छंद माझे वेगवेगळे - नाना पारनाईक

Parnaik_Sir_Image.jpg

ठा

ण्याच्या पारनाईक सरांची ख्याती 'एक कमालीचा छंदिष्ट माणूस' म्हणून ऐकून होतो. आधी कधी त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नव्हती, ती 'मायबोली' च्या निमित्ताने झाली.

ठाण्याच्या सुप्रसिद्ध मो.ह. विद्यालयातून उपमुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या पारनाईक सरांचं घर तसं सर्वसामान्य आणि साधंसुधं आहे. पण खरं म्हणजे ते आहे एक छोटंसं वस्तुसंग्रहालयच. सरांच्या (त्यांच्या नाना छंदांमुळे त्यांना 'नाना' म्हणतात की काय कोण जाणे!) अनेकविध छंदांविषयी त्यांच्याकडून ऐकतांना कानांना धाप लागते, वस्तू बघताना डोळे दमतात आणि बुद्धी दिङ्मूढ होते. त्या सर्व छंदांविषयी या छंद-लेखात लिहिणं केवळ अशक्य, पण तरी प्रयत्न करतो. पहिल्या प्रश्नालाच त्यांनी फर्मान सोडलं की मला सर म्हणू नका, नानाच म्हणा.

नाना, तुमचा सर्वात पहिला छंद कुठला? तो कसा आणि कधीपासून सुरू झाला?
स्वाक्षर्‍या गोळा करण्याचा. त्यावेळी मी साधारणतः दहा वर्षांचा होतो, आम्ही मालेगावला राहत होतो. त्यावेळी आमच्या घरी वडिलांमुळे अनेक मोठी माणसं येत जात असत. तसेच एक दिवस सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आले, त्यांची स्वाक्षरी घेतली. नंतर चक्क सावरकर आमच्या घरी आले होते, त्यांची स्वाक्षरी घेतली आणि कळत नकळत हा स्वाक्षरी घेण्याचा छंद चालू झाला. आजपर्यंत दीड हजारांहून अधिक स्वाक्षर्‍या माझ्याकडे आहेत.

खास असा कुणाच्या सह्यांचा उल्लेख कराल?
भारताच्या पाच माजी पंतप्रधानांच्या सह्या माझ्या संग्रही आहेत - नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिराजी, मोरारजी आणि अटलजी.

बरं ,स्वाक्षरी जमवणे हा एक छंद झाला, दुसरं ?
वेगवेगळी देशी-परदेशी पोस्टल तिकिटे जमवण्याचा. किती आहेत माहीत आहे? बहात्तर हजार. त्यापैकी एक हजाराहून अधिक फर्स्ट डे कव्हर्स आहेत. बाकी प्रत्यक्ष पाहायलाच हवेत. तसाच माझा नाण्यांचा संग्रहही अचाट आहे. मोगलाई, शिवकालीन, पेशवाई, ब्रिटीश राज्य आणि नंतरची अगदी आजपर्यंतची नाणी; अगदी अनेक देशांची नाणी आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, इतकंच नव्हे तर भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रकाशित केली गेलेली commomorative coins माझ्याकडे आहेत. या नाण्यांना देशापरदेशात अँटिक व्हॅल्यू असते. एकेका नाण्यासाठी काही छंदिष्ट दहा दहा हजार रुपये मोजायला तयार असतात. सर्वात जास्त मागणी नेताजींच्या नाण्याला आहे. त्याला जर्मनी, जपान, चीन, ब्रम्हदेश येथे जास्त मागणी आहे. मी या नाण्यांवर लाखो रुपये कमवू शकतो, पण नाही. कशीही परिस्थिती आली तरी मी ही नाणी विकणार नाही, कदापि नाही. माझ्या भावना त्याच्याशी निगडित आहेत. मी क्रिकेटवेडाही आहे. मद्रासला झालेल्या विश्वचषक सामन्याच्या वेळी नाणेफेकीसाठी माझ्याकडे असलेला १९२२ चा खणखणीत चांदीचा बंदा रुपया वापरला होता. ह्या नाण्याची आजची किंमत रुपये आठ हजाराहून अधिक आहे.

इतर कुठले छंद आहेत?

देशी परदेशी ८०० नोटा आहेत. त्यातली एक म्हणजे वेस्ट इंडीजने त्रिनिदादला सर फ्रँक वॉरेल यांच्या स्मरणार्थ दिलेली, त्यांचं चित्र असलेली नोट माझ्या संग्रही आहे - अशा अनेक. तुम्ही कंटाळला नसाल तर सांगतो, माझ्याकडे सुमारे साडेआठशे छोट्या-छोट्या मोटर कार्सची मॉडेल्स आहेत. ही सर्व मॉडेल्स एक छंदिष्ट श्रीमंत पारशी दोन लाखांना एकदम घ्यायला तयार आहे, पण मी दिली नाहीत. 'लोकप्रभा'ची गेल्या ४० वर्षांची मुखपृष्ठे आहेत, दलाल-मुळगावकरांची चित्रं आहेत, बाळासाहेब ठाकरेंपासून विकास सबनीसपर्यंत (तो माझा विद्यार्थी) व्यंग्यचित्रे आहेत, सुमारे १००० हून जास्त आगपेट्या, सिगारेट पाकीटं, (मी स्वतः ओढत नाही, तरीही) छोट्या-छोट्या रंगीत काचांच्या चिमुकल्या बाटल्या, चारशेच्या वर पेनं, तीनशेहून अधिक की चेन्स, ग्रीटिंग कार्डस्, लग्नाच्या निमंत्रण-पत्रिका, विविध दुर्मीळ फोटो, गणपतीची शेकडो चित्रं, क्रिकेटविषयी असंख्य पुस्तकं, रेकॉर्डस, संगीताविषयी बरंच काही, अनेक पुस्तकं.

नाना, मला हे ऐकतानाही दम लागला आहे, तुम्ही हे सगळं कसं जमवलंत?
'त्या'ची कृपा आणि माझी प्रचंड इच्छाशक्ती, दुसरे काय?

नाना, आता जाता-जाता - एखादी तुमच्या 'मर्मबंधातली ठेव' सांगा, एखादा खास छंद?

(किंचित सद्गदित होत) छंद म्हणता येणार नाही, पण माझ्याजवळ एक महादुर्मीळ गोष्ट आहे - एक २० सेंमी X २० सेंमी आकाराचा प्युअर सिल्कचा रुमाल. हा रुमाल साधासुधा नाही. हा मी विकला तर लाखो रुपये कमवू शकतो - पण जीव गेला तरी मी तो विकणार नाही. हा रुमाल मी मिळवला नाही तर तो माझ्याकडे केवळ योगायोगाने आला. १९३६ ला बर्लिनमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये (भारत सोडून) ४८ देश सहभागी झाले होते. त्या ४८ देशांच्या ध्वजांची चित्रे या रुमालावर आहेत. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचा जेव्हा पराभव झाला, तेव्हा हिटलर किंवा जर्मनांशी संबंधित कोणतीही लहानसहान वस्तू ज्याच्याकडे सापडेल त्याला वाईट परिणाम भोगावे लागतील असा फतवा निघाला. सर्व लहानसहान वस्तूही नष्ट करण्यात आल्या. त्यावेळी एका जर्मन माणसाने हा रुमाल त्याच्या घरातल्या एका फोटोफ्रेमच्या मागे नीट निगुतीने लपवून ती फ्रेम बंदिस्त केली होती. काही वर्षांपूर्वी या माणसाने वयाची ८० वर्षे ओलांडल्यावर निरवानिरव करताना हा रुमाल बर्लिनमध्ये असणार्‍या माझ्या डॉक्टर भावाला माझ्यासाठी म्हणून देऊन टाकला. शक्यता आहे की हा जगातला एकमेव तसला रुमाल असावा.

कमालीच्या ऊर्जेनं भारलेल्या या माणसाला नमस्कार करुन निघताना मला दिवसाचं सार्थक झालं असंच वाटत होतं!

शब्दांकन - सुभाष जोशी

हितगुज दिवाळी अंक २०१२ छंदमग्न सदरासाठी

प्रतिसाद

बापरे, नानांना सलाम ! 'छंदमग्न' ह्या सदरासाठी फ्लॅगशिप म्हणता येईल असा लेख आहे हा :) दुर्मिळ रुमालाबद्दल वाचून भारी वाटले.
नाना पारनाईक ह्यांची ओळख करुन दिल्याबद्दल सुभाष जोशी ह्यांनाही धन्यवाद.

दाद द्यावी तितकी थोडीच... त्यांचा संग्रह असाच वाढत राहो.

बाप रे. खरच दम लागला नुसते वाचताना. मस्त! रुमालाची गोष्ट आवडली.

पारनाईक सर रॉक्स....

सर, तुमच्या ऊत्साहाच्या कारंज्यातले चार थेंब योग्य वयात अंगावर पडले. अजूनही भारला गेलेलो आहे.

सुभाष जोशी, खूप खूप धन्यवाद.

__/\__

अरे वा !!! सरां बद्दल वाचुन मजा आली.

आमचे पारनाईक सर म्हणजे आम्हा मो.ह. मधल्या मुलांचा आनंदाचा ठेवा आहे. गेली ३-४ वर्ष माझी आई त्यांच्याच इमारती मधे रहाते, त्या मुळे त्यांचा सहवास खुपच लाभला. सर आम्हाला ९ वीला भुमिती शिकवायचे. इतर टिवल्या बावल्या आम्ही त्यांना खुप करायला लावायचो. दोन हातांनी ते इतकी सुंदर चित्रे काढायचे की सांगता सोय नाही. त्यातही त्यांचं गणपतीचं चित्र तर खासच. त्यांच्या कडे पुर्वी मिळायची ती सिनेमाच्या स्टोर्‍यांची पुस्तकं पण पाहिल्याचं आठवतं आहे. मागच्याच वर्षी आम्हा माजी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेला सगळ्या जुन्या शिक्षकांना बोलावलं होतं. तेंव्हा सरांना भेटुन बोलुन खुपच मजा आली.

नमस्कार... नादिष्टंपणा असल्याशिवाय असे छंद जोपासताच येत नाहीत... ह्या नादिष्टंपणाला साष्टांग नमस्कार.

अतिसुन्दर !!!

आईशप्पथ! पारनाईक सरांची मुलाखत! इतके दिवस मी पाहिलीच नव्हती. पारनाईक सर आमचे अत्यंत आवडते. २५ वर्षं झाली, अजूनही ते आम्हाला सर्वांना नावांनिशी ओळखतात. गेल्या वर्षीच त्याची प्रचिती घेतली आम्ही. अजूनही तितकेच हसतमुख, उत्साही॓! अक्षर फार सुंदर आहे त्यांचं. शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन असो, इतर एखादी स्पर्धा असो, विज्ञान प्रदर्शन असो किंवा आणखीन काही, फळ्यांवरचं संबंधित लेखन, घोषणा या कायम त्यांच्याच अक्षरातील असत.

तुमच्या ऊत्साहाच्या कारंज्यातले चार थेंब योग्य वयात अंगावर पडले. अजूनही भारला गेलेलो आहे. >>> बागुलबुवा, अगदी!

खरंच, सुभाष जोशी, मनःपूर्वक धन्यवाद :)

महान... नाना अंगे, नाना छंद, संपूर्ण अर्थाने "नाना"...

सलाम! नाना खरे छंदमग्न!

बापरे.. छंद वाचतानाच दम लागला मला.

अजून थोडी विस्तृत मुलाखत घ्यायला हवी होतीस.