीत पावा...
यमुनेच्या धारेला छेडीत राधा घेते धावा..

श्रीरंगाला रंग अर्पूनी होई डोह सावळा
राधेचे प्रतिबिंब तयातून, मूर्तिमंत सोहळा

कृष्णाची बासरी आळवी 'राधा... राधा...' गीत
राधेच्या श्वासातून घुमते 'कृष्ण... कृष्ण..' संगीत

कुष्ण धावतो रेतीवरती, उमटतात पाऊले
राधा पळते सृष्टीवरती सांडत चांदणफुले

उष्ण श्वास अन् अधीर डोळे त्यात राधेचे बिंब
कृष्णाच्या डोळ्यात थेंब अन् तिकडे राधा चिंब

अवघ्या सृष्टिवरी पसरते मंतरलेली कळा
चंद्र जणू हो गोरी राधा गगन मुरारी निळा

कातरवेळी रोजच राधा होई अशी बावरी
नेत्र सावळे, सृष्टि सावळी, सोनेरी बासरी

भेटेना राधेला कान्हा जरी भरला सृष्टित
कृष्णाचे दशलक्ष हात पण राधा नाही कवेत

हीच अनामिक हुरहुर भरते आत आणि बाहेर
सांजवेळ मग होऊन जाते हळवी कातरवेळ

- मुग्धमानसी

प्रतिसाद

सुंदर, तरल काव्य!

आहाहा!
>>>भेटेना राधेला कान्हा जरी भरला सृष्टित
कृष्णाचे दशलक्ष हात पण राधा नाही कवेत <<< वा ! क्या बात है|

अहाहा....... एकदम तरल........ !!

व्वा!!

>>चंद्र जणू हो गोरी राधा गगन मुरारी निळा
मस्त!

एकदम तरल :)

कृष्णाचे दशलक्ष हात पण राधा नाही कवेत...

सर्वस्वी नवी कल्पना!वा!

जयन्ता५२

मनःपुर्वक धन्यवाद!!!

सुंदरच!

आहाहा!
आवडली.........

खुप सुन्दर!

मस्त