दमलेल्या राजाची कहाणी

टपाट देश होता [१]. आलात परत? या. आणि आणखीन काही वेळा असं वर-खाली करायला लागणार आहे, आत्ताच मनाची तयारी करून घ्या. म्हणजे काय असं म्हणत असाल तर त्याचा अर्थ तळटीप बघायला कंटाळा केलात [१]. देशात एक राजा होता [२]. आता राजा म्हटल्यावर राजमाता, राजपुत्र, राजकन्या, राजजामात वगैरे आलेच, त्यांची ओळख होईल यथावकाश. किंवा नाही होणार. हे सगळे खरं तर पेज थ्रीवर असायला हवेत पण हल्ली तिसर्‍या पानावरही कोण सोमे-गोमे येत असतात, कॅप्शन वाचल्याशिवाय कळतही नाही कोण आहे ते. वाचल्यानंतरही कळतंच असं नाही. चालायचंच, कालाय तस्मै नम: (खरं तर या घटनेचा आणि या सुभाषिताचा काही एक संबंध नाही पण अमरीश पुरी जसा कबुतरांना दाणे फेकतो [३] तशी अधनं मधनं सुभाषितं फेकली की लेखाला वजन येतं. अर्थात त्यांचा अतिरेक करू नये (सुभाषितांचा. दाण्यांचा अतिरेक केलात तर 'पुतळे थोडे, कबुतरं फार' होईल, बाकी काही नाही.) नाहीतर लेखाचं वजन दिवेकरांचा काटा [४] थरथरेल इतकं व्हायचं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. सुभाषितांचाही. अति सर्वत्र वर्जयेत. काय समजलात? असो.) असो. (एक असो कंसाच्या आतलं, एक बाहेरचं. 'आता पुरे' या अर्थी. असो. हे या कंसाच्या आतलं, परत बाहेर नको नं टाकायला? का टाकावं? टाकूनच द्यावं. त्याला काय पैसे पडतात का?) असो.

ब्याक टू राजघराणं. या राज्यात राजाला फारशी पावर नव्हती कारण राजा राजघराण्यातून न येता एका सामान्य कुटुंबातून आलेला होता. राजमातेनं ऐन वेळी त्याचा राज्याभिषेक करून सगळ्यांना शह दिला होता. ती चाल पाहून खुद्द विश्वनाथन आनंदही अवाक झाला होता. ("यंडनारवुंड! ही बाई माझ्या जागी खेळली असती तर गेलफांडला दोन दिवसात अस्मान दाखवलं असतं!") सिंहासनावर यथावकाश राजपुत्र येणार हे उघड होतं पण कधी हा कळीचा मुद्दा होता. राजासकट सगळे मंत्री राजमातेच्या दरार्‍याखाली असायचे. किंवा असल्याचं दाखवायचे. कारण मलिदा नावाच्या पौष्टिक आहाराची या मंत्र्यांना इतकी सवय झाली होती की राजमाताच काय साक्षात रा. रा. ऍडॉल्फरावजीसाहेब [५] आले असते तरी काही फरक पडला नसता. या सततच्या मलिदा खाण्यामुळे [६] जनता हैराण झाली होती. एक मलिदा प्रकरण निस्तरतय तोवर दुसरं उघडकीला यायचं. लगेच राजा, राजमाता, अमात्य (पैचान कोन?) वाळू-शिमिट घेऊन खिंडार बुजवायच्या कामाला लागायचे. खिंडारं बुजवता बुजवता त्यांच्या तोंडाला फेस आला होता. आणि एक दिवस आक्रित घडलं. खुद्द राजजा..

["हॅलो."
"अरे वा, अलभ्य लाभ! अलभ्य लाभ! आज आमची कशी काय आठवण झाली साहेब?"
"हो साहेब, सगळं ठीक आपल्या कृपेनं. विनोदी लेख लिहीतोय, दिवाळी अंकासाठी."
"हेच आपलं..पॉलीटीक्स, करप्शन वगैरे. आपल्याला विषय कसा कळला साहेब?"
"नाही साहेब, विडंबनाच्या अंगानं जाणारा आहे. सध्याच्या परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी वगैरे ."
"नावं नाहीत कुणाचीच पण जितकं वर्तमानपत्रात आलं आहे तेवढं..."
"हो, बरोबर आहे साहेब, पण..."
"खरय साहेब, स्पष्ट पुरावे मिळालेले नाहीत."
"हो, अगदी बरोबर. मूर्तीभंजनाचाच प्रकार म्हणायचा हा."
"अरे वा? त्या स्वत: येणार आहेत समारंभाला?"
"ओक्के साहेब, अजिबात काळजी करू नका."
"ह्यॅ ह्यॅ.. हे काय विचारणं झालं का साहेब? नक्की येणार पार्टीला."
"ओक्के साहेब. भेटूच,"]

हे असं होतं बघा. दिवाळी आहे म्हणून काहीतरी विनोदी लिहावं म्हटलं तरी लिहू देत नाहीत. खरं सांगू का, विचारशृंखला तुटलेली वगैरे नाहीये, सगळं अजून आहे डोक्यातच. पण काय करता? हल्ली तडजोडीचा जमाना आहे. पूर्वी वशिला लावण्यासारखी कामं प्रतिष्ठेची नव्हती त्यामुळे सगळं पडद्याआडून करावं लागायचं. आता 'नेटवर्किंग'च्या गोंडस नावाखाली सगळं राजरोसपणे करता येतं. असो. तर कथा पुढे सुरू फक्त काही भाग गाळले आहेत. बाडी में क्या रख्खा है, भावनाओं को समझो.

महाराजांची बरीच वैशिष्ट्यं होती, त्यातलं एक म्हणजे ते नेहेमी गप्प असायचे. सुरूवातीला मंत्रिमंडळाला याची सवय नव्हती त्यामुळे पहिला दरबार संपल्यानंतर अमात्यांनी काळजीनं विचारलं, "महाराज, बरं वाटत नाही का? आपण गप्प होता." त्यावरही महाराज गप्पच राहीले. हळूहळू सगळ्यांना सवय झाली. अर्थात याला अपवाद होते. राजमाता किंवा राजपुत्र यांच्याबरोबर मात्र महाराज बोलत असत असं मानायला किमान '२ बीएचके (सेमी फर्निश्ड) + टेरेस (भरपूर हवा, उजेड)' एवढी जागा आहे. राजपुत्रांनी महाराजांची भेट घेतली अश्या स्वरूपाच्या बातम्या अधनंमधनं येत असत. शिवाय राजपुत्रांसाठी कोणतंही पद कधीही मोकळं आहे असं महाराज मोकळेपणानं सांगत असत. राजमातेशी त्यांचं काय बोलणं होत असे हे गुप्तच आहे पण अशी बैठक झाल्यावर हमखास एक-दोन दिवसात बदल्या/मंत्रिमंडळ विस्तार/नवीन नेमणुका/औट ऑफ टर्न प्रमोशन अशा गोष्टी घडत असत. त्यामुळे महाराज-राजमाता बैठक चालू आहे अशी अफवा जरी पसरली तरी सगळे मंत्री देव पाण्यात ठेवून देत असत. एका मंत्र्यानं तर देवघरात शेपरेट पाइपलाईन घेतली होती आणि बटण दाबायला एक माणूस ठेवला होता. आली बातमी, दाबलं बटाण की गेले देव पाण्याखाली. इतर मंत्री आपापल्या श्रद्धेनुसार विविध धर्मांच्या प्रेषितांना साकडं घालत असत, काही लोक स्वामींकडेही जात असत. पण कोणे एके काळी - राजपुत्राचे काका राज्य करायचे तेव्हा - स्वामी लोकांना राजदरबारी जे वजन होतं ते आता राहीलं नव्हतं. त्यामुळे पावरबाज स्वामी एक-दोन बोटांवर मोजण्याइतके राहीले होते. त्यातलेही काही ष्टंट बाजी करण्यात मग्न होते.

राजपुत्राचा वेगळाच प्रॉब्लेम होता. लहान असताना त्यानं राजपुत्र सिद्धार्थाची गोष्ट वाचल्यावर त्याच्या मनात आलं, 'आपल्यालाही असंच सगळ्या दु:खांपासून दूर ठेवलं जातय का?' त्यानं पडताळून बघायचं ठरवलं. एक दिवस तो राजमातेला म्हणाला, "आई, आई, मी बसमधून करोल बागेत जाऊ?" राजमाता लगेच हंबरडा वगैरे फोडून त्याला 'नही, तुम्हें मेरी लाश पर से गुजरना होगा' वगैरे म्हणणार अशी त्याची कल्पना होती. "जा की." राजमाता म्हणाली. "आणि येताना दोन किलो बटाटे घेऊन ये. आपण 'न्यॉक्की दी पताते' करू संध्याकाळी." राजपुत्राचा चेहरा पडला. नंतर काही दिवसांनी त्यानं आणखी एक प्रयत्न करून पाहिला. घरी आल्यावर आईला सांगितलं, "आई, आज मी रस्त्यावरच्या ढाब्यावर जेवलो." आता तरी ती नको म्हणेल? पण राजमाता म्हणाली, "तुला आवडतं का त्यांचं जेवण? आवडत असेल तर जा महिनाभर तिकडे जेवायला. तू आजारी पडतोस का बघूयात, नाही पडलास तर मीही एकदा येईन तुझ्याबरोबर. रोज रोज पास्ता खाऊन कंटाळा आलाय बघ." आयला, राजपुत्र टरकला. असंच चालू राहीलं तर ही बाई एक दिवस आपल्याला नक्की कारगिलमध्ये पाठवणार. त्यानं परिस्थिती स्वीकारली. पण अजूनही कधीकधी आशेचा किरण डोकवायचा, कुठे लोकलमधूनच फिर, कुठे शेतकर्‍याच्या घरीच जेव असले प्रकार तो करून बघायचा. पण राजमातेनं त्याला कधीच थांबवलं नाही. देश एका आधुनिक बुद्धाला मुकला.

राहता राहिले राजकन्या आणि राजजा... पण नको, परत फोन यायचा. मोठमोठ्या वृत्तपत्रांची, न्यूज अँकर लोकांची ज्याच्याबद्दल बोलायची हिम्मत झाली नाही ते आमच्यासारखे य:कश्चित लेखक कुठून सांगणार? बाडी में क्या रख्खा है, भावनाओं को समझो|

तर अशी ही राजा आणि राजमातेची कहाणी सुफळ संपूर्ण. उतू नका, मातू नका, लाइक करणं सोडू नका. ही कथा वाचल्यानंतर तिचा दुवा दहा फ्रेंड लोकांच्या भिंतीवर चिकटवला नाहीत तरी काही होणार नाही. तसंही काय व्हायचं राह्यलयं? शेतकरी आत्महत्या करतायत; जमिनी पाण्याखाली जातायत; यंत्रांकरवी, यांत्रिकपणे डास-चिलटं मारावीत तशी माणसं मारली जातायत. आम्ही कधी कॅपिटलिझम, कधी मार्क्सिझम तर कधी लिबर्टेरियनिझमध्ये; कधी पिंकर, कधी अमर्त्य सेन तर कधी चॉमस्कीमध्ये - उत्तरं शोधत आहोत आणि जाडजूड, वजनदार शब्दांमध्ये स्वत:च्या असमर्थतेचं रॅशनलायझेशन करत आहोत. ते ही नाही जमलं तर विनोद आहेच. आता आम्हाला 'गॅलोज ह्युमर' जमायला लागला असं वाटतय. (बाकी मरहट्टांच्या प्रांतामधले हल्लीचे विनोद आणि त्यांची निर्मिती करणारे मेंदू यांनी एकमेकांशी घेतलेली फारकत बघता कधीकधी त्या ह्यूमरपेक्षा गॅलोजच बरे असं वाटायला लागतं.)

आता थांबतो. संध्याकाळी पार्टीला जायचय नं साहेबांकडे.

----

अल्टर्नेट युनिव्हर्स : वरच्या लेखाचा आणि याचा संबंध असेलच असं नाही. किंवा नसेलच असंही नाही.

१. हे फक्त बघायला तुम्ही खरंच वर-खाली करताय की नाही. वन, टू, फोर टेष्टींग, तीन किधर हय वगैरे. (कमिंग सासू : तुमने बंटी की दोस्ती देखी हय, अब दुश्मनी देखो.)

२. ही कथा, स्फुट किंवा जे काय आहे ते तुमच्या सुदैवाने पारंपरिक आहे. अन्यथा असं काहीतरी वाचावं लागलं असतं - आटपाट देश होता. आट की पाट? पहिल्याच प्रश्नाचं उत्तर न देता आल्यानं माझ्या जांभळ्या, नपुंसक जाणिवा उलतात, विस्कटतात, करवादतात. पुढे राजा असो वा नसो, मुंगीच्या मेंदूतल्या न्युरॉनचं चक्र त्यानं थांबणार का? सीएटलच्या क्युबिकलमध्ये 'क्लाउड बेस्ड मेमरी अ‍ॅप'चा कोड डीबग करताना रंग बदलणारा कर्सर टेबलावरच्या गणपतीच्या चित्राकडे पाहून डोळे मिचकावतो. (ग्लोबल व्हिलेजच्या जाणिवांचं हिंदकळणं एका वाक्यात काय अलगद पकडलय नै? आणि त्यातही ब्लिंकिंग कर्सरचं डोळे मिचकावणं - काय प्रत्ययदर्शी प्रतिमा आहे! जिओ!) थांबू म्हणताय? वाचा की अजून थोडसं? चकटफूच वाचताय नं? किरमिजी पेलिकनच्या पंखावरची - की पेलिकनच्या किरमिजी पंखावरची - की पेलिकनच्या पंखावरची किरमिजी - माशी कुणाला साद घालते आहे? 'अस्ति कश्चित वाग्विशेषः?' हा प्रश्न विचारण्याआधीच सुरू झालेला अलवार अभिव्यक्तीचा प्रवास 'ओपन गंगनम स्टाइल'पाशी आल्यावर थबकतो, गोंधळतो, मागे वळून बघतो, अँड्रॉइडवर गूगल मॅप्स बघतो, जवळच्या स्टारबक्समध्ये 'टॉल टू पंप पेपरमिंट, टू पंप मोका ब्लेंडेड क्रीम फ्राप्पुचिनो' ऑर्डर करतो आणि 'यो! हॅंगिंग आउट ऍट स्टारबक्स, ड्यूड्स. हॅपी दसरा टू यॉल!' असं फेसबुक स्टेटस टाकतो. ब्रिटनी स्पिअर्सच्या डाव्या करंगळीला मुंग्या येतात. आजच्यासाठी इतकं पुरे. जा आता वर. (अन ते काय मोका-खोका ऑर्डर केलंय ते इथं विसरू नका. बंटीला मोकळा सोडलाय आज, त्याला काही म्हणजे काही खायची सवय आहे. नंतर आम्हाला निस्तरावं लागतं, लिटर-ली! बंटी म्हणजे आमचा अल्सेशियन हो. प्युअर ब्रीड, बरं का! असं काय करता - मागच्या वेळी तुमची नडगी फोडली होती नं त्यानं. एवढ्यात विसरलात का? नंतर आठवडाभर चावायला त्रास होत होता त्याला. ब्रेडसुद्धा बारीक करून द्यावा लागायचा. पुअर बंटी!)

३. आणि नंतर रूकरुक खान कबुतराच्या जखमेवर 'इस धरती की मिट्टी' लावून त्याला भुर्रकन उडवतो. 'हे पाहून आम्हाला ज्या जखमा झाल्या त्यांना कोणती माती लावणार?' असा रोखठोक सवाल टाकून एखादी पणती क्षणभर उजळून विझावी तसा तो मटकन खाली बसला.

पण ती पणती होण्याआधी,
आजी माजी होती
गोडगोड खाऊ द्यायला
नेहेमीच राजी होती

त्या गेल्या दिवसांकडे
मी पुन्हा पुन्हा वळून बघतो
त्या मखमली क्षणांची आठवण
अजूनही ताजी होती

- कवी बदामराव बेदाणे यांच्या भावनांच्या पाकात ओथंबलेल्या 'पणती' या चारोळीसंग्रहाला तरूणाईची पसंती, फेसबुकावर दोन हजार लोकांनी लाइकले. ~ धृतराष्ट्र टाइम्स.

पहिल्याच परदेशप्रवासात व्हेनिसच्या विमानतळावर मी एकटीच बसून होते. घरच्या आठवणीने पोटात ढवळून येत होतं - आणि विमानात जे जे दिलं ते सगळं खाल्ल्यामुळेही - दोन फ्रूटी, स्प्राईट, चहा, राइस, भोपळा-टोमॅटो-बीन्सची मिक्स भाजी, मसाला चिकन, कच्चे काकडी/गाजर/मुळा, गुलाबजाम, ब्रेड, बटर, जाम, फ्रूट्स, दही, कॉफी, ऑरेंज ज्यूस, चॉकलेट, रेड वाइन (पहिल्यांदाच घेतली. चव कुमारीआसवासारखी लागली, मग मी सवयीने डोळे गच्च मिटून सगळा ग्लास रिकामा केला. हवाईसुंदरी बघतच राहीली.). 'पानात काही टाकायचं नाही' असा आमच्या नानांनी लहानपणापासूनच दंडक घातलेला. नानांची आठवण येताच डोळे भरून आले. आत्ता काय करत असतील ते? माईंबरोबर नेहेमीप्रमाणे 'प्रियालाच काय, कुणालाच काही कळेना' बघत असतील का? परत आल्यावर मी आमच्या महिला मंडळात भाषण दिलं, 'व्हेनिसनं मला काय दिलं?' आमच्या सेक्रेटरीबाईंना ते इतकं आवडलं की त्या म्हटल्या, "पुढच्या वेळीपण तुम्हीच बोला." जाताना अबूधाबीला पाच तासांचा हॉल्ट होता. मी त्यावर बोलले, 'अबूधाबीनं मला काय दिलं?' नंतर मिसेस टाकसाळे म्हणाल्या, "जाताना चेंबूरला ट्रॅफिकमध्ये अडकला असताल नं? पुढच्या वेळी त्यावर बोला, चेंबूरनं मला काय दिलं?" काही लोकांना इतरांचा उत्कर्ष बघवत नाही हेच खरं. ~ सौ. अल्पना, भुक्तपीठ, दै. दुपार.
(घाबरू नका, तळटीप सावकाश वाचली तरी चालेल. बंटीला बांधलाय आज.)

४. दिवेकरांच्या काट्यावर चढल्यावर काट्याचा दीर्घ प्रवास बघून हताश झालेली म्हैला कोणतं गाणं म्हणेल? काटा लगा SSSS (बंटी, नो बंटी. ब्याड डॉग!)

५. "काही म्हणा, हिटलर एक महान नेता होता" असं म्हणून त्याची आडून स्तुती करणार्‍यांना त्याच्यासमोर उभं केलं तर? असं म्हणणार्‍या एकाचेही डोळे निळे नसणार. (कपूर लोकांना मराठी येत नाही त्यामुळे ते कटाप.) एखाद्याचे असलेच निळे तरी केस सोनेरी नसणार. गार्निएचं उसनं सोनेरीपण चालणार नाय बरं का! अ‍ॅडॉल्फच्या मेंदूने त्यांच्या डोळ्यांच्या, केसांच्या रंगांची नोंद घेऊ देत. मग आम्ही डोळे फाडून ती नेत्तृत्वाची महानता वगैरे बघू आणि जाता-जाता शाडनफ्रॉईडचा लुत्फही लुटू. (डोंट वरी हं. बंटी एकदा फोडलेल्या नडगीला परत तोंड लावत नाही. ही इज व्हेSSरी पर्टीकुलर अबाउट दॅट, यू नो. हो की नै रे बंटी? आणि तुमच्या तर दोन्ही नडग्या फोडून झाल्या आहेत. नाऊ की नै यू आर अगदी सेफ. लुक बंटी, हूज हिअर? हू इज अ गुड डॉग? बंटी, बंटी!! नो बंटी. ब्याड डॉग!)

६. खाण्यावरून आठवलं. श्रेया घोषाल आंबा खाताना कोणतं गाणं म्हणेल? ती गाणं कशाला म्हणेल, ती आंबा खाईल. (बंटीला ना रूट कॅनाल करायला नेलय. त्याची डावी दाढ हलत होती, लास्ट वीक अलोन त्याने सात नडग्या फोडल्या, यू नो. येईलच इतक्यात. अहो, पळताय काय असे? थांबा ना. चहा तरी.. का त्यादिवशीचं मोका-खोका मागवू?)

- राजकाशाना

प्रतिसाद

जबरदस्त! लय हसलो..

OMG...LOL

>>> चेंबूरनं मला काय दिलं?
>>> देश एका आधुनिक बुद्धाला मुकला.
>>> सीएटलच्या क्युबिकलमध्ये 'क्लाउड बेस्ड मेमरी अ‍ॅप'चा कोड डीबग करताना रंग बदलणारा कर्सर टेबलावरच्या गणपतीच्या चित्राकडे पाहून डोळे मिचकावतो

--- जबरदस्त! :)

खतरनाक

:हाहा: भयंकर जमलाय.

भन्नाट!

लई भारी राजकाशाना. :हाहा:
ऑस्सम लिहिले आहेस.

सही जमलाय! :)

:)

सर्वांचे अनेक आभार. सुगरण म्हैला आणि शेफ बापयेमंडळी यांच्यासाठी 'न्योक्की दि पताते' ची रेशिपी.
जमली तर लय भारी लागते असे स्वानुभवावरून सांगतो. :)

http://mumbaiboss.com/2012/01/06/gnocchi-di-patate-by-giovanni-federico/

मस्त लिहिलय, राज! भन्नाट!! :-)

:हाहा:

भन्नाट!!

तळटीपांमुळे (सर्वात शेवटी वाचल्या तरीही) रसभंग होतो असं वैम. लेख फक्कड जमलाय... फार भारी... :)

भयंकर सुंदर जमलाय लेख.

खाण्यावरून आठवलं. श्रेया घोषाल आंबा खाताना कोणतं गाणं म्हणेल? ती गाणं कशाला म्हणेल, ती आंबा खाईल.>> :हाहा:

भन्नाट!

बोले तो ढिन्च्यॅक्क!! :)

जबरदस्त.. :) फार दिवसांनी या शैलीत या दर्जाचे वाचायला मिळाले.

लईच जोरात....

:-)

डार्क ह्युमरसाठीचा एक उत्तम विषय त्याबद्दल लेखकाचं अभिनंदन.

दोन स्वतंत्र (आणि चांगले) लेख होऊ शकले असते असं तळटीपा वाचताना निदान मला वाटलं. त्यामुळे रसभंग होतो. वाचून संपल्यावर वाह छान वाटायला हवं होतं ते वाटत नाही हेमावैम. :)

अप्रतिम. झक्कास शैली, उत्तम सटायर! :)

:-) फार दिवसांनी या शैलीत या दर्जाचे वाचायला मिळाले.>> ++१

:D
सह्हीये बॉस! आवडेश.

:D

:D