"आ
ज पहिल्या फुलाचं बाळलेणं मिळणारेय - म्हणून पहाटे पहाटे उठतोय."
"आज पहिल्या प्रकाशाचं गूज कळणारेय - म्हणून हुंदडत सुटतोय!"
शरदऋतू येणार म्हणून नेहमीच तो असा हरखून जातो. सोनसळी किरणांत न्हालेल्या कमळाच्या पाकळीवरून सोन्याचे कण डोळ्यांनी लुटत राहतो. झाडं-माडं तर त्याचे जन्माचे नातलगच.
"आज पारुलताईच्या रानात जाईन आणि तिला आमंत्रण देऊन येईन - तायडे, तुझ्या इवलाल्या तुतारीसारख्या फुलांचे गुलाबी घोस मिरवत ये. चाफादादाच्या सावलीत भेटतोय आपण सारीजणं."
गाणं रचता रचताच तो थबकतो. आपल्या पांढर्याशुभ्र केसांचं, ’गुरूदेव’ या पदवीचं त्याला भान आहे. जगानं दिलेल्या सगळ्या उपाध्या, जाणत्या माणसालाच वाहावी लागणारी समजूतदार ओझी त्याला चिकटली आहेत. अधूनमधून ते सारं उतरवून ठेवायचा खेळ खेळतो तो स्वत:शीच. "आज शकालबेलाय छेलेखेलार छले सकल शिकल टूटेछी" --पहाटेच मांडलेल्या या लहानपणीच्या खेळाच्या नाटकातून सगळ्या साखळ्या तोडतोय.
पण त्या साखळ्यांच्या अस्तित्वाची जाणीव मात्र त्याला पुसून नाही टाकता येत. त्यानेच रचलेल्या चालीत खिन्न किणकिणत राहतात ती बंधनं.
एकटाच आपल्या अभ्यासिकेत असतो तेव्हा असं आर्त गाणं गुणगुणायची मुभा असते त्याला. पण मग शांतिनिकेतनातली ती चिल्लीपिली ’आजोबा, गाणं शिकवा’ म्हणत येतात, तेव्हा मात्र तो क्षणापूर्वीचा काळीमा कसा झटक्यात नाहीसा होतो! त्याच्यातलं खोडकर मूल टाळ्या पिटत गायला लागतं,
"ढगाच्या कुशीत, ऊन आलं खुशीत,ढगोबाची फुट्टी,
आज आम्हांला सुट्टी रे बाबा, आज आम्हांला सुट्टी.
काय करावं कुणाला माहीत, वाट चुकावी कुठल्या राईत?
कुणाच्या अंगणी धूम ठोकावी, घेऊन सगळ्यांनी बट्टी?
केवडयाच्या पानांची होडी करून सजवू तिला फुलांनी भरून
हळूच तळ्यात देऊया सोडून, जाईल डुलत मोठ्ठी!
गुराखीदादासंगे जाऊ, गायी चारू - पावा वाजवू
अंगी माखू परागकण, चाफ्याशी करून गट्टी!"
पोरांचा चिवचिवाट विरत जातो, तसा तो पुन्हा आपल्या विचारांत गुंगतो. आता मात्र त्याच्या मनात त्याची लाडकी सकाळ उतरलेली असते शरदातली. तिची दृष्टभेट घ्यायला तो घराबाहेर पडतो. निघण्यापूर्वी काचेच्या कुपीतल्या अत्तराचा एक थेंब दाढीला लावायचा परिपाठ विसरत नाही!
बाहेर निळ्या आकाशाच्या राजरस्त्यावरून, शुभ्र ढगांच्या रथात बसून शारदलक्ष्मी त्याच्या भेटीला आलेली असते. प्रसन्न हसत तो गुणगुणू लागतो. त्याचे शब्द, त्याचे सूर - त्याच्यासारखेच चिरतरुण! पुढे दशकानुदशकं त्यांची भूल कायम राहाते. नव्या लयीत, नव्या पेहरावात ते गाणं त्याच शारदीय भावना जागवत राहतं. नुकतीच मिसरूड फुटलेला गिटारधारी पोरगा शरदाच्या नावाखाली तिचंच रुपडं पाहात असतो.
" तुझा सूर्य ओंजळभर प्रकाश घेऊन आला आणि सोबत आपल्या बोटाचा ठसा तेवढा सोडून गेला. दंवात न्हालेले तुझे केस आणि रानवाटांतून विखुरलेला तुझा पदर - पहाटेशीच माझ्या उरात केवढी ती धडधड! माणकांनी गुंफलेली कांकणं लेवून, सतेज कांती घेऊन ओढणी सावरत येतेस, तेव्हा बागेतल्या फुलापाखरांचं नाचगाणंच की गं थांबतं क्षणभर. त्या विरागी प्राजक्ताच्या मनात सुद्धा चलबिचल होते तुझं नाजूक सौंदर्य पाहून. (आपली सौंदर्यलेणी जमिनीवर उतरवताना थबकतच असेल तो - ’असू देत थोडी माझ्याचपाशी’ म्हणत!)"
फिरत फिरत तो एका वाटेवर विसावतो. दुतर्फा पारिजातकाची झाडं ओळीनं उभी राहिलेली, आणि रस्त्यात लक्ष लक्ष फुलांची रांगोळी वाहिलेली. हे शिउली फूल, ही शेफाली त्याला फाऽर आवडते. त्याच्या मनात शरदाचं आणि प्राजक्ताचं अतूट नातं आहे. टच्च भरलेल्या कणसांचं, ओंब्यांचं समृद्ध दर्शन याच ऋतूत घ्यायचं आणि मग लगेच सारं धान्य लुटून आणून उघडीबोडकी झालेली जमीनही पाहायची. उत्तररात्री अंगावर चांदण्या पांघरलेला रसिक प्राजक्तही पाहायचा, आणि पहाटेच ते सुगंधी दान जमिनीला देऊन मोकळा झालेला संन्यस्त पारिजातकसुद्धा. शरदातल्या सुखाला असलेलं कातरपण म्हणजे सृजनानंतर नाळ तोडताना होणारं दु:खच असेल. त्याच्या ’हिरव्या सावलीत पहाटे-पहाटे दिवाळी घेऊन आलेल्या शेफाली’कडे तो एकटक पाहात राहतो. दिवसभराच्या कामकाजात स्वत:ला बुडवून घेणार्या त्याच्या मनाला संध्याकाळी आपली गुपितं सांगायला तीच तर असते हक्काची! शिउलीची मंद करुण भूपाळी वार्यावर लहरत या कवींच्याही कवीला थोपटत राहाते मग.
- गायत्री नातू
प्रतिसाद
खूप जिव्हाळ शब्दचित्र
खूप जिव्हाळ शब्दचित्र महाकवीचं अन त्याच्या शारदलक्ष्मीचं .
सुंदर लिहिलय,
सुंदर लिहिलय, गायत्री!
>>पहाटेच ते सुगंधी दान जमिनीला देऊन मोकळा झालेला संन्यस्त पारिजातकसुद्धा>>
क्या बात है!
छान आहे लेखन.
छान आहे लेखन.
शेवटचा पॅरा फार छान जमलाय...
शेवटचा पॅरा फार छान जमलाय...
सुरेख. गायत्री, अजून का नाही
सुरेख.
गायत्री, अजून का नाही लिहीलेस? अपूर्ण आहे हे..
सुरू व्हायच्या आधीच संपला लेख
सुरू व्हायच्या आधीच संपला लेख असं वाटलं.
छाने.अजून लिहायला हवे होते.
छाने.अजून लिहायला हवे होते.
वरील सर्वानाच अनुमोदन... अजून
वरील सर्वानाच अनुमोदन...
अजून वाचायला आवडले असते.
छान लिहिलाय लेख. अजून लिहायला
छान लिहिलाय लेख. अजून लिहायला हवं होतं.
युट्युबची लिंक उघडत नाहीये. :(
छान आहे ..
छान आहे .. :)
सुरेख गुंफण.. छान भाषा..
सुरेख गुंफण.. छान भाषा..
(No subject)
:)