पाटी

शा

ळा सुटली, पाटी फुटली, आई मजला भूक लागली… हे गीत आताशा ऐकायला मिळत नाही. पण का, कोण जाणे परवा सहज आठवलं आणि शाळेतली पाटी आठवली.
पाटी, ही माणसाच्या जीवनात एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. पाटीनेच माणसाचे जीवन बदलले, घडवले, बिघडवले. पाटी या शब्दाचा अर्थ कधी कधी वेळ, स्थान, व्यक्ती अशा गोष्टींनुसार बदलतो. जसे शाळेची पाटी शिकण्यासाठी असते (पुढे घरून करून आणायच्या अभ्यासाचा भार वाढला, की पाटी टाकणे हा प्रकार सुरू होतो आणि तो आयुष्यभर उपयोगी पडतो. यावरून ही अभ्यास पध्दती किती दूरदर्शी आहे हे लक्षात येते.) तर पाटी पुसणे, कोरी पाटी, गंभीर पाटी, पाटी टाकणे, दारावरील नावाची पाटी, पुणेरी पाट्या असे अनेक प्रकार अभ्यासता येतील. नुकतीच या विषयावर कोणी तरी पी.एच.डी. केल्याचं ऐकीवात आहे. आपण यातले दोन तीन प्रकार पाहू.

असो, तर माझ्या लहानपणी शाळेत ४ थी पर्यंत पाटी होती. आमच्या काळी आतासारखं नव्हतं (पुण्यात रहायला आलं की असं म्हणायचा हक्क आणि जबाबदारी आपोआपच येते. संदर्भ : तुम्हांला कोण व्हायचंय मुं.पु.की नागपुरकर.... लेखक : पु.ल.दे.). हां, तर तेव्हा आतासारख्या प्लॅस्टीकच्या पाट्या नव्हत्या त्यामुळे दगडी जड पाट्याच वापराव्या लागत. विद्यार्थ्यांच्या पाट्या भरवणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे असा आमच्या शाळेत एकूण एक शिक्षकांचा समज होता की काय कोण जाणे. त्या मुळे ४ थी पर्यंत पाट्या आणि पुढे वह्या भरवणे म्हणजेच शिक्षण अशी त्यांचीच काय आता माझीही ठाम समजूत आहे , मग डोक्याची पाटी कोरी राहिली तरी बेहत्तर् पण……... .

Shalechi-Paati.gif
चौथी पर्यंत आम्ही घरचा अभ्यास पाटीवरच करायचो. पण एका बाजूवर लिहीताना दुसऱ्या बाजूला लिहीलेले न पुसता लिहीणे हे कौशल्याचे काम होते. खरतर या कौशल्याबद्दलही काही गुण राखीव असावे अशी आम्ही मागणी करणार होतो. परंतु पुढे पाचवीपासून पाटीच नव्हती त्यामुळे ते राहून गेलं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पाटी टाकणं मात्र चालूच राहिलं. या भानगडीत किती जणांची बौध्दीक उंची वाढण्याऐवजी तिची स'पाटी' तशीच राहिली कोण जाणे. ही सपाटी कधीतरी चुकून एखाद्या शिक्षकाच्या लक्षात आलीच तर त्या विद्यार्थ्याचा हात म्हणजे पाटी आणि पट्टी म्हणजे पेन्सील समजून त्या हातावर खुशाल रेघा ओढल्या जायच्या. तशी ती बौध्दीक स'पाटी' लक्षात यायला आणि एवढं तांडव करायला कारण काही खास नसे. आता समुद्र स'पाटी' वगैरे शब्द ऐकून एखाद्याला चौ'पाटी' आठवली की पुढे भेळ वगैरे आठवणारच ना. तेव्हा लिहायच्या पाटीकडे लक्ष द्यावे की चौ'पाटी'कडे अशा 'भेळयुक्त' मनस्थितीत असतानाच नेमका त्यालाच प्रश्न विचारला जायचा आणि पुढचं रामायण घडायचं. मला सांगा यात त्याची काय बरं चूक? हा तर अभ्यासाच्या पाटीवर लिहीत, माफ करा पाटीबद्दल लिहीत होतो. पाट्या, सगळ्या जरी दगडीच असल्या तरी थोडे प्रकार त्यातही होतेच. काही छान रंगीत कडांच्या असत, काही डबल पाट्या असायच्या, म्हणजे २ पाट्या बिजागरींनी जोडलेल्या असायच्या. एका पाटीचंच ओझं वाटायचं तिथे दोनची हमाली कोण करणार. काहींना अर्ध्या भागात रंगीत मणी असायचे, ते म्हणे गणित शिकण्यासाठी असायचे, असोत बापडे. पण मला तशी पाटी वापरणाऱ्यांचा वेगळ्याच कारणासाठी हेवा वाटायचा. त्यांची पाटी किती पटकन भरायची. पाटी भरली की पुढे लिहायचा प्रश्नच नाही. दसऱ्याला पाटीपूजन असायचे. हा प्रकार मला आवडायचा कारण तेव्हा पाटीला आणि मला दोघांनाही आराम असायचा. तसं तेव्हाही छानपैकी झोप काढायच्याऐवजी पाटी पूजनासाठी सकाळी शाळेत जावे लागे. एकूण काय, हे पाटी नावाचं प्रकरण सर्वच बाबतीत जरा जडच वाटलं. पण कधी कधी वाटतं, इमारत भक्कम होण्यासाठी पाया असा मजबूत, दगडीच हवा, नाही का? अशी ही शाळेतली पाटी हातून हळूच निसटून, टाकायची पाटी केव्हा हातात येते ते कळतही नाही. पण त्याबद्दल नंतर बोलू.

Puneri-Pati.gif पाट्यांचा अजून एक प्रसिध्द प्रकार म्हणजे पुणेरी पाट्या. यात कधी वाचण्यासाठी, कधी दाखवण्यापुरत्या, कधी दिसतील अशा, तर कधी आहे पण दिसणार नाही असे बरेच उपप्रकार आहेत. या पाट्यांवर काय लिहीलेलं असतं ते सांगायची गरजच नाही. ते सगळ्यांनाच पाठ आहे. या पाट्यांना लोक उगाचच नावं ठेवतात. खरंतर या पाट्यांमधून उच्च दर्जाची कल्पकता पहायला मिळते. पुणे हे विद्येचे माहेरघर त्यामुळे इतरांना सतत शिकवले पाहिजे या कळकळीतून थोडा शहाणपणा शिकवला तर कुठं बिघडलं? त्यात उच्च विचार असणारच किंबहुना उच्च विचारच असणार अशी माझी खात्रीच असते. त्यामुळे मी सर्व पुणेरी पाट्यांकडे आदराने पहातो. अपुणेरी लोक उगाचच या पाट्यांचा बाऊ करतात. तरी बरं समर्थांनीच म्हणून ठेवले आहे “शहाणे करून सोडावे सकळजन”. हा विषय तसा खूपच मोठा, शुद्ध मराठीत सांगायचे तर फारच व्हास्ट आहे . अहो, सकाळ दैनिकात तर श्री.कल्याण टांकसाळे आणि श्री. सागर बेदमुथा यांनी पूर्ण वर्षभर 'पुणेरी पाट्या' हे सदर चालवलं होतं. या पाट्यांची काही ठळक वैशिष्ठ्ये म्हणजे स्पष्टोक्ती, धमकीवजा सूचना, तर काही सूचनायुक्त धमक्या, काही नुसत्याच सूचना, तर काही कल्पकता दाखवणाऱ्या. वानगीदाखल ही काही वाक्यं पाहू. “दोघांत एक मिसळ खाऊ नये, वेगळे १०रु. पडतील”. “गाडी येथे लावू नये, पंक्चर झाल्यास आम्ही जबाबदार नाही” दिसतात की नाही एकदम स्पष्ट विचार? डळमळीत नाही. बचत हा तर केवढा मोठा गुण आहे. आता बचतीसाठी निरनिराळ्या सूचना एकाच पाटीवर लिहील्या तर काय होतं ? पण त्याची चेष्टा केली जाते हो. खरंच चांगल्या गोष्टींची कदरच नाही. “डॉ. XYZ, कुत्र्यांपासून सावध रहा, येथे साडीला फॉल पिको करून मिळेल, येथे इडली पीठ मिळेल”… एकाच पाटीवर…. अशा पाट्या फोटो काढून इमेल केल्या जातात. एकीकडे केवढी बचत आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी ? अरेरे, फार वाईट वाटतं. माझ्या मते अश्या गोष्टींचा जाहीर धिक्कार केला पाहिजे. उलट या परंपरेचा प्रसार केला पाहिजे. हा सांस्कृतिक ठेवा जतन होईल, वृद्धिंगत होईल अशा योजना आखल्या पाहिजेत. विद्यापीठांनीही याचे अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. अहो अनेकदा काठीपेक्षा पाटी अधिक परिणामकारक ठरल्याची उदाहरणं आहेत. त्यावरून 'काठी पेक्षा पाटी', 'पाटी सम्राट', 'महा पाटीकार' सारख्या स्पर्धा सुरू केल्या पाहिजेत असा विचार मनात आला. नुसता विचारच नाही तर चित्रच डोळ्यांसमोर उभं राहिलं. निरनिराळ्या वाहिन्यांवर अशा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. नाच, गाण्यांच्या स्पर्धांचा टिआरपी एकदम कमी होऊन या स्पर्धांचा टिआरपी एकदम टॉपला आहे. या कार्यक्रमांच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट आहे. बस, रेल्वे रिकाम्या धावताहेत. एस एम एसची संख्या इतकी आहे की सगळ्या लाईन्स जॅम झाल्या आहेत. निरनिराळ्या वाहिन्यांवर त्यांचे त्यांचे गुरू, महागुरू स्पर्धकांना पाटी पेक्षाही गूढ आणि स्वतःलाही न कळेल अशा भाषेत पाटीवर लिहूनच उपदेश करत आहेत. “तुम्ही लिहीलेली पाटी वाचून तुम्हांला जे कळलंय असं वाटतंय ते बाकीच्यांना कळतंय की नाही हे तुम्हाला कळलं नाही तरी तुम्हाला हे कळणं महत्वाचं आहे की………...तुम्ही त्यांना कळतंय असं समजणं हे मला वाटतं तुमच्या कळण्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे , ऍम आय राइट? म्हणजे मला असं वाटतं हं….” किंवा “म्हणजे असं पहा, तुमची कल्पना चांगली वाटली, पण तुमच्या पाटीतून भाव दिसत नाहीत. तुम्ही उजव्या बाजूची अक्षरं थोडी तिरकी लिहीली असतीत आणि पुढे बाण काढला असता तर मला वाटतं पुरेसा तिरकसपणा आला असता आणि अगदी काळजात बाण लागल्यासारखं वाटलं असतं.” वगैरे वगैरे….. अशा प्रकारचे लेखी (सु)संवाद चालू आहेत.

असो, सध्यातरी अशी काही व्यवस्था नाही तेव्हा या प्रवृत्तींचा निषेध करणाऱ्या आणि पाटी संस्कृतीचा जयघोष करणाऱ्या पाट्याच लावाव्या असा मानस आम्ही पुढील योजनांच्या पाटीवर लिहीला आहे.

अजून एक पाटीचा प्रचलित प्रकार म्हणजे टाकायची पाटी (पाटी टाकणे). मगाशी म्हटल्याप्रमाणे शाळेतली पाटी हातून हळूच निसटून, टाकायची पाटी केव्हा हातात येते ते कळतही नाही. हा प्रकारही काही लोकांनी उगाचच बदनाम केला आहे. इतका चांगला आणि लोकप्रिय प्रकार दुसरा नाही. तसं पाहिलं तर याचे काही फायदेही आहेत. एक म्हणजे पुढे काय करायचंय त्याचा विचार करावा लागत नाही, डोकंही चालवावं लागत नाही. कुठली पाटी टाकायची ते ठरलेलंच असतं. इतरांना त्यांचं नियोजन करता येतं, तुमच्यावर अवलंबून रहावं लागत नाही, कारण मगाचचंच. उगाच इतर गोष्टी न केल्याने वेळ, पैशाची बचत होते. सारं काही ठरल्याप्रमाणेच करत गेल्यामुळे अनपेक्षित असं काही सहसा समोर येत नाही. असे अजूनही बरेच फायदे आहेत.
आता एवढे फायदे असून त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि पाट्या टाकणाऱ्यांची हेटाळणी करायची असा निंद्य प्रकार काही जण करतात. पण त्यांना हे माहीत नाही, की पाट्या टाकणं हे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी तपशचर्या करावी लागते. किंबहुना पाट्या टाकणे हीच एक अखंड तपश्चर्या आहे . याची काही पथ्यंही पाळावी लागतात. अजिबात डोके चालवायचे नाही. निरीक्षण, विचारमंथन, चर्चा, कल्पकता, उत्स्फुर्तपणा वगैरे सारख्या गोष्टी वर्ज्य असतात. दर दिवस, आठवडा, महिना किंवा वर्ष यापैकी कोणत्याही ठराविक काळाने, वेगळं काहीतरी म्हणून ठरलेल्या गोष्टी करायच्या. फिरायला किंवा चालायला (सॉरी वॉकला) जाणं, करमणुकीच्या कार्यक्रमांना जाणं, सहल, बागकाम, निरनिराळ्या ग्रूप्समधे जाणं, मित्रभेट, हॉटेलिंग अश्या अनेक गोष्टी बदल म्हणून नेमाने करायच्याच. मग एखादे वेळी कंटाळा आला असला तरी…….. एखाद्या गाण्याच्या किंवा व्याख्यानाच्या कार्यक्रमाला गेलोच तर गाणं / व्याख्यान संपल्यावर न चुकता टाळ्यांची पाटी टाकायची. त्यासाठी काही समजण्याची, समजून घ्यायची गरज नाही. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत अशा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे सगळं स्थितप्रज्ञ राहून करत रहायचं. मग कोणी हसो वा रुसो. निंदकांकडेही अजिबात लक्ष द्यायचं नाही. शेवटी तेही निंदेच्या पाट्याच टाकतात ना? एक पट्टीचा पाटीवालाच हे करू शकतो. तसं सगळेच सजीव जन्मापासून मरणापर्यंत जगण्याची पाटीच टाकतात की. काही कसलेले लोक हे सर्व इतकं बेमालुमपणे करतात की ते पाट्या टाकताहेत हे न कळल्यामुळे निंदकांना संधीच मिळत नाही.
आमच्या एका सगळ्या गोष्टींची कारणे शोधायच्या पाट्या टाकणाऱ्या मित्राने पाट्या टाकण्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. कधी पुढच्याने केला म्हणून, कधी पर्याय नाही म्हणून, कधी नवीन काही करण्याची हिंमत नाही म्ह्णून, तर कधी इतरांच्या इच्छेसाठी कुठल्या ना कुठल्या कारणाने अनेक पाट्यांची निर्मिती होते. त्यातही वयोमानाप्रमाणे शिक्षणासंबंधीच्या पाट्या, मग व्यावसायिक, प्रापंचिक, धार्मिक असे पाट्यांचे निरनिराळे प्रकार असतात. अगदी सण साजरे करणं हाही त्यातलाच भाग होऊन जातो.

कारणं काहीही असोत. पण एकदा पाटी टाकायची सवय लागली की त्यासारखं दुसरं सुख नाही हे मात्र खरं. अशा सुखी माणसाला मग सगळीकडेच पाट्या दिसू लागतात. अहो परवाच माझ्या लक्षात आलं की 'झाडांनीही आपापल्या ऋतूत आपापल्या फुला, फळांच्या पाट्या टाकायला सुरुवात केली आहे'. शेवटी माणूस निसर्गाचाच भाग आहे. माणसांत आणि निसर्गात देवाणघेवाण चालायचीच.

हुश्श…झाली एकदाची पाटी टाकून. नुकतंच मी ठरवलं होतं की दिसामाजी नाही, तरी निदान दर महिन्याला काही तरी लिहायचंच. हा त्याचाच भाग. आता पुढच्या महिन्यात पुढची पाटी……

- जो_एस

प्रतिसाद

चांगली पाटी टाकली आहे :)

त्याच त्याच (पुणेरी) पाट्या टाकू नयेत.. हुकुमावरुन :)

मस्त पाटी टाकलीय !

    माझ्या माहितीप्रमाणे 'पाटी टाकणे' मधली पाटी शाळेची पाटी नाही. बांधकामाच्या कामावर असणार्या मजुरांकडे वेत, बांबू किंवा तत्सम प्रकाराने विणलेली टोपली सद्रुष्य वस्तू असते तिला पाटी म्हणतात. इकडची माती तिकडे टाकणे या कामासाठी वापरतात. कमितकमी कौशल्याचे काम असल्यामुळे ' नुसतेच पाट्या टाकणे ' असे म्हणतात. 
    बाकी दसर्याच्या पाटीपुजनाची आठवण ताजी झाली. इथल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे सरस्वती आईकडून आदल्या रात्री काढून घ्यायची आणि पाटी वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवायची. सकाळी नटून थटून शाळेत. कोणी स्त्रीदेहातील देवी सरस्वती काढून आणली असेल तर हेवा वाटायचा... 

अरे वा जो छान लिहिलंस की..

मिलिंदा, दिनेशदा, सोनू, शशांक
धंन्यवाद

छान लिहीलय. :स्मित:

छान आहे:)

अभिप्रायाबद्दल धंन्यवाद

मस्त लिहीलेय जो :)

विनिता धंन्यवाद