जनुकीय दैववादाचा अजब नमुना

११० वर्षांच्या आजींच्या तब्येतीचे रहस्य त्यांच्या जनुकांत.'
'ऑलिंपिकमधील उत्तम यशाकरता चिनी खेळाडूंच्या जनुकांत फेरफार केल्याचे आरोप.'
'मला मॅथ्स कसे येणार, माझ्या घराण्यात ते कुणाला जमत नाही, इट्स काइंड ऑफ जेनेटिकल यू नो...'

शेवटची अर्थातच बातमी नाही! ते माझ्या एका विद्यार्थ्याने गणितात सातत्याने कमी गुण मिळाल्यावर दिलेले कारण आहे..या तीनही विधानांमधले एक समान गृहीतक आहे, ते म्हणजे 'आपले प्रत्येक गुणवैशिष्ट्य हे संपूर्णपणे आपल्या जनुकांवर अवलंबून असते'. अर्थात हा अनुवांशिकतावाद काही नवा अजिबात नाही. अगदी प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्येदेखील काही गुण हे आनुवंशिक असतात हे नोंदवलेले होते. घराणेशाहीच्या आणि पितृसत्ताकपद्धतीच्या मुळाशी हा अनुवांशिकतावाद नक्कीच होता. पुढे वंशवादाला शास्त्रीय पाठबळ देण्याच्या प्रयत्नांमध्ये 'गोरे किंवा कॉकेशिअन्स हे जन्मजात, आनुवंशिकतेनेच श्रेष्ठ आहेत' हे सिद्ध करण्याचा प्रचंड, पण असफल प्रयत्नही करून झाला.

डीएनएची रचना आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याचे कार्य कसे चालते हे जसजसे कळू लागले तसतसे एका अत्यंत तीव्र जनुकीय दैववादाची सुरुवात झाली. 'ह्युमन जिनोम प्रॉजेक्ट'मधून पुढे आलेल्या अफाट माहितीनेही हा समज जास्त दृढ होऊ लागला. 'जो नसिबमें लिखा होगा वोही होगा'ची जागा 'जो जीन्समें लिखा होगा वोही होगा' या वाक्याने घेतली. प्रसारमाध्यमांनी या प्रकाराला आणखीनच खतपाणी घातले. 'अल्झायमर्सचे जनुक सापडले', 'भारतीयांमध्ये मधुमेहाचे जनुक जास्त प्रभावी', आणि अर्थातच सर्वांत गाजलेली बातमी 'स्तनांच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी अँजेलिना जोलीने केली शस्त्रक्रिया'. हे मथळे वाचले तर जनुके आपल्या शरीरात आजार निर्माण करण्यासाठीच असतात की काय, अशी शंका यावी. हे म्हणजे शरीरात किडनी ही मुतखडा होण्यासाठी आणि डोळे मोतिबिंदू व्हावा म्हणून असतात, असे सांगण्यासारखे आहे.

मी आज ज्या रोगाची कथा तुम्हांला सांगणार आहे, तो असाच एक जनुकीय अथवा आनुवंशिक आहे, पण आहे अत्यंत खास, चक्रावून टाकणारा, मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठवणारा. हा आहे - 'हंटींग्टन्स डिसीज'. सर्वसामान्यपणे 'हंटींग्टन्स कोरिआ' या नावाने प्रसिद्ध असलेला हा आजार मध्ययुगापासून नोंदवला गेला आहे. १८७२ साली जॉर्ज हंटींग्टन या डॉक्टरने वयाच्या केवळ बाविसाव्या वर्षी या रोगाबद्दल पहिला विस्तृत शोधनिबंध लिहिला. त्याने न्यूयॉर्कच्या 'लाँग आयलंड' भागात काही मोठ्या एकत्रित कुटुंबांतील या रोगाच्या लक्षणांचा आणि आनुवंशिकतेचा सखोल अभ्यास केला. याच अभ्यासाला इतर अनेक शास्त्रज्ञांनी पुढे नेले.

प्रसिद्ध अमेरिकन गायक वूडी गथ्री १९६७ साली या आजाराने मृत्यू पावला. त्याच्या पत्नीने 'कमिटी टू काँबॅट हंटींग्टन्स डिसीज' या संस्थेची स्थापना केली आणि त्याच्या संशोधनाला एकदम उभारी आली. त्याच सुमारास मिल्टन वेक्सलर या डॉक्टरने हंटींग्ट्न्सवर काम सुरू केले. त्याची पत्नी आणि मेव्हणे या आजाराने ग्रस्त होते. मिल्टनची मुलगी नॅन्सी वेक्सलरला तर हंटींग्टनचे जनुक शोधून काढण्याच्या प्रेरणेने जणू झपाटून टाकले. मिल्टनने स्थापन केलेल्या 'हेरेडीटरी डिसीज फाऊंडेशन'चे काम तिने हातात घेतले. आज 'हंटींग्टन्स डिसीज'ची कथा आणि नॅन्सी वेक्सलर हे जणू समानार्थी शब्द बनले आहेत.

मात्र मानवी गुणसूत्रांच्या अथांग जंजाळात केवळ एक जनुक शोधणे अत्यंत दुरापास्त काम होते. १९७२ साली, म्हणजे जॉर्ज हंटींग्टन्सच्या प्रसिद्ध शोधनिबंधाच्या शताब्दी वर्षात; नॅन्सीला वेनेझुएलातील एका प्रचंड मोठ्या कबिल्याची माहिती मिळाली, ज्यांच्यामध्ये या रोगाचा आनुवंशिक प्रादुर्भाव होता. पुढची काही वर्षे या लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा करणे, त्यातील पेशी वेगळ्या करून त्यामधील हंटींग्टनचे जनुक शोधणे या अत्यंत किचकट कामात गेली. जवळपास तेरा हजार व्यक्तींचा उल्लेख असलेला एक प्रचंड वंशवृक्ष यातून बनला.

निरोगी व्यक्तींच्या प्रत्येक गुणसूत्रांशी, बाधित व्यक्तींच्या प्रत्येक गुणसूत्राशी तुलना करीत या जनुकाशी निगडित नेमके गुणसूत्र नक्की करायला १९८३ साल उजाडले. अखेरीस प्रत्येक मानवी पेशीतील चौथ्या क्रमांकाच्या गुणसूत्रांवर 'कुठेतरी' हे जनुक आहे, एवढी माहिती मिळाली. १९९३ साली, म्हणजे नॅन्सी वेक्सलरच्या शोधमोहिमेच्या चौदाव्या वर्षी, हंटींग्टन डिसीजचे जनुक आणि त्याची संपूर्ण रचना प्रकाशात आली. अधिक अभ्यासानंतर त्याच्यातला नेमका बिघाड आणि या बिघाडाचा पेशीवर होणारा परिणाम हेदेखील समजले.

पण हा आजार नक्की आहे काय आणि त्याच्या शोधातून आपल्याला नेमके गवसले तरी काय, हे जाणून घेण्याआधी आपण जनुकाची रचना आणि त्यांचे कार्य कसे चालते ते पाहू. प्रत्येक मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या २३ जोड्या, म्हणजेच एकूण ४६ गुणसूत्रे असतात (अपवाद फक्त पुरुषातील शुक्राणू आणि स्त्रियांतील अंडपेशींचा, ज्यात फक्त २३च गुणसूत्रे असतात). हे प्रत्येक गुणसूत्र म्हणजे डीएनएचा एक प्रचंड लांब तुकडा, जो प्रथिनांच्या मदतीने अत्यंत घट्टपणे गुंडाळलेला असतो. डीएनएचा जो भाग एका विशिष्ट प्रथिनाची निर्मिती नियंत्रित करतो त्याला जनुक म्हणतात. उदाहरणार्थ, डीएनएचा जो भाग इन्सुलिनची निर्मिती नियंत्रित करतो त्या भागास इन्सुलीनचे जनुक म्हणायचे. आता या जनुकात जर बिघाड झाला तर तुम्हांला मधुमेह होऊ शकतो (पण म्हणून या जनुकाला मधुमेहाचे जनुक म्हणणे चुकीचे आहे). प्रत्येक जनुकामध्ये प्रथिननिर्मितीची माहिती रसायनांच्या सांकेतिक भाषेत लिहिलेली असते. या भाषेत चार अक्षरे आहेत A, C,T आणि G. पण या अक्षरांच्या क्रमामध्ये थोडा जरी बदल झाला तर चुकीचा संदेश तयार होतो, ज्यामुळे संपूर्ण प्रथिनचा रचनाच चुकू शकते आणि त्यातून निर्माण होतात अत्यंत घातक आजार. प्रत्येक व्यक्तीला ही जनुके आपल्या मातापित्याकडूनच मिळतात, त्यामुळे एखादा जनुकीय दोष त्यांच्यात असेल, तर तो पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या शक्यता वाढते. आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पेशीत गुणसूत्रांची जोडी असते, म्हणजेच प्रत्येक जनुकाचीही जोडी असते (अपवाद- पुरुषांमधील एक्स गुणसूत्रांवरील काही जनुकांचा. त्यांचे जोडीदार जनुक, वाय गुणसूत्रावर अस्तित्वातच नसते. उदाहरणार्थ, रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेल्या काही प्रथिनांचे जनुक). अनेकदा या जोडीतले एखादेच जनुक बिघडलेले असेल, तर फारसा फरक पडत नाही कारण दुसरे चांगले जनुक, त्या बिघाड झालेल्या जनुकाचा प्रभाव नष्ट करते.

हंटींग्टन्स डिसीज मात्र वेगळा आहे. यात जोडीमधले एक जनुक जरी बिघडलेले असले तरी ते रोग होण्यासाठी पुरेसे ठरते, दुसरे चांगले जनुक काहीच प्रभाव पाडू शकत नाही. हंटींग्टनच्या जनुकामध्ये ‘CAG’ या रसायनक्रमाची अथवा शब्दसमुच्चयाची पुनरावृत्ती असते. ही पुनरावृत्ती किती वेळा झाली आहे त्यावरून तुम्हांला हा रोग होणार का आणि कधी होणार, हे ठरते.

सर्वसाधारणपणे सामान्य जनुकात ‘CAG’च्या १०-१५ आवृत्त्या असतात. जर त्या ३९पेक्षा जास्त झाल्या तर मध्यमवय येतायेता मेंदूच्या पुटामेन आणि कॉडेट न्यूक्लिअस या दोन भागातील चेतापेशी मृत्यू पावतात आणि शरीराच्या हालचालीवरील ताबा सुटू लागतो. बौद्धिक क्षमता मंदावते, निराशेचे तीव्र झटके येऊ लागतात, व्यक्ती भ्रमचित्त होते आणि शेवटी अटळ आणि अकाली मृत्यू. अनेकदातर अन्नाचा घास गिळू न शकल्याने श्वास गुदमरून व्यक्ती मरण पावते. सर्वांत भयानक बाब ही, की रोगाच्या पहिल्या लक्षणापासून मृत्यूपर्यंत १५-२० वर्षांचा काळ जाऊ शकतो.

यावर कोणताही इलाज नाही, कोणतेही प्रतिबंधक उपाय नाहीत, कसलाही दिलासा नाही. तुम्ही उत्तम आहार घ्या अथवा निकृष्ट, व्यसन करा किंवा करू नका, व्यायाम करा, योग करा, तथाकथित शुद्ध-सात्त्विक जीवनशैली ठेवा, काहीही करा अथवा करू नका; सामान्य निरोगी आयुष्य आणि काळीज पिळवटून टाकणारा वेडेपणा यांतले तुमच्या नशिबात काय आहे, ते केवळ एका जनुकाच्या रचनेवर अवलंबून आहे. जनुकात ‘CAG' जितक्या जास्तवेळा असेल तितका हा रोग लवकर होतो. ‘CAG' च्या आवृत्त्यांची संख्या आणि रोग होण्याचे वय याचा संबंधतर अत्यंत अचूक आहे. ३९ आवृत्त्या असतील तर वयाच्या ७५व्या वर्षी, ४० असतील तर ५९व्या, ४१ असतील तर ५४व्या, ४२ असतील तर ३७व्या आणि ५०पेक्षा जास्त असतील तर २७व्या वर्षीच लक्षणे दिसू लागतात. भविष्यकथनाची कोणतीही पद्धती, जीवनाचे सूत्र शोधू पाहणारा कोणताही सामाजिक-आर्थिक अथवा मानसशास्त्रीय सिद्धांत किंवा कोणतेही धर्मदर्शन, गुरु वा द्रष्टा इतके अचूक आणि अटळ भाष्य करू शकणार नाही.

अशी आत्यंतिक जनुकशरणता अनेक नव्या प्रश्नांना आणि वादांना जन्म देते. 'निसर्ग की जोपासना?' हा तिढा काही नवा नाही. अनेक संशोधनामध्ये एखाद्या मानवी गुणधर्मावर जनुकांची सत्ता किती आणि जीवनशैलीचा प्रभाव किती हे तपासले गेले आहे. सर्व काही जनुकांवर अवलंबून नाही आपल्या वागणुकीवरही अनेक गोष्टी ठरतात, हे खरेच आहे. उलट सर्वकाही जनुकांच्या हाती, हा अत्यंत घातक आणि निराशावादी विचार आहे. पण मग हंटींग्टन्ससारख्या रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला या सर्व तत्त्वज्ञानाचा अजिबात उपयोग नाही, हेही तितकेच सत्य आहे.

नॅन्सी वेक्सलरच्या वेनेझुएलामधील संशोधनावेळचा एक किस्सा यादृष्टीने फार महत्त्वाचा आहे. घराण्यात हंटींग्टन्सची आनुवंशिकता असणार्‍या व्यक्तींमध्ये रोगाची शक्यता आहे काय, हे काही चाचण्यांच्या मदतीने आधीच तपासता येऊ शकते. अशा एका चाचणीच्या दरम्यान डॉक्टरांना एका स्त्रीमध्ये रोगाची लक्षणे आढळली. मात्र तिने त्याबद्दल विचारले असता त्यांनी अजून काही अभ्यास करण्याची गरज आहे, आताच सांगता येणार नाही, असे सांगून वेळ मारून नेली. ती स्त्री खोलीबाहेर पडताच तिची मैत्रीण तत्काळ आत आली व डॉक्टरांना 'तुम्ही तिला काय सांगितले?' असे विचारू लागली. डॉक्टरांचे उत्तर ऐकून तिला हायसे वाटले कारण रोगी म्हणून निदान झाल्यास 'मी आत्महत्या करेन', असे त्या स्त्रीने आधीच ठरवले होते. वरवर पाहता हा शेवट सुखांत वाटतो पण तो तसा अजिबात नाही. त्या स्त्रीला रोग आहे आणि तो त्याच्या ठरलेल्या वेळी होणारच आहे. तिचा बुद्धिभ्रंश आणि मृत्यू अटळ आहे. कशाही पद्धतीने सांगितले अथवा सांगितले नाही तरी ती तिचे प्राक्तन टाळू शकत नाही.

अशा परिस्थितीत पहिला महत्त्वाचा प्रश्न हा, की अशा आजारांचे निदान करायचे की नाही? जगातील सर्वच संस्कृती-समाजात भविष्यवेत्त्यांची कधीच कमतरता नव्हती. भविष्यरुपाने जी माहिती दिली जाते ती एकतर नि:संदिग्ध नसते आणि त्या माहितीचा वापर कसा करायचा याचे कसलेच मार्गदर्शन केले जात नाही. हंटींग्टन्सचे निदान अत्यंत सुस्पष्टपणे तुमचे भविष्य सांगते पण त्याच्यापासूनचा कसलाही बचाव अथवा उपाय नसल्याने, निदान केल्याने आपण नक्की काय साधतो आहोत?

निदानाच्या चाचण्या जेव्हा अस्तित्वात नव्हत्या तेव्हा हंटींग्टन्सचा धोका असणार्‍या व्यक्तींपैकी ७०% लोक अशी चाचणी करून घेण्यास उत्सुक होते. मात्र अशी चाचणी उपलब्ध झाल्यावर मात्र अशा केवळ १३% लोकांनी निदान करून घेतले. नॅन्सी वेक्सलरने स्वतः कधीही चाचणी करून घेणे टाळले - रोग होणार असेल तर त्यापासून सुटका नाहीच, पण मग उरलेले निरोगी आयुष्य त्याची वाट पाहत कशाला घालवायचे असा विचार तिने केला.

पण हेदेखील वाटते तितके सरळ नाही. हंटींग्टन्सच्या बाबतीत असलेली आणखी एक गुंतागुंत म्हणजे जर कुटुंबात त्याची आनुवंशिकता असेल आणि एखाद्याने त्याचे निदान करण्याचे टाळले तर ही डोळेझाक रोगाला पुढच्या पिढीकडे संक्रमित करू शकते. पुन्हा तुमच्या जवळच्या नातेवाइकांपैकी एकाने जरी ही चाचणी करून घेतली तरी तुमच्या सर्व कुटुंबाचेच निदान झालेले असते.

या संदर्भातील एक विचार करायला भाग पाडणारी गोष्ट म्हणजे हंटींग्टन्सचा धोका असलेल्या कुटुंबातील स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात चाचणी करण्यास उत्सुक असतात. आपल्याला रोग नसला तरी आपण आपल्या मुलांना हा आजार संक्रमित करू याची जास्त काळजी स्त्रियांना वाटते, पुरुष फक्त स्वतःपुरता विचार करतात, असा निष्कर्ष यावरून काढला जाऊ शकतो! नॅन्सी आणि तिची बहीण अ‍ॅलिस या दोघींनीही आई न बनण्याचा निर्णय घेतला, हेदेखील इथे नमूद करणे आवश्यक आहे.

इथे जनुकीय समुपदेशनाची किती गरज आहे, हे प्रकर्षाने लक्षात येते. एखाद्या चाचणीचे निकाल कशा पद्धतीने सांगितले जातात केवळ यामुळेदेखील त्या रोगाकडे आणि पर्यायाने आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. 'तुम्हांला हा आजार न होण्याची शक्यता ३/४ आहे' आणि 'तुम्हांला हा आजार होण्याची शक्यता १/४ आहे' ही दोन्ही वाक्ये संख्याशात्राच्या दृष्टीने एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण कोणते वाक्य कोणत्या व्यक्तीला सांगायचे आणि त्याचा त्यावर काय परिणाम होईल, याचे भान समुपदेशकाला असायलाच हवे. विशेषतः हंटींग्टन्सच्या बाबतीत तर संख्याशास्त्रीय शब्दजाल चुकीचा संदेशही देऊ शकते. 'तुमच्या पालकांपैकी एकाला हा रोग आहे, त्यामुळे तुम्हांला तो होण्याची शक्यता ५०% आहे' हे वाक्य गणिताच्या नियमात बसेलही, पण हंटींग्टन्सच्या संदर्भात ते संपूर्ण असत्य आहे. तुम्हांला तो होण्याची शक्यता एकतर शून्य टक्के आहे अथवा १००%, तिसरा पर्यायच अस्तित्वात नाही. समुपदेशनाच्या दरम्यान समोरच्या व्यक्तीची आजाराबद्दलची मनोभूमिका काय आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबामध्ये रोगाचे प्रमाण जास्त आहे, त्यातील व्यक्ती आणि केवळ शंकेपोटी चाचणी करायला आलेली व्यक्ती निदानाकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतात. रोग होण्याची शक्यता कळल्यामुळे त्यांचा नेमका फायदा किंवा नुकसान काय होणार आहे, किंबहुना ते कशाला फायदा अथवा नुकसान समजतात, हेदेखील समजून घेतले पाहिजे.

हंटींग्टन्सच्या लक्षणपूर्व चाचण्या अनेक प्रश्नांचे मोहोळ उठवतात. रोगाचे निदान झालेल्या व्यक्तीने स्वतःच्या उरलेल्या आयुष्याकडे कशा प्रकारे पाहावे? त्याला शिक्षण, करिअर इत्यादी करण्याचा उत्साह असेल काय? त्याच्या कुटुंबीय, मित्र, डॉक्टर आणि सर्व समाजाची या बाबतीत काय भूमिका असावी? अशा व्यक्तीची स्वतःची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी काय? हंटींग्टन्सचे निदान झालेला एखादा सर्जन किंवा फायटर पायलट यांनी स्वेच्छेने निवृत्ती घेणे योग्य ठरेल काय? की त्यांच्या रोगाच्या स्वरूपामुळे हा निर्णय घेणेदेखील त्यांना शक्य नाही असे समजावे? जोपर्यंत अशा रोगांवर इलाज उपलब्ध होत नाही तो पर्यंत त्यांच्या निदान चाचण्यांवर सरसकट बंदी असावी असाही एक मतप्रवाह आहे. विशेषतः भ्रूणामध्ये या रोगांची जनुके शोधणे आणि त्या अनुषंगाने गर्भपाताचा निर्णय घेणे आपल्याला परत तथाकथित सुप्रजननशास्त्राच्या दिशेने नेऊ शकते, हा धोकाही आहे.

ग्रीक पुराणातील टेरिसिअस या आंधळ्या भविष्यवेत्त्याला पुढे काय घडणार आहे, ते स्पष्ट दिसत असे, पण आजची कोणतीच परिस्थिती बदलायचे सामर्थ्य त्यामध्ये नव्हते. आपल्या राज्याची अवस्था का ढासळत आहे, आपल्या वडिलांना कोणी मारले, हे इडीपस राजा त्याला विचारतो तेव्हा टेरिसिअस काहीही बोलायला नकार देताना म्हणतो -"Ah me! It is but sorrow to be wise when wisdom profits not." शेवटी त्याला सत्य सांगावेच लागते आणि तो इडीपसचा नाश थांबवू शकत नाही. आज हंटींग्टन्ससारख्या आजारांच्या बाबतीततरी जनुकविज्ञानाची अवस्था अशीच झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केवळ शास्त्रीय प्रगतीकडे डोळे लावून बसणे पुरेसे ठरणार नाही. समाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म या सर्वांनाच यासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील. मानवी इतिहासात वेगवेगळ्या ज्ञानशाखा एकमेकांपासून सतत प्रेरणा घेत आल्या आहेत. या प्रश्नातही त्या मिळून काही मार्ग काढतील, असा विश्वास ठेवण्यास हरकत नसावी.

आज वयाच्या ६८व्या वर्षी नॅन्सी वेक्सलर अजूनही निरोगी आहे आणि हंटींग्टन्सवरती इलाज शोधण्यासाठी अत्यंत जोमाने कार्यरत आहे, हे पाहिल्यावर वाटते की जनुकांच्या भाषेत आपले भाग्यलिखीत काहीही असो, मिळालेल्या जीवनाचे करायचे काय, हेतरी नक्की आपल्याच हातात आहे.

****
लेखाची संदर्भसूची खालीलप्रमाणे -

संकेतस्थळे -

http://content.time.com/time/magazine/article/0,9171,1075227,00.html
http://www.hdfoundation.org/html/oracle.php
http://www.hdfoundation.org/html/venezuela_huntington.php
http://discovermagazine.com/1993/dec/huntingdownhunti321/
http://predictivetestingforhd.com/

पुस्तके -
Genome: The autobiography of a species in 23 chapters - Matt Ridley,
Harper Perennial, New York, 2000
The Woman Who Walked Into the Sea. Huntington's and the Making of a
Genetic Disease.- Wexler A, Wexler N, Yale University Press. 2008.
Mapping Fate: A Memoir of Family, Risk, and Genetic Research. New
York: Random House, 1995

- आगाऊ

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

मस्तं लेख.
आवडला.

लेख आवडला. धन्यवाद.

सुरेख लेख.

लेख छान आहे. विचार करायला लावणारा. कुणाला कुठल्या वर्षी कुठला आजार होउ शकतो हे जनुकीय पेटीत लिहिलेले वाचणारे वैज्ञानिक म्हणजे ज्योतिषी च की! :)

मस्त लेख

आवडला

छान लेख.

आगाऊ, लेख आवडला

मस्त मांडले आहेस.

एखादी गोष्ट बदलता येणार नाही हे माहीत झाल्यानंतरची परिस्थिती खर्‍या परीक्षेची असते. त्यावेळी धैर्य आणि लॉजीक टिकवणे सगळ्यात कठीण.

२३ अ‍ॅण्ड मी सारख्या साईट्सवरुन जेनेटीक अ‍ॅनॅलिसीस करुन घेणे आता सोपे झाले आहे.

मस्त लेख. आवडला !

अतिशय नेटका लेख! खूप आवडला.

लेख आवडला.

सुरेख लेख !!

मस्त लिहिला आहे. सोप्या भाषेत.

अतिशय मस्त लेख .. प्रभावी लेखन .. :)

हटिंग्टन डिजिझ बद्दल माहितच नव्हते .. धन्यवाद! :)

मुशो करताना वाचला होता पण चुका काढण्याच्या नादात (:फिदी:) डोक्यात रजिस्टर नव्हता झाला. आज पुन्हा वाचला. मस्त माहितीपूर्ण लेख आहे. निरामय विभागात सगळ्यात उत्तम जमलेला लेख.

रच्याकने, अंकात बर्‍याच लेखांमध्ये कंसात लिहिलेली वाक्यं आहेत. ती कंसात न घालता मूळ लेखातच घातली असती तर चाललं असतं असं वाटलं.

पण चुका काढण्याच्या नादात डोक्यात रजिस्टर नव्हता झाला.>> :-D
समद्यास्नी धन्यवाद, लेख लिहिल्यावर तो फार मोठा, किचकट आणि कंटाळवाणा झाला आहे असे मलाच वाटू लागले होते पण काहीही संकलन करण्याची इच्छा नव्हती. तो आहे तसा आवडला ह्याचे आश्चर्यच आहे!

उत्तम, माहितीपूर्ण लेख.