ऋतूंचे तराणे..



आळविसी तू नव्याने जुने ऋतूंचे तराणे
तीच लहरीची भाषा, तेच सवयीचे गाणे

घेता वासंती शपथा सात जन्माच्या सोबती
कुंदा मालतीच्यासवे खुळ्या फुलारून येती
याग ग्रीष्माचा मांडता सारे तयात आहुती
तुझा मोहोराचा तुरा, माझे अगतिक होणे

घालमेल वेडीपिशी मन भेगाळ बेचैन
रिझवाया छेडतोस लाघटशी वर्षाधून
मीही नकार उसना मग आणावा कुठून
क्षोभ वितळतो देता, मृद्गंधित आभूषणे

कधी अधीर, उत्कट, कधी सौम्य हलकासा
कधी दीर्घ अळीमिळी, कधी उधाण जलसा
येसी, जासी, तुझी मर्जी, तुझा कुठे भरवसा
तुझा नूर, मनमानी, तुझे हजार बहाणे

शरदाच्या रातीतले आलिंगन चांदण्याचे
दव धुक्यात हेमंती, कवडसे कनकाचे
संमोहनात ना भान, पुढ्यातल्या शिशिराचे
एक स्वप्नाळ चाहूल, उदरात जागविणे

सारे तुझे नियंत्रण, सारा तुझाच पसारा
सदा कलते घेऊन, सांभाळाव्या तुझ्या तऱ्हा
कधी वाटे 'माझ्यास्तव' ऋतुचक्राचा फुलोरा
तुझी बेभान आवर्ते, माझे खुळावून जाणे

- रूपाली परांजपे

प्रतिसाद

छानै..आवडली~

अप्रतिम कविता, उत्तम सादरीकरण.

कविता सुंदर! आवडली.

माफ करा, पण सादरीकरण नाही आवडलं. सुरवात तरी कवितेच्या अर्थाला, शब्दांना विसंगत अशी, खडसावून म्हंटल्यासारखी झाली.

खूप आवडली कविता, सादरीकरण जरा सुरुवातीला अवघडलेले पण नंतर छान झाले.

सुंदर कविता.! आवडली!

काही शब्द फारच वजनदार वाटले. कवितेचा आशय आवडला. सादरीकरण ठिक.

कविता छान पण सादरीकरण मात्र तितके प्रभावी नाही वाटले..

कविता छान आहे :)
सादरीकरणाबाबत, भारतीताई + १

कविता सुंदर! आवडली. सादरीकरणा बद्दल मृण्मयीशी काही अंशी सहमत.

आवडली :)