बालसाहित्ययात्री - माधुरी पुरंदरे

मा

धुरी पुरंदरे, हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. मग ते 'तीन पैशाचा तमाशा'मधले काम असो किंवा ग्रेस कवितांवर आधारित उत्तमोत्तम कार्यक्रमात गायन असो किंवा उत्तम वाचनानुभव देणार्‍या पुस्तकांचं लिखाण असो, कलेची आस्वादक अशा अंगाने माधुरीताईंनी घेतलेला जीवनाचा वेध अतिशय रोचक आहे. दिवाळी संवादासाठी संपर्क केल्यावर त्यांनी मुलांकरिता असलेल्या पुस्तकांवरती गप्पा मारण्याची इच्छा व्यक्त केली. लहान मुलांसाठी 'राधाचं घर' आणि 'यश' ही त्यांची पुस्तकमालिका प्रसिद्ध आहेच, त्याबरोबर 'काकूचं बाळ', 'बाबांच्या मिश्या' यांसारखी पुस्तकं पाच भारतीय भाषांत अनुवादित झाली आहेत. पुढील पिढीपर्यंत उत्तम साहित्य पोहोचावे अशा तळमळीने संपादित केलेला 'वाचू आनंदे' हा पुस्तकांचा संच सकस पूरक वाचनासाठी म्हणून नावाजला गेला आहे, तर 'लिहावे नेटके' हा मराठी भाषा शिकण्याचा एक अप्रतिम अनुभव! या सगळ्या पार्श्वभूमीवर बालसाहित्य आणि त्याच्या अनुषंगाने येणार्‍या विषयांवर जाणून घेऊयात माधुरीताईंचे विचार...

IMG_4978_Madhuri_Purandare_BW.jpg

नमस्कार माधुरीताई! बालसाहित्यात आज पाहिलं तर तुमची पुस्तकं अतिशय आवडीनं वाचली जातात. तर मुळात तुम्ही बालसाहित्याकडे कशा वळलात?

'वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र' हा निर्मला पुरंदरे यांनी १९८१मध्ये सुरु केलेला प्रकल्प. त्याचा मूळ उद्देश खेड्यापाड्यात शिक्षणाचा प्रसार करणं हा होता. प्रकल्पामध्ये ग्रामीण भागातील शिक्षिकांना त्यांच्या ठिकाणी जाऊन सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जायचं. पण त्या सहा महिन्यांच्या पुंजीवर त्या शिक्षिका काही आयुष्यभर शिकवू शकल्या नसत्या. त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, त्यांना शिकवताना त्याची मदत व्हावी, म्हणून कोणतंच साहित्य त्यांना उपलब्ध होत नव्हतं. चावडीत किंवा एखाद्-दुसर्‍या घरी वर्तमानपत्र येई . चावडीवर जाऊन एखादी बाई वर्तमानपत्र वाचतेय हे त्या काळी शक्य नव्हतं. तर प्रत्यक्ष त्यांच्या हातात काही वाचण्यासाठी पडावं, जे काही त्या शिकलेल्या आहेत ते ताजं राहावं, त्यात भर पडत राहावी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासाला आणि कामाला मदत व्हावी अशा दृष्टीनं द्वैमासिकाची सुरुवात झाली. त्याचं संपादन मी करत होते. आणि ते फक्त शिक्षिकांसाठीचं किंवा बायकांसाठी असं मासिक नसून ग्रामीण भागातल्या सर्वांसाठी असं होतं. त्यामुळे मासिकात राजकीय घडामोडी, कविता, कथा, ललित यांप्रकारचं लिखाण होतं. तेव्हा असं लक्षात आलं की हे ठीक आहे, याचा उपयोगही आहे, पण त्यांना यातलं काहीही थेट शिकवताना वापरण्याजोगं असं नव्हतं. त्या काळात, किंबहुना आजही पुस्तकांची उपलब्धता सहजासहजी नव्हती. ग्रामीण मुलांना आपलीशी वाटतील अशी फारशी पुस्तकंही बाजारात नव्हती. म्हणून मग अंकातच मुलांसाठी विभाग सुरु केला आणि त्यात काही गोष्टी - गाणी, चित्रे यांचा समावेश केला. ग्रामीण मुलांसाठी खास असं साहित्य एकतर आपल्याकडे फारसं लिहीत नाहीत. खेड्यातल्या लहान मुलांसाठी लिहिताना शहरातली माणसं बिचकतात. एकतर ग्रामीण जीवनाची माहिती, पार्श्वभूमी माहिती नसते आणि आपण लिहिलेलं लिखाण आवडेल की नाही, अशी शंका असते. त्यामुळे अंकासाठी साहित्याची कमतरता होती. एखाद्या विषयासाठी साहित्य मिळत नसलं की मीच माहिती गोळा करून लिहायचे. अशी कामं कुठल्याही संपादकाला करावी लागतातच. मला मुलांसाठी लिहिण्याचा काडीचाही अनुभव नव्हता. त्या निमित्ताने मग मी थोडंफार मुलांचं साहित्य वाचायला सुरुवात केली. त्या काळामध्ये लिहायला शिकण्यासाठी म्हणून मी काही अनुवाद केले, रूपांतरं केली. हळूहळू एखाद्या गाजलेल्या कथेची कल्पना घेऊन तिचा माझ्या पद्धतीने विस्तार करुन पाहिला. अशा प्रकारे मी मुलांसाठी लिहिणं शिकत गेले. त्यामुळे स्वतःचं स्वतः लिहायला शिकायला बराच वेळ लागला मला. फ्रेंच शिकवताना लहान मुलांची पुस्तकंही वाचायला लागायची. त्यांची भाषा आणि वाक्यरचना सोपी असे. त्यामुळं त्याचा उपयोग झाला. एका दृष्टीने तो माझ्या शिकण्याचाच भाग होता. जसं गाणं शिकतानाही आपण ऐकत ऐकत आपली शैली विकसित करतो, तसा तो प्रकार होता. कधी कल्पना उचलून कधी नक्कल करुन मी कथा लिहित गेले. हळूहळू स्वकल्पनेचा भाग जास्त होत गेला. मुलांसाठी लिहिणं हा प्रयत्नपूर्वक आणि विचारपूर्वक करण्याचा उद्योग आहे हे माझ्या लक्षात आलं.

तुमच्या मते मुलांसाठी लिहिताना काय वेगळा विचार करावा लागतो?

वेगळं म्हणजे मुलांचं वास्तव समजून घेणं. मुलांना जग कसं दिसतं, कसं ऐकू येतं याची कल्पना करणं किंवा ती नजर आणि कान विकसित करणं. मोठ्या माणसांना ज्या पद्धतीनं गोष्टी दिसतात, जाणवतात त्यापेक्षा मुलांना त्या वेगळ्या दिसत असणार, ऐकू येत असणार याची मुलांच्या भूमिकेत जाऊन कल्पना करणं किंवा तसा प्रयत्न करणं. त्याला शब्द कसे ऐकू येत असतील आणि त्याचे अर्थ तो कसे लावत असेल? हे समजून घेणं.
बराच काळ मुलांच्या दृष्टीने शब्द म्हणजे नाद असतो. साहित्य लिहीताना शब्दांचे नाद त्यांना कसे ऐकू येत असतील, कशाची त्यांना गंमत वाटत असेल, कशाची भीती वाटेल किंवा कंटाळा येईल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करणं या गोष्टींचा उपयोग होतो. बर्‍याचदा आपल्याकडे काही चांगले अपवाद सोडले तर लहानपणीच्या आठवणी या कथा म्हणून लिहिल्या जातात. पण तो त्या मुलाच्या अनुभवाचा भाग नसतो. आणि विशेषतः आता ज्या वेगानं जग बदलतंय ते पाहता, आपल्या लहानपणीचं जग आणि मुलाच्या भोवतीचं आजचं जग याचा संबंध त्याला लावता येत नाही. तो फरक समजण्याचं त्याचं वय नसतं. दुसरं म्हणजे मुलांच्या ऐकण्याच्या ताकदीचा आवाका त्या त्या वयात किती आहे याचाही अंदाज करावा लागतो. ते मूल एखादी गोष्ट किती काळ किती सातत्याने, किती चिकाटीने ऐकू शकतं, पाहू शकतं या सगळ्याचा हिशेब त्या त्या वयानुसार डोक्यात ठेवावा लागतो. एखादी कथा लिहिताना तिची लांबी किती, वाक्यांची लांबी किती, वाक्यात शब्द किती असावेत या सगळ्या तांत्रिक बाबींचा विचार करावा लागतो. ते करताना मुलांना जी गंमत वाटावी अशी आपल्याला अपेक्षा असते, तीच गंमत आपल्यालाही वाटली तर या सगळ्याचा वेगळा विचारही नाही करावा लागत. एका मोठ्या वाक्याची तीन लहान वाक्यं करणं हे आपसूकच होत जातं, वाक्यं मोठी होतच नाहीत.
प्रौढांसाठी आणि कुमारवयोगटातील मुलांसाठी लिहिताना अशा पद्धतीनं विचार नाही करावा लागत. मी कुमारवयोगटासाठी 'त्या एका दिवशी' म्हणून एक कथासंग्रह लिहिलेला आहे. या वयोगटासाठी लिहिताना भाषेसाठी वेगळा विचार केलेला नाही. त्यांची समज वाढली आहे, हे गृहीत धरुन जसं मोठ्यांसाठी लिहितो तशीच मांडणी केलेली आहे. आई-वडिलांमधले ताण किंवा स्वतःच्या आयुष्याचा अर्थ सापडणं किंवा मृत्यूची जाणीव होणं आणि त्याचे अर्थ उमगणं असे विषयही या वयोगटासाठी येतात. एरवी लहान मुलांची माझी पुस्तकं ही गोडगोड असतात. सगळ्यांचं छान सुरु असतं. पण आता या वयोगटातल्या मुलांसाठी गोष्टी बदलतात.

मुलांसाठीचं लिखाण म्हणजे साहसकथा किंवा संस्कारक्षम लिहिणं असा एक समज असतो किंवा फक्त जादूई दुनिया मांडणं असं काहीसं...

बालसाहित्य ही बाकी कशाशी संबंधित नसलेली आणि वेगळी गोष्ट आहे असं मला कधीच वाटलं नाही. मला असं वाटतं की मुलांना सगळंच द्यावं. अमूक एक देऊच नये असं मला वाटत नाही. हिंसा, अश्लीलता किंवा अनैतिकतता यांना अधोरेखित करणारं किंवा महत्त्व देणारं असं साहित्य देऊ नये हे उघडच आहे. पण काही जणांचं असं मत असतं की 'आजूबाजूच्या जगण्याबद्दल सांगूच नका त्यांना, कशाला आतापासूनच? पुढे बघायचंच आहे त्यांना जग'. तर या सगळ्याचा तारतम्याने विचार करायचा असतो. मुलांना आताचं जग कसं दिसतंय, मुलांवर त्याचा होणारा परिणाम काय आहे याचा अंदाज येत गेला की त्याचं प्रतिबिंब मुलाच्या भाषेमध्ये-वागण्यामध्ये जसं उमटेल त्यावरुन ठरवून लिहिलं जातं. साधं उदाहरण आहे की कुटुंब लहान झाल्यामुळे त्यांची भाषा बदलली का, प्रतिक्रिया देण्याची किंवा मोठ्या माणसांशी वागण्याची पद्धत बदलली का या बाबींना विचारात घ्यावं लागतं. पूर्वीच्या काळी कुटुंबात वेगवेगळ्या वयांची खूप मुलं असल्याने त्यांचं एक जग असायचं. ती एकमेकांकडून बर्‍याच गोष्टी शिकायची. बर्‍याच गोष्टी सहजगत्या त्यांच्यापर्यंत पोहोचत असत. आता ते नसल्यामुळे मुलांचा सतत मोठ्या माणसांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांच्या व्यवहारात जो बदल होतो त्याचं भान जरा आपल्याला ठेवता आलं पाहिजे. कारण त्याशिवाय मुलांना त्या कथा आपल्या वाटणार नाहीत.
दुसरं असं की मुलांना काल्पनिक आवडतं हे ठीक आहे पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या जगाबद्दल समजून घ्यायला जास्त आवडतं. 'राधाचं घर', 'यश' या पुस्तकमालिकांना येणार्‍या मुलांच्या प्रतिक्रियांवरुन हे लक्षात येतं. माझं हे पुस्तक १५-१७ वर्षं पडून राहिलं होतं कारण त्याला 'एकदा काय झालं ' अशी सुरुवात नाही आणि 'ते सुखाने नांदू लागले' असा शेवट नाही. त्यामुळे कित्येकांच्या मते ती गोष्टीची पुस्तकंच नव्हती. पण आता असं लक्षात येतंय की नेमकं असंच हवंय मुलांना. कारण त्यातूनच ती आपली गोष्ट सांगतात - तयार करतात. पण त्यांच्या जगाशी संबंध नसलेल्या गोष्टी जर आपण त्यांना सतत सांगत राहिलो तर त्यांना थोड्या वेळाने त्याचा कंटाळा येतो. कारण तो त्यांच्या अनुभवाचा भाग नसतो. राधाच्या घरात जे आहे ते त्यांच्या रोजच्या अनुभवातल्या गोष्टीचा भाग आहे. त्याच्यातून मग ते हळूहळू इतर गोष्टींकडे बघतात. कितीतरी मुलं मला माहित आहेत ज्यांनी स्वतःची छोटी-छोटी पुस्तकं तयार केली आहेत - माझी आई, माझा बाबा अशी. त्यांचं जे जग आहे त्या जगाबद्दल त्यांना बोलतं करणं, त्यातल्या नात्यांकडे, घटनांकडे त्यांना बघायला लावणं, असं करत गेलं की त्यातून त्यांचा परिघाचा विस्तार वाढत जाऊन ती मग दुसर्‍या गोष्टींकडे बघायला शिकतील.
कुमारवयातल्या मुलांसाठीच्या माझ्या पुस्तकात मृत्यूची जाणीव अणि त्याचे उलगडत गेलेले अर्थ हेही येतं. कारण मुलं अनेकदा आजूबाजूला मृत्यू पाहतात. त्यांच्या जाणीवा बोथट व्हायच्या आधीच त्यांना त्याबद्दल सांगायला हवं. द्वैमासिकात लिहिलेल्या काही कथांची पुढे पुस्तकं झाली.

sneha_colage.jpg

वाचू आनंदे आणि लिहावे नेटकेबद्दल थोडं सांगा ना..

आम्ही लहान असताना आम्हांला कुणीच वाचनावर बंधनं घातली नव्हती. मुलांनी अमूक पुस्तकं वाचलं पाहिजे अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण नव्हतं. अशी कितीतरी पुस्तकं आहेत, जी आम्ही तेव्हा वाचली, परत ५ वर्षांनी वाचली, नंतर परत वाचली. प्रत्येक वेळी ते पुस्तक त्या त्या वयाच्या अनुभवानुसार आणि आकलनक्षमतेनुसार नव्यानं कळत जातं. 'चांदोबा','शालापत्रिक' तसंच 'कुमार' नावाचं एक मासिक असायचं. भा. रा. भागवत, लीलाताई भागवत, ना. धों. ताम्हनकर , राजा मंगळवेढेकर यांनी मुलांसाठी साहित्य लिहिलं होतं. कित्येक पुस्तकं ही मोठ्यांसाठी आहेत हे देखील मोठं झाल्यावर कळलं. उलट 'गोट्या', 'लहानी'ची पुस्तकं मी आत्ता अलीकडे वाचली. अमूक एक लेखक घेऊन त्याची पुस्तक वाचली असंही काही नव्हतं. वाचनाच्या ओघात आलेली पुस्तकं आम्ही वाचत गेलो. परंतु, हे घडतंच नाही या मुलांच्या बाबतीत. त्यांचं वाचन कप्पाबंद झालेलं आहे. ज्या मोठ्यांच्या जगात ती वावरतात त्या जगाविषयीची जाण यायला मदत व्हावी असं साहित्य त्यांना वाचायला मिळत नाही. १८ वर्षांचं झाल्याशिवाय शास्त्रीय संगीत ऐकायचं नाही असं म्हटल्यासारखं काहीसं होतं. दुर्दैवाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे बरं-वाईट कसं का असेना पण १० वर्षांच्या आतल्या मुलांसाठी साहित्य तरी आहे. या वयात त्यांना पुस्तक या गोष्टीची ओळख होते, वाचनाची गोडी लागू शकते. पण ते वय ओलांडलं की वाचायला काहीच उपलब्ध नाही. वाचनाची आवड टिकून राहावी यासाठी मुलांच्या हाती जसं साहित्य जायला हवं, असं साहित्यच मिळत नाही. मग एकदा आवड आणि सवय सुटली की मग ती पुन्हा लागणं फार कठीण. म्हणून जे अभिजात मराठी साहित्य आहे, त्यांची तोंडओळख त्या लहान वयात जर झाली तर उत्तम. कारण कुमारगटातल्या ह्या मुलांना लहान मुलांचं साहित्य पोरकट वाटतं आणि मोठ्यांचं कळावं इतकी समज आलेली नसते. पूरक वाचन मुलांनी केलं पाहिजे असं आपण म्हणतो, पण त्यासाठी साहित्य शोधायचं कुठे, मुलांनी नक्की त्या साहित्यातलं वाचायचं काय असे पुढचे प्रश्न तयार होतात. शिक्षकही त्याच शिक्षणव्यवस्थेतून येत असल्यामुळे त्यांनांही अशा प्रकारचं काही प्रशिक्षण नसतं. तेही मार्क, घोकंपट्टी यात अडकलेले असतात. त्यामुळे शिक्षकांना एक तयार साधन मिळावं म्हणून 'वाचू आनंदे'ची निर्मिती झाली.
'लिहावे नेटके'च्या बाबतीत बोलायचं झालं तर, मराठी भाषा मरणार, तिची परिस्थिती एकूण वाईट आहे असे खूप लोकं गळे काढतात. सर्वसामान्य माणूस हे वाचून म्हणतो की 'आम्ही काय करायचं यात? असं असेल तर भाषा शिकवायचीच कशाला?' त्यामुळे न लढताच हार पत्करली असं एक चित्र दिसायला लागलेलं आहे. याचाच कंटाळा आला म्हणून काहीतरी करुन तर पाहू अशा विचाराने 'लिहावे नेटके'चा प्रकल्प सुरु झाला.

तुमच्या पुस्तकांत चित्रं ही त्या पुस्तकाच्या रचनेचा अविभाज्य भाग असतात, किंबहुना त्यांच्यामुळे पुस्तक सजीव होतं..

मी चित्रकलेची विद्यार्थिनी. मला कायमच जाणवायचं आणि रागही यायचा की हा विषय महाराष्ट्रात दुर्लक्षिला गेला आहे, त्याचं महत्त्व कुणाला कळत नाहीये. डोळ्यांचा जणू वापरच न केल्यामुळे, व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारचं पांगळेपण आलेलं आहे. दुर्दैवानं ते कळतच नाहीये कुणाला. चित्रकला शिकायची म्हणजे असेल काहीतरी. बाकी कशात डोकं चालत नाही मग शिका चित्रकला, असा एक समज असतो लोकांचा. आर्ट स्कूलमध्ये जाऊन नक्की काय करतात आणि चित्रं कशाबद्दल काढायची याबद्दलचं एक अज्ञान असतं आणि मग त्या विषयाची चेष्टा केली जाते. यासाठी काय करता येईल, लोकांना काय सांगता येईल असा विचार मनात होता. मग असं उमजलं की मोठ्या माणसांना समजावण्यात काही पॉईंट नाही. लहान वयापासूनच याची सुरुवात व्हावी लागते. संगीताच्या बाबतीत विचारात घेतलं तर तर्‍हेतर्‍हेनं संगीत आपल्यापर्यंत पोचतं. सिनेमाच्या गाण्यांपासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत. संगीत हे जगण्यासाठी अनावश्यक वाटत नाही. तशाप्रकारे चित्रकलेची गरज वाटली पाहिजे आणि ती वाटल्याखेरीज हे चित्र बदलणार नाही असं मला नेहमी वाटायचं. ही सवय लहान वयापासून लागण्यासाठी काय करता येईल? चित्रांची पुस्तकं निर्माण करावीत का असाही विचार आला. मग लक्षात आलं की पालकच मुलांसाठी ही पुस्तकं घेतात. कारण मुलं काही स्वतःहून सांगू शकत नाहीत की अमूक एक पुस्तक घ्या म्हणून. लोकांना सवय कशी असते तर कुठल्यातरी मजकुरासाठी काढलेलं, मजकूर अधिक स्पष्ट करुन सांगणारं असं एक चित्र हवं. पण चित्रकार कुठल्या कवितेसाठी किंवा कशासाठी म्हणून चित्र काढत नाही, ती त्याची संपूर्ण स्वतंत्र निर्मिती असते.
साहित्य आणि चित्र या दोन्हींचा आत्मा एकच आहे का? हा मुद्दा त्यातून शोधायचा प्रयत्न करावा लागतो. या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत, एकमेकींसाठी केलेल्या नाहीयेत. मग त्यातून एक गोष्ट कळते की चित्रकार वेगवेगळ्या कारणांसाठी चित्र काढतात. माझ्या पुस्तकांत चित्रंही मीच काढत असल्यामुळे, चित्रांनुसार मजकूरातही बदल होतात आणि दोन्ही बाजूंनी विचार केला जातो.

'वाचू आनंदे' आणि 'लिहावे नेटके' मध्ये हा मुद्दा कशाप्रकारे हाताळला गेला आहे? '

वाचू आनंदे'चं संपादन करताना, वेच्यांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे तसाच चित्रांमध्येही. मग लोककला, धार्मिक विधींसाठी काढलेल्या रांगोळ्या, खेड्यापाड्यात काढलेली निसर्गचक्राशी जोडून येणारी भित्तीचित्रं किंवा सिनेमासाठीचं पोस्टर अशा विविध गोष्टींची, अभिव्यक्तीची दखल त्यात घेतलेली आहे. त्यात फक्त अभिजात चित्र वापरायचं असं काही नाही. त्यात काही सूत्रविषय घेतलेले आहेत उदा. निसर्ग, प्राणीसृष्टी, माणसांनी निर्माण केलेले सृष्टी आणि त्या अनुषंगाने येणारे विषय. आपल्याकडे शब्द म्हणजेच खरी भाषा अशी घट्ट कल्पना आहे. मुलांच्या आजूबाजूला दृष्यमाध्यमं इतकी आहेत आणि ती भाषा त्यांच्यापर्यंत लवकर पोचते त्यामुळे तिला टाळून चालणारच नाही. भाषेचा वापर ज्या ज्या मार्गांनी होऊ शकतो ते सगळे मार्ग वापरायला हवेत आणि भाषा शिकणं अधिक लवचिक व्हायला हवं.

मी आलियोसला फ्रेंच शिकवत असताना आम्हाला तिथे इतक्या प्रकारची साधनं उपलब्ध असायची की कुठल्याही विषयाकडे इतक्या मार्गांनी जाता येतं हे तिथं शिकवता शिकवता लक्षात आलं. मग आपली नेहमीची भाषा आणि दृष्यभाषा समोरासमोर ठेवली, नातं उलगडून दाखवलं तर कदाचित त्याचा उपयोग होईल असं वाटलं. कदाचित चुकूनमाकून लक्ष जाईल, दाढी-मिशा काढण्यासाठी तरी त्या चित्राकडे बघतील, चित्रकाराचं नाव बघतील असा विचार आला. त्यामुळे अभिजात साहित्य आणि चित्रकला हा स्वतंत्र कलाप्रकार अशी दोन्हींची ओळख त्यांच्यासमोर मांडूयात असा विचार केला गेला.

तुमच्या भविष्यातल्या प्रकल्पांबद्दल काही सांगा ना...ऑडिओ बुक्स किंवा तत्सम असा काही विचार केला आहे का?

ऑडिओ बुक्स्‌ किंवा अ‍ॅनिमेशनचा सध्यातरी विचार नाही केलेला. मला स्वतःला त्या पुस्तकांचा अनुभव नाही. छोट्यांसाठी लिहिणं चालू राहीलच तरीही थोड्या मोठ्या वयाच्या म्हणजे १० वर्षांच्या पुढच्या मुलांसाठी लिखाण करण्याचा मानस आहे.

- अनीशा

सौजन्य - कृष्णधवल छायाचित्र - संदेश भंडारे
कोलाजसाठी पुस्तकांची मुखपृष्ठं वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल ज्योत्स्ना प्रकाशनाचे आणि कोलाज बनवून दिल्याबद्दल बित्तुबंगा यांचे अनेक आभार.

प्रतिसाद

chhaan mulakhat, tyaa ek uttam chitrakaar aahet , tyaa anushangaane thode adheek vachaayalaa aawadale asate

मस्त मुलाखत, अनीशा! :-)

वा! मस्तच मुलाखत.
खुप आवडली. त्यांनी लहान मुलांसाठी लिहीलेली पुस्तकेही खुप आवडतात.
धन्यवाद अनीशा

मुलाखत नाही आवडली. नवीन काहीच गवसले नाही, पण कदाचित माधुरीताईंची फॅन असल्याकारणाने ही माहिती माझ्यासाठी नवीन नाही म्हणुनही असेल.

मायबोलीसाठी पहिल्यांदाच कोणीतरी माधुरीताईंची मुलाखत घेतली याचेच बरे वाटले. धन्यवाद अनीशा.
लोकहो, ही पुस्तके मुलांसाठी खरंच उत्कृष्ट आहेत. घ्याच.

माधुरीताई इज ग्रेट.

ऊत्कृष्ट मुलाखत... माधुरीताईंसारख्या बहुरंगी, बहुढंगी, अनुभव संपन्न व्यक्तीची एका "ठोस" विषयावर मुलाखत घेतल्याने मुलाखतीचा फोकस, गाभा, माहिती सर्व सर्व अगदी परीपूर्ण झाले आहे.
अभिनंदन!

कुमारवयातील मुलांसाठी साहित्य निर्माण करणे हे किती अवघड आहे हे अगदी पटले.

रैना+१ तरी धन्यवाद अनीशा!