सागुती

"आ

न आजूऽऽऽ न, मंदीचा संदीप. झाली का दीड डजन?”

“मानलं ब्वा तुला. आम्ही जमीन-जुमला आसून एव्हडी पिलावळ नाई पोसू शकत आन तुम्ही कसं काय जमवता हातावर प्वाट आसून, रामाला ठाऊक!”

“आवं, सुट्टीपुरती येत्यात लेकरं, जलमभर थोडीच येणार हाईत”

जोडा सांधत सांधत बाबा कुणाशीतरी गप्पा हाकत होता. ओसरीत दुपार घाम फोडीत होती. गुलाबी मुंडाशाखालून टीपटीप करत घाम बाबाच्या पांढ-या झालेल्या खुरट्या दाढीतून वाट काढत होता. तासाभरापासून बाबा काम करत होता. आम्ही अंगणभर हुंदडत होतो.

मामाचा गाव म्हणजे लळा-जिव्हाळा आणि बालपण यांचा आनंदोत्सवच. मग दिवाळी असो की उन्हाळा, आम्ही वाटच पहात असू. केव्हा एकदा मामाच्या गावी जातोय असं व्हायचं तेव्हा. मी धरून अठरा नातवंडे. आमचे खेळ, भांडणं, गोंधळ, आरडाओरडा आणि आजीची चूल, कोणालाही उसंत नसायची. खाणं आणि खेळणं एवढंच दिवसभराचं काम. मग कोणाला आवडणार नाही तिथं रहायला? आम्ही पंधरा-पंधरा दिवस आजोळी रहायचो.

“जमलं का?” सांधलेला जोडा मालकाच्या हातात ठेवत बाबा हसला.

“जमलंच की, बरं काय द्यायचं याचं?”

“पाच रुपयं द्या झालं.”

“आरं येडा का खुळा, धा रुपयाच्या जोड्याला पाच रुपयं सांदाया?”

“मंग द्या की खुशीनं काय ते, पोरं हायेत तं खायापेया लागतंय.”

“आरं मंग आस्स बोलकी लेका! सागुती खाणार काय?”

“सागुती?” बाबाच्या चेहऱ्यावरच्या रेषा खुलल्या.

“घराकडं ये.”

शब्द संपेपर्यंत मालक ओसरी उतरून निघाला होता. बाबा मनातून आनंदून गेला. कोपरीचा खिसा चाचपत त्याने बिडी काढली, दुसऱ्या हाताने काडेपेटी काढून शिलगावली. गालाच्या खळग्यांचा अंत पहात धूर छातीत कोंबला.
दोन-चार झुरके मारून मग त्याने आजीला हाक मारली,

“शिते ऽऽऽऽ ये शिते”

“काय?” आजी दारातून डोकावली.

“ डेर्‍याच्या मळ्यात जायचंय, पिशी दे.”

“इतक्या उन्हात?”

“ऊन काय माणसाला खातंय व्हय? पर माणसानं ऊन खाल्ल्याबिगर दुसरं काही खायला मिळंल का?”

डोक्यावरचं मुंडासं सोडून बाबानं घाम पुसला. तोंड पुसलं. आयुष्यभर उन्हानं रापलेल्या नशिबाच्या रेषा एका हातानं चाचपल्या आणि काहीतरी ध्यानात येऊन तो आजीला म्हणाला...

“भगुलं न् मीठ-मिरची काढून ठेव भाईर... रात व्हईल... आन त्योबी येईल तंवर”

“म्हंजी पोरासोरास्नी ‘ते’ खायला घालणार तुमी?”

“नाई, माह्यापुरतं आणतो, लागलं ग्वाड तं खातील लेकरं."

“मी उपाशी ठेवीन पोरं, पर हे आसं नाई खाऊन देणार. त्यांच्या आईबापांला कळालं तं पाठवतील का परत?”

“का? बामनाची हैत? नका पाठू म्हणावं.” बाबा घरातल्या कोणावरही रागवायचा, मात्र आम्हा पोरांना जीव लावायचा.

आजीच्या हातातली पिशवी हिसकावत तो ओसरी उतरू लागला. चालता चालता हातात घेतलेली रापी त्याने पिशवीत हळूच ठेवली. आत्तापर्यंतची चर्चा लक्षपूर्वक ऐकल्याने मला सागुतीबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकत होतो.

“बाबा, मी येऊ?” मागून पळत जाऊन मी बाबाला हटकले.

“नको रं बाबा, रात व्हईल.”

बाबा नको नको करीत राहिला, मी हट्ट धरीत राहिलो. बाकीची पिलावळ खेळण्यात दंग होती. आजीही घरात निघून गेली होती. अनवाणी पायांनी मी बाबासोबत निघालो. बाबा माझ्याशी अजिबात बोलत नव्हता. झपझप पावलं टाकत तो पुढं पुढं चालत होता आणि मी त्याच्या मागे. थोडे अंतर गेल्यावर एका अरुंद बोळाजवळ तो थांबला. “हितच थांब, आलोच मी.” बाबा बोळात वळाला आणि क्षणात दुसऱ्या टोकावर दिसेनासा झाला. मी उभा राहून वाट पाहू लागलो. मनात विचारांची वादळं घोंघावू लागली. काही वेळ असाच गेला. आणि मग बाबा परतताना दिसला. दुरून बघतानाच त्याच्यात बदल जाणवत होता. मुंडासे नीटनेटके केले होते. चालण्याचा डौल बदलला होता. चेहऱ्यावरची एक एक सुरकुती करारी बनली होती. जवळ येऊन माझ्याशी काहीही न बोलता तो पुन्हा चालू लागला. हळूहळू त्याच्या पायांनी वेग घेतला. मी मागे पडत होतो, बाबा पुढे पुढे जात होता. आणि अचानक मला ठेच लागली. मी धपकन खाली पडलो. आवाज ऐकून बाबा धावत जवळ आला. हातातल्या पिशवीने माझा अंगठा त्याने पुसला, जरावेळ दाबून धरला.

“नको येऊ म्हनलो होतो ना?” बाबा हळहळत होता. मी कपडे झटकून उभा राहिलो.

“चालता येईल ना? का उचलून घेऊ?”

इतका वेळ गप्प असणारा बाबा बोलायला लागला तसे मला जाणवले की त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता.

“बाबा, तू दारू पेला?”

‘’व्हय रं लेकरा”

“का?”

“काय सांगू बाळा, गरीबी लई वंगाळ आस्ती, ती फक्त राबवती, कसंबसं जगवती. शिरमन्तांच्या श्या खाया, अपमान गिळाया, कोणी तरी असावं म्हणून.”

बाबा जे बोलत होता त्यातलं मला काहीच कळत नव्हतं. वाट उरकत होती बस्स.

..........................................................

“त्या तिथं टाकलीय शेळी... त्या... त्या गोठ्यात.” हिरव्या बागायतातल्या रुबाबदार माडीसमोरून मघाच्या जोडयावाल्यानं दूर खुणावत सांगितलं.

“आजारली व्हती काय?”

‘नाय रं उन्हात व्हती काल, व्ह्लगाडली तापानं !”

“म्हंजी चांगली आसंल!”

“शंभराला नस्ती दिली, बरं चामडं काढून बाकीच लांब फेकून देशील ना?”

“व्हय तर!”

बाबाशी बोलून मालक माडीत निघून गेला.

Saguti.gif

गोठ्यात शिरताच आमच्या चाहुलीने दोन कुत्री गोठ्याबाहेर पळाली.

"बाबा, हे काय करतोय?" घडणार्‍या प्रकाराचं मला कधी आश्चर्य तर कधी किळस वाटत होती.

“ बाबा, कामाचे पैशे द्यायचे सोडून यानं पुन्हा कामालाच जुपलं तुला, आन सागुती कवा देणार हाये?”

“आरं लेकरा, हे चामडं इकलं का पाच रुपयं मिळतील. तुमची सकाळची बटारं व्हतील आन सागुती आपुनच काढायची.”

बाबाने दगडावर रापीला धार लावली... सरसर हात चालू लागला काही वेळातच त्याने चामडे बाजूला करून पिशवीत घातले. कुत्र्यांनी बऱ्याच ठिकाणी शेळीचे लचके तोडले होते.

“सांग, काय खायचं तुला? काळीज का फरा?” बाबाच्या प्रश्नाने मी गोंधळून गेलो.

“हे खायचं?”

“आरं हीच सागुती”

“मेलेल्या जनावराचं मटन?”

“मारलेलं काय नि मेलेलं काय, भुकंला डोळं नसत्यात लेकरा.”

भूक शब्दावरून आठवलं बाबा सकाळपासून उपाशीच होता. काम करीत होता. मी त्याला विचारलं

“बाबा, तू जेवला नाई ना आज?”

“म्हनलं व्हतं शितीला, म्हनली पोरांनी संपवलंय समदं, आता जेवा की प्वाटभर.”

चांगलं दिसेल ते ते मांस कापून बाबाने पिशवीत भरलं. उरलेली शेळी खांद्यावर घेऊन दूर फेकून आला. त्याने पिशवी काखेत घातली आणि माझं बोट पकडून घराचा रस्ता धरला.
............................................

आम्ही घरी पोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. आजीने पातेलं आणि मसाला बाहेर भिंतीला लागून असलेल्या तीन दगडांच्या चुलीजवळ ठेवला होता. पोरांची पंगत पडली होती. बाबाने हातपाय धुतले. आजीने त्याच्या वाट्याची भाकर बाहेर ताटात आणून ठेवली.

मटणाचे बारीक तुकडे करून बाबाने मसाला लावून पातेल्यात शिजण्यास टाकले.
मी घरात जेवायला गेलो तेव्हा आजी बाहेर येऊन बाबाला म्हणाली
“त्यो यायच्या आत जेऊन घ्या. घरात शिजून देत नाईच,आला तं खाऊन बी देणार नाई.”

“मी त्याचा बाप हाये का त्यो माझा? आयुष्यभर आसंच जगलो आपुण. आता खाणं सोडलं म्हून काय इमान येणारे का न्यायला तुकारामाचं? आन काय कमिवतो त्याच्या कापडाचोपडाला आन डब्याला पुरतं का?”

एव्हाना सागुतीचा दरवळ गल्लीभर पसरला होता. कुरबुर करत आजीने बाबाला जेवायला बसवलं. कांदा चिरून पुढ्यात ठेवला. बाबा घास घेणार तोच सायकलची घंटी वाजली.

"मामा आला ऽऽऽऽ मामा आला" करत पिलावळ त्याला झोंबली. बाबा अंगणाच्या कोपऱ्यातून गप्प बघत होता.

“कसला वास येतोय आई?” मामाने जेवणाचा डबा खाली टेकवत आजीला विचारले.

"अं..."

आजी काही बोलणार तोच त्याने बाबाच्या ताटातलं मटन पाहिलं, चुलीवरचं पातेलं पाहिलं. आणि क्षणभरही विचार न करता पहिल्यांदा पातेलं आणि नंतर बाबाचं ताट उचलून रस्त्यावर भिरकावलं. इतकावेळ आजीपुढे वाघ बनलेल्या बाबाचं लेकापुढे मांजर झालं होतं.

“काय कमी पडू देतो मी तुम्हाला? का अशी चव घालवताय? याला अजिबात भाकर देऊ नकोस आई.” मामा रागात बडबडत होता.

बाबा जागेवरून उठला. हात धुतले. गोधडी उचलून अंगणाजवळ रस्त्यावर अंथरली.

आकाशातलं चांदणं पोटात भरता येत नाही, नाहीतर त्याने तेही केलं असतं. दिवसभराची भूक होती, अश्रूंनी कशी भागणार? तो नुसताच पडून राहिला होता. जरावेळाने मी त्याच्याजवळ गेलो.

“बाबा, जेवायला चल ना!”

“नाई लेकरा, आता भूक नाई." भरल्या डोळ्यांनी बाबा उत्तरला.

“मामा तुला किती बोलला, तू त्याला काहीच का नाही बोलला?”

“आरं तो कामावून दमून आला व्हता. शिनला व्हता. मी बोललो असतो तं जेवला नसता. आन सकाळी पुन्हा कामावं जायला ताकत नको अंगात? म्हून नाई बोललो. तुला हे समदं नाई कळायचं, ल्हान हैस... झोप आता. जा.”

दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा बाबा आमच्यासाठी धोतराच्या सोग्यात बटर घेऊन आला होता. त्याच्या चेहऱ्यावर किंचित हसूही होतं, कालचा दिवस तो साफ विसरला होता. आणि त्याचं कारण एकच होतं. अशा असंख्य रात्री गरिबीने त्याला आंदण दिल्या होत्या ज्यांची सागुती करून त्याने आयुष्याच्या रस्त्यावर फेकली होती आणि नव्या दिवसाची वाट पहात झोपला होता, पुन्हा त्याच रस्त्यावर.

-शाम

प्रतिसाद

आवडली कथा :)

भयंकर आहे हे सगळं.......असंही जगावं लागतं लोकांना.... :(
लिखाणात कुछ तो है दोस्त..... वाचत रहावंसं वाटतं !!

आवडली कथा.

छान लिहिलयं .

सुरेख लिहिलंय

आवडली.

खतरनाक लिहीले आहे!

गालाच्या खळग्यांचा अंत पहात धूर छातीत कोंबला.>>>
अशा असंख्य रात्री गरिबीने त्याला आंदण दिल्या होत्या ज्यांची सागुती करून त्याने आयुष्याच्या रस्त्यावर फेकली होती आणि नव्या दिवसाची वाट पहात झोपला होता, पुन्हा त्याच रस्त्यावर.>>> जबरदस्त!

भुकंला डोळं नसत्यात लेकरा>>>>>>अशक्य खरंय!! :(

काय प्रतिक्रिया द्यायची हे कळत नाहीये! तुमची लेखनशैली जबरदस्त आहे इतकंच म्हणेन!!

उत्तम..

आवडली कथा

सुंदर कथा

सुंदर...
आवडली.

खुप मस्त. आवडली.
चमन +१

शाम,नि:शब्द केलंत.. वेदनेचं बोलणं काळजात घुसतं,घर करून रहातं..

:(
तुम्ही प्रभावीपणे पोहोचवलीत. छान कसं म्हणायचं? सॉरी.

नि:शब्द करणारी खरंच .. काय प्रभावी शैली आहे लेखनाची ..

शेवटपर्यंत कथेचा गाभा शाबूत ठेऊन साध्याश्याच मांडणीतून व्यक्त होणारी >> ह्याबाबतीमधे चमन +१.

अप्रतीम लिहीलत. डोळ्यात पाणी कधी आले कळलेच नाही.

अप्रतिम.

खुपच छान. मस्त जमलीय कथा.

शाम,

खूप सरळ शब्दांत दाहक वास्तव मांडलंय. भूक खूप भयंकर प्रकार आहे.

खरंतर मला माझ्याच या वाक्यांचं हसू येतंय. शेवटी नायक परिस्थितीशी त्याच दमाने झुंजत राहतो. आपण काही करू शकत नाही हे जाणून वाचकाचा मात्र छक्का होतो. माझा झालाय.

भुकेची कळ काय असते त्याचा एकदा अनुभव आला होता. नाही, तसलं काही नाही. व्यवस्थित खात्यापित्या घरचा होतो. वांगणीजवळच्या चांदेरीच्या डोंगरावर आम्ही १२ जण वाट चुकलो होतो. खाणं आणि पाणी अपुरं होतं. बाकीच्यांना द्यावं लागलं कारण आम्ही 'लीडर'! चांगला गरगरीत असूनही भुकेने पार लोळागोळा केलान माझा. ज्यांना दिवसच्या दिवस उपास पडत असतील त्यांचं काय होत असेल! केवळ कल्पनाच करता येते.

आ.न.,
-गा.पै.