तं तं.. तंत्रज्ञानातला

हानपणी आजी, आजोबा आम्हाला गोष्टी सांगायचे. सुरस, चमत्कारिक गोष्टी. कधी त्या गोष्टींमधे राजा असायचा, कधी राजपुत्र-राजकन्या असायच्या... तर कधी एखादा कुशल, निपुण जादूगार. आमच्या बालमनाला अशक्य वाटणार्‍या गोष्टी आपल्या जादूनं सहजी साध्य करणारा. असा जादूगार आपल्यालाही भेटावा असं एक भाबडं स्वप्न पहात आमचं बालपण गेलं ... आणि खरोखरच आमच्या पिढीच्या आयुष्यात 'तो' जादूगार अवतरला. अवघड वाटणार्‍या, सहजी शक्य न होणार्‍या, आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी साध्य करायला मदत करणारा तो जादूगार - तंत्रज्ञानाच्या रूपात आमच्या पिढीला भेटला... नुसता भेटलाच नाही, तर बघता बघता त्यानं आमच्या आयुष्याचा हळूहळू ताबाच घेतला.

साठच्या दशकात आमच्या घरात जेव्हा मिक्सर आला तेव्हा असं वाटलं होतं आता आपल्याला काहीच करायला लागणार नाही. नुसतं बटण दाबलं की स्वयंपाक तयार! मिक्सर म्हणजे जणू अल्लादिनचा चिरागच! पुढे आमच्या पिढीला असे अनेक जादुई चिराग सापडले.

गेल्या पन्नास वर्षात तंत्रज्ञानात ज्या झपाट्याने प्रगती झाली, त्याच्या प्रचंड वेगाचा आमची पिढी गेली काही दशके अनुभव घेत आहे. किंबहुना या तंत्रज्ञानातील झपाट्याने होणार्‍या बदलांची आणि प्रगतीची ती साक्षीदार आहे. एकेकाळी सकाळी उठल्यावर सडासंमार्जन, रांगोळी वगैरे सकाळची कामं करणारी करणारी स्त्री आता सकाळी जाग आल्यावर आधी सेलफोन पाहते आणि लॅपटॉप, सेलफोन चार्जिंगला लावण्याचा विधी करते. सेलफोन वापरताना त्याची इतकी सवय झालीये, किंबहुना त्याच्या इतके अधीन झालोय की सेलफोन समोरून दिसेनासा झाला तर एक प्रकारची अस्वस्थता येते. सेलफोनचा चार्जर, लॅपटॉपचा चार्जर, कॅमेर्‍याची कॉर्ड... साधं प्रवासाला निघालं तर मला स्वतःलाच जाणवतं की आपण किती वायर्स कॅरी करतोय. त्यात लेक बरोबर असेल तर यात हेअर ड्रायरच्या वायरचाही समावेश! हल्ली प्रवास करताना मला कायम 'टाइम्स ऑफ इंडिया'तल्या एका लेखात नवीन पिढीला "वायर्ड जनरेशन" म्हटलं होतं त्याची आठवण येते आणि प्रत्ययही येतो.

पूर्वी प्रवासाला जाताना आम्ही बरोबर नेत असू बॅगा, पाण्याची बाटली, थोडं फार खाण्याचं सामान आणि पर्समधे पैसे ! आता पैसे, पाणी आणि खाणं जवळ नसलं तरी काही बिघडत नाही. कारण काळानुरूप घराबाहेर कुठेही पाणी आणि खाणं मिळू शकतं आणि पैसा तर काय, एक कार्ड एका मशीनच्या खाचेत घातलं की हातात पैसा!
खरंच सांगते... एटीएम जेव्हा अगदी पहिल्यांदा अनुभवलं तेव्हा आपल्याला जादूची कांडी मिळाली आहे आणि आपण स्वतः जादू करत आहोत असा अनुभव आला.

साठच्या दशकाच्या शेवटाकडची गोष्ट. माझ्या एका मैत्रिणीची बहीण शिकायला अमेरिकेला गेली. हीच आधी त्याकाळी नवलाई होती. ती अमेरिकेला सुखरूप पोचली हे कळायलाही बराच अवधी जावा लागला. नंतर एखाद्या ठरलेल्या रविवारी सकाळी मैत्रिणीच्या घरचे, शेजारी जाऊन बसायचे. कारण मैत्रिणीकडे फोन नव्हता. सेलफोन सोडाच...पण साधा लँडलाइन फोनही तेव्हा एखाद्याकडेच असायचा. तसा तो शेजार्‍यांकडे होता. मग मैत्रिणीची बहीण ठरलेल्या वेळी फोन करायची. त्यातही कधी ऐकूच यायचं नाही, ती तिकडून करत असायची पण इकडे कनेक्टच व्हायचा नाही. सतरा नाटकं. कधी कधी सगळ्यांना अगदी खट्टू होऊन घरी परतायला लागायचं. म्हणजे साधी खुशाली समजणंही दुरापास्त!

आणि आज २०११-१२ मधली गोष्ट. अमेरिकेतली माझी लेक खरेदीला जाते तेव्हा ती आयफोनवर स्वतःचा ट्रायल घेतलेल्या नव्या कपड्यांतला फोटो काढते, लागलीच मला त्याच आयफोनवरून मेल करते, मग मी माझी पसंती/नापसंती कळवली की मग दुसरी ट्रायल!

एकूणच आमच्या पिढीने तंत्रज्ञानामुळे रोजच्या जीवनात झालेले जे काही बदल अनुभवले त्याला तोड नाही. एकेकाळी 'पत्र' हा एक जिव्हाळ्याचा विषय होता आणि पत्रलेखन ही एक कला विकसित झाली होती. मैत्रिणींची, भावंडांची पत्रं, पोस्टमनने आणून दिल्यानंतर पाकीट/इनलॅन्ड उघडून वाचेपर्यंतची ती जीवाची घालमेल! अश्या पत्रांची पारायणं करण्यात काय गोडी असायची! आणि मग लिहिण्यातली मजा सुद्धा! पण एक दिवस इंटरनेट आणि ई-पत्रं आयुष्याचा अविभाज्य भाग बनली... पत्रामार्फत होणार्‍या गप्पा, विचारपूस फोनवर, चॅटमधे किंवा स्काईपवर व्हायला लागल्या आणि बघता बघता रोज पोस्टमनची वाट पाहणे हा एक मोठा आणि महत्त्वाचा विषय टेक्नॉलॉजीने संपुष्टात आणला !

final_f.jpg

माझ्या मते कंप्यूटर हा आमच्या पिढीला जाणवणारा सर्वात महत्त्वाचा असा तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी आमच्या ऑफिसातलं 'टायपिंग' हा एक 'बॉटलनेक फॅक्टर' बनत चालल्याचं लक्षात यायला लागलं आणि टायपिस्ट या एका व्यक्तीमुळे आपण परावलंबी होत चाललो आहोतसं वाटायला लागलं. पूर्ण झालेली कामं टायपिंगमुळे अडायला लागली. कंप्यूटरच्या मदतीने हा प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो असंही जाणवायला लागण्याइतपत माहिती झाली होती. पण कंप्यूटर कशाशी खातात काहीच माहिती नव्हतं! आम्हा उभयतांनी एका सुप्रभाती एक कंप्यूटर क्लास जॉइन केला. तिथे गेल्यावर तिथली इन्स्ट्रक्टरही नवखी आणि अगदीच तरुण बालिका! खरं म्हणजे आम्हाला या कंप्यूटर नामक यंत्राकडून काय पाहिजे हेच उमगायला आणि मनात क्लिअर व्हायला थोडा अवधी जावा लागला. पण दोन तीन दिवस क्लासला जाऊन आम्ही स्वतःच शिकण्याचा निर्णय घेतला. कारण क्लासमधे काही पदरी पडेना!

नवरोबांना त्यांची कामं होतीच. मग हे शिकण्याचं काम मी आवडीने माझ्या अंगावर घेतलं. मला नवीन टेक्नॉलॉजीला सामोरं जायला नेहेमीच आवडतं! त्यामुळे मी
लोटस-१२३, वर्डस्टार ७ इ. प्रोग्रॅमशी खेळायला सुरवात केली, जे प्रोग्रॅम्स अजिबातच यूजर फ्रेंडली नव्हते, त्यांच्या कमांड्स लक्षात ठेवायला लागायच्या. तरी कट-पेस्ट, कॉपी-पेस्ट करताना मजा वाटायची. मग आम्ही बाजारातून ट्यूटर फ्लॉपीज आणल्या आणि झुंज सुरू झाली. मजा आली. त्यावेळी आम्ही दोन '२८६' घेतले होते. हळूहळू, सगळ्यात आधी टायपिंग आणि मग सगळं ऑफिस कंप्यूटराइज झालं आणि मी स्वत:च टायपिस्ट बनले. 'लोटस-१२३'वर बॅलन्स शीट्स बनवायला लागले. वर्डस्टार ७ मधे पत्र आणि बाकीचं बरंच काही टायपायला लागले.

स्वयंपाकघरात, पाट्यावरवंट्यावरून मिक्सरवर शिफ्ट होताना सासूबाईंना कन्विन्स करायला जे स्किल सेट्स वापरायला लागले तेच ऑफिसात टाइपरायटरवरून कंप्यूटरवर शिफ्ट होण्याबाबत सासर्‍यांना कन्विन्स करताना वापरायला लागले. त्यांना कन्विन्स करायला अंमळ जास्ती वेळ लागला!

तेव्हा कंप्यूटर-स्टेशनरी नामक कागदांशी ओळख होतानाही बर्‍याच गोष्टी आधी माहीतच नव्हत्या. सुरूवातीला प्रत्येक स्टेटमेंटच्या कॉपीज करताना आधी जितक्या कॉपीज लागतील तितक्या वेळा प्रिंटर चालवत असू. प्रिंटरही डॉट-मॅट्रिक्स! काय कर्कश्श आवाज करायचा,(ऑफिस आहे की वर्कशॉप!) आणि किती वेळ लागायचा एकेका कॉपीला! पण हे सगळं करताना कार्ट्रिज बदलणं इ. कामंही आपोआप शिकत गेले.

लवकरच कार्बन घातलेल्या पर्फोरेटेड ट्रिप्लिकेट स्टेशनरीविषयी माहिती झाली. आणि मग काय महाराजा! असं वाटलं आता कामाचा वेळ तिपटीने कमी झाला! नंतर लेझर प्रिंटर आले, मग अत्यंत कमी आवाजात आणि कमी वेळात एकच कॉपी आणि त्याच्या लागतील तेवढ्या झेरॉक्स कॉपीज! मग आपण काय आणि कसं करत होतो असं वाटायला लागलं!

ऑल क्रेडिट गोज टु टेक्नॉलॉजी! मग व्यवसायाशी संबंधित सॉफ्टवेअर्स आली, पुण्याला जाऊन त्याच्यासंबंधात माहिती घेऊन ती ऑफिसात वापरू लागलो आणि काम सुकर झालं. एखाद्या क्लाएंटचं नाव फॉर्मवर हाताने ५/६ वेळा लिहिताना अगदी नाकी नऊ यायचे. नंतर सगळं संगणकीकरण झाल्यावर अशी बरीच हाताने(मॅन्युअली) करण्याची कामं वाचली. पण काम जितकं सुकर झालं तितकीच कामाची व्याप्तीही वाढली आणि येणार्‍या क्लाएंटच्या अपेक्षाही वाढल्या. जवळच्या खेड्यातून येऊन आज काम करून घेणारा माणूस पूर्वी म्हणायचा,"साहेब, चार पाच दिवसांनी येणार आहे, तेव्हा स्टेटमेंट्स घेऊन जाईन." तोच माणूस आज काम झाल्यावर थोडं नगरात चक्कर मारून छोटी-मोठी पर्सनल कामं करून त्याच दिवशी पेपर्स घेऊनच गावी जाण्याच्या तयारीने आलेला असतो.

तर ही झाली व्यवसायातली कथा! पण त्याचबरोबरीनं तंत्रज्ञानामुळे आपले छंद जोपासणं देखील खूपच सोपं झालं आहे. ऑफिसचं काम करता करता हळूहळू इंटरनेटही कधी जीवनात घुसलं, पत्ताच लागला नाही. आधी लेकीशी पत्रव्यवहार(इ-मेल), चॅटिंग, मग इथल्या सर्व ठुसुक फुसुक घटनांचे फोटो, व्हिडिओज, ऑडिओ क्लिप्स उसगावात असलेल्या लेकीला पाठवण्यासाठी तिनेच दिलेल्या डिजिकॅमचाही सराईत वापर करायला शिकले. तशीही कॅमेरा वापरण्याची आवड लहानपणापासून होतीच. अकरावीत असताना वडिलांशी खूप डिस्कशन करून(हुज्जत घालून?) ७५ रुपयांचा(कोण कोण दचकलं?) क्लिक थ्री चा कॅमेरा घेतला आणि खूप फोटो काढत सुटले. पण नंतर, आधी रोल आणण्यापासून ते फिल्म धुऊन(?) आणण्यापर्यंत, फोटोग्राफी हे एक महागडं अफ़ेअर आहे, हेही हळूहळू लक्षात यायला लागलं! मग नीट प्लॅनिंग करूनच जरूर तेवढेच फ़ोटो निघायला लागले. वडील म्हणाले होते की, "काही नडलंय का त्या कॅमेर्‍यावाचून?" आणि आता लक्षात येतंय की समोरच्या कडुलिंबावर अचानक वेडा राघू दिसतो तेव्हा जवळ डिजिकॅम नाही तर गेला बाजार सेलफोनचा तरी कॅमेरा हवाच! त्याच्याशिवाय मायबोलीवरच्या 'निसर्गाच्या गप्पा'त त्याचा फोटो कसा टाकणार? कॅमेरा ही रोजच्या जीवनातली इतकी जीवनावश्यक वस्तू बनेल असं कधीच वाटलं नव्हतं!

अगदी साध्या शिलाई मशीनला आधी इलेक्ट्रिक मोटर लागली, मग सिंगरचं फॅशन मेकर आलं! तेव्हाही त्या आतल्या भरतकामाच्या प्लेट बदलताना काय दैवी आनंद व्हायचा ... कापडावर उमटलेले वेगवेगळ्या प्रकारचे टाके बघून तर मन भरून यायचं! आता तर मशीन उघडून प्लेट्सही बदलाव्या लागत नाहीत. फक्त एक नॉब हव्या त्या खुणेवर नेला की हवा तो टाका! मला नेहमी वाटतं या सर्व निर्जीव गॅजेट्सनी माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण केला आणि ते सुंदर केलं!

संगीतक्षेत्रात तर तंत्रज्ञानानं एक स्थित्यंतरच घडवून आणलं. हा प्रवास अगदी रेकॉर्ड प्लेअरपासून चालू होऊन कॅसेट, सीडी मार्गे आयपॉड, पेन ड्राइव्ह अश्या स्टेशनांवर स्थिरावला! आता एका छोट्याश्या पेन ड्राइव्हमधे खूप काही सामावलेलं असतं! हीच पेन ड्राइव्ह तुम्ही तुमच्या कारच्या म्युझिक प्लेअरलाही लावून प्रवासातही आवडत्या संगीताचा आनंद लुटू शकता! आता कधीही काही उत्तम ऐकलं, पाहिलं की लगेच ते आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला पाठवू शकतो... इलेक्ट्रॉनिक तबला, तंबोरा आता इकडून तिकडे न्यायला, कॅरी करायला खूपच सोपा पडतो. आणि गायकाला खूप मार्गदर्शक ठरतो. ही किमयाही प्रगत तंत्रज्ञानाचीच!

फावल्या वेळात तुम्ही जितकं कंप्यूटरशी खेळाल तितकं तुम्ही स्वत:च नवनवीन गोष्टी शिकत जाता, असं मला वाटतं! लेकीचं लग्न झाल्यावर वाटायला लागलेल्या एकटेपणातूनच मला ''मायबोली'' सापडली. आणि बघता बघता मी माबोकर होऊन गेले. आपण 'व्यसनाधीन' होत नाही ना याबाबतीत मला स्वत:वर लक्ष ठेवायला लागलं!

नव्या पिढीबरोबर हळूहळू आमच्या पिढीनेही नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं इतकंच नाही तर नव्या पिढीसारखे आम्हीही त्यात नकळत गुंततही गेलो.

कधी फुरसतीच्या चार क्षणी मागे वळून पाहिलं की जाणवतं बोल बोल म्हणता समोरचं चित्र बदलत गेलं. कालपरवापर्यंत, शाळा कॉलेज करून संध्याकाळीच काय पण जेव्हा जमेल तेव्हा धुमसून खेळून, मैत्रिणींबरोबर हुंदडून, घरी येऊन, हातपाय धुऊन परवचा म्हणणारी आणि रात्री खूप उशिरा म्हटलं तरी फारफार तर दहा-साडेदहाला गाढ झोपणारी मुलं मला आठवतात. आज तेच चित्र खूप धूसर आणि अनोळखी वाटायला लागतं!

आज शाळा, अभ्यास, परीक्षा या चरकातून पिळून निघालेली तरुण पिढी, उमलत्या वयाची बालकं जेव्हा उरलेला वेळ टीव्ही आणि कंप्यूटरसमोर घालवताना दिसतात तेव्हा वाईट वाटते. खेळाची मैदाने ओस पडलेली दिसतात तेव्हाही मनाला यातना होतात. विकृत एमएमएस ला बळी पडलेल्या तरुणीबद्दल वाचलं की तंत्रज्ञानाला दोष द्यायचा की तरुणाईला... हेच कळेनासं होतं!

ऑर्कुट किंवा फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सबद्दल बोलायचं झालं तर आपल्या मित्रमंडळात काय घडामोडी चालल्यात हे या साइट्सवरून सहजी समजते. चांगली बाजूच बघायची झाली तर सामाजिक प्रश्नांबद्दल सोशल अवेअरनेस निर्माण करायला या साइट्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. तुमचा व्यवसाय वाढवायलाही इथे मदत होते. पण इथे अनोळखी व्यक्तीशी गंमत म्हणून मैत्री करण्यात खूप मोठी धोकाही असू शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. कधी कधी केवळ एखाद्याच्या आयुष्यात डोकावण्याची विकृत उत्सुकता म्हणूनही या साइट्सचा वापर होऊ शकतो. काही वेळा समोर ओळख न देणारा एखादा नातेवाईक, किंवा ज्याने आपल्याशी काहीही संबंध ठेवलेले नाहीत असा नातेवाईक किंवा मित्र/मैत्रीण फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकतात याला काय म्हणायचं?

एकीकडे या तंत्रज्ञानाच्या जादूगारानं माणसाचं एकटेपण दूर केलं. लांब परदेशी असलेली मुलं स्काइपमुळे जवळ आली. जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना समक्ष बघता येते, त्यांच्याशी ख्यालीखुशालीचं बोलता येतं, या आनंदात त्यांना जवळ घेता येत नाही ही व्यथा थोड्या काळापुरती का होईना या जादूगारानं दूर केली. ह्याच्या जादूनं, ह्या प्रगत तंत्रज्ञानामुळे वैद्यकशास्त्रातही आमूलाग्र परिवर्तन घडवलं, माणसाची आयुर्मर्यादा वाढवली...

पण आजीच्या गोष्टीतल्या जादूगाराप्रमाणेच ह्या तंत्रज्ञानाच्या जादूगारानंही हळूहळू अवघ्या आयुष्याचा कब्जा घ्यायला सुरुवात केली. हाती असलेल्या अमाप, अमर्याद ताकदीमुळे 'उतायला... मातायला' सुरुवात केली. तांत्रिक प्रगतीमुळे आणि प्रगत अश्या औषधांमुळे वाढलेली किंवा वाढवलेली आयुर्मर्यादा एखाद्या व्यक्तीला कितपत आनंददायी आहे हा एक प्रश्न निर्माण झाला. पायी चालणं आणि कष्टाच्या कामांची शरीराला सवयच राहिली नाही. सगळीकडे वाहनांचा वापर आणि उरलेला वेळ बैठी कामं याच्यामुळे माणूस अधिकाधिक व्याधिग्रस्त होऊ लागला. वाड्यांची जागा आता गगनचुंबी इमारतीनी घेतली. मोबाइल टॉवर्समुळेही कित्येक पक्ष्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालाय. शहरात बाळांना जेऊ घालताना "ये गं चिऊ" म्हणण्यापुरत्याही चिमण्या उरल्या नाहीत. रोजच्या कचर्‍याचा प्रश्न सुटता सुटत नाही आणि आता त्याच्या जोडीला इ-कचर्‍याचा एक ज्वलंत प्रश्न आपल्या समोर उभा ठाकला.

कालचा अनुभव पाठीशी असलेली आणि वर्तमानाशी जुळवून घेणारी आमची पिढी हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतेय... कधी आनंदानं.. कधी समाधानानं ....कधी निराशेनं.. तर कधी आशेनं!

कधीकधी याच डोळ्यांसमोर एक भविष्यकाळही उभा राहतो....आजी-आजोबा दूर परग्रहावर राहणार्‍या आपल्या नातवंडांना गोष्टी सांगताहेत... सॅटेलाईटच्या माध्यामातून...सुरस, चमत्कारिक गोष्टी ...पृथ्वीवरच्या माणसांच्या... कोणालाही सहज साध्य न होणार्‍या गोष्टी लीलया साध्या करणार्‍या कुशल, निपुण जादूगाराच्या !!

-मानुषी

प्रतिसाद

मस्तच लिहिलंय. विशेषत: लेखाचा पहिला अर्धा भाग ज्यात तुम्ही तुमच्या आयुष्याशी निगडित अनुभव, आठवणी सांगितल्या आहेत ते वाचायला खूप आवडलं :)

मस्त लिहिलय.

नव्या पिढीबरोबर हळूहळू आमच्या पिढीनेही नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं इतकंच नाही तर नव्या पिढीसारखे आम्हीही त्यात नकळत गुंततही गेलो. >> हे आवडले. :-)

छान!

खुप मस्त जमलाय लेख! सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं! तंत्रज्ञानाच्या प्रवाहाप्रमाणे तुम्हीही बदलत गेलात हे महत्वाचं!

खूप आवडलं. तुम्ही जसं तंत्रज्ञान स्वीकारलं, तशी दृष्टी आताच्या पिढीलाही ठेवावीच लागणार. नाहीतर.. कल्पनाच करवत नाही :)

अरे वा! इतके प्रतिसाद! छान वाटलं.!...धन्यवाद. एक मुद्दा खूप महत्वाचा राहिलाय! तो इथेच शेअर करते!
बोरू ते बराहा: बराहाचा अर्थ नक्कीच नव्या पिढीला समजेल पण बोरूचा अर्थ समजेलच याची मला खात्री नाही.
पण आमच्या पिढीने बोरू ते बराहा डॉट कॉम हाही प्रवास अगदी मजेमजेत केला आहे.
या पिढीला आश्चर्य वाटेल पण शाळेत...बहुतेक चौथीपाचवीपर्यंतच... मी शाईची दौत नेत होते हे मला अगदी लख्ख आठवतंय! आणि कित्येक वेळा ती दप्तरात सांडल्याचंही आठवतंय! आणि बोरू दौतीत बुडवून बुडवून लिहिताना कागदावर उमटत जाणारी अक्षर पहायलाही अगदी आवडायचं मला! अर्थातच दौत आणि बोरू वापरल्याचा कालावधी फ़ारच अत्यल्प असावा.
नंतरच्या कालावधीत वापरून उरलेल्या कागदावर लिखाण व्हायचं आणि हळूहळू "मायबोली"वर विहार करतानाच कधीतरी बराहा डॉट कॉमही गवसलं! मग जसं लेकीने डिजिकॅम भेट दिला तसंच मुलाने एका वाढदिवसाला एक छोटा लॅपटॉप(नेटबुक) भेट दिला आणि मग लिहिण्याचा(!?) उत्साह दुणावला. आणि हातून खूप लिखाण(!?) व्हायला लागलं.
पण सटीसामासी जेव्हा खरंच काही लिहिण्याची वेळ कधी येते तेव्हा जाणवतं की सुबक, आखीव, रेघी, पांढऱ्या तावावर पेनाने मोत्यासारखं वळणदार अक्षर काढण्यातही काय अमाप आनंद आहे!!

छान... टेक्नोलॉजी ऊत्क्रांती व स्थित्यंतरांचा अनुभव चांगला रेखाटला आहे..

काही जुन्या गोष्टी नाही अनुभवल्यात यातल्या. पण हल्लीचे बदलते ट्रेंडस नक्की पाहीले / अनुभवले आहेत. मानुषी छान झालय लेख.

कालचा अनुभव पाठीशी असलेली आणि वर्तमानाशी जुळवून घेणारी आमची पिढी हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहतेय... कधी आनंदानं.. कधी समाधानानं ....कधी निराशेनं.. तर कधी आशेनं! >>> अगदी, अगदी.

टेक्नोलॉजी ऊत्क्रांती व स्थित्यंतरांचा अनुभव चांगला रेखाटला आहे..>>> +१००

खूप सुंदरप्रकारे सादर केलंस मानुषी.

सर्वांना खूप खूप धन्यवाद!

तंत्रज्ञानात झालेल्या बदलांचा उत्तम आढावा..

मानुषी, आपला प्रवास त्याच वाटेवरुन झाला म्हणायचा, अगदी हेच आणि असेच टप्पे माझे... पण आता हा वेग मला झेपेनासा झालाय. पुरे वाटतय आता.

हिम्सकूल
तंत्रज्ञानात झालेल्या बदलांचा उत्तम आढावा..>>>>>>>>>>>>
ओक्के हिम्सकूल , तुमच्या पिढीची ही प्रतिक्रीया असेल तर भरून पावले रे बाबा! धन्यवाद!

>>>>>>आपला प्रवास त्याच वाटेवरुन झाला म्हणायचा, अगदी हेच आणि असेच टप्पे माझे... पण आता हा वेग मला झेपेनासा झालाय. पुरे वाटतय आता.
>>>>
अगदी अगदी ..........दिनेशदा, मला तर भीति वाटते की इथून पुढचा तंत्रद्न्यानाचा वेग आपल्याला झेपेल का?.........वाढत्या वयानुसार? की तंतं तंत्रद्न्यानातला म्हणताना आपली तंतरणार?

:)

छान झालाय लेख :)

सर्वांना धन्यवाद!

आवडला :)