एकदा एका लाल टोपीला खूप म्हणजे खूपच कंटाळा आला. ह्हे क्काय! दुकानात कुठेतरी कपाटात एखाद्या गठ्ठ्यात पडून राहायचं आणि त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून दिसेल तेवढंच जग बघायचं?
तिच्या मनात विचार आला 'कशी असेल या दुकानाबाहेरची दुनिया? मज्जा असेल खूप सारी? की कंटाळवाणी असेल?'
दुकानाच्या बाहेर लटकणार्या दोरीवर दुपारच्या वेळी येऊन बसणार्या चिमणीताईकडूनतर तिला नेहमी गमतीजमतीच्या गोष्टी कळायच्या. तेव्हापासून ती वाट बघायची, लवकरात लवकर आपली कोणी तरी निवड करावी आणि मग ह्या एकाच जागी बसण्यातून आपली सुटका व्हावी.
तशी थोडी भीतीही वाटायची मनातून तिला, त्या दुकानदाराच्या छोट्या, व्रात्य चिंटूसारखा कोणी निघाला आपल्याला निवडणारा तर..? अरे बापरे! इतका व्रात्य होता ना हा चिंटू, की बास! काही विचारायचीच सोय नाही. तो दुकानात आला की सगळेच जीव मुठीत घेऊन बसायचे. नेहमी हे उचक, ते पाड, ह्याची घडी मोड, असे उद्योग चालायचे त्याचे. टोप्यातर त्याच्या विशेष आवडीच्या. टोप्यांचा कॅचकॅच खेळायला त्याला खूप मज्जा यायची. पण इथे टोप्यांना इजा व्हायची, त्या मळायच्या ह्याकडे त्याचं लक्षच नसायचं.
त्याच्या बाबांचं लक्ष गेलं, की दोन धपाटे बसायचे त्याच्या पाठीत, पण दुकानात गर्दी असेल तर आतल्या बाजूला त्याचे हे उद्योग चालायचेच बाबांचं लक्ष जाईपर्यंत.
"अस्सा नक्को बॉ आपल्याला चिंटूसारखा कोणी सोबती", त्या लाल टोपीनं बंद झटकत स्वत:शीच म्हटलं.
एके दिवशी 'बनी' त्याच्या आईबरोबर दुकानात आला. गोबर्यागोबर्या गालांचा हा बनी तिला खूप आवडला. त्याची सोबत मिळाली तर कित्ती मज्जा येईल, असंही तिच्या मनात येऊन गेलं, पण तो आला होता त्याच्या छोट्या बहिणीसाठी कपडे घ्यायला म्हणून. ह्यावेळीही आपण ह्या गठ्यातून बाहेर पडणार नाही, अशी खात्री वाटून ती थोडीशी हिरमुसली.
"पिंकीबरोबर मलाही काहीतरी घेच" असा बनीने आईकडे हट्ट धरला आणि मग हो नाही, हो नाही करताकरता "बरं! घे काय हवं ते पटकन" अशी आईची परवानगी मिळताच, बनी 'काय बरं घ्यावं', असा शोध घ्यायला लागला.
आता मात्र ती लाल टोपी एकदम लक्षपूर्वक बघू लागली. जेव्हा त्यानं टोप्यांच्या गठ्ठ्याकडे आपला मोर्चा वळवला तेव्हा तर ती खूपच खूश झाली.
ही नको ऽ ती नको ऽऽ करताकरता त्याचं लक्ष एकदाचं त्या लाल टोपीकडे गेलं आणि मग त्या गठ्ठ्यातून ती थेट त्याच्या डोक्यावर जाऊन बसली. आईनं एकदा 'छान आहे हो बनी तुझी टोपी' असं म्हणून तिचं कौतुक केलं आणि मग दुकानदाराला पैसे देऊन ते तिघं बाहेर पडले.
बाहेर पडतापडता त्या लाल टोपीनं तिच्या सोबत्यांना एकदा हात हलवून टाटा केला आणि मग ती बाहेरचं जग बघण्यात गुंगून गेली.
अबब! केवढ्या रंगीबेरंगी गोष्टी होत्या इथे. आणि किती गर्दी होती, हवा होती, उजेड होता. सार्या नव्या गोष्टी बघताबघताच ती दमून गेली आणि त्याच्या डोक्यावरच तिला डुलकी लागली.
"बनीऽऽ, बाळा ती टोपी मळेल आता. काढून ठेव बघू ती", असं म्हणत आईनं जेव्हा तिला बनीच्या डोक्यावरुन काढलं, तेव्हा तिला जाग आली. बनीचं घर त्या दुकानापेक्षा केवढंतरी मोठ्ठं होतं. ती ते बघूनच खूश झाली.
"उउऽऽ! आई, थोडावेळ घालू दे ना टोपी", म्हणत बनीनं पुन्हा तिला आईच्या हातातून घेतली आणि डोक्यावर घालून आरशात बघू लागला, तेव्हा तिला एकदम ती खास कोणीतरी असल्यासारखं वाटलं. आरशात स्वत:ला बघून ती खुदकन हसली.
बनीनं तिला सगळं घर फिरून दाखवलं. आज्जीच्या डोक्यावर बसवलं, बाबाच्या मांडीवर ठेवलं आणि पिंकुटलीच्या पाळण्यापुढे उभं राहून 'कोणेल्ले कोणेल्ले! भ्भोऽऽ'च्या खेळातपण तिला सहभागी करून घेतलं.
आईचा पुन्हा एकदा ओरडा खाल्यावर मगच त्यानं तिला त्याच्या अभ्यासाच्या टेबलावर काढून ठेवलं. कपड्यांच्या कपाटात मात्र ठेवायला त्यानं आईला साफ नकार दिला.
मग रोज प्रत्येक गोष्टीत तो त्या टोपीला सहभागी करून घेऊ लागला. अभ्यास करताना, मैदानात क्रिकेट खेळताना, इतकंच काय रात्रीचं जेवण झाल्यावर आईस्क्रिम खायला जातानासुद्धा.
ह्या सगळ्यामुळे तिला थोडी मैदानातली धूळ लागली, थोडा आईस्क्रिमचा डाग पडला, पण ती तरीही खूपच खूश होती, कारण तो तिचा आवडता दोस्त होता आणि त्याच्यामुळेच तिला ह्या सगळ्या नवीननवीन गोष्टी बघायला मिळत होत्या.
पण त्या दिवशी मामाने त्याला वाढदिवसाला पोलिसाचा ड्रेस भेट दिला आणि मग त्या ड्रेसमधल्या पोलीस कॅपला त्याच्या डोक्यावर स्थान मिळालं. तेव्हापासून ह्या लाल टोपीकडे त्याचं दुर्लक्ष व्हायला लागलं.
आता तिची रवानगी झाली त्याच्या कपड्यांच्या रॅकमध्ये. तिथे नुसतंच पडून दिवस घालवायचा तिला खरंतर खूप कंटाळा यायचा, पण तीतरी काय करणार? त्यात त्यांच्या घरात नुकतच पेस्टकंट्रोल करून घेतलेलं असल्यानं तिचा तर श्वासच कोंडत होता.
पेस्टकंट्रोलनंतरचा रविवार होता. बनीचे आईबाबा दोघंही घरात होते म्हणून त्यांची सगळी साफसफाईची गडबड चालू होती. बनीचे सगळे कपडे, अगदी टोपीसकट, गरागरा मशिनमध्ये धुऊन काढून बनीच्या आईने ते गॅलरीतल्या दोरीवर वाळत घातले, वरती कपड्यांना चिमटे लावून दोरीवरून न पडण्याची व्यवस्था केली. नेमका एक चिमटा कमी पडला म्हणून आईनं डोक्यावर टोपी घातल्यावर मानेभोवती बंद बांधतात तसे दोरीभोवती टोपी घालून तिचे बंद लावले आणि ती आत कामाला निघून गेली.
थोड्यावेळात पाऊस पडण्यापूर्वी जसा जोराचा वारा सुटतो तसा वारा सुटला आणि त्या वार्यामुळे टोपीचे बंद सुटून आले. एका क्षणात टोपी हवेत उडाली.
आधी तिला भीती वाटली, पण मग मज्जा वाटू लागली. वार्याबरोबर उडताउडता आजूबाजूला बघू लागली. पुष्कळ नव्या गोष्टी बघताना ती बनीलाही विसरून गेली. थोड्या वेळानं हवेचा जोर कमी होताच ती हळूहळू खाली येऊ लागली.
ईईई! खाली सगळा चिखल होता. आता आपण चिखलात पडणार, असं वाटून तिला रडूच आलं.
पण तेवढ्यात एका झाडाच्या फांदीवर जाऊन ती अडकली. आपण दोरीवरून पडल्याचं लक्षात आल्यावर बनीला कित्ती वाईट वाटेल, असंही तिला वाटून गेलं. पण आता ती खूप दूर आली होती आणि तसंही कोणाच्या मदतीशिवाय परत जाणं तिला शक्यच नव्हतं.
थोडावेळानं तिनं त्या फांदीवरून आजूबाजूला बघितलं, तेव्हा तिच्या लक्षात आलं की, ती लांब आली होती पण अगदीही लांब आली नव्हती. फक्त बनीचं घर खूप उंचावर असल्याने तिला तसं वाटलं होतं.
तरीही तिला एकटीला काही परत बनीकडे जाणं शक्यच नव्हतं. तिला आता घराची आठवण यायला लागली आणि मग ती हमसून हमसून रडू लागली.
त्या झाडावर असलेली 'चिऊ' चिमणी तिचं रडणं ऐकून घरट्यातून बाहेर आली. तिने तिला तिच्या रडण्याचं कारण विचारलं.
लाल टोपीची गोष्ट ऐकून तिलाही खूप वाईट वाटलं आणि तिने तिला मदत करायचं ठरवलं. तिने चिमण्याच्या कानावर टोपीची गोष्ट घातली. त्या दोघांनी मिळून तिला घरी पोहोचवायचा एक प्लॅन ठरवला. ते तिला म्हणाले, "आम्ही तुला आमच्या चोचीत पकडू आणि तू दिलेल्या पत्यावर तुला सोडू. मग तर खूश?"
ते ऐकून तिला आनंद झाला खरा, पण तो आनंद फारच कमी वेळ टिकला.
चिमणाचिमणी दोघांना मिळून ती टोपी उचलणं शक्यतर झालं, पण झाडावरून उडून थोडं अंतर जाईपर्यंतच त्यांना दम लागला आणि ते जवळच असलेल्या एका झाडावर विश्रांती घ्यायला बसले.
तिथेच त्या झाडाच्या एका फांदीवर त्यांनी टोपीला अडकवून ठेवलं आणि तिला म्हणाले "अशी निराश होऊ नकोस, आम्ही आमच्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना घेऊन येतो. सगळे मिळून तुला आम्ही तुझ्या घरी नक्की सोडू."
मग ते चिमणाचिमणी त्यांच्या मित्रमैत्रिणींना मदतीसाठी म्हणून बोलवायला निघून गेले. थोड्याच वेळात ते झाड चिमण्यांनी भरून गेलं. सगळ्यांनी मिळून आळीपाळीने तिला चोचीत पकडून घरी सोडायचा निश्चय बोलून दाखवताच टोपीला पुन्हा हुरूप आला.
ठरल्याप्रमाणे पाच चिमण्यांची पहिली तुकडी तिला घेऊन निघाली. बाकीच्या चिमण्या त्यांच्या मागून उडू लागल्या. एखादी चिमणी दमली की दुसरी एखादी पटकन तिची जागा घ्यायची आणि असं करतकरत त्या बनीच्या घराच्या गॅलरीमध्ये पोहोचल्यासुद्धा.
इकडे इतक्या वेळात बनीच्या घरी काय गोंधळ उडाला माहितीये?
वारा आला असं बघून आईने बनीला गॅलरीचं दार लावून घ्यायला सांगितलं, तेवढ्यात त्याला त्याची टोपी दोरीवरून बंद निघून उडालेली दिसली.
"मला माझी टोपी परत हवीय" म्हणत त्याने घरात रडून गोंधळ घातला. त्यांनी इमारतीच्या आवारात शोधलं, तिथे टोपी नव्हती. मग गेली असेल वार्याने उडून जरा दूर, म्हणून शेजारच्या कंपाऊंडमध्येही बघितलं. इतकंच काय, पण इमारतीमधल्या बागेत, बागेतल्या झोपाळ्यावर, घसरगुंडीमागच्या झाडावर, सगळीकडे बघून झालं, पण ती लाल टोपी कुठ्ठे म्हणजे कुठ्ठेच दिसली नाही.
मग आता आणायची कुठून ती टोपी परत, आणि समजवायचं तरी कसं ह्या बनीला, असा आईबाबा विचार करत बसले.
आणि नेमकी तेवढ्यात एक गंमतच झाली. टोपी चोचीत धरलेली चिमण्यांची एक टीम त्यांच्या गॅलरीच्या कठड्यावर येऊन बसली.
त्यांच्या चोचीत असलेली टोपी बनीने पटकन ओळखली. डोळे पुसून तो टोपी घ्यायला धावला. टोपीनंही त्याच्याकडे झेप घेतली. टोपी डोक्यावर घालून तो घरभर नाचत सुटला. बनीला आणि टोपीलाही खूप म्हणजे खूपच आनंद झाला.
टोपीने आणि बनीनेही चिमण्यांचे आभार मानले. बनीने तर चिमण्यांसाठी तांदळाचे दाणे आणि एका वाटीत पाणीपण ठेवलं.
टोपीला तिचा दोस्त बनी परत मिळाला आणि बनीची टोपीमुळे चिमण्यांशीही दोस्ती झाली.
तेव्हापासून बनी त्याच्या लाल टोपीची खूप जास्त काळजी घेऊ लागला. अगदी त्याच्या पोलीसकॅपच्या इतकीच. आणि गॅलरीत रोज चिमण्यांसाठी खाऊ म्हणून दाणे आणि एका चिमुकल्या वाटीत पाणीही ठेवू लागला.
- कविता नवरे
प्रतिसाद
कित्ती गोड
कित्ती गोड :)
क्युट.
क्युट.
कित्ती गोड मस्त ग !
कित्ती गोड :) मस्त ग !
Kasal goad lihilay.. khup
Kasal goad lihilay..
khup chhan :)
गोड आहे गोष्ट
गोड आहे गोष्ट
मस्त, एकदम गोड गोष्टं आहे
मस्त, एकदम गोड गोष्टं आहे :)
मस्त आहे गोष्ट ..
मस्त आहे गोष्ट .. :)
क्युट्ट्ट!!!
क्युट्ट्ट!!! :)
धन्यवाद
धन्यवाद :)
सुर्रेख ...
सुर्रेख ...
फारच गोड गोष्ट आहे!
फारच गोड गोष्ट आहे!
छान आहे.
छान आहे. :)
मिनोती, चित्र खूप गोड काढलयस.
मिनोती, चित्र खूप गोड काढलयस. चिमण्या, टोपी आणि बनी तर एकदमच गोड :)
केवढणतरी>> Typo
केवढणतरी>> Typo
गोड गोष्ट
गोड गोष्ट :)
केवढणतरी>> Typo>> दुरुस्त
केवढणतरी>> Typo>> दुरुस्त केली आहे.
निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
आईशप्पथ खुप्प गोडुली गोष्ट
आईशप्पथ खुप्प गोडुली गोष्ट आहे, खुपच आवडली :-) मिनोती, चित्रही अगदी साजेसं काढलंयस, खुप आवडलं. सगळ्यांच्या पोट्ट्यांना पण खुप आवडेल!
गोड गोष्ट.
गोड गोष्ट. :)
गोड गोड गोष्ट ...
गोड गोड गोष्ट ...:)
गोड्डं गोष्ट..
गोड्डं गोष्ट.. :-)
गोड आहे कथा आणि चित्रही.
गोड आहे कथा आणि चित्रही.
मस्तच!
मस्तच!
धन्यवाद
धन्यवाद :)
कित्ती गोड
कित्ती गोड :-)
छान आहे गोष्ट. पण लहान
छान आहे गोष्ट. पण लहान मुलांची भाषा आणि काही एकदम प्रगल्भ भाषा अशी सरमिसळ झाली आहे असं वाटलं. उदा: घरी सोडायचा निश्चय बोलून दाखवताच टोपीला पुन्हा हुरूप आला
चित्र प्रचंड गोड आहे.
मस्त आहे गोष्ट
मस्त आहे गोष्ट :)
ए मस्ताय गोष्ट
ए मस्ताय गोष्ट :)