तुझे इवले पाऊल



ivale paaul_f.jpg तुझे इवले पाऊल,
बाळा घरभर पडे..
घर अंगण सजले,
दारी अमृताचे सडे ||१||

तुझे इवले पाऊल
जाग आणतसे घरा,
तुझ्या टपोर्‍या डोळ्यांत
माझी सामावली धरा ||२||

तुझे इवले पाऊल,
आता शाळेलाही जाई,
पाटी-पुस्तक हातात
मागे पडली अंगाई ||३||

तुझे इवले पाऊल,
कसे भराभर वाढे,
नीती नियमांचे सुद्धा
त्याने गिरवले धडे ||४||

तुझे इवले पाऊल,
उच्चशिक्षणही ल्याले,
लागे अर्थार्जन करू
खरे स्वावलंबी झाले ||५||

तुझे इवले पाऊल,
हवा सोबती तयाला,
उभा जन्म सोबतीने
सप्तपदी जगण्याला ||६||

तुझे इवले पाऊल
जोडव्यांनी सजलेले,
कर संसार सुखाचा
फुलो स्वप्न जपलेले ||७||

तुझे इवले पाऊल,
आता कधी-मधे येते..
सार्‍या घराला स्पर्शूनी
हलकेच परतते ||८||

तुझे इवले पाऊल
फार फार आठवते,
सार्‍या आठवणी तुझ्या
पाणी पापणीला देते ||९||

तुझे इवले पाऊल
करी संसार मानाचा,
नाव राखी संस्कारांचे,
आब दोन्ही घराण्याचा ||१०||

तुझे इवले पाऊल
बाळा आता जडावले..
स्निग्धावल्या चित्तवृत्ती
अंग रेशमी जाहले ||११||

तुझे इवले पाऊल
आता रुप बदलते,
होता 'आई' तू तान्ह्याची
त्याला थोरपण येते ||१२||

-बागेश्री

प्रतिसाद

सुंदर..... कविता, वाचन दोन्हीही!

अतिशय सुरेख कविता! सादरीकरणानं कवितेचं सौंदर्य अधिक खुललं आहे.

अप्रतिम, पापणी ओलावली........

कविता खूप सुंदर, सादरीकरण जरा गडबडलेय कुठेकुठे.

आभारी आहे दोस्तहो..
सादरीकरणाचा अगदी पहिला प्रयत्न होता हा, लाँग वे टू गो :-)

छान!

सुंदर, सुंदर आणि सुंदर.

बहिणाबाईंची आठवण झाली. तुझे इवले पाऊल .... अप्रतिम कविता.

केवळ केवळ अप्रतिम... प्रत्येक लेकीच्या आईचं मनोगत कवित्तात... सहज, सोपी शब्दरचना, साधासुधा भाव....
आवंढा आला गळ्यात...
बागेश्री, सादरीकरणही सुंदर आहे...

कविता छानच आहे..

सादरीकरण मात्र तितकेसे नाही आवडले.
>>तुझ्या कोवळ्या डोळ्यात का टपोर्‍या...? कवितेत "टपोर्‍या" आहे!

सुंदर. बहिणाबाईंची आठवण झाली :)

नचिकेत, शशांक, किशोर, दाद, योग, अगो मनःपूर्वक आभारी आहे..

साधासुधा भाव....>> दाद :)

हो योग, सादरीकरणाबाबत सहमत.
कवितेचे दोन व्हर्जन्स झाले, टपोर्‍या आणि कोवळ्या, मूळ कवितेत कोवळ्या होते तेच सादरीकरणात आलेय, लक्षात नव्हते आले रेकॉर्ड करताना.. आभारी आहे.

छान कविता.

गोड! सहज सोपी शब्द रचना..+१

अतिशय सुरेख कविता..

पहिल्या प्रथम हा अंक चाळला तेव्हा बागेश्रीची एक तरी कविता/रचना असलीच पाहिजे ह्या अपेक्षेनेच अंक धुंडाळला होता आणि ही रचना गवसली होती. आत्ता पर्यंत खूप वेळा वाचन केले ह्या कवितेचे. :-)
पण बागेश्रीच्या आवाजातले सादरीकरण आता ऐकले त्यामुळे प्रतिसाद आता देत आहे.

कविता व सादरीकरण दोन्ही आवडले.

दुसर्‍या कडव्यात टपोर्‍या ऐवजी कोवळ्या आणि
तिसर्‍या कडव्यात शाळेलाही ऐवजी शाळेतही

हे बदल मी टिपले. पण एकुणच कवितेच्या सौंदर्याला मुळीच बाधा येत नाहीये. :-)

आवडेश! :-)