वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट

१९७५ - १९७६, माझे कॉलेजकाळातील दिवस आणि कोल्हापूर शहर म्हणजे मुंबईपुण्याप्रमाणे इंग्रजी चित्रपटघरांचे माहेरघर जरी बनले नसले, तरी उमा आणि पार्वती या दोन सुंदर चित्रपटगृहांत नित्यनेमाने इंग्रजी चित्रपट लागायचे. ते राहायचे साधारण एक आठवड्याच्या मुक्कामासाठी, मात्र ज्यांना 'लोकप्रिय’ गटात गणले जात असे, ते मात्र तब्बल चार आठवडे आपला मुक्काम हलवत नसत आणि मग वितरकाच्या दृष्टीने ’मॅकेनाज गोल्ड’, ’साऊंड ऑफ म्युझिक’, तमाम जेम्स बॉण्डपट आदी म्हणजे गल्ल्याच्या नजरेत दूज का चाँदच. मात्र जगभरातील रसिकांना सोळा आणे पसंत पडतील अशा यादीतील काही चित्रपट कोल्हापुरात आले की आम्हांला मनस्वी आनंद होत असे, कारण त्यांच्याविषयी नगर वाचन मंदिरामध्ये उपलब्ध होणार्‍या 'लाईफ', 'टाइम' आदी नियतकालिकांतून भरभरून लिहून आलेले असायचे, जे आम्हांला वाचायला मिळायचे.

अशीच आस लागून राहिली होती 'युनायटेड आर्टिस्ट'निर्मित 'वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट' या अभिजात म्हटल्या जाणार्‍या चित्रपटाची. केन केसीच्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपटाची पटकथा बेतली आहे हे माहीत होते, पण उत्सुकता होती ती सर्वस्वी एका सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा ऑस्करविजेता अभिनय पाहण्याची… त्याचे नाव जॅक निकल्सन. ऑस्करची भुरळदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाला होतीच होती. १९७५मधील इंग्रजीतील विविध वर्तमानपत्रे आणि साप्ताहिके यांनी त्या वर्षाच्या ऑस्करच्या बातम्या देताना ’वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट'ने बाहुल्या मिळविण्यामध्ये केलेल्या एका आगळ्या विक्रमाची नोंद घेतली, जो आम्हां इंग्रजी चित्रपटप्रेमी मित्रांच्या दृष्टीने चर्चेसाठी एक विषयही ठरला. ऑस्करच्या आतापर्यंतच्या जवळपास ९० वर्षांच्या इतिहासात केवळ तीनच असे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, की ज्यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री, पटकथा ही पाचही महत्त्वाची ऑस्कर पारितोषिकं मिळविण्याचा विक्रम केला आहे. १९३४मध्ये आलेल्या 'इट हॅपन्ड वन नाईट'मध्ये क्लार्क गेबल आणि क्लॉडेट कोल्बर्ट हे प्रमुख भूमिकेत होते, तर यानंतर तब्बल ४१ वर्षांनी आलेल्या ’वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट’मध्ये जॅक निकल्सन आणि लुईझा फ्लेचर प्रमुख भूमिकेत होते. ’वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट’नंतर १६ वर्षांनी आलेल्या 'सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ज’मध्ये अ‍ॅन्थनी हॉपकिन्स आणि जोडी फॉस्टर प्रमुख भूमिकेत चमकले होते. वैशिष्ट्य म्हणजे हे तीनही अभिनेते हॉलिवूडपटांच्या इतिहासातील मैलाचे दगड ठरले आहेत आणि कोट्यवधी डॉलरची उलाढाल त्यांच्या नावावर होत असल्याचे दाखले मिळतात.

तीन चित्रपटांपैकी ’वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट’चे खास चित्र असे, की यातील जवळपास सारी पात्रे मनोरुग्ण असून त्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सरकारने एका सुधारगृहात रवानगी केली आहे. तेथील संस्थेची प्रमुख नर्स रेचेड आणि तिचे सहकारी या मनोरुग्णांची देखभाल करत असतात. अतिशय शांत वृत्तीची असलेली रेचेड तशी कडक शिस्तीची स्त्री असून कोणत्याही शारीरिक कारवाईशिवाय ती आपल्या इनमेट्सना आपल्या अधिकाराच्या रेघेत ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. तिच्या अधिकाराला सर्वच मनोरुग्ण योग्य तो प्रतिसाद देतही असतात. तसे पाहायला गेल्यास या वेळापत्रकात मनोरुग्णांना त्यांचे स्वत:चे असे काहीच मत नसते…वेळापत्रकाप्रमाणे खेळायचे, बागडायचे, विश्रांतीच्या वेळी विश्रांती, ठरलेली औषधे रांग लावून घ्यायची, त्या दरम्यान मुख्य नर्स आणि साहाय्यक यांच्याशी हसतमुखाने एकदोन मिनिटे गप्पाही झाडायच्या, वेळच्या वेळी जेवण करायचे, पत्ते, कॅरमसारखे अंतर्गत खेळ खेळायचे…आणि मग विशिष्ट वेळेला शिट्टी वाजली की झोपीही जायचे…संपला एकसुरी दिनक्रम.

हा मनोरुग्णांचा नित्याचा दिनक्रम! यात औत्सुक्यपूर्ण वा वातावरण बदलून टाकणार्‍या बदलाची संधी नाहीच, मग बंडखोरी तर दूरचीच गोष्ट. मग अशा वातावरणात एक दिवस प्रवेश करतो रॅण्डल मॅकमर्फी. पस्तिशीतील एक गुन्हेगार जो आता मनोरुग्ण म्हणून या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यासाठी तुरुंगाधिकार्‍यांच्या शिफारशीवरून आलेला आहे. जरी तो मानसिकदृष्ट्या कमजोर असल्याचे दिसते, तरीही त्याने तुरुंगापेक्षा बर्‍या ठिकाणाच्या वातावरणात राहायला मिळावे, म्हणून कदाचित सोंगही घेतलेले असावे, असा आपल्याला संशय येत राहतो आणि पुढे ते खरेही निघते. पहिल्या दिवशी नर्स रेचेडसह त्या वार्डासाठी असलेला सुरक्षा कर्मचारीवर्ग आणि मेडिकल स्टाफ यांच्याशी तर त्याची ओळख होतेच, पण त्याला आनंद होतो तो वार्डात असलेल्या विविध वयाच्या आणि गटांच्या मनोरुग्णांना पाहून. त्याला इस्पितळातील नियमही समजावून सांगितले जातात…जे ते आपल्याला समजले रॅण्डल दाखवितो…दाखवावेच लागते.

दिवस उजाडतो…संपतो…रात्र उगवते…संपते…पण इस्पितळातील जीवन आणि त्या तलावावरील पाण्यावर हालचालीची वा बदलाची एक पुसटशीदेखील रेष नाही…रेषेची शक्यताही नाही…कारण एकट्या रॅण्डलचा अपवाद वगळता कुठल्याच रुग्णाला त्या वातावरणात बदल हा नकोच आहे. रॅण्डलने आता तिथले वातावरण अभ्यासले आहे. सारे काही न चुकता इस्पितळाच्या वेळापत्रकाप्रमाणे होत आहे आणि नर्स रेचेड ते एखाद्या हुकूमशहाप्रमाणे अमलात आणीत आहेत, इतकेच नव्हे तर वेगळे वागणार्‍या एखाद्या रुग्णास कसलीही दयामाया न दाखविता दिले जाणारे इलेक्ट्रॉनिक्स शॉक…सारेच भयानक! रॅण्डल विचार करू लागतो, की मग याच्यापेक्षा थेट तुरुंगवासच बरा ना! या इस्पितळातील रुग्ण हे सक्तमजुरीचे कैदी नसून माणसं आहेत. जीवनातील इतरांना मिळणारे आनंद-अश्रू यांनाही मिळायला हवेत, त्यांना टीव्हीचा आनंद घ्यावासा वाटतो, एखाद्या राष्ट्रीय पातळीवरील सामन्याचे प्रक्षेपण पाहायचे झाल्यास ते त्यांना मिळण्याचा हक्क आहे, अशा विचाराने तो झपाटला जातो. त्याच्याकडे मादक स्त्रियांचे फोटो असलेले पत्त्याचे एक कॅट आहे, त्यावरील चित्रे या नव्या मित्रांना दाखवून त्यांच्याशी विनोदमस्ती करत सर्वांचा मित्र तर बनतोच पण एक दिवशी चक्क नेताही. रेचेडविरुद्धच्या 'आम्हांला टीव्हीवरील सामना पाहायचा आहे' या आग्रहाने केलेल्या मोहिमेत त्यालाही हे नेतेपण भावतेच.

मनोरुग्णांच्या मैफिलीतील काही ठरावीक त्याचे त्यानंतर कट्टर मित्रही बनतात. त्यातील महत्त्वाचा ठरतो [जो पुढे सर्वार्थाने ’वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट’मधील ’वन’ बनण्यात यशस्वी ठरतो] तो ब्रॉमडेन - अमेरिकन रेड इंडिअन. सर्व मनोरुग्ण या ना त्या निमित्ताने बोलतात, दंगा घालतात, हसतात, भांडतात, खेळतात, रुसतात….पण ब्रॉमडेन यांपैकी कशातही भाग न घेता आपल्या वाट्याला आलेल्या कामात स्वत:ला बुडवून घेत असतो. त्याच्याकडे तो एक मूकबधिर म्हणूनच पाहिले जाते, जो प्रत्यक्षात तसा नाहीही. त्याला आजूबाजूला जे काही घडते ते सारे कळते, उमजते. रॅण्डलचा तो नंतर पक्का मित्रही बनतो आणि पुढे एकदा सुरक्षारक्षकांशी मारामारी केल्याप्रकरणी रॅण्डल, चार्ली चेसविक आणि त्यांच्याबरोबरीने ब्रॉमडेनलाही इलेक्ट्रिक शॉक देण्यासाठी त्या लॅबोरेटरीत आणले जाते. त्यावेळी प्रथम प्रचंड आरडाओरडीच्या स्थितीत चार्लीला शॉक दिले जात असतात. त्यावेळी हे दोन घट्ट मनाचे रुग्ण बाहेर शांत बसलेले असतात. रॅण्डल आपल्या नर्मविनोदी स्वभावानुसार तिथेही दंगामस्ती करताना ब्रॉमडेनला बोलका करण्याचा प्रयत्न करीत असतोच. मध्येच तो ब्रॉमडेनला चॉकलेटसारख्या गमची वडीही देतो, चघळण्यासाठी….तोंडात ती टाकतो आणि ब्रॉमडेन ’थॅन्क यू’ असे उद्गार काढतो. रॅण्डलला धक्का बसतोच, कारण त्याला माहीत असते, की हातर मूकबधिर आहे. खरे वाटत नाही म्हणून परत दुसरी वडी देतो. ब्रॉमडेन सौम्य हसून ते स्वीकारतो. रॅन्डलला पटते, की हादेखील आपल्यासारखाच एक छुपा असला तरी बंडखोरच आहे. आणि विशेष म्हणजे मनोरुग्ण नसून चांगला धडधाकट आहे, त्याच्यासारखाच. टीव्ही सामन्याच्या वेळी मुख्य हॉलमध्ये आरडाओरडा झाल्याने नर्स रेचेडने हजर असलेल्या मनोरुग्णांत मतदान घेतलेले असते. रॅण्डलच्या बाजूने बहुमत होण्यासाठी एका मताची गरज असते, त्यावेळी कोपर्‍यात झाडू घेऊन उभे असलेल्या ब्रॉमडेनची रॅण्डेलने 'मतदान कर’ म्हणून अगदी काकुळतीने विनवणी केलेली असते, तिला तो होकारार्थी प्रतिसादही देतो. पण अगोदरच मोजणी झाली असल्याचे सांगून रेचेडने रॅण्डलचा प्रस्ताव नामंजूर केलेला असतो. त्याचे शल्य रॅण्डलच्या मनी असतेच. पहिल्या शॉक ट्रीटमेंटनंतर रॅण्डल आणि कंपनी आपण ठिकाणावर आलो आहोत असे दाखवितातही. खेळायच्या मैदानावर तो आता ब्रॉमडेनला त्याच्या उंचीचा उपयोग बास्केटबॉलसाठी कसा करून घ्यावा हेही शिकवतो. स्वतंत्रतेची जाणीव तसेच महत्त्व याची शिकवण रॅण्डल सार्‍याच रुग्णांना देत राहतो. एकदातर डॉक्टरांचा वेष घालून हे दहा-पंधरा कैदी मुख्य गेटमधून शिताफीने पलायन करून चक्क बोटिंगला तर जातातच, पण दरम्यान रॅण्डल कैद्यांच्या मनोरंजनासाठी शहरातील आपल्या दोन डान्स मैत्रिणींनाही त्यात सामील करून घेऊन पोलिसांनी तिथे येऊन त्यांना पकडेपर्यंत धमाल मजा करतात. खास केबिनमध्ये दिलफेक रॅण्डल आणि कॅण्डी [त्याची बोटीवर आलेली मैत्रीण] जी मौजमजा करीत राहतात, तिकडे तर सारेच रुग्ण ओढले जातात.

वॉर्डात बिली नामक एक युवक रुग्ण असतो, जो रॅण्डलचा चांगलाच मित्र बनतो. त्याने कॅण्डीला पाहिलेले आहे आणि ती त्याच्या मनी वसली आहे. मनोरुग्ण आहे म्हणून त्याला कॅण्डी का मिळू नये, असा सवाल खुद्द रॅण्डल स्वत:शीच विचारतो आणि एका उत्सवाच्या प्रसंगी कॅण्डीला तो फोन करतो आणि 'इस्पितळामागे असलेल्या गेटमधून तू आत आमच्या हॉलच्या खिडकीजवळ ये, तुला पार्टीत घेतो', असा निरोप धाडतो. रॅण्डल क्लब बारमध्ये चांगलाच स्त्री-प्रिय असल्याने कॅण्डी आणि तिची एक मैत्रीण निमंत्रण स्वीकारून रात्री चोरीच्या वेळी प्रवेश करतात. [रात्रीच्या वेळी तिथे हॉस्पिटलचा फक्त वॉचमन असतो. त्यालाही रॅण्डलने 'आम्ही फक्त गंमत-जंमत करण्यासाठी दारू आणणार आहोत', असा भ्रम करून दिलेला असतो. तोही फशी पडतोच.] कॅण्डी आणि मैत्रीण आल्यानंतर मध्यरात्री सारे मनोरुग्ण एकजात ती दारू पिऊन मोकळ्या वातावरणाचा आनंद मनसोक्त लुटतात. वास्तविक त्याच रात्री रॅण्डेलने तिथून पलायन करण्याचे ठरविलेले असते, पण युवा बिलीचा कॅण्डीसाठी जीव तुटत आहे हे पाहून केवळ त्याच्यासाठी तो बिली आणि कॅण्डीला शरीरसुखाचा आनंद घेण्यासाठी तिथल्याच एका स्वतंत्र अशा केबिनमध्ये पाठविण्यात पुढाकार घेतो. बाकीचे रुग्ण क्लांत होऊन जिथे आहेत तिथे लोळत पडतात, झोपी जातात. विचारात पडलेला रॅण्डल पळून न जाता खिडकीकडे नजर लावून विमनस्कपणे एकदा त्या मोकळ्या रस्त्यांकडे तर एकदा बिली कॅण्डीच्या खोलीकडे नजर लावून शांत बसतो.

नवा दिवस उजाडतो. सारा स्टाफ हळूहळू कामावर यायला लागतो. नर्स रेचेडही येते आणि आल्याक्षणीच वॉर्डातील ती अशक्य कल्पनेची आणि गलथानपणाची दृश्ये पाहून साहजिकच संतापाने भडकून उठते. कैद्यांनी सारे नियम मोडून बेशिस्तीचे वर्तन तर केले आहे हे तर उघडच, शिवाय अतिशय निर्लज्जपणे बिलीसारखा एरवी अत्यंत शांत असलेला तरुण चक्क नग्नावस्थेत एका वेश्येसमान मुलीशी त्या रूममध्ये कॉटवर पडलेला पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकाला जातेच. सुरक्षाकर्मींना अत्यंत कडक अशी कारवाई करण्याचे ती आदेश देते. अक्षरशः: दंडुक्याने कैद्यांची पिटाई केली जाते. बिलीची आई ही रेचेडची मैत्रीण असते. त्या मैत्रीचा आधार घेऊन रेचेड बिलीला धारेवर धरते आणि 'तुझ्या या बाहेरील मुलगी इथे आणून केलेल्या कृत्याबाबत मी तुझ्या आईला लागलीच कळविणार' अशी धमकीही देते. बिली तिची विनवणी करत आहे आणि तिच्या पायाही पडायला तो तयार आहे. पण त्याला हिसडा देऊन रेचेड मुख्य ऑफिसकडे वळते. आता नर्स रेचेड आईला खरेच फोन करणार या विचाराने गर्भगळित झालेला बिली वेगाने परत रात्रीच्याच रूमकडे पळतो आणि तिथे असलेली दारूची मोठी बाटली फोडून घेऊन ती स्वत:च्या गळ्यावर सुरीसारखी चालवितो, कापून घेतो. रक्तबंबाळ पडतो सार्‍यांसमोर आणि मरतोही… घाबरून सारेच ओरडतात.

हे सारे एका विशिष्ट अंतरावरून पाहाणार्‍या रॅण्डलच्या सहनशक्तीचा बांध आता मात्र बिलीच्या रक्ताचा लोंढा पाहून एकदम फुटतोच आणि त्याला रेचेडने पेशंटला या पातळीवर येऊन छळणे सहनशक्तीच्या पल्याड जाते आणि विजेच्या वेगाने, संतापाने ओरडत तो रेचेडवर झेप घेतो. तिचा गळा तो जोराने दाबतो, ती जमिनीवर वेदनेने कोसळते, अन्य रक्षक तिच्या मदतीसाठी धावतात. ताकदीच्या प्रचंड जोरावर ते रॅण्डलला तिच्या गळ्यापासून दूर करण्यात जरी यशस्वी ठरतात तरी रेचेडच्या गळ्याच्या व्होकल कॉर्डला धक्का लागतोच.

आता हे सारे प्रकरण वरिष्ठ पातळीवर जाते आणि जसा रेचेडचा जबाब नोंदविला जातो तद्वतच रॅण्डेलला द्यायच्या शिक्षेबाबतही विचारविनिमय केला जातो आणि त्याला कोणत्या पातळीवरील आणि किती इलेक्ट्रिक शॉक द्यायचे यावर निर्णय घेतला जातो. एका रात्री इतरांना नकळत त्याला तिथून नेले जातेही आणि जी काही शॉक ट्रीटमेंट द्यायची ठरते ती दिलीही जाते. अगदी गलित अवस्थेतील, शुद्ध पूर्णपणे हरपलेल्या रॅण्डेलला मध्यरात्री त्याच्या अंथरुणावर आणलेही जाते. एकटा ब्रॉमडेन सोडल्यास रॅण्डेलची ती भयावह अवस्था पाहण्यास कुणी जागेही नसते. अगदी लोळागोळा झालेल्या त्या सिंहाची अवस्था ब्रॉमडेनला पाहवत नाही. रेड इंडियन्सच्या पद्धतीनुसार तो आपल्या मित्राला देवाघरी पाठविण्याचा निर्णय शांतपणे घेतो आणि तसेच शरीराच्या त्या अवस्थेपासून त्याची सुटकाही व्हावी हा देखील उद्देश मनी ठेवून त्याच्या कानी हळूच काहीतरी कुजबुजतो आणि बेडवर पडलेल्या रॅण्डेलच्या तोंडावर मोठी उशी घट्ट दाबून धरतो. असहाय रॅण्डेलची तडफड काही वेळात शांत होतेही…अखेरची.

याच रॅण्डेलने ब्रॉमडेनना तेथून जर पळून जायचे असेल तर काय केले पाहिजे याचे धडे दिलेले असतात. रॅण्डेलच्या शवाकडे पाहत असतानाच त्याला ती शिकवण आठवते आणि 'आता या ठिकाणी मी राहणार नाही' असा निर्धार करून इस्पितळ वॉर्डाच्या आतील बाजूला असलेल्या पिण्याच्या पाण्याचे पॅनेल आपल्या अजस्त्र अशा ताकदीने तो उचलतो आणि खिडकीवर आदळतो. त्या ओझ्याने ते गज तुटतातही. पहाटेच्या अंधुक छटांत ब्रॉमडेन खिडकीतून बाहेर उडी घेतो आणि 'वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट'च्या चालीवर मुक्तही होतो. खरे तर हे गाणे या रेड इंडियन जमातीचे… जे ब्रॉमडेनला नेहमीच आठवत असते. केसीच्या कादंबरीत या गाण्याचा पूर्ण संदर्भ दिला आहे. पूर्ण गाणे असे आहे:

Wive, Briar, Limberlock
Three geese in a flock… One flew east, one flew west
And one flew over the Cuckoo’s nest.

चित्रपट समीक्षकांच्या नजरेत जसा गाजला तितकाच जागतिक पातळीवर मिळकतीच्या बाबतीतही. रॅण्डलची भूमिका अक्षरशः: जगलेल्या जॅक निकल्सनने यानंतर हॉलिवूडवर राज्यच केल्याचा दाखला आहे. चित्रपट १९७५चा आहे; पण आज २०१३मध्येही हा अभिनेता तितकाच दोन्ही पातळ्यांवर लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे अशा धर्तीच्या रगड्या-तगड्या भूमिका करण्यातच ज्याचा हातखंडा मानला जातो त्या मायकेल डग्लसने या चित्रपटाची निर्मिती केली होती; पण प्रमुख भूमिकेसाठी त्याने अन्य कर्तबगार कलाकार शोधला. वास्तविक मायकेलचे वडील सुप्रसिद्ध कलाकार कर्क डग्लस यांनी या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकार करण्याचा मानस व्यक्त केला होता, कारण रंगभूमीवर सादर झालेल्या प्रयोगात कर्क डग्लस हेच रॅण्डलचे पात्र रंगवत असत. पण ज्यावेळी मायकेलने ’तुम्ही आता वयस्कर झाले असल्याने ही भूमिका मी दुसर्‍याला देऊ इच्छितो’, असे सांगितल्यावर डग्लस-घरात वादही चांगलाच रंगला होता. त्यानंतरतर मार्लन ब्रॅण्डोच्या नावाचा विचार झाला. पण तोपर्यंत ब्रॅण्डोच्या 'गॉडफादर’ने सार्‍या जगात जे काही विलक्षण असे नाव कमाविले होते, त्याच्यापुढे 'वन…'ची कथा मूळ प्रसिद्धीमागे पडेल, असे मायकेल डग्लसला वाटले. नंतर 'फ्रेंच कनेक्शन'च्या जीन हॅकमनबाबतही विचार झालाच, तरीही शेवटी त्यांतल्या त्यात नवा चेहरा म्हणून ती भूमिका जॅक निकल्सनच्या वाट्याला आली आणि त्याने मग अभिनयात इतिहासच घडविला. तीच बाब नर्स रेचेडची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री लुईसा फ्लेचर. केवळ नर्सच्या ड्रेसमध्येच आणि त्यातही एका केबिनमध्ये बसणारी आणि रुग्णांचे सेशन घेणारी ती वॉर्ड इन-चार्ज. कोणतेही चढ्या आवाजातील संवाद नाही. रॅण्डेल इतक्या क्रांतिकारी घोषणा करीत असतानाही 'हाही एक नेहमीसारखाच' या नजरेने त्याच्याकडे तितक्याच थंडपणाने पाहणारी नर्स साकारणारी लुईस फ्लेचर ऑस्कर मिळविणारी अभिनेत्री झाली, ही बाब तिच्या अभिनयकौशल्याची दादच होय. ब्रॅड डोरिफ हा आणखीन एक गुणी अभिनेता, ज्याने बिली साकारला. तोतरा बोलणार्‍या बिलीची भूमिका इतकी हुबेहूब वठवली ब्रॅडने, की त्यानंतर जेव्हा ’मिसिसिपी बर्निंग’मध्ये चमकला त्यावेळी तो नैसर्गिकरीत्या न अडखळता बोलतो यावर विश्वास बसला नाही.

ऑस्करविजेत्या चित्रपटांचा ९० वर्षांचा इतिहास तपासल्यास लक्षात येईल, की ’गॉन विथ द विंड’, ’कॅसाब्लांका’, ’ऑल अबाऊट इव्ह’,’द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’, ’लॉरेन्स ऑफ अरेबिया’, ’साऊंड ऑफ म्युझिक’, ’गॉडफादर’, ’डीअर हंटर’ ’शिंडलर्स लिस्ट’ आदी चित्रपटांनी ज्या भव्यदिव्यतेचे पडद्यावर दर्शन घडविले त्याबद्दलही त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. पण इतक्या वर्षांच्या प्रवासात ’वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट’ हा एकमेव असा चित्रपट आहे की तो सात-आठ मिनिटांचा एक प्रवास सोडल्यास साराच्या सारा हॉस्पिटलच्या एका वॉर्डमध्येच चित्रित केला गेला आहे. इतकेच नव्हे तर यातील कलाकारांचे कपडेही नित्याचेच. रुग्णांना तो नित्याचा फिकट निळा शर्ट-पॅण्टचा तर नर्सेसना त्यांचा पांढरा. अंतर्गत सजावट दाखविण्यासाठी कथेत वावच नाही. हे साधेसुधे दर्शन पडद्यावर कसे आवडेल रसिकांना, याचा विचार दिग्दर्शकाने करायचा नसतोच. त्याच्या नजरेत कथा आणि अभिनय या दोनच बाबी खूप महत्त्वाच्या आणि ’वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट’चे दिग्दर्शक मिलॉस फोरमन यांनी ते काम अत्यंत कौशल्याने केले.

****

या चित्रपटाबद्दल लिहिताना ज्याच्या कादंबरीवरून चित्रपट घेतला गेला, त्या कादंबरीकार केन केसी याच्यावर आणि चित्रपटाने जागतिक पातळीवर मनोरुग्णांच्या संदर्भात केलेल्या परिणामाबद्दलही चार ओळी लिहिल्या गेल्या पाहिजेत.

१७ सप्टेंबर १९३५मध्ये अमेरिकेतील कोलोरॅडो प्रांतात जन्म झालेल्या केन केसी याने तारुण्यात पदार्पण करेपर्यंतची वर्षे वडिलांच्या शेतीवरच काढली. त्याची वाढ ख्रिश्चन धर्माच्या विचारसरणीत आणि त्यानुसार करावयाच्या वर्तनात झाली. हायस्कूल आणि नंतर कॉलेजच्या जीवनातही केन केसी हा एक विजेता कुस्तिगीर म्हणून नावाजलेला होता. याच काळात त्याचे फे हॅक्सबी या तरुणीशी प्रेम जुळले आणि दोघांनी ओरेगॉन इथे जाऊन विवाह केला. जोडप्याला तीन मुलेही झाली. 'स्पीच आणि कम्युनिकेशन' या विषयात केन केसीने पदवी प्राप्त केली आणि त्यातील यशामुळे त्याला स्टॅनफोर्ड विद्यापीठात क्रिएटिव्ह रायटिंग करण्यासाठी 'वुड्रो विल्सन फेलोशिप'ही मिळाली. या अभ्यासक्रमात त्याला रॉबर्ट स्टोन, लॅरी मॅकमर्फी, केन बॅब्स, वेन्डल बेरी असे मित्र भेटले, ज्यांनी पुढे केनसारखेच अमेरिकन साहित्यात नाव कमावले. अभ्यास चालू असतानाच केन विद्यापीठाच्या सायकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये उपजीविकेसाठी चार पैसे कमावण्याच्या दृष्टीने काम करू लागला. येथील प्रयोगात वापरल्या जाणार्‍या रसायनांचा - त्यातही सिलोसिबिन, मेस्कॅलिन आणि एल. एस. डी. यांसारख्या एरवी भयावह वाटू शकणार्‍या रसायनांचा मनोरुग्णांसाठी होणारा वापर त्याला खटकू लागला. त्याने मग डायरी लिहिण्याचे चालू केले. प्रयोगादाखल त्या प्रयोगशाळेत तो आता हरकाम्या म्हणूनही इकडेतिकडे हिंडू लागला होता. जणू काही चित्रपटातील त्या झाडूवाल्या मूकबधिर रेड इंडियनसारखाच. [पुढे 'वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट' ही कादंबरी चीफ ब्रॉमडेन हा रेड इंडियन सार्‍यांना सांगत आहे, अशा रीतीनेच लिहिली गेली.]

स्वतंत्रपणे पुढे लेखक म्हणून आयुष्याची सुरुवात करताना केन केसीने 'वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट' हीच कादंबरी १९६२मध्ये प्रकाशित केली आणि ती प्रसिद्ध होताच समीक्षक आणि वाचक या दोन्ही घटकांत चांगलीच लोकप्रिय ठरली. डेल वॅसेरमनने त्याचे नाटकात रूपांतर केले [यात रॅण्डेल मॅकमर्फीची प्रमुख भूमिका कर्क डग्लसने केली होती] आणि ते गाजलेही. पुढे मिलॉस फोरमन यानी १९७५मध्ये याच कथेला चित्रपटासाठी वापरले आणि ऑस्कर तसेच लोकप्रियता यांचा मानदंड याला मिळाला, ज्याचे रेकॉर्ड आजही अबाधित आहे असे मानले जाते.

या चित्रपटाने चांगले विरुद्ध वाईट या युद्धात जय कुणाचा, हा प्रश्न खरातर उभा केल्याचे दिसते. म्हणजे मनोरुग्णांना ताळ्यावर आणण्यासाठी शासनपातळीवर केल्या जाणार्‍या उपाययोजनांचे वाभाडे काढणे वा त्यातील दहशत क्रूर स्वरूपात पुढे आणणे हेच जर केन केसी आणि मायकेल डग्लस यांचे हेतू असतील तर नायक मॅकमर्फीचं शोचनीय मरण हे एक मोठे भांडवल लेखक व निर्मात्याने उभे केले, असे म्हणावे लागेल. वास्तविक अशी भूमिका समाजासमोर मांडणे चुकीचेच मानले गेले पाहिजे. चित्रपटावरील १९७५पासूनच्या सातत्यपूर्ण चर्चेनंतर मनोरुग्ण इस्पितळातील बर्‍याच अघोषित कारवायांवर नियंत्रण आले. त्यातही मोठ्या लोखंडी सळ्या असलेल्या सेल्सचे उच्चाटन होऊन रुग्णांना आपण कोठडीत आहोत, याचे भान येणार नाही याची काळजी अमेरिकन सरकारने घेतली. मात्र उपचारात नित्यनेमाने केमिकल्सचा वापर राहिलाच, शिवाय हिंस्र होणार्‍या रुग्णांना देण्यात येणारी शॉक ट्रीटमेंटही पूर्णपणे नाहीशी झाली नाही. त्याची तीव्रता मात्र कमी झाल्याच्या वार्ता प्रकाशित झाल्या. असे असले तरी प्रशासन आणि तेथील कर्मचारी हे नेहमी रुग्णांशी कठोरच वागतात, असे चित्र जनतेसमोर ठेवण्याचा प्रकार कधीही योग्य नाही, कारण 'वन फ्ल्यू…'मध्ये ज्याप्रकारे कर्मचारी आणि संचालक मंडळाचे वर्तन दाखविले गेले आहे, ते पाहता केन केसीने स्वत:चे रंग त्यात भरले आहेत, असे वाटणारा बराच मोठा वर्ग त्यावेळी होता.

खुद्द केन केसीचेही त्यापुढील आयुष्य अशा बेभरवशाच्याच वातावरणात व्यतीत झाल्याचे आढळून येते. त्याला ड्रग्ज सेवनाचे व्यसन लागले. 'समटाईम्स अ ग्रेट नोशन' नामक कादंबरीही त्याने १९६४मध्ये लिहिली. मित्रांबरोबर भटकंती करणे, स्थानिक वाद्यमेळ्यांसमवेत कार्यक्रम करणे आणि एल. एस. डी. तसेच अन्य ड्रग्जच्या टेस्ट्स करीत राहणे यांतच तो गुंतून गेला. पुढे अमेरिकन सरकारने एल. एस. डी.वर बंदी आणून तिचा वापर करणे बेकायदेशीर केले त्यावेळी केन केसी मेक्सिको राज्यात पळून गेला. तिथे त्याने आत्महत्येचे एक नाटकही रचले. नंतर गुपचूप जरी अमेरिकेत परतला, तरी त्यावेळी पोलिसांनी त्याला ड्रग्ज वापराबाबत अटक केली. पाच महिन्यांची शिक्षाही झाली. तुरुंगातील वातावरणाने मात्र त्याच्यावर परिणाम झाला आणि सुटकेनंतर 'प्लीजंट हिल' येथील शेतावर तो पत्नी आणि मुलांसह राहून जोडीने शिकवणीचेही काम करू लागला.

फुप्फुसाच्या कर्करोगाने त्याला गाठले आणि १० नोव्हेंबर २००१ रोजी त्याचे निधन झाले.

-अशोक पाटील

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

पाटील साहेब ! नोस्टालजिक केलंत. ! हा चित्रपट चार पाच वेळा पाहिला. पहावाच लागला ! यावर आधारीत "आकाशपक्षी" हे नाट्क आम्हाला राज्य - नाट्य करायचं होतं ना ! केलंच आम्ही ते शेवटी ! आमच्या औरंगाबादच्या "नाट्यरंग"नं हे धाडस केलं, आमचे परममित्र (आता कै) कुमार देशमुख यानं मराठी स्क्रीप्ट लिहिली होती. (मी ही त्यात वॉर्ड बॉय ची छोटीशी भूमिका केली होती). सगळं आठवलं बघा ! आता या नाटकाची फक्त संहिता तेव्हढी आहे माझ्या कडे !!!

प्रत्यक्ष चित्रच उभे करणारा ओघावता लेख! छान, मजा आली.

छान परिक्षण !
कांहीं सिनेमा आपल्याला नुसते भारावूनच टाकत नाहीत तर भेडसावतही रहातात. 'ककूज नेस्ट' हा त्यापैकीच एक.
कर्क डग्लस माझा आवडता अभिनेता पण मला वाटतं निकल्सनच्या डोळ्यातली मिष्कील, वेडसर झलक [ स्ट्रीक ऑफ मॅडनेस] त्याच्या या चित्रपटाच्या निवडीसाठी निर्णायक व सार्थही ठरली असावी.
पुनःप्रत्ययाचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.

खुप छान ओळख. मी आधी नकळत्या वयात पाहिला होता पण त्यावेळी खरेच आवडला नव्हता... आता म्हणावेसे वाटतेय, समजला नव्हता.

लेख आवडला नाही. चित्रपटाची संपूर्ण कथा लिहिण्यातच बरंच फूटेज वाया गेलं. अवांतर माहिती ठीकठाक, पण कथेतली किंवा चित्रपटातली तुम्हाला जाणवलेली/भावलेली सौंदर्यस्थळं उलगडून सांगितली असतीत तर लेखाला काहीएक पर्सनल टच आला असता. हे आयएमडीबीवर माहिती वाचल्यासारखं वाटतंय.

स्वाती_आंबोळे +१.
मी हा सिनेमा पाहिल्यावर अगदी २ दिवस त्याच विचारात होते, गारुड करतो हा सिनेमा मनावर, प्रचंड डीप्रेसिंग पण वाटले होते. त्यामुळे मलाही वाटले होते की त्यातली सौदर्यस्थळे, जॅक निकलसन च्या अभिनयाबद्दल किंवा एकूणात थोडं खोल काही लिहीलं असेल असं वाटलं, पण नुसतीच स्टोरी वाचायला मिळाली.

माझा आवडता अ‍ॅक्टर आणी चित्रपट सुद्धा. छान लिहिलंय.

छान लिहिलत मामा

छान लिहिलंय. सिनेमा बघितला एकदा, पण आता कादंबरी पण वाचावी :)

मस्त ओळख, बघायला हवा हा सिनेमा.

वा, अशोकजी - शीर्षक वाचूनच हा तुमचा लेख असणार याची खात्रीच वाटली.

फारच जबरदस्त सिनेमा आहे हा - किती गहिरा परिणाम करतो आपल्यावर ....

कथानक, अभिनय, दिग्दर्शन सगळेच अफाट ....

’वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट’ हा एकमेव असा चित्रपट आहे की तो सात-आठ मिनिटांचा एक प्रवास सोडल्यास साराच्या सारा हॉस्पिटलच्या एका वॉर्डमध्येच चित्रित केला गेला आहे. इतकेच नव्हे तर यातील कलाकारांचे कपडेही नित्याचेच. रुग्णांना तो नित्याचा फिकट निळा शर्ट-पॅण्टचा तर नर्सेसना त्यांचा पांढरा. अंतर्गत सजावट दाखविण्यासाठी कथेत वावच नाही. >>>>> यासारखे बरेच बारकावे या लेखात प्रकट केल्यामुळे लेख प्रचंड आवडला.

मी ही कादंबरी फार पूर्वी वाचली आहे, चित्रपट पाहिलेला नाही.कादंबरीचा विषयच सर्वकाळ भेडसावून टाकणारा आहे. अमेरिकेतले तत्कालीन कायदे,मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमधलं तत्कालीन वातावरण यापलीकडे जाणाऱ्या सार्वकालिक सत्यापर्यंत हा विषय जातो.
मनोरुग्णांचं आंतरिक जग आणि बाह्य जगातलं त्यांचं भयावह स्थान.
या शाश्वत वेदनेवरचा चित्रपट अंगावर येणारा असणारच.. अशोकजी, तुम्ही त्यावर विस्ताराने लिहिले आहे व त्याचा सर्वांगीण परिचय करून दिला आहे. पुन:प्रत्यय ,पूर्वपीठीका अशा दोन्ही उद्देशांची पूर्ती या वाचनातून होते.

लेख थोडा त्रोटक वाटला मला. चित्रपट मी पाहिलेला नाही, पहायला हवा आता. कथाबीज आणि चित्रपट बनवण्याबद्दल वाचूनही चित्रपट इतका प्रभावी का आहे ते नीटसे लक्षात आले नाही. तसेच अभिनयाची किंवा इतर तांत्रीक पारितोषके मिळण्याचे अनेक निकष चित्रपट पूर्ण करत असेल पण मिळकतीचे उच्चांक मोडले जाण्याइतका परिणाम साधण्याइतके चित्रपटात नक्की काय होते हे समजून घ्यायला आवडेल. कारण रूढार्थाने सर्व अभिरुचीच्या प्रेक्षकांना तितकाच आवडेल, खिळवून ठेवेल असा कथाविषय प्रथमदर्शनी तरी दिसत नाहीये पण तरीही तो पाहिला गेलाय आणि पाहिला जातोय, हे कसे काय असा प्रश्न पडला.

लेख चित्रपटाची ओळख करून देणार्‍या पठडीतला आहे, परिक्षण नव्हे असे वाटले. पण लेख उत्तम लिहिला आहेत. कादंबरी माझी अत्यंत आवडती आहे, सिनेमादेखील आहेच, पण कादंब्री खासच. तुमच्या लेखामुळे काहिंनी कादंब्री वाचली, चित्रपट पाहिला तरी मस्तच :)

<<<<<कांहीं सिनेमा आपल्याला नुसते भारावूनच टाकत नाहीत तर भेडसावतही रहातात. 'ककूज नेस्ट' हा त्यापैकीच एक.>>>.+१

मामा, भारी :)

लेख आवडला .. चित्रपट पहावा असं वाटत आहे ..

मामा, अतिशय सुंदर लेख.
खुप आवडला

लेख छान आहेच चित्रपट पाहिलेला नाही आणि कादम्बरी माहित सुद्धा नाही . आता फक्त अभिनय कसा झाला हे पहाण्याकरिता चित्रपट पाहीन.