हे ढळणे जर सुपीक असले...

हे ढळणे जर सुपीक असले
फुलवित राहू येता जाता
पोचवायचे असे गतीला...
काळाच्याही विरूद्ध आता!

अगम्यतेच्या कुण्या किनारी
स्वतःस नेउन असे सोडले?
आणि कुणाचा भक्त व्हावया...
मी श्रद्धेचे स्फटिक फोडले?

अस्तित्त्वाच्या तुटती तारा
तरी स्वरांचे उरते नाव...
लाज राखण्या भूपाची तरी
तुझी भैरवी पणास लाव!

म्हणू नको ना "उत्तर नाही!"
डोळ्यामधले प्रश्न बोचले
क्षितीज नाही अशा प्रवाहा -
समोर आता हात टेकले!!

2013_HDA-neniveche_daas.JPG

- सुशांत खुरसाले

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

छान.... तिसरे कडवे सर्वात विशेष.

>>
अगम्यतेच्या कुण्या किनारी
स्वतःस नेउन असे सोडले?
आणि कुणाचा भक्त व्हावया...
मी श्रद्धेचे स्फटिक फोडले?
<<
वा! श्रद्धेचे स्फटिक ही कल्पना फार फार आवडली. मनोरम दिसल्या तरी अशा साचत गेलेल्याच असतात श्रद्धा. आणि मग त्यांच्या रंगरूपाची भुरळ इतकी प्रभावी असते की ठिसूळ असल्या तरी मोडवत नाहीत.

आवडली कविता

सहमत स्वातीशी.
लाज राखण्या भूपाची तरी
तुझी भैरवी पणास लाव!
हेही अप्रतिम. सुंदर कविता .

बेस्टच
खुरसाले अभिनंदन

ओ हो, अप्रतिम ...

सुंदर!

श्रद्धेच्या स्फटीकाचं स्वातीनं केलेलं 'इंटरप्रिटेशन' ही सुंदर आहे. माझ्या मनात कविता वाचताना स्फटीकाचा पारदर्शीपणा विशेषत्वानं होता, 'साचत जाण्याचा' संदर्भ मला नव्यानं समोर आला आणि आवडलाही!
कवीच्या मनात 'कुणाचा तरी' भक्त होण्याच्या निमित्तानं श्रद्धेचा स्फटीक फोडल्याची खंत असावी असं मला वाटलं होतं. कारण त्या कृतीची परिणती दिशाहीन प्रवाहात 'पतित' होण्यात झाली असावी...

सुशांत, कवीच्या मनातलं स्पष्ट झालं तर आवडेल.

-सतीश.

>>कवीच्या मनात 'कुणाचा तरी' भक्त
होण्याच्या निमित्तानं श्रद्धेचा स्फटीक
फोडल्याची खंत असावी असं मला वाटलं होतं. कारण
त्या कृतीची परिणती दिशाहीन प्रवाहात 'पतित'
होण्यात झाली असावी...<< अगदी अगदी .

सतीशजी , तुम्ही एवढं सुंदर मत व्यक्त केलंत की ,त्यापुढे मी खरंतर अजून काही बोलू नये .

स्वातीताई , आभार एवढ्या सुंदर प्रतिसादाबद्दल .

सर्वांचे मनःपूर्वक आभार . :)